Current Affairs of 4 September 2015 For MPSC Exams
चालू घडामोडी (4 सप्टेंबर 2015)
पंतप्रधान नरेंद्र मोदी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधणार :
- शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर आज (शुक्रवार) संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
- मागील वर्षीही शिक्षक दिनाच्या निमित्ताने पंतप्रधानांनी विद्याथी-शिक्षकांशी संवाद साधला होता.
- राजधानी दिल्लीमध्ये मानेकशा सभागृहात देशातील नऊ राज्यातील विद्यार्थ्यांशी ते व्हिडिओ-कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहेत.
- विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे संचलन विद्यार्थीच करणार आहेत.
- तसेच यावेळी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विशेष नाणेही प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
- तसेच कला उत्सवाच्या एका संकेतस्थळाचेही उद्घाटन करण्यात येणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
“स्मार्ट सिटी” योजनेंतर्गत 194 कोटी रुपये दिले :
- “स्मार्ट सिटी” योजनेंतर्गत आराखडा तयार करण्यासाठी केंद्रीय नगर विकास मंत्रालयाने 96 शहरांसाठी प्रत्येकी दोन कोटी रुपये या प्रमाणे 194 कोटी रुपये आज दिले.
- या योजनेत जाहीर झालेल्या 98 पैकी दिल्ली आणि चंडीगड या उर्वरित दोन शहरांना गृह मंत्रालयातर्फे लवकरच निधीचे वितरण केले जाणार आहे.
- राज्यांनी तीन महिन्यांत आपापल्या शहरांचे आराखडे सादर करावेत, असेही केंद्रातर्फे सांगण्यात आले आहे.
- तसेच “स्मार्ट सिटी” योजनेवर दिल्लीत आज झालेल्या कार्यशाळेत केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी हा निधी देण्याचे जाहीर केले.
- या योजनेत 98 शहरांची निवड या आधीच जाहीर केली होती.
- उत्तर प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील प्रत्येकी एक अशा दोन शहरांची निवड अद्याप बाकी आहे.
- महाराष्ट्रातील नवी मुंबई, नाशिक, ठाणे, बृहन्मुंबई, अमरावती, सोलापूर, नागपूर, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद आणि पुणे या दहा शहरांचा त्यात समावेश आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकराचे अनावरण येत्या दहा सप्टेंबरला :
- राज्यघटनाकारांचा पूर्णाकृती पुतळा जपानच्या कोसायान विद्यापीठात उभारण्यात आला आहे, त्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या दहा सप्टेंबरला करणार आहेत.
- तसेच आता जपानमध्येही डॉ. आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी जपानमधील वाकायामा सरकारबरोबर राज्य सरकारने सामंजस्य करार केला आहे.
- वाकायामामधील कोसायान या शहराला बाराशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डॉ. आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा कोसायान विद्यापीठाच्या प्रांगणात उभारला आहे, त्याचे अनावरण मुख्यमंत्री करतील.
“ब्रेकिंग न्यूज”च्या शोधात ट्विटरला सर्वाधिक पसंती :
- सोशल मिडियाच्या युगात “ब्रेकिंग न्यूज”च्या शोधात असलेल्या नेटिझन्सची ट्विटरला सर्वाधिक पसंती असल्याचे अलिकडेच करण्यात आलेल्या संशोधनातून समोर आले आहे.
- यासाठी अमेरिकन प्रेस इन्स्टिट्युट आणि ट्विटर यांनी संयुक्तपणे डीबी5 या संशोधन संस्थेच्या सहकार्याने सर्व्हे केला आहे.
- त्यामध्ये सोशल मिडियावरील 4,700 युजर्सच्या मुलाखती घेण्यात आल्या त्यातून ही माहिती समोर आली आहे.
- सर्व्हेक्षणात सहभागी झालेल्या युजर्सपैकी तब्बल 40 टक्के युजर्सनी “ब्रेक्रिंग न्यूज” पाहण्यासाठी मुख्य स्रोत म्हणून ट्विटरचा उपयोग करत असल्याचे सांगितले आहे.
- ट्विटरद्वारे पत्रकारांचे आणि लेखकांचे वाचन नियमितपणे वाचले जात असल्याचेही सर्वेक्षणातून समोर आले आहे.
- तसेच ट्विटरवरील बहुतेक युजर्स हे इतर माध्यम समूहांचे ग्राहक असल्याचेही संशोधनात म्हटले आहे.
‘स्वच्छ भारत अभियाना’तून विजयालक्ष्मी जोशी यांची स्वेच्छानिवृत्ती :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या ‘स्वच्छ भारत अभियाना’ला एक वर्ष पूर्ण होत नाही, तोच या अभियानाच्या प्रमुख विजयालक्ष्मी जोशी यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.
- गुजरात केडरच्या आयएएस असलेल्या विजयालक्ष्मी जोशी यांनी केंद्र सरकारकडे स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला होता.
- सरकारने त्यांचा अर्ज मंजूर केला आहे.
- विजयालक्ष्मी यांचे पतीही गुजरात केडरचे अधिकारी होते.
- तसेच त्यांनी यापूर्वीच स्वेच्छानिवृत्ती घेतली असून, ते अमेरिकेत स्थायिक झाले आहेत.
मॅट न लावण्याची उच्चस्तरीय समितीची शिफारस केंद्र सरकारने केली मान्य :
- भारतात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या विदेशातील संस्थात्मक गुंतवणूकदारांवर पूर्वलक्ष्यी प्रभावाने किमान पर्यायी कर (मिनीमम अल्टरनेट टॅक्स अर्थात मॅट) न लावण्याची उच्चस्तरीय समितीची शिफारस केंद्र सरकारने मान्य केली आहे.
- यामुळे विदेशी गुंतवणूकदारांना एप्रिल 2015 पासून हा कर द्यावा लागणार नाही.
- कायदा आयोगाचे अध्यक्ष न्या. ए. पी. शहा यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने ‘मॅट’ लागू करण्याबाबतचा आपला अंतिम अहवाल जुलैमध्ये सादर केला होता.
- त्यांच्या या शिफारसी सरकारने स्वीकारल्या आहेत.
- शहा समितीनुसार परदेशी गुंतवणूकदार संस्थांनी केलेल्या गुंतवणुकीवर मॅट लागू करण्यास कोणताही वैधानिक आधार नाही.
- या शिफारसी स्वीकारल्यामुळे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी) लवकरच तशी सूचना जारी करणार आहे.
- सीबीडीटीच्या नोटिसीनंतर विविध कोर्टांत सुरू असलेल्या मॅट केसेस रद्दबातल ठरवण्यात येतील.
अॅग्रोवन स्मार्ट व्हिलेज प्रकल्प :
- शेती क्षेत्रात जगात आघाडीवर असलेल्या इस्राईलची मदत घेऊन महाराष्ट्रातील निवडक पाच गावांमध्ये कृषिकेंद्रित ‘अॅग्रोवन स्मार्ट व्हिलेज’ साकारण्याचा संकल्प ‘अॅग्रोवन’ आणि डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनने केला आहे.
- शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ करणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
- निकष आणि अटी पूर्ण करणाऱ्या सर्व गावांना प्रकल्पात सहभागासाठी प्रस्ताव पाठवण्याची संधी आहे.
- प्रत्यक्ष पाहणी करून इस्राईलच्या तज्ज्ञांच्या मदतीने गावांची अंतिम निवड केली जाईल.
- जादा गावे पात्र ठरली, तर लॉटरी पद्धतीचा अवलंब केला जाईल.
- परदेशी गुंतवणुकीतून साकारला जाणारा हा कृषी प्रकल्प पूर्णपणे व्यावसायिक पद्धतीने चालवला जाईल.
- त्याचबरोबर सरकारच्या सहकार्याने गावात आवश्यक त्या पायाभूत सोयी-सुविधा पुरवण्याचेही नियोजन आहे.
- आपल्या गावाचा कायापालट करण्याबरोबरच शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवण्याची ही अनोखी आणि दुर्मिळ संधी ‘अॅग्रोवन’ उपलब्ध करून देत आहे.
- ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना ज्ञान-तंत्रज्ञान पुरवून सन्मानाने आणि प्रतिष्ठेने उभे करणे हा या प्रकल्पाचा गाभा आहे.