Current Affairs of 27 October 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (27 ऑक्टोबर 2017)

चालू घडामोडी (27 ऑक्टोबर 2017)

राज्यात 15 डिसेंबरपासून उडान योजना :

 • उडान योजनेतंर्गत मुंबई विमानतळाहून नाशिकसह राज्यांतील अन्य शहरांमध्ये विमानसेवा सुरू करण्यासाठी निश्चित वेळ (टाइम स्लॉट) देण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी नागरी विमान वाहतूक मंत्रालयालवर मोठा मोर्चा काढला. त्या दणक्यापुढे नमून मंत्रालयाने 15 डिसेंबरपासून नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, जळगाव आणि सोलापूरला मुंबईहून विमानसेवा सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले.
 • गोडसे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे पाचशेहून अधिक शिवसैनिकांनी सफदरजंग परिसरातील मंत्रालयावर मोठा मोर्चा काढला. त्यामध्ये मराठी व हिंदीमधून घोषणा दिल्या जात होत्या. सगळे वातावरण भगवे झाले होते. त्यात नाशिकहून आलेले काही जण होते, तर उर्वरित कार्यकर्ते दिल्ली, उत्तर प्रदेश बिहार व पंजाबमधील होते.
 • तसेच गोडसे गेल्या तीन-चार महिन्यांपासून प्रकरणाचा पाठलाग करीत होते. अगदी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून मंत्रालयातील वरिष्ठांना वारंवार निवेदने दिली होती. प्रत्यक्षात भेटीगाठी घेतल्या होत्या. पण तेव्हा त्यांना दाद न देणारया मंत्रालयातील बाबूंनी मोर्चाच्या दणक्यानंतर लगेगच लेखी पत्र दिले.
 • नाशिकसह महाराष्ट्रातील चार शहरांमध्ये विमानसेवा सुरू करण्यासाठी मुंबई विमानतळावर निश्चित वेळ (टाइम स्लॉट) देण्याचे आश्वासन आहे.

देशातील ऐतिहासिक वारशांच्या देखभाली आता कंपन्यांकडे :

 • पर्यटन मंत्रालयाच्या ‘वारसा दत्तक योजने’ अंतर्गत 14 स्मारकांच्या देखभालीसाठी 7 कंपन्यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.
 • दिल्लीत आयोजित ‘पर्यटन पर्व’ या उपक्रमात या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. भविष्यात या कंपन्या ‘स्मारक मित्र’ म्हणून कार्यरत राहणार आहेत. यात दिल्लीतील जंतरमंतरच्या देखभालीसाठी ‘एसबीआय फाऊंडेशन’चे नाव निश्चित करण्यात आले आहे.
 • कोणार्क मधील सुप्रसिद्ध सुर्यमंदिर, भुवनेश्वरमधील राजा-राणी मंदिर आणि ओडिशामधील रत्नागिरी स्मारकाच्या देखभालीचे काम ‘टी. के. इंटरनॅशनल लिमिटेड’ला सोपवण्यात येणार आहे.
 • कर्नाटक मधील हंपी, जम्मू-कश्मीर मधील लेह पॅलेस, दिल्लीतील कुतुबमिनार आणि महाराष्ट्रातील अजिंठा लेण्यांच्या देखभालीची जबाबदारी ‘यात्रा ऑनलाईन प्रा.लि.’कडे सोपवण्यात येणार आहे.
 • कोचीमधील मत्तान चेरी पॅलेस संग्रहालय आणि दिल्लीतील सफदरगंज मशिदीची देखभाल ‘ट्रॅव्हल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ करणार आहे.
 • गंगोत्री मंदिर क्षेत्र आणि गोमुख तसेच जम्मू-कश्मीरमधील माऊंट स्टोकंग्रीच्या देखभालीची जबाबदारी ‘ॲडव्हेंचर टुर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडिया’ करणार असून, दिल्लीतील अग्रसेन की बावलीची देखभाल ‘स्पेशल हॉलिडेज ट्रॅव्हल प्रा. लि.’ करणार आहे.
 • तसेच दिल्लीमधील पुराना किला या वास्तुच्या देखभालीसाठी एनबीसीसीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये 70 नवीन शब्दांचा समावेश :

 • जगाच्या पाठीवरील भाषिक आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीची दखल घेत सातत्याने नव-नवीन शब्दांची ओळख करून देणा-या ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीच्या नव्या आवृत्तीत तेलगू, उर्दू, तामिळ, हिंदी आणि गुजराती या भारतीय भाषांतील 70 नवीन शब्दांचा समावेश केला आहे.
 • ‘अण्णा, अब्बा, अच्छा, बापू, बडा दिन, सूर्यनमस्कार, बच्चा’ यासह नातेसंबंध, संस्कृती व खाद्यपदार्थांशी संबंधित भारतीय भाषांतील 70 नवीन शब्दांचा महिनाभरापूर्वीच ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीच्या ताज्या आवृत्तीत समावेश करण्यात आला आहे.
 • ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीत भारत व पाकिस्तानचे चलन एकक म्हणून ‘आणा’ हा शब्द आधीच या डिक्शनरीत अस्तित्वात आहे. आता तेलगू आणि तामिळ भाषेत थोरल्या भावाचा आदराने उल्लेख करणार्‍या ‘अण्णा’ या शब्दाचाही (नाम) समावेश करण्यात आला आहे.
 • ‘भारतीय इंग्लिश’ यावर डॅनिका सॅलझर (ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी-संपादक) यांनी म्हटले आहे की, यापूर्वी ऑक्सफर्ड डिक्शनरीत भारतीय भाषांतील 900 शब्दांचा समावेश होता. आता आणखी नवीन 70 शब्दांचा समावेश करण्यात आला आहे.
 • एकूण एक हजार शब्द समाविष्ट 2017 सप्टेंबरमध्ये ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीत 1000 नवीन शब्द, अर्थ आणि रूपांचा समावेश करण्यात आला आहे, असे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने नवीन शब्दांच्या समावेशासंदर्भातील टिपणात म्हटले आहे.

थायलंडच्या राजाला नागपुरात श्रद्धांजली :

 • थायलंडचे राजे भूमीबोल आदुलादेलज यांचे गेल्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल विविध देशांमध्ये श्रद्धांजली सभा घेण्यात येत आहे. नागपुरातही बौद्ध बांधवांतर्फे 26 ऑक्टोबर रोजी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
 • अहल्याबाई होळकर बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्यावतीने वसंतराव देशपांडे सभागृह सिव्हील लाईन्स येथे श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, सिनेअभिनेते गगन मलिक, लॉर्ड बुद्धा टीव्हीचे संचालक भय्याजी खैरकर, नितीन गजभिये यांच्यासह बौद्ध भिक्खू संघ सहभागी झाले होते. यावेळी राजे भूमीबोल यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला.
 • थायलंडचे राजे भूमीबोल आदुलादेलज यांनी आपले संपूर्ण जीवन जनतेच्या कल्याणासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी वेचले, त्यांनी एका अविकसित देशाला विकासनशील देशाच्या रांगेत उभे केले.
 • तसेच थायी जनतेचे त्यांच्यावर विलक्षण प्रेम होते. त्यामुळे त्यांच्या निधननंतर एक वर्षाचा राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला होता.

सरकारतर्फे स्टार्टअप्ससाठी तेल आणि वायू क्षेत्राची कवाडे खुली :

 • ऊर्जेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी तेल आणि वायू क्षेत्रातील ऊर्जा बचत आणि संवर्धन करणाऱ्या नव उद्योजकांना (स्टार्टअप) सरकार भक्कम प्रोत्साहन देणार आहे.
 • तेल आणि वायू क्षेत्राची कवाडे खुली करून देत सरकारने या क्षेत्रातील सार्वजनिक कँपन्यांच्या माध्यमातून स्टार्टअप्ससाठी 320 कोटींची तरतूद केली आहे.
 • पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 26 ऑक्टोबर रोजी मुंबईत हायड्रोकार्बन परवाने आणि तसेच स्टार्टअप्सविषयी घेतलेल्या परिषदेत ही माहिती दिली.
 • भारतात गेल्या दोन वर्षात स्टार्टअप इकोसिस्टिम विकसित झाली आहे. दररोज तीन ते चार नवे स्टार्टअप उदयास येत असून त्यांची एकूण संख्या साडे चार हजारांच्या आसपास आहे. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअप्स मोठ्या संख्येने कार्यरत आहेत.
 • स्टार्टअप्समधील नाविन्यपूर्ण उपाययोजनांचा ऊर्जा क्षेत्रामध्येही सक्रिय वापर करून घ्यावा यादृष्टीने केंद्र सरकारने विशेष उपक्रम सुरू केला आहे.
 • तेल आणि वायू क्षेत्रातील 10 सार्वजनिक उपक्रमांना पहिल्या टप्प्यात 30 स्टार्टअपची निवड करण्यास सांगितले आहे.
 • तीन वर्षांच्या या योजनेसाठी एकूण 320 कोटींचा निधी राखून ठेवण्यात आला आहे. यावेळी उत्खनन आणि परवाना धोरणानुसार निविदेचा दुसरा टप्पा पार पडला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.