Current Affairs of 26 December 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (26 डिसेंबर 2015)

चालू घडामोडी (26 डिसेंबर 2015)

चित्रपटसृष्टीवर शोककळा :

  • ‘मेरा साया‘, “वक्त‘, “मेरे मेहबूब‘, “परख‘, “इंतकाम‘, “एक मुसाफीर एक हसीना‘ आदी चित्रपटांत विविध भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री साधना शिवदासानी (वय 74) यांचे शुक्रवारी हिंदुजा रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी (ता. 26) सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण केशरचनेमुळे एकेकाळी “फॅशन आयकॉन‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका गुणी अभिनेत्रीला चित्रपटसृष्टी मुकली आहे, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
  • साधना काही वर्षे कर्करोगाने आजारी होत्या. त्यांच्यावर उपचार सुरू होते. वार्धक्‍यामुळे त्यांचे शरीर उपचारांना साथ देत नव्हते. प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयात काही दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली. अभिनेत्री शबाना आझमी, वहिदा रेहमान आणि हेलन यांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली. अंत्यदर्शन घेण्यासाठी चित्रपटसृष्टीतील काही मंडळी तिथे जमली होती.

दहशतवादविरोधी कायदा :

  • वादग्रस्त दहशतवादविरोधी कायदा उद्या (ता. 27) चीनच्या संसदेत मंजूर होण्याची दाट शक्‍यता आहे. या कायद्याला चीन कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीत मान्यता मिळाली असल्याने संसदेत मंजूर होणे, ही केवळ औपचारिकता असणार आहे.
  • नव्या दहशतवादविरोधी कायद्यातील सायबर गुन्हेगारीसंदर्भातच्या काही तरतुदींना अमेरिकेचा विरोध आहे. तसेच, या कायद्यामुळे मानवाधिकारांवरही गदा येणार असणार असल्याचे अमेरिकी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. नव्या कायद्यातील तरतुदीनुसार, तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना “इन्क्रीप्शन कोड‘सह सर्व संवेदनशील माहिती चीन सरकारला देणे बंधनकारक असणार आहे. या तरतुदीला बहुतेक पाश्‍चात्त्य कंपन्यांचा विरोध आहे.
  • अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग यांच्याशी थेट चर्चा करत याबाबत काळजीही व्यक्त केली होती. नव्या कायद्यामुळे कंपन्यांच्या कामकाजावर परिणाम होणार असून, तपासणीच्या नावाखाली पाश्‍चात्त्य कंपन्यांना लक्ष्य केले जाण्याची शक्‍यताही व्यक्त होत आहे. अनेक मानवाधिकार संघटनांनी मात्र चीन सरकारच्या हेतूंविषयीच शंका उपस्थित केली आहे. मुस्लिमबहुल असलेल्या चीनच्या शिनजिआंग प्रांतात दहशतवादाचे प्रमाण अधिक असले तरी चीन सरकारने त्यांच्या हक्कांवर आणि संस्कृतीवर निर्बंध आणल्याचाच हा परिणाम असल्याचे विविध संघटनांचे म्हणणे आहे.
  • चीनने मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हा कायदा केवळ देशाच्या सुरक्षेसाठी असून, कंपन्यांनी घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही, असे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, इतर कोणत्याही देशाला आमच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, असे सांगत त्यांनी अमेरिकेलाही अप्रत्यक्षपणे फटकारले आहे.
     

पुन्हा पुन्हा वापरता येणारा अग्निबाण विकसित :

  • अमेरिकेच्या स्पेस एक्स कंपनीने फाल्कन -9 अग्निबाण अवकाशात सोडून तो परत जमिनीवर पूर्ववत उतरविण्यात मंगळवारी यश प्राप्त केले आहे. विमानांसारखा पुन्हा वापरता येण्याजोगा अग्निबाण बनविण्याचा हा पहिलाच प्रयोग असल्यामुळे ऐतिहासिक मानला जात आहे. पृथ्वीवर परतण्यापूर्वी 11 संदेश दळणवळण उपग्रह या अग्निबाणाने सुरक्षित अवकाश प्रक्षेपित केले.
  • कॅलिफोर्नियाच्या हॉथ्रोन येथील कंपनीच्या मुख्यालयात उत्साहित व आनंदी वातावरणात एकत्र जमलेल्या सहकाऱ्यांसमोर प्रवक्त्याने ‘फाल्कन जमिनीवर सुखरूप परतले’ असे जाहीर करताच एकच जल्लोष झाला.
  • स्पेस एक्सच्या बेव प्रसारणात अग्निबाण केप कनेवेराल तळावर यशस्वीरीत्या उतरत असल्याचे दाखविण्यात आले. कंपनीने टष्ट्वीट करूनही ही बातमी दिली. त्यात म्हटले आहे की, फाल्कनने पहिला टप्पा पार पाडला आहे. अमेरिकन अवकाश संशोधन संस्था नासाने कंपनीला अभिनंदनाचा संदेश धाडला आहे.
  • हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे अवकाश संशोधनात एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. अग्निबाण पुन्हा पुन्हा वापरात आल्याने खर्चात कपात होईल. यापूर्वी जूनमध्ये झालेला प्रयोग फसला होता.
  • फाल्कनचे तुकडे तुकडे होऊन तो पेटला होता. यावेळी सुधारित असा 23 मजली उंच अग्निबाण केप कनेवेराल हवाई तळावरून अवकाशात झेपावला व अवघ्या 10 मिनिटात आपली कामगिरी पार पाडून तळाच्या दक्षिणेकडील 9 कि.मी. अंतरावरील तळावर परतला.

पंतप्रधान आजपासून रशिया भेटीवर :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी दोन दिवसांच्या रशिया भेटीवर जात आहेत. वार्षिक शिखर बैठकीत ते रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतीन यांच्याशी चर्चा करतील. अणुऊर्जा, हायड्रोकार्बन, संरक्षण आणि व्यापार या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करतानाच सामरिक संबंध बळकट करण्याचा या भेटीमागे उद्देश आहे.
  • जुने मित्र अशी ओळख असलेल्या या दोन देशांचे नेते गुरुवारी चर्चेनंतर अणुऊर्जा आणि संरक्षणासह विविध करारांवर स्वाक्षऱ्या करतील. या करारांना अंतिम आकार दिला जात असल्याचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी पत्रकारांना सांगितले. मॉस्को आणि नवी दिल्ली येथे 2000 पासून या दोन देशांमध्ये उच्च स्तरावर आलटून-पालटून चर्चा केली जात आहे.
  • आर्थिक संबंधाच्या विस्ताराला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असून पुढील 10 वर्षांत द्विपक्षीय व्यापार सध्याच्या 10 अब्ज अमेरिकन डॉलरवरून 30 अमेरिकन डॉलरवर नेण्यावर भर असेल. सिरियातील परिस्थिती आणि दहशतवादासारख्या जागतिक मुद्यांवरही दोन नेते चर्चा करतील, ही निश्चितच आमच्यासाठी मोठी कटिबद्धता असेल, असे जयशंकर यांनी म्हटले.

पाकिस्तान दौरा करणारे भारताचे चौथे पंतप्रधान :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी टि्वटरवरुन पाकिस्तान भेटीचा कार्यक्रम जाहीर करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मोदींच्या आधी त्यांच्याच पक्षाचे अटलबिहारी वाजपेयी पाकिस्तान दौ-यावर जाणारे शेवटचे भारतीय पंतप्रधान होते. अकरावर्षापूर्वी वाजपेयी पाकिस्तान दौ-यावर गेले होते.
  • त्यानंतर आज मोदींनी पाकिस्तानला धावती भेट दिली. योगायोग म्हणजे अटलबिहारी वाजपेयी यांचा आज 91 वा वाढदिवस आहे आणि आजच नवाझ शरीफ यांचाही वाढदिवस आहे.  वाजपेयी 2004 साली 12 व्या शिखर परिषदेसाठी इस्लामाबादला गेले होते. वाजपेयी यांच्यानंतर पंतप्रधान बनलेले मनमोहन सिंग पाकिस्तान दौ-यावर जातील अशी शक्यता होती. मात्र 2008 साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी त्यांच्या कार्यकाळात पाकिस्तान दौरा केला नाही.
  • भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळाले त्यानंतर सहावर्षांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी 1953 साली पाकिस्तान दौरा केला. सप्टेंबर 1960 मध्ये नेहरु एक करार करण्यासाठी पुन्हा पाकिस्तान दौ-यावर गेले होते. त्यानंतर नेहरु यांचे नातू दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी दोनवेळा पाकिस्तान दौ-यावर गेले.
  • नेहरु यांच्यानंतर 28 वर्षांनी राजीव गांधी यांनी डिसेंबर 1988 आणि जुलै 1989 मध्ये पाकिस्तान दौरा केला. राजीव गांधी यांनी त्यांच्या पाकिस्तान दौ-यामध्ये पाकिस्तानच्या दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्याबरोबर परस्परांच्या अणूऊर्जा प्रकल्पांवर हल्ला न करण्याचा महत्वपूर्ण करार केला होता.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.