Current Affairs of 2 December 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (2 डिसेंबर 2017)

चालू घडामोडी (2 डिसेंबर 2017)

तिहेरी तलाक दिल्यास तुरुंगवास होणार :

 • मुस्लिम समाजातील तिहेरी तलाक या अनिष्ट प्रथेला सर्वोच्च न्यायालयाने बेकायदा ठरवल्यानंतर आता, अशा प्रकारे जर कोणत्याही मुस्लिम पतीने आपल्या पत्नीला तिहेरी तलाक दिल्यास त्याला तीन वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे.
 • तिहेरी तलाक पद्धत संपुष्टात आल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या सूचनेनुसार केंद्र सरकारने नव्या कायद्याचा मसुदा तयार केला आहे. हिवाळी अधिवेशनात संसदेत तो मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.
 • केंद्र सरकारने सर्व राज्यांकडे या विधेयकाचा मसूदा पाठवला असून त्यावर प्रतिक्रिया मागवल्या आहेत. या विधेयकानुसार, तोंडी तिहेरी तलाक देणाऱ्या व्यक्तीला तीन वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे.
 • तसेच तो अजामीनपात्र गुन्हा असणार आहे. मात्र, हा कायदा जम्मू-काश्मीरमध्ये लागू होणार नाही.

देशातील प्रदूषणाला अमेरिका जबाबदार :

 • भारतामध्ये दिल्लीसारख्या शहरांनी प्रदूषणाची धोक्याची पातळी गाठलेली असताना अमेरिकेसारखा मित्रदेशच भारताला अस्वच्छ इंधनाचा पुरवठा करत आहे. तेल शुद्धीकरण प्रकल्पांमध्ये कच्च्या तेलावर प्रक्रिया केल्यानंतर बॅरलच्या तळाशी उरणाऱ्या डांबरासारख्या पदार्थाचा भारताला पुरवठा केला जात आहे. हा पदार्थ स्वस्त आणि जाळल्यानंतर कोळशापेक्षा उष्णता निर्माण करत असला तरीही हृदयाला धोकादायक असा अतिप्रमाणात कार्बन आणि फुप्फुसांना हानिकारक अशा सल्फरचे उत्सर्जन करत असल्याने प्रदूषण पातळीत वाढच होत आहे.
 • एपी या वृत्तसंस्थेच्या चौकशीमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भारत हा नेहमीच इंधनाचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. अमेरिकेने काही वर्षांपूर्वीच स्वत:चे तेल उत्पादन सुरू केले आहे, परंतु देशभरात ‘पेटकोक’ प्रकारातील हा पेट्रोलियम पदार्थ पाठविण्याचे सोडून केवळ भारतालाच हे इंधन पाठविले जाते.
 • 2016 मध्ये अमेरिकेने तब्बल आठ दशलक्ष मेट्रिक टन पेटकोकचा भारताला पुरवठा केला आहे. हा पुरवठा 2010 पेक्षा 20 पटींनी जास्त आहे. या इंधनाचा वापर भारतातील लाखोंनी असलेल्या कंपन्या आणि प्रकल्पांमध्ये करण्यात येतो. आणि याच कंपन्यांमधून घातक अशी प्रदूषित हवा वातावरणात सोडण्यात येत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

राम सुतार घडवणार डॉ. आंबेडकरांचा पुतळा :

 • अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांचा पुतळा, गुजरातेतील 522 फुटांचा जगातील सर्वांत मोठा सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा असे महत्त्वाचे आणि देशाची ओळख होतील अशा पुतळ्यांनंतर मुंबईतील इंदू मिल परिसरात होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकात डॉ. आंबेडकरांचा 250 फुटी पुतळा साकारण्यात येणार आहे. तो साकारण्याची संधी ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना मिळाली आहे.
 • दादरमधील इंदू मिलमध्ये डॉ. आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक साकारण्यात येणार आहे. तिथे डॉ. आंबेडकरांचा तब्बल 250 फुटांचा ब्रॉंझचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे.
 • ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्यावर सरकारने हा पुतळा साकारण्याची जबाबदारी सोपवली आहे. राम फाईन आर्ट प्रा. लि. या कंपनीशी सरकारने नुकताच याबाबत करार केला. निविदाप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुतळ्याची उभारणी सुरू होईल. यापूर्वी डॉ. आंबेडकरांचे अनेक पुतळे सुतार यांनी साकारले आहेत.

राज्यसरकारकडून ‘राइट टू सर्व्हिस ऍक्‍ट’ लागू :

 • नव्या इमारतींना परवानगी देण्यासाठी राज्य सरकारने अधिकाऱ्यांना ‘राइट टू सर्व्हिस’ कायदा लागू केला आहे. निश्‍चित केलेल्या कालावधीत इमारतींना विविध टप्प्यांची परवानगी न दिल्यास संबंधित अधिकाऱ्यांना 500 रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. भोगवाटा प्रमाणपत्र आठ दिवसांत देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
 • ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’अंतर्गत मुंबई महापालिकेने इमारत बांधकामाला परवानगी देण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करून प्रत्येक परवानगीची कालमर्यादा ठरवली आहे. याच पद्धतीने राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने सर्व शहरांतील स्थानिक सरकारी संस्थांनाही हा नियम लागू केला आहे.
 • नगरविकास विभागाने ठरवलेल्या मुदतीत इमारतींना परवानगी न मिळाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर ‘राइट टू सर्व्हिस ऍक्‍ट’नुसार कारवाई करण्याचा सरकारी अध्यादेश नगरविकास विभागाने प्रसिद्ध केला आहे.

देशात पुन्हा एकदा ‘विकास’ विजयी :

 • उत्तर प्रदेशातील 16 पैकी 14 पालिकांवर भाजपचे कमळ फुलले आहे. या निकालांवर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधत देशात खऱ्या अर्थाने विकास पुन्हा एकदा विजयी झाला असल्याची प्रतिक्रिया ट्विट केली आहे.
 • उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मिळालेला विजय हा नोटाबंदी आणि जीएसटीचा अपप्रचार करणाऱ्यांना बसलेली सणसणीत चपराक आहे. निदान आता तरी केंद्र सरकारच्या निर्णयांना विरोध करणाऱ्यांची तोंडे बंद होतील असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

दिनविशेष :

 • सन 1971 मध्ये 2 डिसेंबर रोजी संयुक्त अरब अमीरातीची स्थापना झाली.
 • 2 डिसेंबर 1989 मध्ये भारताच्या पंतप्रधानपदी ‘विश्वनाथ प्रताप सिंग’ यांचा शपथविधी झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.