Current Affairs of 28 October 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (28 ऑक्टोबर 2017)

चालू घडामोडी (28 ऑक्टोबर 2017)

सिंधू फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत :

 • भारताची स्टार शटलर पी.व्ही. सिंधूने चीनच्या चेन युफेईला सरळ दोन गेममध्ये नमवून पहिल्यांदाच फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.
 • पुरुष गटात एच.एस. प्रणॉय याने डेन्मार्कचा प्रतिस्पर्धी हॅन्स ख्रिस्टियन विटिगसला सरळ गेममध्ये नमवून उपांत्यपूर्व फेरी गाठली.
 • सिंधूने स्पर्धेत पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठताना जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानी असलेल्या युफेईचा केवळ 41 मिनिटांमध्ये 21-14, 21-14 असा धुव्वा उडवला. याआधी गेल्या आठवड्यात डेन्मार्क ओपनच्या सुरुवातीला युफेईविरुद्ध सिंधूला पराभव पत्करावा लागला होता.
 • तसेच आता, कोरियाची तिसरी मानांकीत सुंग जि हुन आणि जपानची पाचवी मानांकीत अकाने यामागुची यांच्यातील विजेत्याशी सिंधूचा उपांत्य सामन्यात लढत होईल.

काश्मीरमध्ये दगडफेक केल्यास पाच वर्षांचा कारावास :

 • जम्मू-काश्मीरमध्ये यापुढे संप आणि आंदोलने करून सरकारी मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांना एक ते पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.
 • राज्यपाल एन.एन. व्होरा यांच्याकडून या वटहुकूमाला मंजुरी देण्यात आली आहे. सरकारी प्रवक्त्यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की, या कायद्यामुळे व्यक्ती किंवा संघटनांकडून होणाऱ्या हिंसक कारवाया रोखण्यासाठी किंवा लोकांना यापासून परावृत्त करण्यासाठी मदत होईल. त्यानुसार संप वा आंदोलनाच्या काळात दगडफेक करून सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्यास आंदोलकांना थेट पाच वर्षाचा कारावास होणार असून त्यांच्याकडून मालमत्तेच्या झालेल्या नुकसानीची भरपाईही करून घेण्यात येणार आहे.
 • बंद, संप, आंदोलन आणि मोर्चा दरम्यान संपत्तीचे नुकसान झाले तर या आंदोलनाची हाक देणाऱ्यांना 2 ते 5 वर्षाचा कारावास होऊ शकतो. त्याशिवाय त्यांना त्या संपत्तीची नुकसान भरपाई बाजार भावानुसार द्यावी लागणार असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले. त्यासाठी जम्मू अँड काश्मीर पब्लिक प्रॉपर्टी (प्रिव्हेन्शन अँड डॅमेज) दुरूस्ती विधेयक 2017 नुसार सार्वजनिक संपत्तीशी संबंधित सर्व कायद्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. राज्यसरकारने काढलेल्या या अध्यादेशास राज्यपाल एन.एन. व्होरा यांनी मंजुरी दिली आहे.

जगातील तब्बल 75 टक्के अब्जाधीश चीनमध्ये :

 • आशियातील अब्जाधीशांची संख्या यंदा प्रथमच अमेरिकेपेक्षा जास्त झाली आहे. अब्जाधीशांकडील सर्वाधिक संपत्तीच्या बाबतीत मात्र अजूनही अमेरिकाच सर्वोच्च स्थानी आहे.
 • आशियात चीनमध्ये सर्वाधिक अब्जाधीश आहेत. चीनमध्ये सरासरी दर तीन आठवड्यांत एक अब्जाधीश तयार होतो. सध्याची गती पाहता येत्या चार वर्षांत अमेरिकेला मागे टाकून आशियामध्ये जगातील सर्वाधिक संपत्ती असेल.
 • यूबीएस आणि प्राईस वॉटरहाऊस कूपर्स या संस्थांनी एका अहवालाद्वारे ही माहिती जारी केली आहे. अमेरिका, आशिया आणि युरोप या विभागांतील अब्जाधीशांकडील संपत्तीचा लेखाजोखा अहवालात मांडण्यात आला आहे.
 • तसेच जगातील 1550 अब्जाधीशांच्या संपत्तीचे विश्लेषण करून या संस्थांनी वरील निष्कर्ष काढले आहेत.
 • संस्थांनी जारी केलेल्या माहितीनुसार अब्जाधीशांची संख्या वाढल्यामुळे कला आणि खेळाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जात आहे. 2016 मध्ये जगातील 200 मोठ्या कला संग्राहकांपैकी 75 टक्के संग्राहक अब्जाधीश होते.

कॅटलान राष्ट्र आता स्पेनपासून स्वतंत्र :

 • गेल्या चार वर्षांपासून स्वतंत्र होण्यासाठी धडपड करणाऱ्या स्पेन पूर्वेतील कॅटलान प्रातांच्या पार्लमेंटने 17 ऑक्टोबर रोजी स्पेनपासून वेगळे होत स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्याचा ठराव मंजूर केला. यावेळी मतदानापूर्वीच विरोधकांनी सभात्याग करीत मतदानावर बहिष्कार टाकला. तर कॅटलानच्या प्रांतीय पार्लमेंटने स्वत:ला स्वतंत्र्य घोषित केल्यानंतर स्पेनचे पंतप्रधान मारिआनो राहॉय यांनी ट्वीट करीत लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले.
 • स्पेनने कॅटलानला स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्याला आधीपासूनच विरोध केला असून मॅडरिड सरकार कॅटलानची सुत्रे हातात घेण्याच्या तयारीत आहे. हा ठराव कॅटलानला स्वतंत्र राष्ट्र करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करीत स्पेनसोबत कॅटलानला समान दर्जा देण्याबाबत चर्चा करण्यासाठी पारित करण्यात आला आहे.
 • कॅटलान पार्लमेंटच्या 70 सदस्यांनी स्पेनपासून वेगळे होण्याच्या बाजूने मतदान केले. तर या विरोधात 10 सभासदांनी मतदान केले. तर दोन सभासद अनुपस्थित होते. 135 सदस्यांच्या कॅटलना पार्लिमेंटमध्ये विरोधकांनी या प्रस्तावावर विचार करण्यास नकार दिला.
 • दरम्यान या स्वायत्त प्रदेशाला कलम 155 नुसार स्पेनच्या केंद्र सरकारच्या नियंत्रणात आणण्याचा ठराव स्पेनकडून मंजूर केला जाण्याची शक्यता आहे.

सौदी अरेबियाची पहिली रोबोट नागरिक सोफिया :

 • मानवी आयुष्य सुकर करण्याच्या उद्देशाने निर्माण करण्यात आलेल्या यंत्रमानवाला थेट मानवाच्या जोडीने देशाचे नागरिकत्व देण्याची अभिनव कृती सौदी अरेबियाने केली आहे. असे करणारा हा पहिला देश ठरला असून, कृत्रिम बुद्ध‌किौशल्याला उत्तेजन देणारा देश अशी जगात ओळख निर्माण व्हावी, यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
 • सोफिया असे या यंत्रमानवाचे नाव आहे. रियाधमध्ये झालेल्या एका सोहळ्यात तिला सौदी नागरिकत्व बहाल करण्यात आले. त्याबाबत एका समितीची स्थापना करण्यात आली होती.
 • समितीचे निमंत्रक असलेले व्यापारविषयक लेखक अन्ड्रयू रौस सॉर्किन यांनी ही सोफियाच्या नागरिकत्वाची घोषणा कली. ‘सोफिया, सौदीचे नागरिकत्व मिळणारी तू पहिली यंत्रमानव ठरली आहेस’, असे सॉर्किन यांनी जाहीर करताच टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.
 • तसेच या घोषणेनंतर सोफियाची छोटेखानी मुलाखतही घेण्यात आली. ‘नागरिकत्व बहाल झालेला जगातली पहिली यंत्रमानव ठरणे ही माझ्यासाठी अतीव सन्मानाची गोष्ट असून, त्याबद्दल मला अभिमान आहे. या ऐतिहासिक घटनेबद्दल मी सौदी अरेबियाचे आभार मानते’, अशा शब्दांत सोफियाने आपला आनंद व्यक्त केला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.