Current Affairs of 23 August 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (23 ऑगस्ट 2017)
अभिमन्यू बनला महाराष्ट्रातील सातवा ग्रॅण्डमास्टर :
- बुद्धिबळाच्या क्षेत्रात पुण्याचे भूषण असलेला अभिमन्यू पुराणिक याने बुद्धिबळातील ग्रॅण्डमास्टर किताबाचे चक्रव्यूह भेदण्यात यश प्राप्त केले आहे.
- 2500 एलो रेटिंग गुणांचा टप्पा ओलांडत या 17 वर्षीय खेळाडूने 21 रोजी ग्रॅण्डमास्टर किताबासाठी आवश्यक तिसरा व अंतिम नॉर्म पूर्ण केला.
- अबूधाबी येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अभिमन्यूने हा नॉर्म पूर्ण केला.
- ग्रॅण्डमास्टर हा किताब पटकावणारा अभिमन्यू हा पुण्यातील तिसरा, राज्यातील सातवा, तर देशातील 49वा बुद्धिबळपटू ठरला आहे.
- अभिमन्यू हा राज्यातील सर्वांत कमी वयाचा ग्रॅण्डमास्टर ठरला आहे. सध्या त्याचे वय 17 वर्षे, 6 महिने आणि 19 दिवस इतके आहे. या आधी हा विक्रम नाशिकचा ग्रॅण्डमास्टर विदित गुजराथी याच्या नावावर होता.
- 2013 मध्ये 18 वर्षांचा असताना त्याने हा किताब मिळविला होता. अभिजित कुंटे आणि अक्षयराज कोरे हे पुणेकर अनुक्रमे वयाच्या 23व्या व 24व्या वर्षी ग्रॅण्डमास्टर बनले होते.
Must Read (नक्की वाचा):
सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल तिहेरी तलाक घटनाबाह्य :
- पतीने एकाच वेळी लागोपाठ तीन वेळा ‘तलाक’ म्हणून पत्नीला सोडचिठ्ठी देण्याची हनाफी सुन्नी मुस्लीम समाजामधील 1400 वर्षांपासूनची प्रचलित प्रथा सर्वोच्च न्यायालयाने 22 ऑगस्ट रोजी घटनाबाह्य ठरवून रद्दबातल केली.
- सामाजिक आणि राजकीयदृष्ट्याही अत्यंत संवेदनशील अशा या विषयावरील हा निकाल पाच बहुधर्मीय न्यायाधीशांच्या घटनापीठाने 3 विरुद्ध 2 अशा बहुमताने दिला.
- सरन्यायाधीश न्या. जगदीश सिंग खेहर व न्या. एस. अब्दुल नझीर यांनी तिहेरी तलाक रद्द करण्यास नकार दिला. तर न्या. कुरियन जोसेफ, न्या. रोहिंग्टन फली नरिमन आणि न्या. उदय उमेश लळित यांनी ही प्रथा घटनाबाह्य आणि बेकायदा असल्याचे जाहीर केले.
- तसेच यानुसार 3:2 बहुमताच्या निर्णयाने ‘तलाक-ए-बिद्दत’ म्हणजेच तिहेरी तलाकची प्रथा घटनाबाह्य ठरवून रद्द केली गेली.
प्रदूषित शहरांच्या यादीत राज्यातील 17 शहरे :
- केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केलेल्या देशभरातील प्रदूषित शहरांच्या यादीत राज्यातील 17 शहरांचा समावेश आहे.
- तसेच या शहरांतील प्रदूषणाची समस्या सोडवण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे, असे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.
- पर्यावरण विभागाच्या एकदिवसीय ‘शुद्ध हवा संकल्प महाराष्ट्र’ या विषयावरील राष्ट्रीय परिषेदेच्या उद्घाटनप्रसंगी पोटे बोलत होते.
- राज्यमंत्री म्हणाले, ‘देशात 123 शहरे प्रदूषित आहेत. त्यात महाराष्ट्रातील 17 शहरांचा समावेश आहे. प्रदूषणमुक्तीसाठी सरकार विविध उपाययोजना करीत असले, तरी प्रत्येकाने स्वच्छतेची सुरवात आपल्या घरापासून करावी. प्रत्येकाने या मोहिमेत सहभागी झाले पाहिजे. महानगरपालिकेने 25 टक्के निधी प्रदूषणाव्यतिरिक्त महत्त्वाच्या कामासाठी खर्च केला पाहिजे.’
- निकृष्ट हवेची राज्यातील 17 शहरे –
- हवेच्या गुणवत्तेची पातळी निर्धारित मानकापेक्षा अधिक असलेली शहरे :- अकोला, अमरावती, औरंगाबाद, बदलापूर, चंद्रपूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर आणि उल्हासनगर.
राज्यात मेणाचे पुतळे बनविणारे पहिले संग्रहालय :
- मॅडम तुसाद हे जगातील अत्यंत प्रसिद्ध असे मेणाचे पुतळे बनविणारे पहिले संग्रालय आहे.
- जागतिक पातळीवरील प्रसिद्ध आणि नामवंत अशा व्यक्तींची मेणाने अगदी हुबेहूब अशी प्रतिकृती तयार करून ती संग्रलायात प्रदर्शनासाठी ठेवली जाते. परंतु हे सर्व पाहण्यासाठी पर्यटकांना लंडन किंवा दिल्लीला जावे लागते जे सर्वसाधारण लोकांसाठी शक्य नाही. ही गोष्ट सुनील कंदलुर याने हेरली.
- मूळचा केरळच्या असलेल्या सुनीलने असे संग्रालय उघडण्याचे ठरविले. 2000 साली त्याने लोणावळ्यात पहिले संग्रहालय उघडले. त्यात अनेक नामवंत कलाकारांचे आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांचे पुतळे सजविण्यात आले आहेत. या संग्रहालयाला प्रचंड यश प्राप्त झाले असता त्यांनी नंतर कोची मध्ये दुसरी शाखा उघडली. या त्यांच्या दोन्ही संग्रहालयांमुळे ते ठिकाण खूपच प्रेक्षणीय आणि एक पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास येत आहे.
दिनविशेष :
- 23 ऑगस्ट 1632 रोजी विजापूरच्या आदिलशहाचा ‘वजीर मरार जगदेव’ याने परिंडा किल्ल्यावर मोगलांच्या ताब्यात असलेली मुलुक-ए-मैदान तोफ विजापूर येथे आणली.
- सन 1958 मध्ये 23 ऑगस्टला मराठवाडा विद्यापिठाचा प्रारंभ झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा