Current Affairs of 2 April 2018 For MPSC Exams
चालू घडामोडी (1 एप्रिल 2018)
राज्यातील महापालिकांत सक्षमा केंद्रे उभारणार :
- महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी राज्यातील महापालिका, नगरपालिका यामध्ये महिला सक्षमा केंद्रे उभारली जाणार आहेत. यासाठी राज्य महिला आयोगाने राज्यातील सर्व पालिकांना निर्देश दिले आहेत.
- महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन अविरत प्रयत्नशील आहे. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांनीही आपला वाटा उचलला पाहिजे. त्यादृष्टिकोनातून स्थानिक स्वराज संस्थांनी सक्रिय सहभाग घेत स्त्री संसाधन केंद्र (जेंडर रिसोर्सेस सेंटर) उभारावे. त्यास सक्षमा कक्ष असे नाव देता येऊ शकेल, असे आयोगाने आपल्या निर्देशात म्हटले आहे.
- राज्यातील महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे सीईओ, तसेच विभागीय आयुक्तांना स्त्री संसाधन केंद्रची अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
- स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपापल्या शहरामध्ये स्त्री संसाधन केंद्र उभारून महिलांच्या अडचणी सोडवून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करून, त्यांच्यातील कौशल्याला वाव देणारी एक सक्षम यंत्रणा उभी करावी, हे या केंद्राच्या निर्मितीमागील उद्दिष्ट आहे.
Must Read (नक्की वाचा):
आता नंबर प्लेटसह मिळणार वाहन :
- वाहन कंपन्यांकडून लवकरच नंबर प्लेट असलेल्या कार बाजारात येणार आहेत. वाहनांच्या किंमतीत नंबर प्लेटसाठीचा खर्चाचाही समावेश असेल, अशी माहिती केंद्रीय रस्ते, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ही लायसन्स प्लेट ज्याला नंबर प्लेट म्हटले जाते. वाहनाची नोंद झाल्यानंतर संबंधित विभागाकडून हा क्रमांक दिला जातो.
- गडकरी म्हणाले की, आम्ही हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता वाहन उत्पादकच प्लेट लावून देतील त्यावर नंतर मशीनच्या साहाय्याने अक्षरं उमटवण्यात येतील. कारच्या किंमतीत याच्या खर्चाचा समावेश केला जाईल. यामुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल.
- राज्यांकडून ज्या नंबर प्लेट खरेदी केल्या जातात. त्यांची किंमत ही 800 ते 40 हजार रूपयेपर्यंत असते, असे गडकरी म्हणाले. सध्या संबंधित राज्यातील जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवाहन विभागाकडून (आरटीओ) हे क्रमांक दिले जातात. वाहनांच्या सुरक्षेबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. वाहन स्वस्त असो किंवा महाग सर्वांसाठी नियम समान असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एसबीआय ग्राहकांसाठी तीन नियम बदलणार :
- स्टेट बॅंक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी 1 एप्रिलपासून काही गोष्टी बदलल्या आहेत. ते पुढीलप्रमाणे –
- मिनिमम बॅलेन्स –
बॅंक खात्यामध्ये किमान रक्कम(मिनिमम बॅलेन्स) न ठेवल्यास लागणारा 75 टक्के चार्ज कमी केला आहे. त्यामुळे तुम्हाला आधीपेक्षा कमी चार्ज आकारला जाईल. एक एप्रिलपासून हा नियम लागू होणार आहे. सध्या मेट्रो शहरांमधील ग्राहकांना किमान 3 हजार रूपये बॅलेन्स खात्यामध्ये ठेवावा लागतो. त्या खालोखाल 2 हजार रूपये मिनिमम बॅलेन्स आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये 1 हजार मिनिमम बॅलेन्स खात्यामध्ये ठेवावा लागतो. - चेकबुक –
स्टेट बॅंक ऑफ इंडियाने काही दिवसांपूर्वी आपल्या सहयोगी बॅंकांच्या ग्राहकांना 31 मार्चपर्यंत आपआपल्या बॅंकेचे चेकबुक बदलून घेण्याची आठवण केली होती. सहयोगी बॅंकांच्या सर्व ग्राहकांनी 31 मार्चपर्यंत नवं चेकबुक मिळवावे असे एसबीआयने सांगितले होते. 1 एप्रिलनंतर त्या चेकबुकचा वापर ग्राह्य धरला जाणार नाही. गेल्या वर्षी 5 सहयोगी बॅंकांना एसबीआयमध्ये विलीन करण्यात आले आहे. एप्रिल 2017 मध्ये स्टेट बॅंक ऑफ बीकानेर अॅंन्ड जयपूर (SBBJ), स्टे बॅंक ऑफ हैद्राबाद( SBH), स्टेट बॅंक ऑफ मैसूर (SBM), स्टेट बॅंक ऑफ पटियाला (SBP), स्टेट बॅंक ऑफ त्रावणकोर (SBT) आणि भारतीय महिला बॅंकेचे एसबीआयमध्ये विलिनीकरण झाले आहे. - लेक्टोरल बॉन्ड –
देशात इलेक्टोरल बॉन्डची विक्री दोन एप्रिलपासून सुरू होणार आहे. स्टेट बॅंकेच्या 11 शाखांमध्ये 9 दिवस ही विक्री सुरू असेल. निवडणूक आयोगानुसार दिल्ली, गुवाहाटी, भोपाळ सारख्या 11 शहरांमध्ये हे बॉन्ड 10 एप्रिलपर्यंत मिळतील. केंद्र सरकारने राजकिय पक्षांना मिळाणा-या देणगीमध्ये पारदर्शकता यावी यासाठी इलेक्टोरल बॉन्डची व्यवस्था केली आहे.
1 एप्रिलपासून नवी करप्रणाली लागू :
- नवीन आर्थिक वर्षाला 1 एप्रिलपासून सुरवात होत आहे. केंद्रातील मोदी सरकारने नव्या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पात जे कर प्रस्ताव मांडले होते, ते प्रस्ताव 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. त्यामुळे काही वस्तू महाग, तर काही वस्तू स्वस्त होणार आहेत.
- महाग होणाऱ्या वस्तू –
मोबाईल फोन, सोने, चांदी, भाजीपाला, फळांचे रस, सन ग्लासेस, नानाविध खाद्यपदार्थ, सनस्क्रीन, हात, नखे आणि पायांची निगा राखण्यासाठी लागणारी साधने, दातांची निगा राखण्यासाठी लागणारी साधने, दंतचिकित्सेसाठीची साधने आणि पावडर, दाढी करण्यासाठी वापरण्यात येणारे क्रीम आणि तत्सम वस्तू, डिओड्रंट, परफ्यूम्स, सेंट्स, ट्रक आणि बसचे टायर्स, रेशमी कपडे, पादत्राणे, रंगीत खडे, हिरे, इमिटेशन ज्वेलरी, स्मार्ट घड्याळे, एलईडी आणि एलसीडी टीव्ही, फर्निचर, दिवे, व्हिडिओ गेम, तीनचाकी सायकली, स्कूटर, चाकाची खेळणी, बाहुल्या, खेळणी, खेळाचे साहित्य, सिगारेट, मेणबत्त्या, पतंग, खाद्यतेल. - या वस्तू होणार स्वस्त –
कच्चा काजू, सोलार टेम्पर्ड ग्लास, कॉक्लियर (कानाशी संबंधित यंत्रे) प्रत्यारोपणासाठी लागणारी कच्ची सामग्री आणि साधने, तसेच काही निवडक इलेक्ट्रॉनिक वस्तू. - आणखी काही परिणाम –
नोकरदार आणि उद्योजकांना आयकरावर एक टक्का उपकर आणि शेअर विक्रीच्या भांडवली नफ्यावर कर द्यावा लागणार आहे. - शिक्षण आणि आरोग्य अधिभारात 1 टक्क्याने वाढ केली असून, त्यामुळे प्रत्येक बिल वाढणार आहे. याचाच अर्थ तुम्ही जे जे खरेदी कराल त्या त्या बिलावर 1 टक्का अधिभार आकारण्यात येणार आहे. पूर्वी हा अधिभार 3 टक्के होता, तो आता 4 टक्के असणार आहे.
- 50 हजारापर्यंतच्या व्याजावरच्या आयकरात सूट देऊन केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांना दिलासा दिला आहे.
ई-वे बिल प्रणाली लागू होणार असून 50 हजार रुपयांपेक्षा जास्त मूल्यांच्या आंतरराज्य मालवाहतुकीवर इलेक्ट्रॉनिक्स बिल आकारण्यात येणार.
शहीद राजगुरू आरआरएस संघाचे स्वयंसेवक होते :
- भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोलाची कामगिरी बजावणारे महान क्रांतीकारक शहीद राजगुरू हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते, असा दावा संघाने केला आहे.
- संघ प्रचारक आणि अभाविपच्या हरयाणा शाखेचे संघटन मंत्री म्हणून काम पाहिलेल्या नरेंद्र सेहगल यांच्या पुस्तकात हा दावा करण्यात आला आहे.
- राजगुरू हे संघाच्या मोहिते वाड्याचे स्वयंसेवक होते, असे या पुस्तकात म्हटले आहे. राजगुरू यांचे संघ संस्थापक हेडगेवार यांच्याशी निकटचे संबंध होते. त्याचबरोबर नेताजी सुभाषचंद्र बोस हेही संघाच्या कार्यामुळे प्रभावित झाले होते, असेही या पुस्तकात म्हटले आहे.
- सेहगल यांच्या ‘भारतवर्ष की सर्वांग स्वतंत्रता’ या पुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक 147 वर लिहिले आहे की, लाला लजपत राय यांच्या हौताम्याचा बदला घेण्यासाठी भगत सिंग आणि राजगुरू यांनी इंग्रज पोलीस अधिकारी सँडर्सवर लाहोर येथे गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर दोघांनी लाहोर सोडले. राजगुरू यांनी नागपूर येथे येऊन डॉ. हेडगेवार यांची भेट घेतली. राजगुरू संघाचे स्वयंसेवक होते. हेडगेवार यांनी आपले सहकारी भैयाजी दाणी यांच्या फार्म हाऊसवर राजगुरू यांच्या राहण्याची व्यवस्था केली होती.
दिनविशेष :
- गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांच्या प्रेरणेने 2 एप्रिल 1870 मध्ये पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली.
- छत्रपती राजार्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक 2 एप्रिल सन 1894 मध्ये झाला.
- स्मॉल इन्डस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाची स्थापना सन 1990 मध्ये झाली.
- 2 एप्रिल 2011 मध्ये क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत भारताने 28 वर्षांनंतर विजय मिळवला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा