Current Affairs of 26 October 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (26 ऑक्टोबर 2017)

चालू घडामोडी (26 ऑक्टोबर 2017)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे होणार संयुक्त पूर्व परीक्षा :

 • सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षकपदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा घेतल्यानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) गट ‘क’ पदांसाठीही हाच ‘फॉर्म्युला’ वापरण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसाही वाचणार आहे.
 • गट ‘ब’ अराजपत्रित संवर्गातील सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक या पदांसाठी 2016 पर्यंत वेगवेगळ्या पूर्व परीक्षांचे आयोजन केले जात असे. आयोगाने या तीन पदांसाठी एकत्र पूर्वपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणीही केली; परंतु या पदांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या लक्षात घेता अभ्यासक्रमाच्या आधारे प्रत्येक पदासाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा होणार आहे. डिसेंबरच्या शेवटी तसेच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या परीक्षा होतील.
 • तसेच हा ‘फॉर्म्युला’ यशस्वी झाल्यामुळे आयोगाने आता गट ‘क’ पदांसाठीही याच पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, कर सहायक व बृहन्मुंबईतील विविध शासकीय कार्यालयांतील लिपिक-टंकलेखक या संवर्गातील पदे भरण्यासाठी 2018 पासून संयुक्त पूर्वपरीक्षा होणार आहे. त्यात जाहिरातीला अनुसरून अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ते यापैकी एक, दोन किंवा तीनही पदांसाठी बसू इच्छितात काय, याचा विकल्प (ऑप्शन) भरून घेण्यात येईल.
 • भरावयाच्या पदसंख्येच्या आधारे संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्‍चित केली जाईल.
 • पूर्वपरीक्षेचे निकाल मात्र स्वतंत्र जाहीर करण्यात येतील. मुख्य परीक्षाही प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्र घेतली जाईल.
 • तसेच मुख्य परीक्षेबाबतचे सविस्तर निवेदन आयोगातर्फे लवकरच जाहीर होणार आहे.

सरकारकडून भारतमाला योजनेची घोषणा :

 • तब्बल 35 हजार किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्यासाठी 5 लाख 35 हजार कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी “भारतमाला” योजनेच्या पहिल्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने मंजुरी दिली. त्यामध्ये सर्वाधिक तरतूद 9000 किलोमीटर लांबीच्या आर्थिक कॅरिडोर्सना असून त्यांच्यासाठी एक लाख वीस हजार कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे. आजपर्यंतच्या इतिहासात हा सर्वाधिक भव्य, महाकाय महत्त्वाकांक्षी योजना असल्याचा केंद्रीय रस्ते महामार्ग, जहाजबांधणी आणि जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
 • भारतमाला योजनेच्या पहिल्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळेल, असे अर्थमंत्री अरुण जेटलींनी सांगितले होते. त्यानुसार पुढील बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर गडकरींनी योजनेचा संपूर्ण तपशील जाहीर केला.
 • तसेच 35 हजार किलोमीटरमध्ये आर्थिक कॉरिडोर 9000 किमी (खर्च 1 लाख 20 हजार कोटी), अंर्तगत कॉरिडोर व जोड रस्ते (फीडर) 6000 किमी (खर्च 80 हजार कोटी), सीमावर्ती रस्ते 2000 किमी (खर्च 25 हजार कोटी), किनारी मार्ग व बंदरांना जोडणारे रस्ते 2000 किमी (खर्च 20 हजार कोटी) आदींचा समावेश आहे.

पुणे आणि पंजाबी साहित्य अकादमी यांच्यात सामंजस्य करार :

 • महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि पंजाबी साहित्य अकादमी लुधियाना (पंजाब) यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. या करारामुळे भाषिक सौहार्दाबरोबरच उत्तम साहित्य कृतींचे अनुवाद, दोन्ही भाषांतील लेखकांचा संवाद, पुस्तक प्रदर्शने, संशोधन, साहित्य संमेलन आणि कार्यशाळा याना चालना मिळणार आहे.
 • तसेच यामुळे मराठी-पंजाबी भाषा भगिनींचा स्नेह दृढ होण्याबरोबरचसाहित्याचे आदान-प्रदान होईल अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.
 • या सामंजस्य करारावर पंजाबी साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. सुखदेव सिंग सिरसा, सचिव डॉ. सुरजित सिंग, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, सरहदचे संजय नहार, पहिल्या विश्वपंजाबी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सुरजित पातर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
 • मसाप आणि पंजाबी साहित्य अकादमी या दोन संस्थांमधल्या या सामंजस्य करारात सरहद पुणे समन्वयकाची भूमिका बजावणार आहे.
 • प्रा.जोशी म्हणाले, मसाप ही 111 वर्षांची प्रदीर्घ परंपरा असलेली साहित्यातील मातृसंस्था आहे तर पंजाबी साहित्य अकादमीला 63 वर्षांची वाङ्मयीन परंपरा आहे. ‘वेगळ्या राज्यातील दोन साहित्यविषयक काम करण्याऱ्या आणि समृद्ध परंपरा असणाऱ्या महत्वाच्या साहित्य संस्थांनी सामंजस्य करार करण्याची ही इतिहासातील पहिलीच घटना आहे. या करारामुळे या दोन भाषांमध्ये भाषिक सौहार्द तर निर्माण होईलच त्याचबरोबर उत्तम मराठी साहित्यकृतींचा पंजाबीत आणि पंजाबी साहित्यकृतींचा मराठी अनुवाद व्हावा यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे.

कोकण रेल्वेचे नोव्हेंबरपासून नवे वेळापत्रक :

 • कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्यांचे वेळापत्रक 1 नोव्हेंबरपासून बदलणार आहेत.
 • पावसाळी कालावधीत सर्व गाड्यांचा वेग कमी करण्यात असल्याने 10 जून ते 31 ऑक्‍टोबरपर्यंत मान्सून वेळापत्रक लागू केले होते.
 • पण आता पावसाळा संपल्याने 1 नोव्हेंबरपासून नव्या वेळापत्रकानुसार सर्व गाड्या धावणार आहेत.
 • तसेच मुंबईत 1 जानेवारीपासून ए.सी. लोकल धावणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी दिल्ली येथे केली.
 • सुरूवातीच्या टप्प्यात लोकलचे एक किंवा दोन डबे वातानुकूलित असतील त्यानंतर हळूहळू लोकलचे सगळे डबे ए.सी. केले जातील असेही गोयल यांनी स्पष्ट केले.

सिंगापूरचा पासपोर्ट जगातील सर्वाधिक शक्तिशाली :

 • जगातील सर्वाधिक शक्तिशाली पासपोर्ट म्हणून सिंगापूरच्या पासपोर्टला पसंती देण्यात आली आहे.
 • अनेकविध देशांच्या पासपोर्टची एकमेकांशी तुलना केली असता सिंगापूरचा पासपोर्ट हा ताकदवान आहे, असे ग्लोबल पासपोर्ट इंडेक्सच्या माहितीतून उघड झाले आहे.
 • जागतिक स्तरावरच्या या स्पर्धेत 193 देशांना सहभागी करून घेण्यात आले होते. यामध्ये भारताचा क्रमांकात सुधारणा झाली असून, 78 वरून तो 75 क्रमांकावर झेप घेतली आहे.
 • तसेच जर्मनी दुसऱ्या स्थानी असून, स्वीडन आणि दक्षिण कोरिया अनुक्रमे तिसऱ्या स्थानावर झेपावले आहेत.
 • विशेष म्हणजे यादीतील पहिल्या 10 क्रमांकावर युरोपियन देशांचेच प्रभुत्व असायचे. परंतु यंदा पहिल्यांदाच आशियाई देशांनी या यादीत स्थान मिळवले आहे.
 • गेल्या काही वर्षांपासून नागरिक एका देशातून दुसऱ्या देशात स्थलांतर करत असून, काही अंशी त्यांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे.
 • शिक्षण, नोकरी यासारख्या गोष्टींसाठी लोक देश सोडून परगावी जात असल्याचंही समोर आले आहे. त्यामुळे अनेकांना तात्काळ व्हिसा मिळणेही गरजेचे असते.
 • सिंगापूरमधील नागरिकांना 159 देशांचा व्हिसा सहजरीत्या (व्हिसा फ्री) मिळू शकतो. त्यानंतर जर्मनीतल्या नागरिकांना 158 देशांचा व्हिसा उपलब्ध होतात. स्वीडन आणि दक्षिण कोरियामधील नागरिकांना 157 देशांचे व्हिसा सहज देण्यात येतात. तर भारतातील नागरिकांना 51 देशांचे व्हिसा सहज देण्यात येतात. गेल्या दोन वर्षांपासून या स्पर्धेत जर्मनी सातत्याने पहिला क्रमांक राखून होती, परंतु यंदा त्या देशाला दुस-या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.