Current Affairs of 29 September 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (29 सप्टेंबर 2017)
माणिक भिडे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर :
- राज्य सरकारतर्फे भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीतासाठी दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ गायिका माणिक भिडे यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी ही घोषणा केली.
- शास्त्रीय गायन व वादन या क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकारास या पुरस्काराने गौरवले जाते. पाच लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
- तावडे यांच्या अध्यक्षतेखालील पं. केशव गिंडे, पं. नाथराव नेरळकर, कमलताई भोंडे यांच्या समितीने या पुरस्कारासाठी अत्रोली घराण्यातील (जयपूर) भिडे यांची शिफारस केली होती. यापूर्वी किशोरी आमोणकर, पं. जसराज, प्रभा अत्रे, पं. राम नारायण, परवीन सुलताना यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
- 1935 मघ्ये कोल्हापूरला जन्मलेल्या भिडे यांना आई-वडिलांकडून अभिजात संगीत शिकण्यास प्रोत्साहन मिळाले. अत्रोली घराण्याचे आद्यपुरुष उस्ताद अल्लादियॉं खॉं यांचे पुत्र उस्ताद मजी खॉं आणि भूर्जी खॉं साहेब यांची तालीम लाभलेले मधुकरराव सडोलीकर हे भिडे यांना गुरू म्हणून लाभले.
Must Read (नक्की वाचा):
केंद्र सरकारकडून 5G तंत्रज्ञानासाठी समिती स्थापन :
- भारतात झपाट्याने झालेल्या मोबाईल फोन्सच्या क्रांतीमुळे लोकांचे जगणे सुसह्य झाले आहे. सध्याचा 4Gचा जमाना आहे.
- मात्र, आता हे तंत्रज्ञान आणखी वेगवान होणार असून 2020 पर्यंत देशात 5G सेवा सुरु करण्यात येणार आहे.
- केंद्र सरकारने यासंदर्भात एका समितीची स्थापना केल्याची घोषणा केली. ही समिती या नव्या तंत्रज्ञानाचा आराखडा तयार करणार आहे.
- दूरसंचार राज्यमंत्री मनोज सिन्हा म्हणाले, या नव्या तंत्रज्ञानाची ध्येय-धोरणे ठरवण्यासाठी आम्ही 5G समितीची निर्मिती केली आहे.
- टेलिकॉम विभागातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, 5G तंत्रज्ञानाच्या विस्तारासाठी केंद्र सरकार 500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देणार आहे. या तंत्रज्ञानातील संशोधनासाठी आणि प्रॉडक्ट डेव्हलपमेंटसाठी या पैशाचा वापर करण्यात येणार आहे.
- 5G तंत्रज्ञानांतर्गत सरकारने शहरी भागात 10 हजार एमबीपीएस या वेगाने डेटा पुरवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तर ग्रामीण भागात 1 हजार एमबीपीएस वेगाने डेटा पुरवण्यात येणार आहे.
- 5G सेवेच्या या समितीत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, टेलिकॉम विभाग, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातील सचिवांचा समावेश असणार आहे.
पुष्पा पागधरे यांना ‘गानसम्राज्ञी’ पुरस्कार जाहीर :
- राया मला पावसात नेऊ नका, राया मला जरतारी शालू आणा, आला पाऊस मातीच्या वासात, मैत्रिणींनो थांबा थोडं, खुशाल मागनं हसा, अगं पोरी संबाळ दर्याला तुफान आयलंय भारी अशी असंख्य लोकप्रिय ठरलेली गाणी आपल्या आगळ्या आवाजात गाणा-या गायिका पुष्पा पागधरे यांना राज्य सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला.
- सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी ही घोषणा केली. ‘इतनी शक्ती हमें देना दाता…’ हे त्यांचे गाणेही खूपच गाजले.
- लता मंगेशकर यांच्या वाढदिवशीच हा पुरस्कार जाहीर करण्यात येतो. गायन व संगीत क्षेत्रात मोलाचे योगदान देणार्या कलाकारास हा पुरस्कार दिला जातो. रोख 5 लाख रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह असा हा पुरस्कार आहे. समितीने पुष्पा पागधरे यांच्या नावाची शिफारस केली.
- तसेच यापूर्वी हा पुरस्कार माणिक वर्मा, श्रीनिवास खळे, गजानन वाटवे, दत्ता डावजेकर, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. हदयनाथ मंगेशकर, ज्योत्स्ना भोळे, आशा भोसले, अनिल विश्वास, सुधीर फडके, प्यारेलाल, रवींद्र जैन, स्नेहल भाटकर, मन्ना डे, जयमाला शिलेदार, खय्याम, महेंद्र कपूर, सुमन कल्याणपूर, सुलोचना चव्हाण, यशवंत देव, आनंदजी शहा, अशोक पत्की, कृष्णा कल्ले, प्रभाकर जोग, उत्तम ब्रीदपाल सिंग यांना प्रदान करण्यात आला आहे.
क्रीडा मंत्रालयाकडून 23 खेळाडूंचा सन्मान :
- रिओ ऑलिम्पिक, पॅराऑलिम्पिक आणि महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा या तीन स्पर्धामधील उल्लेखनीय खेळाडू व त्यांचे क्रीडा मार्गदर्शक तसेच महाराष्ट्र राज्यातील सहभागी खेळाडू अशा एकूण 23 जणांचा राज्य सरकारतर्फे 28 सप्टेंबर रोजी रोख पारितोषिके देऊन शानदार सत्कार करण्यात आला.
- सह्याद्री अतिथिगृह येथे क्रीडामंत्री विनोद तावडे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. या सत्कारामुळे अन्य खेळाडूंनाही प्रेरणा मिळेल, असा विश्वास तावडे यांनी व्यक्त केला.
- रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक (50 लाख), तिचे मार्गदर्शक कुलदीप सिंग (25 लाख), अॅथलेटिक्सपटू ललिता बाबर (75 लाख), तिचे मार्गदर्शक भास्कर भोसले (25 लाख), नौकानयनपटू दत्तू भोकनळ (50 लाख), हॉकीपटू देविंदर वाल्मीकी (50 लाख), मॅराथॉनपटू कविता राऊत (50 लाख), नेमबाज आयोनिका पॉल (50 लाख), टेनिसपटू प्रार्थना ठोंबरे (50 लाख) यांचा सत्कार करण्यात आला.
- तसेच रिओ येथे झालेल्या पॅराऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले खेळाडू उंचउडीपटू मरियप्पन थंगावेलू (एक कोटी), त्याचे मार्गदर्शक सत्यनारायण (25 लाख), भालाफेकपटू देवेंद्र झझारिया (एक कोटी), त्याचे मार्गदर्शक सुनील तन्वर (25 लाख), गोळाफेकपटू दीपा मलिक (75 लाख), तिचे मार्गदर्शक वैभव सरोही (18.75 लाख), उंचउडीपटू वरुण भाटी (50 लाख), त्याचे मार्गदर्शक सत्यनारायणा (12.50 लाख), जलतरणपटू सुयश जाधव (50 लाख) यांचाही रोख पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला.
- आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पध्रेमध्ये भारतीय संघाने उपविजेतेपद मिळवले. या संघातील महाराष्ट्राच्या क्रिकेटपटू मोना मेश्राम, पूनम राऊत आणि स्मृती मानधना यांनी प्रत्येकी 50 लाख रुपये तसेच संघ व्यवस्थापिक तृप्ती भट्टाचार्य (10 लाख), फिजोओथेरेपिस्ट रश्मी पवार (10 लाख) व सायकलपटू ओमकार जाधव (6 लाख) यांचाही सन्मान करण्यात आला.
भारताचे बॅडमिंटनपटू जागतिक क्रमवारीत अव्वल 25 मध्ये :
- जपान ओपन सुपर सिरीज भारतीय बॅडमिंटनपटूंना अपेक्षित यश मिळाले नाही, तरीही भारताच्या पाच पुरुष बॅडमिंटनपटूंनी जागतिक क्रमवारीत अव्वल पंचवीसमध्ये स्थान मिळवले आहे.
- भारतीय बॅडमिंटन म्हणजे पी.व्ही. सिंधू, साईना नेहवालच नव्हे हेच पुरुष खेळाडू दाखवून देत आहेत. जपान स्पर्धेत सिंधू आणि साईना दुसऱ्या फेरीतच पराजित होत असताना श्रीकांत किदांबी आणि एच.एस. प्रणॉयने उपांत्यपूर्व फेरी गाठली. या कामगिरीमुळे त्यांनी 5 हजार 40 गुण मिळवले. श्रीकांतने गतवर्षीही उपांत्यपूर्व फेरी गाठली होती, त्यामुळे त्याने हे गुण राखले आहेत. त्यामुळे तो जागतिक क्रमवारीत 58 हजार 583 गुणांसह आठव्या क्रमांकावर कायम आहे.
- प्रणॉय गतवर्षी दुसऱ्या फेरीत पराजित झाला होता. पण प्रतिस्पर्ध्यांनी सरस कामगिरी केल्यामुळे तो 47 हजार 295 गुणांसह एकोणीसावा झाला आहे. बी.साई प्रणीत 48 हजार 360 मानांकन गुणांसह सतरावा आहे, तर अजय जयराम 45 हजार 835 मानांकन गुणांसह विसावा आहे. समीर वर्माची प्रगती कायम आहे. त्यानेच या क्रमवारीत भारतीयात सर्वोत्तम प्रगती केली आहे. त्याने चार क्रमांकाने प्रगती केली आहे. तो आता 21 वा आहे. त्याचे मानांकन गुण 44 हजार 642 आहेत. समीरने जपान स्पर्धेत प्रभावी कामगिरी केली होती.
दिनविशेष :
- हमीद दलवाई – (29 सप्टेंबर 1932 (जन्मदिन) – 1977 (स्मृतीदिन)) हे मुस्लिम समाजसुधारक, मराठी साहित्यिक होते. मुस्लिम समाजसुधारणेच्या उद्देशाने त्यांनी मुस्लिम सत्यशोधक मंडळ स्थापन केले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा