Current Affairs of 22 December 2015 For MPSC Exams
चालू घडामोडी (22 डिसेंबर 2015)
न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅक्लमचा क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय :
- न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅक्लम याने फेब्रुवारीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेनंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे मार्चमध्ये होणाऱ्या ट्वेंटी-20 विश्वकरंडक स्पर्धेचे नेतृत्व केन विल्यम्सन याच्याकडे सोपविण्यात आले आहे.
- मॅक्लम हा सलग 100 कसोटी खेळणारा एकमेव क्रिकेटपटू आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 20 फ्रेबुवारीपासून ख्राईस्टचर्च येथे होणाऱ्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात तो खेळणार आहे.
- 34 वर्षीय मॅक्लमच्या कसोटी व क्रिकेट कारकिर्दीतील अखेरचा सामना असणार आहे. मॅक्लमने श्रीलंकेविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 अशी जिंकल्यानंतर आपली निवृत्ती जाहीर केली आहे.
- मॅक्लमच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने खेळलेल्या 29 सामन्यांपैकी 11 सामन्यांत संघाने विजय मिळविला आहे.
- मॅक्लमने आतापर्यंत 99 कसोटी सामने खेळले असून, 6,273 धावा केल्या आहेत. यात नऊ शतकांचा समावेश आहे. न्यूझीलंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक करणारा मॅक्लम हा एकमेव फलंदाजी आहे. त्याने वेलिंग्टन येथे गेल्यावर्षी भारताविरुद्ध 302 धावांची खेळी केली होती.
Must Read (नक्की वाचा):
फेसबुकद्वारे “फ्री बेसिक्स” योजनेला पाठिंबा देण्याचे आवाहन :
- जगप्रसिद्ध सोशल नेटवर्किंग साइट असलेल्या फेसबुकद्वारे सध्या वापरकर्त्यांमध्ये “फ्री बेसिक्स” योजनेला पाठिंबा देण्याचे आवाहन केले जात आहे. या योजनेमुळे फक्त कंपनीचा फायदा आहे.
- या योजनेमुळे नजीकच्या काळात विविध इंटरनेट पॅक खरेदी करावे लागणार असल्याने योजनेचे समर्थन करू नये, असाही संदेश फिरविला जातोय. त्यामुळे “फ्री बेसिक्स”बद्दल सध्या तरी नेटकऱ्यांमध्ये संभ्रम आहे.
- गेल्या काही वर्षांत देशात स्मार्टफोन वापरकर्त्यांची संख्या झपाट्याने वाढलेली असल्याने इंटरनेटचाही वापर तितक्याच गतीने वाढत चालला आहे. असे असले तरी अद्यापही देशात एक मोठा वर्ग इंटरनेटच्या वापरापासून वंचित राहिलेला आहे. या वर्गाचे महत्त्व कंपन्यांनी चांगल्या प्रकारे ओळखले आहे. त्यामुळे आतापर्यंत इंटरनेट न वापरलेल्या लोकांपर्यंत पोचण्याचा कंपन्यांचा प्रयत्न राहिलेला आहे. याचाच एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वी फेसबुकतर्फे “रिलायन्स”च्या सहकार्याने इंटरनेट डॉट ओआरजी ही योजना आणली होती.
- “फ्री बेसिक्स”द्वारे एक अब्ज भारतीयांना ऑनलाइन येण्याची संधी मिळणार असल्याचा “फेसबुक‘चा दावा आहे. या योजनेमुळे “डिजिटल एक्व्यालिटी” निर्माण होणार असून, भारतीयांनी पाठिंबा दर्शविला नाही, तर आठवडाभरात योजना बंद होईल, असा दावा केला जात आहे. योजनेद्वारे कम्युनिकेशन, आरोग्य, शैक्षणिक, नोकरी व शेतीविषयक माहिती कुठल्याही डेटा चार्जेसशिवाय मिळू शकेल, असाही दावा आहे.
अत्याचार प्रतिबंधक दुरुस्ती विधेयक 2015 मंजूर :
- अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक दुरुस्ती विधेयक 2015 राज्यसभेत कोणत्याही चर्चेशिवाय मंजूर झाले.
- सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांनी विधेयक सभागृहात सादर केले.
लोकसभेत दिवाळखोरीवर नवे विधेयक :
- आर्थिक सुधारणांच्या बाबतीत आपली स्थिती आणखी मजबूत करण्याच्या उद्देशाने सरकारने लोकसभेत दिवाळखोरी विधेयक सादर केले.
- वस्तू व सेवा कराशी (जीएसटी) संबंधित विधेयकानंतरचे हे दुसरे सर्वांत महत्त्वाचे विधेयक आहे. या विधेयकाची देशी तसेच परदेशी गुंतवणूकदारांना मोठी प्रतीक्षा होती.
- या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यानंतर दिवाळखोरीची प्रकरणे निश्चित कालावधीत सोडविण्यास मदत होईल, तसेच आजारी कंपन्यांना आपल्या व्यवसायात सुधारणा करणेही सोपे जाणार आहे.
- सध्या कंपनी बंद किंवा आजारी पडण्याच्या स्थितीत कर्जदारांना आपला पैसा परत मिळविण्यासाठी दीर्घकालीन न्यायालयीन प्रक्रियेची वाट पाहावी लागते आणि यामध्ये बराचसा वेळ खर्च होतो. याचा सर्वाधिक तोटा बॅंकांना सहन करावा लागतो. प्रस्तावित कायद्यात अशी कोणतीही समस्या नसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
चीनची “एक दांपत्य, दोन मुले” धोरण राबविण्याची तयारी :
- जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असलेल्या चीनने आता आपल्या वादग्रस्त कुटुंब नियोजन धोरणात बदल करून “एक दांपत्य, दोन मुले” हे धोरण राबविण्याची तयारी दर्शविली आहे.
- प्रत्यक्षात घटते मनुष्यबळ आणि जलद गतीने वृद्ध होत जाणाऱ्या लोकसंख्येचा सामना करण्यासाठी चीनने हे पाऊल उचलले आहे. चीनमधील वृद्धांची संख्या गेल्या वर्षी 21.20 कोटींवर पोचली आहे.
- नॅशनल पीपल्स कॉंग्रेसच्या स्थायी समितीच्या द्विमासिक सत्रात समीक्षेसाठी गोळा करण्यात आलेल्या सर्वेक्षणात म्हटले आहे की, एक दांपत्य दोन मुलांना जन्म देऊ शकते याची सरकार वकालत करत आहे.
- दरम्यान, या नव्या धोरणाचा लाभ होऊ शकणाऱ्या दहा कोटी दांपत्यांपैकी अधिकांश लोकांना दुसऱ्या मुलात रस नाही. दुसऱ्या मुलाच्या पालनपोषणाचा खर्च लक्षात घेऊन या लोकांनी हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जाते. याबाबतचा नवा कायदा 1 जानेवारी 2016पासून लागू होऊ शकतो.
अमेरिका व भारत लष्करी तळ व बंदरे एकमेकांना वापरू देण्यासंदर्भातील प्रस्ताव मान्य :
- अमेरिका व भारताचे नियंत्रण असलेले लष्करी तळ व बंदरे एकमेकांना वापरू देण्यासंदर्भातील चर्चा पुन्हा एकदा सुरू करण्याचा प्रस्ताव भारताने मान्य केल्याचे वृत्त आज सूत्रांनी दिले.
- याआधीच्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) सरकारच्या कार्यकाळामध्ये “अमेरिकेच्या नेतृत्वाखालील लष्करी गटामध्ये सहभागी होण्याच्या प्रक्रियेचे हे पहिले पाऊल असू शकेल,” या भीतीने सरकारने यासंदर्भातील चर्चेचा प्रस्ताव फेटाळून लावला होता.
- “लॉजिस्टिक्स सपोर्ट ऍग्रीमेंट” या नावाने करार करण्याचा हा प्रस्ताव असून, यामध्ये अमेरिका व भारत हे देश एकमेकांच्या देशाच्या विशिष्ट तळ व बंदराच्या सुविधा वापरू शकणार आहेत.
पहिल्या इलेक्ट्रिक बस गाडीला हिरवा झेंडा :
- प्रदूषण मुक्त भारताची घोषणा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसद परिसरात खासदारांसाठीच्या पहिल्या इलेक्ट्रिक बस गाडीला हिरवा झेंडा दाखविला.
- या वेळी झालेल्या कार्यक्रमात मोदी यांनी इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणाऱ्या बसच्या चाव्या लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांच्याकडे सुपूर्त केल्या.
- पर्यावरण आणि प्रदूषणाबाबत आपण अनेक वर्षांपासून चर्चा करत आहोत. संपूर्ण जगासमोर ही समस्या आहे.
- इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणाऱ्या असा प्रकारच्या बसमुळे देशातील प्रदूषणाचे प्रमाण कमी होण्यासाठी मदत होईल, असेही मोदी पुढे म्हणाले. अशा प्रकारच्या 20 बस प्रायोगिक तत्त्वावर चालविण्यात येणार आहेत. त्यापैकी दोन बस संसदेच्या परिसरात खासदारांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
हस्तलिखितांच्या सर्वेक्षणात “गुरुचरित्र” हस्तलिखितांचा समावेश :
- मराठी हस्तलिखित केंद्रातर्फे करण्यात आलेल्या गुरुचरित्राच्या हस्तलिखितांच्या सर्वेक्षणात विविध संस्थांत 51, 52 आणि 53 वा अध्याय, अशी शंभर हस्तलिखिते शहरात आढळून आली आहेत. त्यामध्ये 51 वा अध्याय 1695 मधील वाईच्या सरदार किबे यांच्या, तर 1884 मधील आणि गोकाक (कर्नाटक) येथील 1887 मधील “गुरुचरित्र” हस्तलिखितांचा समावेश आहे.
- यातील सरदार किबे यांचे हस्तलिखित वाईच्या प्राज्ञ पाठ शाळेत मिळाले. “गोकाक”च्या हस्तलिखितात दत्तमूर्तीचे हात आणि तीन मुखे वेगवेगळ्या रंगांत दाखविली असून, श्वान आणि गाय नसलेले “गुरुचरित्र” हे या हस्तलिखिताचे वैशिष्ट्य आहे.
- हस्तलिखितांचे अभ्यासक वा. ल. मंजुळ म्हणाले, मराठी हस्तलिखित केंद्रात 32, भांडारकर संस्थेत 18, भारत इतिहास संशोधक मंडळाकडे 15 आणि पुणे विद्यापीठ, डेक्कन महाविद्यालय, वैदिक संशोधन मंडळ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आदी संस्थांत गुरुचरित्रावरील हस्तलिखिते आहेत.
- दोन शतकांपूर्वी ग्रंथाच्या छपाईसाठी वापरण्यात येणाऱ्या शाईत बदल करून, त्यातील दोष घालविण्यासाठी आद्य छापखाना चालक गणपत कृष्णाजी पाटील यांनी गाईच्या तुपाद्वारे शाई बनवून 1845 मध्ये “पवित्र गुरुचरित्र” छापले.
- दत्त जयंतीच्या निमित्ताने “गुरुचरित्र” या मौल्यवान धार्मिक ग्रंथाचा परिचय वाचकांसाठी महत्त्वाचा आहे.
सेप ब्लाटर व मायकल प्लातिनी यांच्यावर आठ वर्षांची बंदी :
- वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या फिफाच्या नैतिक लवादाने सेप ब्लाटर व मायकल प्लातिनी यांच्यावर आठ वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
- प्लातिनी यांच्यावर 20 लाख फ्रँक्स प्रदान करण्याच्या प्रकरणात पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.
- ब्लाटर व प्लातिनी यांना फुटबॉलच्या कुठल्याही प्रकारात सहभागी होण्यापासून बंदी घालण्यात आली आहे.
- 1998 पासून फिफाचे अध्यक्षपद सांभाळणाऱ्या ब्लाटर यांच्यावर 50 हजार स्विस फ्रँक्स (सुमारे 33 लाख 39 हजार 374 रुपये) आणि युएफाचे निलंबित अध्यक्ष आणि फिफा उपाध्यक्ष प्लातिनी यांच्यावर 80 हजार फ्रँक्सचा (सुमारे 53 लाख 42 हजार 998 रुपये) दंड ठोठावण्यात आला.
भारतीय संघाची धुरा सानिया मिर्झाकडे :
- पुढील वर्षी होणाऱ्या फेड कप टेनिस स्पर्धेसाठी भारतीय संघाची धुरा जागतिक महिला दुहेरीत अग्रस्थानी असलेल्या सानिया मिर्झाकडे सोपविण्यात आली आहे.
- ऑल इंडिया टेनिस असोसिशनच्या (एआयटीए) एस. पी. मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने 3 ते 5 फेब्रुवारीदरम्यान थायलंडमध्ये होणाऱ्या फेड कपच्या आशिया-ओशियाना गटातील सामन्यांसाठी चार सदस्यांच्या भारतीय संघाची घोषणा केली.
- सानिया मिर्झाच्या नेतृत्वाखालील निवडण्यात आलेल्या भारतीय संघात देशाची अव्वल महिला एकेरी खेळाडू अंकिता रैना, राष्ट्रीय विजेती प्रेरणा भांबरी आणि प्रार्थना ठोंबरे यांचा समावेश आहे.
गायीला मिळाला यंदाचा ‘पर्सनॅलिटी ऑफ द इयर’ बनण्याचा मान :
- आंतरजालावर माहिती शोधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘याहू’ या सर्च इंजिनने सरत्या वर्षांत कोणकोणत्या बाबींचा सर्वाधिक शोध घेतला गेला याची माहिती जाहीर केली असून, त्यात यंदाचा ‘पर्सनॅलिटी ऑफ द इयर’ बनण्याचा मान चक्क गायीला (काऊ या इंग्रजी शब्दाला) मिळाला आहे.
- गायीखोलोखाल बिहार आणि दिल्ली निवडणुका, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आयसिस, 2015 वर्ल्ड कप, एपीजे अब्दुल कलाम, शीना बोरा हत्याकांड, व्यापम घोटाळा, सलमान खान, अॅपलची तांत्रिक उपकरणे यांचा भारतात प्रामुख्याने शोध घेतला गेला. याहूवर महिलांचा शोध घेण्याच्या बाबतीत सनी लिऑनी गेली सलग चार वर्षे आघाडीवर राहिली.
लवकरच राज्यघटनेच्या मसुद्यात बदल :
- मधेशी समाजाच्या मागण्यांची दखल घेण्यासाठी राज्यघटनेत बदल करण्याचे नेपाळ सरकारने मान्य केले आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व आणि मतदारसंघांची फेररचना या मधेसी समाजाच्या दोन प्रमुख मागण्या होत्या.
- कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या तातडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नेपाळमधील प्रांतांची पुनर्रचना करण्यात येणार असून त्यातून निर्माण होणारे वाद तीन महिन्यांत मिटविण्यासाठी आवश्यक राजकीय यंत्रणा उभी केली जाईल, असेही या बैठकीत ठरले.
- नव्या राज्यघटनेतील सात प्रांतांच्या नमुन्यावर आक्षेप घेत मधेशी समाज चार महिन्यांपासून आंदोलन करीत आहे. या समाजाने भारत-नेपाळ सीमारेषाही बंद केली होती. त्यामुळे नेपाळमध्ये आवश्यक वस्तू आणि औषधांचा तुटवडा निर्माण झाला होता.
- मधेशी समाजाच्या आंदोलनामुळे ऑगस्ट महिन्यापासून 50 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. तेराई प्रांतात वास्तव्य असलेल्या मधेसी समाजाची लोकसंख्या नेपाळच्या एकूण लोकसंख्येच्या 52 टक्के इतकी आहे.
- संसदेत याआधीच सादर करण्यात आलेल्या राज्यघटनेच्या मसुद्यात बदल करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
‘स्टार वॉर्स- द फोर्स अवेकन्स’ चित्रपटाने मोडला तिकीटबारीवरचा विक्रम :
- ‘स्टार वॉर्स- द फोर्स अवेकन्स’ या चित्रपटाने उत्तर अमेरिकेत तिकीटबारीवरचा विक्रम मोडला असून प्रदर्शित होताच 23.8 कोटी डॉलरचा गल्ला मिळवला आहे.
- हा डिस्नेचा साय-फाय महाचित्रपट असून त्यात हॅरिसन फोर्ड, कॅरी फिशर व नवोदित ऑस्कर आयझ्ॉक, जॉन बोयेगा, डेझी रिडले यांचा समावेश आहे.
- या चित्रपटाने भरपूर पैसा मिळवताना ज्युरासिक पार्कचा 20.9 कोटी डॉलर्सचा विक्रम मोडला आहे, असे दी न्यूयॉर्क टाइम्सच्या बातमीत म्हटले आहे.
- डिसेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या 2012 मधील ‘द हॉबिट -अॅन अनएक्सपेक्टेड जर्नी’ या चित्रपटाच्या दुप्पट पैसा मिळवला आहे. हॉबिटने डिसेंबरच्या प्रदर्शनात 8.46 कोटी डॉलर्स मिळवले होते.
- दरम्यान, अलविन अँड द चिपमंकस – द रोड चिप हा चित्रपट उत्तर अमेरिकेत दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याला 1.44 कोटी डॉलर्स मिळाले आहेत तर टिना फे व अॅमी पोहलर यांच्या ‘सिस्टर्स’ या विनोदी चित्रपटाने 1.34 कोटी डॉलर्स कमावून तिसरा क्रमांक मिळवला आहे.
दिनविशेष :
- 1666 : शीख धर्मगुरू गुरु गोविंदसिंग यांचा जन्म.
- 1918 : रवींद्रनाथ टागोर यांच्या विश्वभारती विद्यापीठाची पायाभरणी.