Current Affairs of 30 September 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (30 सप्टेंबर 2017)
वर्धा जिल्हा आरोग्य सेवेला राज्यस्तरीय ‘नॅक्स’ पुरस्कार :
- नागरिकांना अद्यावत आणि सुरळीत आरोग्य सेवा पुरविण्याकरिता वर्धा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला राज्यस्तरीय नॅक्स पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार जिल्ह्याचे आरोग्य आरोग्य अधिकारी आणि विभागाच्या आरोग्य उपसंचालकांनी स्वीकारला.
- ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जात्मक सेवा पुरविण्याकरिता हा पुरस्कार देण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली.
- ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्याकरिता शासनाच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च होत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना मोफत आरोग्य सेवा पुरविल्या जात आहे. ही आरोग्य सेवा पुरविण्याकरिता जिल्ह्यातील साहूर प्राथमिक आरोग्य केंद्र अग्रेसर असल्याने पुरस्काराकरिता केंद्राची निवड झाली आहे.
- तसेच येथे देण्यात येत असलेली सुविधा, प्रयोगशाळा नागरिकांकरिता महत्त्वाची ठरत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी पुणे येथे आयोजित एका बैठकीत स्वीकारला.
- साहुर प्राथमिक केंद्राप्रमाणे जिल्ह्यातील इतर आठ प्राथमिक आरोग्य केंद्र बनविण्यात येणार आहे. याकरिता खरांगणा, मांडगाव, अल्लीपूर, विजयगोपाल, कन्नमवारग्राम, सिंदी (रेल्वे) आणि हमदापूर येथील आरोग्य केंद्राची निवड करण्यात आली आहे. हे केंद्रही अद्यावत करण्यात येणार आहे. सध्या साहुर येथील आरोग्य केंद्राची निवड करण्यात आली आहे.
Must Read (नक्की वाचा):
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते टॉम अल्टर कालवश :
- बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि पद्मश्री पुरस्कार विजेते टॉम अल्टर यांचे 29 सप्टेंबर रोजी निधन झाले. ते 67 वर्षांचे होते.
- टॉम अल्टर यांनी 1976 मध्ये धर्मेंद्र यांची मुख्य भूमिका असलेल्या चरस या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
- शतरंज के खिलाडी, गांधी, क्रांती, बोस:द अनफरगॉटन हिरो आणि वीर झारा यासारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारली.
- मात्र जबान संभालके (1993–1997) या शो (सिटकॉम) नंतर ते बॉलिवूडमध्ये प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यांनी 300हून अधिक चित्रपटामध्ये अभिनय केला.
- 1980 ते 90 च्या कालावधीत टॉम अल्टर यांनी क्रीडा पत्रकार म्हणूनही काम केले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी टीव्हीसाठी त्याची मुलाखत घेणारे टॉम अल्टर पहिले पत्रकार होते.
- टॉम अल्टर यांनी तीन पुस्तकेही लिहिली आहेत. तसेच, चित्रपट आणि कलेच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल 2008 मध्ये भारत सरकारकडून त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
भैयाजी जोशी पदावर कायम राहणार :
- देशाच्या सत्तापक्षाचे दोर हाती असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीत अत्यंत महत्त्वाची असलेली कार्यकारी मंडळ बैठक तोंडावर आली असताना क्रमांक दोनच्या पदावरील सरकार्यवाह सुरेश ऊर्फ भैयाजी जोशी यांना विश्रांती दिली जाण्याची चर्चा असली, तरी भोपाळ बैठकीत तसा काहीही निर्णय होणार नाही, असे सूत्रांनी स्पष्टपणे सांगितले.
- मात्र, या बैठकीत कामगारवर्गाला सामाजिक सुरक्षा देण्याबाबतच्या प्रस्तावित विधेयकाबाबत चर्चा होईल. अर्थव्यवस्थेच्या दुरवस्थेवरून सरकारवर टीकास्त्र सोडणाऱ्या भारतीय मजदूर संघाने मोदी सरकारकडे ही मागणी लावून धरली आहे. याच बैठकीत देशभरातील प्रचारकांच्या बदल्या, भाजप संघटनमंत्र्यांच्या रिक्त जागांवरील नियुक्त्या व एखादा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.
- गेली सहा वर्षे (दोन टर्म) सरकार्यवाह पदावर असलेले जोशी हे गेली दोन-तीन वर्षे प्रकृती अस्वास्थ्याशी झगडत आहेत. प्रथम डोळ्यांच्या व नंतर पायांच्या दुखण्याने त्यांना सतावले. मात्र, आता त्यांची प्रकृती पूर्ण बरी असून, लवकरच त्यांचा प्रवासही सुरू होईल असे सूत्रांनी सांगितले. त्यांनी इच्छा व्यक्त केली तरच त्याच्या निवृत्तीवर विचार होऊ शकतो. मात्र, जोशी आणि वर्तमान सरसंघचालकांदरम्यान असलेला उत्तम संवाद पाहता ती शक्यताही दिसत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
बाजार समित्यांचा उत्कृष्ट व्यवस्थापनाचा गौरव :
- पुणे येथील महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या वतीने पुणे येथील झांबरे सभागृहात राज्यातील बावीस बाजार समित्यांचा उत्कृष्ट प्रशासन व व्यवस्थापनाचे काम केल्याने गौरव करण्यात आला. त्यात साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीचाही समावेश होता.
- राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचा माल खरेदी केला जातो. स्थानिक शेतकऱ्यांना गांवालगतच्या बाजार समित्यांमुळे शेतमाल विकता येतो. यात उत्कृष्ट प्रशासन व व्यवस्थापनाचे उल्लेखनीय काम करणा-या बाजार समित्यांचा राज्य बाजार समिती महासघांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सहकार, पणन व वस्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते राज्यातील बावीस बाजार समित्यांचा सन्मान चिन्ह,प्रशिस्त पत्र,शाल,श्रीफळ देऊन गौरव झाला.
- सत्कार समित्यांचे सभापती, उपसभापती व पदाधिकाऱ्यांनी स्विकारला. साक्री बाजार समितीचे सभापती पोपटराव सोनवणे यांचा मंत्री श्री. देशमुख यांच्या हस्ते गौरव झाला.
- महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी महासघांचे अध्यक्ष दिलीपराव मोहिते-पाटील, माजी आमदार केशवराव मानकर, गजाननराव घुगे, साक्री शेतकरी सहकारी संघाचे सभापती विलासराव बिरारीस उपस्थित होते.