Current Affairs of 26 September 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (26 सप्टेंबर 2017)
विवेक देबरॉय यांची अध्यक्षपदी नियुक्ती :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना केली असून नीति आयोगाचे सदस्य विवेक देबरॉय यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- पंतप्रधानांनी स्थापन केलेल्या या 5 सदस्यीय आर्थिक सल्लागार परिषदेत प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे.
- देबरॉय यांच्याशिवाय डॉ. सुरजित भल्ला, डॉ. रथिन रॉय आणि डॉ. आशिमा गोयल यांनाही अर्धवेळ सदस्य करण्यात आले आहे. त्याचबरोबर नीति आयोगाचे सदस्य सचिव रतन वाटल यांना परिषदेचे प्रधान सल्लागार म्हणून नेमण्यात आले आहे.
- आर्थिक सल्लागार परिषदेचे मुख्य कार्य हे पंतप्रधान यांना विविध आर्थिक प्रकरणांमध्ये सल्ला देणे हे असेल.
- परिषदेत पंतप्रधानांकडून सोपवण्यात आलेले आर्थिक किंवा अन्य संबंधित मुद्द्यांचे विश्लेषण करणे आणि सल्ला देणे, त्याचबरोबर महत्वाच्या आर्थिक मुद्द्यांचे समाधान करणे आणि त्याबाबत पंतप्रधानांना याची माहितीही ते देतील. त्याचबरोबर परिषदेकडून पंतप्रधान वेळोवेळी जी जबाबदारी देतील ती ही पार पाडावी लागणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
एसबीआयकडून ‘मिनिमम बॅलन्स’ची मर्यादा 3 हजार :
- भारतीय स्टेट बँक अर्थात एसबीआयने मुख्य शहरांमधील शाखांसाठी एक चांगले पाऊल उचलले आहे.
- किमान मासिक शिल्लक (Monthly Average Balance) रकमेची मर्यादा एसबीआयने 5 हजारांवरून 3 हजारांवर आणली आहे.
- तसेच किमान शिल्लक ठेवता न आल्यास आकारण्यात येणारे शुल्कही कमी करण्यात आले आहे.
- ‘सेमी अर्बन’ शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात हे शुल्क 20 ते 40 रूपये असेल. तर मुख्य शहरांमध्ये हे शुल्क 30 ते 50 रुपये असणार आहे. हे नवे बदल ऑक्टोबरपासून लागू होतील असेही एसबीआयने स्पष्ट केले आहे.
- पेन्शनर, सरकारी योजनांचा लाभ घेणारे खातेदार आणि अल्पवयीन खातेदारांना मिनिमम बॅलन्स ठेवण्याचे कोणतेही बंधन ठेवण्यात आले नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सौभाग्य योजनेचा शुभारंभ :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘दीनदयाळ ऊर्जा भवना’चे 25 सप्टेंबर रोजी लोकार्पण केले. यावेळी त्यांनी प्रत्येक घरात वीज येणार असल्याची घोषणा केली.
- दरम्यान, ‘प्रधानमंत्री सहज बिजली योजने’चे (सौभाग्य) त्यांनी उद्घाटन केले. देशातील सुमारे 4 कोटी जनतेला या योजनेंतर्गत मोफत वीज जोडणी उपलब्ध होणार आहे.
- पंतप्रधान म्हणाले, स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही 4 कोटी लोकांच्या घरात अद्यापही वीज उपलब्ध नाही. थॉमस अल्वा एडिसनने बल्बचा शोध लाऊन सव्वाशे वर्षे लोटली तरी भारतात आजही अनेकांच्या घरात बल्बचा उजेड नव्हे तर मेणबत्ती, कंदीलाचा उजेडच दिसतो आहे. याचा परिणाम घरातील महिलांवर होत आहे. या योजनेद्वारे सरकार लोकांच्या घरी येऊन मोफत वीज कनेक्शन देणार आहे. वीज कनेक्शनसाठी गरिबांना आता सरकारी कार्यालयांत जाऊन खेटे घालावे लागणार नाहीत. यासाठी 16 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. वीज जोडणीसाठी कोणत्याही गरीब व्यक्तीला एकही रुपया द्यावा लागणार नाही. गरीबांच्या या सौभाग्याचा संकल्प आम्ही करणार आहोत.
- तसेच आर्थिक जनगणनेत ज्यांचे नाव आहे त्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. ज्यांचे नाव या योजनेत नाही त्यांना 500 रुपये भरुन या वीज जोडणी घेता येणार आहे.
मुंबई सागरी मार्ग प्रकल्प अंतिम टप्प्यात :
- मुंबईतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला सागरी महामार्गाचा नव्या वर्षात श्रीगणेशा होणार आहे.
- मुंबईतील पहिला सागरी मार्ग बांधण्यासाठी 17 कंपन्यांनी स्वारस्य दाखविले आहे. या प्रकल्पाला केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागांची मंजुरी, ना हरकत प्रमाणपत्रही मिळाले आहे.
- निविदा प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आहे. या सागरी मार्गामुळे वाहतुकीच्या कटकटीतून मुंबईकरांची सुटका होणार आहे.
- मुंबईतील वाहतूककोंडी कमी व्हावी, यासाठी सागरी महामार्गाची संकल्पना मांडण्यात आली होती. पण मुंबईकरांसाठी असलेल्या या महात्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत अनेक आक्षेपही घेण्यात आले होते.
- गिरगाव चौपाटीला या प्रकल्पाचा धक्का बसेल म्हणून मुंबई पुरातन वास्तू समितीने यावर आक्षेप घेतला होता. मात्र भू-तांत्रिक सर्वेक्षण सकारात्मक झाल्याने या प्रकल्पातील मोठा अडथळा दूर झाला आहे.
- सागरी मार्गात तिवरांची मोठ्या प्रमाणात कत्तल होणार असल्याने पर्यावरण खात्याची परवानगी मिळवणे पालिकेसाठी आव्हानात्मक ठरले. मात्र काही अटींवर ही मंजुरी मिळाली. असे सर्व सरकारी अडथळे पार करीत हा प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.
क्रीडा मंत्रालयाकडून सिंधूची पद्मभूषणसाठी शिफारस :
- भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिची प्रतिष्ठेच्या पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
- क्रीडा मंत्रालयाने केंद्र सरकारकडे पद्मभूषण पुरस्कारासाठी सिंधूची शिफार केली आहे. याबाबत क्रीडा मंत्रालयानेही दुजोरा दिला आहे.
- सिंधूने नुकतेच कोरिया ओपन सुपर सिरीजचे विजेतेपद मिळविले होते. गेल्या काही स्पर्धांमध्ये सिंधूची कामगिरी उल्लेखनीय राहिलेली आहे.
- सिंधूने 2016 मध्ये झालेल्या रिओ ऑलिंपिक स्पर्धेत रौप्यपदक मिळविले होते. ऑलिंपिक स्पर्धेत रौप्यपदक मिळविणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली होती.
- तसेच सिंधूला यापूर्वी भारतातील चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. आता तिची पद्मभूषणसाठी शिफारस करण्यात आली आहे.