Current Affairs of 23 December 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (23 डिसेंबर 2015)

चालू घडामोडी (23 डिसेंबर 2015)

पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाच्या दौऱ्यावर :

 • दीर्घकाळापासून असलेले मैत्रीचे संबंध अधिक वाढविण्याच्या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या रशियाच्या दौऱ्यावर जात आहेत. दोन देशांमधील सहकार्य आर्थिक पातळीवरही वाढावे, यासाठी मोदी विशेष प्रयत्न करणार आहेत.
 • मोदी या वेळी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेऊन द्विपक्षीय पातळीवर चर्चा करतील.
 • मोदींच्या या दौऱ्यात अणुऊर्जा सहकार्य, संरक्षण, आण्विक पाणबुडी, शस्त्रयंत्रणा यांसह विविध क्षेत्रांत करार होण्याची शक्‍यता आहे. दोन्ही देशांमध्ये होत असलेली ही 16 वी वार्षिक बैठक असेल.

नवीन विद्यापीठ कायदा मंजुरीसाठी दोन्ही सभागृहांत :

 • हिवाळी अधिवेशनाला दोन दिवस उरले असताना, नवीन विद्यापीठ कायदा मंजुरीसाठी दोन्ही सभागृहांत ठेवण्यात आला आहे.
 • प्रस्तावित कायद्यात निवडीपेक्षा नामनिर्देशित नियुक्तीवर अधिक भर देण्यात आला आहे. विद्यापीठात कायमस्वरूपी अधिष्ठाता असतील. महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळाचे (बीसीयूडी) संचालकपद रद्द करून विविध संचालकांच्या पदांची निर्मिती करण्यात आली आहे. डॉ. अरुण निगवेकर, डॉ. राम ताकवले आणि डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली तयार झालेल्या नवीन विद्यापीठ कायद्याच्या मसुद्यात कुलगुरूंच्या अधिकार क्षेत्रात वाढ करण्यावर अधिक भर देण्यात आला. शिवाय व्यवस्थापन, विद्वत परिषद आणि अधिसभेसारख्या अधिकार मंडळांचे महत्त्व कमी करण्यात आले.

अमेरिकेतील “स्पेस एक्‍स” जमिनीवर सुरक्षित :

 • अमेरिकेतील खासगी कंपनी “स्पेस एक्‍स”ने अवकाशात पाठविलेले रॉकेट पुन्हा जमिनीवर सुरक्षित उतरवून नवा इतिहास घडविला आहे. या यशस्वी प्रयोगामुळे अवकाश मोहिमांच्या खर्चात मोठी बचत होणार असून, रॉकेटचा पुनर्वापर करता येणार आहे.
 • केप कॅनाव्हेराल येथील हवाई दलाच्या तळावरून सोमवारी रात्री 8 वाजून 29 मिनिटांनी स्पेस एक्‍स कंपनीचे “फाल्कन 9” रॉकेट अवकाशात झेपावले. विशेष म्हणजे अवघ्या काही मिनिटांमध्ये हे रॉकेट निर्धारित कार्य पूर्ण झाल्यानंतर सुरक्षितपणे जमिनीवर उतरविण्यात आले. “फाल्कन 9” रॉकेटच्या माध्यमातून “स्पेस एक्‍स”चे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या इलॉन मस्क यांनी खर्चात कपात करण्यासाठी आणि अवकाशात पाठविण्यात येणारे रॉकेट पुन्हा उपयोगात आणण्यासाठी अशा प्रकारचा अभिनव प्रयोग यशस्वीपणे पार पाडला आहे.
 • एकूण 23 मजले असलेल्या “फाल्कन 9” रॉकेटच्या माध्यमातून एकूण 11 उपग्रह निर्धारित कक्षेत सोडण्यात आले. त्यानंतर हे रॉकेट जमिनीवर सुरक्षितपणे ठरलेल्या ठिकाणी उतरविण्यात शास्त्रज्ञांना यश आले.
 • हे रॉकेट अवकाशात सुमारे शंभर किलोमीटर वर पाठविण्यात आले होते. त्या वेळी रॉकेटची गती 27 हजार किलोमीटर प्रतितासपेक्षा अधिक होती. ज्या ठिकाणाहून रॉकेट अवकाशात झेपावले होते, त्या ठिकाणापासून 9.6 किलोमीटर अंतरावर रॉकेट सुरक्षितपणे उतरविण्यात आले.
 • रॉकेट पुन्हा जमिनीवर उतरविण्यात आल्यामुळे खर्चात मोठी बचत होणार असून, पुन्हा हे रॉकेट वापरता येणार आहे. “स्पेस एक्‍स”ने यापूर्वी केलेले तिन्ही प्रयोग अयशस्वी झाले होते. मात्र, चौथ्या प्रयोगाला यश मिळाले.

भारताचा अमेरिकेकडून शंभर अत्याधुनिक मानवरहित विमाने घेण्याचा निर्णय :

 • चिनी सैन्याकडून वारंवार घुसखोरी होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर भारताने अमेरिकेकडून शंभर अत्याधुनिक मानवरहित विमाने घेण्याचा निर्णय घेतला आहे.
 • टेहेळणी आणि शस्त्रसज्ज अशा दोन्ही प्रकारांमधील विमानांची मागणी केली असून, यासाठी दोन अब्ज डॉलर खर्च अपेक्षित आहे.
 • चीनच्या कारवायांकडे पाहूनच भारताने अमेरिकेकडे ऍव्हेंजर ड्रोन या मानवरहित लढाऊ विमानांची मागणी केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
 • तसेच, अंतर्गत सुरक्षा आणि दहशतवादी हल्ल्यांचा धोका असल्याने “प्रिडेटर एक्‍सपी” या वर्गातील टेहेळणी विमानांचीही मागणी करण्यात आली आहे.
 • या खरेदीसंदर्भातील चर्चा गेल्या काही महिन्यांपासूनच सुरू झाली असली तरी अमेरिकेने विमाने देणार असल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केलेले नाही. तसेच क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण गटाच्या (एमटीसीआर) सदस्यत्वाची भारताची मागणीही अद्याप मंजूर केलेली नाही.

जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ भूजलतज्ज्ञ सुरेश खानापूरकर यांना जाहीर :

 • जीवनविद्या मिशनतर्फे देण्यात येणारा ‘सद्गुरू श्री वामनराव पै जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ भूजलतज्ज्ञ सुरेश खानापूरकर यांना जाहीर केला आहे.
 • यंदा पुरस्कार सोहळ्याचे दुसरे वर्ष असून, गतवेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांना प्रदान करण्यात आला होता.

बाल गुन्हेगार न्याय विधेयक मंजूर :

 • राज्यसभेत मंगळवारी बाल गुन्हेगार न्याय विधेयक मंजूर करण्यात आले.
 • या विधेयकातील तरतुदीनुसार आता बालगुन्हेगारीची वयोमर्यादा 18 वरून 16 वर आणण्यात आली आहे.
 • देशाला हादरवून टाकणाऱ्या ‘निर्भया’ बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या सुटकेनंतर या विधेयकात सुधारणा करण्याची मागणी करण्यात येत होती. गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यसभेत प्रलंबित असलेल्या अल्पवयीन न्याय सुधारणा विधेयकावरील चर्चेलाराज्यसभेत सुरुवात झाली. त्यानंतर डाव्या पक्षांचा विरोध वगळता अन्य पक्षांच्या सहमतीने बाल गुन्हेगार न्याय विधेयक मंजूर करण्यात आले.

दिनविशेष :

 • 1947 : बेल लॅबमध्ये प्रथमत: ट्रांझिस्टरचे प्रदर्शन.
 • 1979 : सोवियेत सैन्याने अफगाणिस्तानची राजधानी काबुल काबीज केले.
 • 2004 : पी. व्ही. नरसिंहराव, भारतीय पंतप्रधान यांचा मृत्यू.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.