Current Affairs of 29 December 2015 For MPSC Exams
चालू घडामोडी (29 डिसेंबर 2015)
काश्मीरमधील शाळा होणार “स्मार्ट’ :
- तंत्रज्ञानातील भविष्यातील आव्हान पेलविण्यासाठी जम्मू-काश्मीरमधील शाळांमध्ये संगणकाद्वारे शिक्षण देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने राज्यातील 220 शाळा ‘स्मार्ट‘ होणार असून, 132 शाळांमध्ये व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचा निर्णय सरकारने आज जाहीर केला. पुढील वर्षी मार्च महिन्यापासून हा निर्णय लागू होणार आहे.
- राज्याच्या शिक्षण व सांस्कृतिकमंत्री प्रिया सेठी यांनी याबाबत माहिती दिली. संपूर्ण राज्यातील शाळांमधील अध्यापन व अध्ययन संगणकाद्वारे होणार आहे. या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यात 220 शाळांमध्ये “ई-लर्निंग‘ सुरू होणार आहे. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण मोहीम आणि माहिती व दळणवळण तंत्रज्ञानांतर्गत केंद्र सरकारने संगणक कक्षासह “स्मार्ट क्लासरुम‘साठी मंजुरी दिली आहे. याची पूर्वतयारी झाली असून, “नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी‘ आणि राष्ट्रीय शिक्षण मोहिमेच्या राज्य प्रकल्प अधिकाऱ्यांमध्ये समझोता करार होणार आहे, असे सेठी यांनी सांगितले.
- राज्यातील 132 शाळांमध्ये व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट असून, माहिती तंत्रज्ञान, पर्यटन, आरोग्य व रिटेल व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येईल. यासाठी राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाशी करार करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 440 शाळांमध्ये ही योजना सुरू करण्यात येणार आहे, असे सेठी म्हणाल्या.
Must Read (नक्की वाचा):
‘जीएसटी’ पुढील वर्षी :
- ‘बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित वस्तू आणि सेवा कर विधेयक (जीएसटी) 2016 मध्येच लागू होईल,‘ याचा पुनरुच्चार केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला. राज्यसभेत हे विधेयक मंजूर होण्यासाठी ‘कॉंग्रेसच्या सतत संपर्कात‘ असल्याचेही जेटली यांनी सांगितले.
- “संसदेच्या पुढील अधिवेशनामध्ये ‘जीएसटी‘ मंजूर होईल, अशी आशा आहे. शेवटी, हे विधेयक कॉंग्रेसनेच मांडले होते. राजकीय हेतूंमुळे त्यांनी आता या विधेयकाची अडवणूक सुरू केली आहे; पण हे धोरण कॉंग्रेस अनंतकाळ राबवू शकत नाही. मी सतत त्यांच्या संपर्कात आहे. विधेयक मंजूर करण्यासाठी कॉंग्रेसच्या संपर्कात राहणे, हे माझे काम आहे आणि ते मी करत राहीन,‘‘ असे जेटली यांनी सांगितले.
- देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने फायदेशीर आणि करप्रणालीचा किचकटपणा दूर करणारे ‘जीएसटी‘ विधेयक गेली अनेक वर्षे राजकीय विरोधामुळे संसदेत प्रलंबित आहे. कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘यूपीए‘ सरकारच्या काळात तत्कालीन विरोधक भाजप आणि इतर पक्षांनी या विधेयकास विरोध केला होता. आता केंद्रात सत्तांतर झाल्यानंतर ‘एनडीए‘ सरकारने मांडलेल्या स्वरूपात या विधेयकास मंजुरी न देण्याचे धोरण कॉंग्रेसने स्वीकारले आहे.
- येत्या 1 एप्रिलपासून देशभरात ‘जीएसटी‘ लागू करण्याचा केंद्र सरकारचा मानस होता. मात्र, हिवाळी अधिवेशनामध्येही कॉंग्रेसने कामकाज न होऊ दिल्याने राज्यसभेत हे विधेयक मंजूर होऊ शकले नाही. त्यामुळे या विधेयकाच्या भवितव्याविषयी विचारले असता जेटली म्हणाले, “हे विधेयक प्राप्तिकरासारखे नाही. त्यामुळे नव्या आर्थिक वर्षाच्या सुरवातीपासूनच ते लागू केले पाहिजे, असे बंधन नाही. हा व्यवहारांवरील कर आहे. तो आर्थिक वर्षात कधीही सुरू करता येऊ शकतो.‘‘
आंध्र प्रदेश सरकारचा “मायक्रोसॉफ्ट’बरोबर करार :
- आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्टबरोबर आंध्र प्रदेश सरकारने सामंजस्य करार केला असून, या माध्यमातून मायक्रोसॉफ्ट कंपनी विशाखापट्टणम येथे मोठी गुंतवणूक करणार आहे.
विशाखापट्टणम येथे मायक्रोसॉफ्टतर्फे “सेंटर ऑफ एक्सलन्स‘ सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आंध्र प्रदेश सरकारतर्फे आज देण्यात आली. यासाठी “मायक्रोसॉफ्ट‘चे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्य नाडेला भारतात दाखल झाले असून, त्यांनी आज आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांची हैदराबाद येथे भेट घेतली.
- मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये आंध्र प्रदेश सरकार आणि “मायक्रोसॉफ्ट‘मध्ये सामंजस्य करार झाला. मुख्यमंत्री नायडू आणि नाडेला यांची बैठक जवळपास 80 मिनिटे चालली. राज्य सरकारच्या विविध सेवा आणि योजनांच्या अंमलबजावणीसाठी साह्य करण्याचेही “मायक्रोसॉफ्ट‘ने या वेळी मान्य केले.
या सामंजस्य करारानुसार शिक्षण, शेती आणि ई-सिटिझन या क्षेत्रामधील विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी “मायक्रोसॉफ्ट इंडिया‘ सहकार्य करणार आहे. याशिवाय, उत्पादकता वाढविण्यासाठी प्रशासनातील काही अधिकाऱ्यांना “मायक्रोसॉफ्ट‘कडून प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
मार्टिन गप्टीलच्या 30 चेंडूत 93 धावा :
- मार्टिन गप्टीलच्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने श्रीलंकेचे 117 धावांचे लक्ष्य अवघ्या 8.2 षटकात पूर्ण केले आणि दहागडी राखून दणदणीत विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या श्रीलंकेचा डाव न्यूझीलंडच्या भेदक गोलंदाजीसमोर अवघ्या 117 धावात संपुष्टात आला. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या सलामीवीर गप्टीलने श्रीलंकन गोलंदाजांचा अक्षरक्ष पालापाचोळा केला.
- पहिल्या चेंडूपासून गप्टील श्रीलंकन गोलंदाजांवर तुटून पडला. त्याने 30 चेंडून नाबाद 93 धावा तडकवल्या. या त्याच्या खेळीत नऊ चौकार आणि आठ षटकाराचा समावेश होता. समोरच्या टोकाकडून फलंदाजी करणा-या लॅथमने नाबाद 17 धावा केल्या. त्यावरुन गप्टीलच्या वादळी खेळीची कल्पना येते.
- गप्टीलने 13 चेंडूत 46 धावा फटकावल्या. तेव्हा तो दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिविलियर्सचा 16 चेंडूतील अर्धशतकाचा विक्रम मोडण्याच्या जवळ होता. मात्र त्याने नुवान कुलसेखराचे दोन यॉर्कर खेळून काढले. गप्टीलला तो अर्धशतकाच्या विक्रमाच्याजवळ आहे याची कल्पनाच नव्हती. माझ्या विक्रमापेक्षा संघ जिंकला याचा आनंद आहे असे गप्टीलने सांगितले.
महिला स्मोकर्समध्ये भारत दुस-या स्थानावर :
- भारतात सिगारेट ओढणा-यांची संख्या झपाटयाने कमी होत असली तरी, महिलांचे धुम्रपान करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. धुम्रपान करणा-या महिलांमध्ये अमेरिकेपाठोपाठ भारत दुस-या स्थानावर आहे.
- धुम्रपानासंबंधी आरोग्य मंत्रालयाने संसदेत दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार 2014-15 मध्ये 93.2 अब्ज सिगारेटची विक्री झाली. 2012-13 च्या तुलनेत सिगारेट विक्रीमध्ये 10 अब्जने घट झाली आहे.
- 2014-15 मध्ये सिगारेटच्या उत्पादनातही 117 अब्जवरुन 105.3 अब्जपर्यंत घसरण झाली आहे.
- भारतात धुम्रपान करणा-यांचे प्रमाण कमी होत आहे ही समाधानाची बाब असली तरी, दुसरी गंभीर बाब म्हणजे भारतात महिला धुम्रपानाची संख्या वाढली आहे. 1980 मध्ये भारतात धुम्रपान करणा-या महिलांचे प्रमाण 53 लाख होते. 2012 मध्ये हेच प्रमाण 1 कोटी 27 लाख झाले आहे. जागतिक तंबाखू सेवनाच्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.