Current Affairs of 3 April 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (3 एप्रिल 2018)

चालू घडामोडी (3 एप्रिल 2018)

आता रेशनकार्डाचीही पोर्टेबिलिटी होणार :

 • ज्याप्रमाणे मोबाईल नंबर न बदलता कंपनी बदलता येते म्हणजे पोर्टेबिलिटी करता येते, तशाच प्रकारे यापुढे कोणत्याही शिधावाटप दुकानात तुमचे रेशनकार्ड चालणार आहे. त्यामुळे या राज्यातून दुसऱ्या राज्यात अथवा एका शहरातून दुसऱ्या शहरात स्थलांतर झाले तरीही आधीचे कार्ड रद्द करून नवे कार्ड काढण्याची गरज भासणार नाही.
 • या व्यवस्थेसाठी सरकार एकीकृत व्यवस्थेवर (आयएमपीडीएस) सध्या काम करत आहे. ही पद्धत महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, तेलंगणासह काही राज्यांत अंशतः लागू आहे. अन्न आणि नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांच्या माहितीनुसार येत्या दोन वर्षांत ही आयएमपीडीएस नावाची योजना सर्वत्र लागू होणार आहे. त्यासाठी 127 कोटी रुपयांचा खर्च केंद्र सरकार करणार आहे.
 • देशव्यापी पोर्टेबिलिटीशिवाय अतिरिक्त डुप्लिकेट रेशनकार्ड रद्द करण्याचेही काम त्याखाली केले जाईल.  सार्वजनिक वितरणप्रणाली राज्याच्या पोर्टल्सला जोडण्याबरोबरच रेशन कार्डचे व्यवस्थापन, वितरण, पुरवठा व रेशन दुकानांच्या स्वयंचलनाचे कामही याअन्वये केले जाईल.
 • रेशन दुकानात स्वस्त धान्य मिळविण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे आहे. केंद्र सरकारने यासंदर्भातील निर्देश जारी केले आहेत.ज्या कार्डधारकांकडे आधार कार्डच नाही, अशा नागरिकांना 30 जूनपर्यंतच मुदत दिली आहे. या काळात त्यांनी आधार कार्ड काढून घ्यायचे आहे. अन्यथा यापुढे आधार कार्डशिवाय रेशनधान्य मिळणार नाही, अशी भूमिका सरकारने घेतली आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (2 एप्रिल 2018)

कोकणी मेव्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ :

 • ‘उडान’ योजनेअंतर्गत रत्नागिरी विमानतळ ‘टेकऑफ’ घेण्यास सज्ज झाले आहे. साडेतीनशे कोटींचा हा प्रकल्प आहे. विमानसेवेद्वारे कोकणातील आंबा, काजू, मासळी, करवंद, जांभूळ अशा मेव्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय कंपन्यांना बोलाविले होते.
 • पायाभूत सुविधा उभारण्यासाठी तयार केल्या जाणाऱ्या ‘टास्क फोर्स’ मध्ये केंद्र, राज्य शासन, कोस्टगार्ड, पोलिस अधिकारी असणार आहेत. तेही कामे करून घेतील. त्यामुळे कोकणच देशाच्या विकासाची दिशा ठरेल, असा विश्‍वास नागरी हवाई वाहतूकमंत्री तथा वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला. कोकणच्या विकासाला चालना देण्यासाठी उच्चस्तरीय अधिकारी व प्रतिनिधींच्या ‘राउंड टेबल कॉन्फरन्स’साठी रत्नागिरी दौऱ्यावर आले होते.
 • तसेच श्री. प्रभू म्हणाले, एमपीडी, एपीडी या आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रतिनिधींना कॉन्फरन्ससाठी बोलाविले होते. देशाला ज्या 12 चॅम्पियन सेवा मिळणार आहेत. त्यामध्ये पर्यटनाचा समावेश आहे. त्यासाठी आर्थिक तरतूद केली आहे.

मोटारवाहनांसाठी विमा अनिवार्य होणार :

 • सद्यस्थितीतील वाहनांच्या विमा संदर्भातील परिस्थितीवर नाराजी व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा समितीने विम्यासंदर्भात काही सूचना केल्या आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, समितीने विमा नियामक मंडळाला वाहन विम्यासंदर्भात काही बदल करण्यास सांगितले आहे. त्यानुसार चारचाकी वाहनांना तीन वर्षांचा विमा तर दुचाकी वाहनांना पाच वर्षासाठींचा विमा अनिवार्य करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.
 • समितीने सुचवलेल्या नवीन नवीन वाहन विमा धोरणानुसार, चारचाकी वाहन घेताना तीन वर्षांचा विमा तर दुचाकी घेताना पाच वर्षासाठींचा विमा घेणे अनिवार्य करण्यास सांगितले आहे. सध्या नवीन वाहन घेताना वाहनांसाठी एकाच वर्षाचा विमा दिला जातो. मात्र यापुढे चारचाकी आणि दुचाकी खरेदी आणि नोंदणीच्या वेळेसच अनुक्रमे तीन आणि पाच वर्षांचा वाहन विमा घ्यावा लागेल.
 • इन्शुरन्स इन्फॉर्मेशन ब्युरोने (आयआयबी) दिलेल्या माहितीनुसार, देशात फक्त 6.5 ते 7 कोटी वाहनांनी विमा काढला आहे. प्रत्यक्षात मात्र 18 कोटी वाहनांची नोंदणी झाली आहे.
 • थर्ड पार्टी इन्शुरन्सशिवाय कोणतेही वाहन चालवणे गुन्हा आहे. तसे केल्यास 1,000 दंड आणि तीन महिने तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. शिवाय अशी वाहने नुकसान भरपाई मिळण्यास अपात्र ठरतात. 

मुख्यमंत्र्यांकडून राज्यात 1456 प्रकरणे निकाली :

 • दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी मंत्रालयात होणाऱ्या ऑनलाइन लोकशाही दिनाला सामान्य नागरिकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वेळोवेळी न्याय मिळवून दिला जातो. सोमवारी झालेल्या 106 व्या लोकशाही दिनात सोलापूर येथील गरीब शेतकऱ्याला ठिबक सिंचनाचे अनुदान देण्याचे निर्देश देतानाच पुणे जिल्ह्यातील घोडेगाव येथील सिमेंट बंधाऱ्याची दुरुस्ती दोन महिन्यांत करण्याचे सांगून सामान्य शेतकऱ्याला न्याय मिळवून दिला आहे.
 • या वेळी जळगाव, भांडूप, सातारा, सोलापूर, पुणे, अंमळनेर येथील नागरिकांनी तक्रारी दाखल केल्या. गेल्या तीन महिन्यांत लोकशाही दिनात 21 अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी 18 अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. आतापर्यंत लोकशाही दिनात एकूण 1 हजार 459 अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी 1 हजार 456 निकाली काढण्यात आले आहेत.

चीनची ‘स्पेस लॅब’ कोसळली प्रशांत महासागरात :

 • सध्या वापरात नसलेले, अनियंत्रितपणे अवकाशात भ्रमण करत असलेले चीनचे अंतराळस्थानक (स्पेस लॅब) भारतात कोठेही कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. अखेर हा धोका टळला असून, ही स्पेस लॅब दक्षिण प्रशांत महासागरात कोसळल्याची माहिती चीनच्या वैज्ञानिकांनी दिली आहे.
 • या स्पेस लॅबने 1 एप्रिल रोजी सायंकाळी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला अखेर ही लॅब दक्षिण प्रशांत महासागरात कोसळली. यापूर्वी ती लॅब ऑस्ट्रेलियापासून अमेरिकेपर्यंत कोठेही कोसळू शकते, अशी शक्‍यता चीनच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली होती. त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मुंबई व महाराष्ट्रात कोठेही ही लॅब कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.   
 • ‘तियांगोंग-1’ असे या अंतराळ स्थानकाचे नाव असून, त्याला चीनमध्ये ‘स्वर्गातील महाल’ असेही संबोधले जाते. हे अंतराळ स्थानक 1 एप्रिल रोजी दुपारी पृथ्वीच्या वातावरणापासून सुमारे 179 किलोमीटर अंतरावर होते. ‘तियांगोंग’ने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर त्याचे इंधन आणि अनेक भाग जळून खाक होतील. त्यामुळे अतिशय लहान अवशेष पृथ्वीवर कोसळले तरी त्यामुळे मोठे नुकसान होणार नाही.
 • तसेच, पृथ्वीवर कोसळल्यानंतर कुठलेही विषारी पदार्थ तयार होणार नाहीत, असे चिनी लष्कराच्या अधिकाऱ्यांनी या आधीच स्पष्ट केले होते. दोन वर्षांच्या नियोजित सेवेनंतर 2013 मध्ये या अंतराळ स्थानकाचा वापर थांबविण्यात आला होता.

नेल्सन मंडेला यांच्या पत्नी विनी यांचे निधन :

 • दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला यांची पत्नी आणि वर्णभेदविरोधी कार्यकर्त्यां विनी मंडेला (वय 81) यांचे 2 एप्रिल रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. जोहान्सबर्गमधील रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.
 • नेल्सन मंडेला यांच्याशी विनी 1958 ते 1996 अशी 38 वर्षे विवाहबद्ध राहिल्या. नेल्सन मंडेला यांचे 2013 साली निधन झाले होते. दक्षिण आफ्रिकेतील वंशवादविरोधी लढय़ाचे नेतृत्व नेल्सन मंडेला यांनी केले असले तरी विनी-मडिकीझेला मंडेला यांचीही वंशवादविरोधी कार्यकर्ती म्हणून स्वतंत्र ओळख होती. पतीप्रमाणेच त्यांचीही उमेदीची बहुतांशी वर्षे कारावासात गेली. प्रत्यक्ष कारावास संपल्यानंतरही अनेक वर्षे त्या घरी स्थानबद्धतेत होत्या. नेल्सन मंडेला तुरुंगात असताना विनी यांनी त्यांचा लढा तेवत ठेवला होता.
 • विनी यांची नंतरची कारकीर्द मात्र अनेक आरोपांनी डागाळली गेली होती. मात्र वर्णभेदविरोधी लढय़ादरम्यान झालेल्या अत्याचारप्रकरणी त्यांच्यावर खटला चालवण्यात आला होता. अपहरण आणि हल्ल्याच्या प्रकरणात 1991 साली त्या दोषी ठरल्याने त्यांना दंडही भरावा लागला होता. 1997 साली त्यांच्यावर या प्रकरणात पुन्हा आरोप झाले. दक्षिण आफ्रिकेला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झालेल्या पहिल्या बहुवांशिक निवडणुकीत त्या संसदेत निवडून गेल्या. त्यानंतर त्या भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरल्या होत्या.

दिनविशेष :

 • भारतीय धार्मिक नेते ‘स्वामीनारायण’ यांचा जन्म सन 1781 मध्ये 3 एप्रिल रोजी झाला.
 • ओरिसा उच्च न्यायालयाची स्थापना 3 एप्रिल 1948 रोजी झाली.
 • सन 1973 मध्ये 3 एप्रिल रोजी मार्टिन कूपर या मोटोरोला कंपनीतील संशोधकाने जगातील पहिला मोबाइल कॉल केला.
 • 3 एप्रिल 2000 रोजी आयएनएस आदित्य हे इंधन पुरवणारे संपूर्ण भारतीय बनावटीचे वेगवान जहाज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले.
 • ऍपल कंपनी ने आयपॅड या टॅब्लेट संगणकाची पहिली आवृत्ती सन 2010 जाहीर केली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (4 एप्रिल 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.