Current Affairs of 13 December 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (13 डिसेंबर 2015)

चालू घडामोडी (13 डिसेंबर 2015)

बहुविध प्रकल्पांचा समावेश असलेल्या करारांवर स्वाक्षऱ्या :

 • बुलेट ट्रेन प्रकल्प, नागरी आण्विक ऊर्जानिर्मिती क्षेत्रात सहकार्य, संरक्षणविषयक तंत्रज्ञान हस्तांतरण, अकरा औद्योगिक वसाहतींची निर्मिती, दिल्ली- मुंबई औद्योगिक पट्टा, पश्‍चिम रेल्वे स्वतंत्र मालवाहतूक मार्ग, मुंबई ट्रान्स हार्बर लाइन निर्मिती प्रकल्प अशा बहुविध प्रकल्पांचा समावेश असलेल्या करारांवर भारत व जपानतर्फे आज येथे स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
 • भारत- जपान नवव्या वार्षिक शिखर परिषदेच्या निमित्ताने भारतभेटीवर आलेले जपानचे पंतप्रधान शिंझो ऍबे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या भेटीनंतर सहकार्यविषयक संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे.
 • भारतात अतिवेगवान रेल्वेगाड्या सुरू करणे, त्या रेल्वेगाड्यांचे जाळे तयार करणे या प्रकल्पांवरही चर्चा झाली आणि काही करारही करण्यात आले तर बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या तंत्रज्ञानविषयक सहकार्य आणि इतर बाबींसाठी बारा अब्ज डॉलर्सचे आर्थिक साह्य करण्याचे जपानने मान्य केले आहे.
 • तर मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प हा सर्वप्रथम असेल व त्यासाठी 98 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सात वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होईल, मुंबई- अहमदाबाद हे 505 किलोमीटरचे अंतर तीन तासांत पार करणे यामुळे शक्‍य होणार आहे.
 • तसेच नागरी आण्विक ऊर्जा सहकार्यविषयक करारही या वेळी करण्यात आला आहे तर आण्विक वीजनिर्मिती प्रकल्प उभारणाऱ्या विविध परदेशी कंपन्यांमध्ये जपानचीही भागीदारी आहे.
 • अमेरिकेतील वेस्टिंगहाउस तसेच जनरल इलेक्‍ट्रिकल्स (जीई) या कंपन्यांमध्ये जपानचा सहभाग आहे.
 • महत्वाचे मुद्दे :
 1. “मेक इन इंडिया फंड”च्या प्रमोशनसाठी जपानकडून 12 अब्ज डॉलर
 2. जपान प्रथमच मारुती सुझुकीच्या कार भारतातून आयात करणार
 3. जपानी नागरिकांना 1 मार्च 2016 पासून “व्हिसा ऑन अरायव्हल” सुविधा
 4. उभय देशांत संरक्षण साहित्य आणि तंत्रज्ञानाचे हस्तांतरण होणार
 5. सुरक्षा परिषदेतील स्थान निश्‍चित करण्यासाठी जपानकडून मदत अपेक्षित
 6. सागरी संरक्षणामध्ये दोन्ही देश एकत्र काम करणार
 7. दहशतवादी कारवायांविरोधात दोन्ही देश एकवटले
 8. अमेरिकी बनावटीची 2 ऍम्फिबीयन विमाने मिळणार
 9. भारताची सागरी संरक्षण फळी आणखी मजबूत होणार
 10. अमेरिकेसोबत नौदल कवायतीमध्ये आता जपानही सहभागी
 11. उभय देशांतील लष्करी पातळीवरील चर्चेला वेग येणार
 12. भारतीय नौदलास जपानी तंत्रज्ञान मिळणार

भारताचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी अश्‍गाबात दौऱ्यावर :

 • भारताचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचे तुर्कमेनिस्तानची राजधानी अश्‍गाबात येथे आगमन झाले. तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी येथे दाखल झालेल्या अन्सारी यांचे विमानतळावर अहल प्रांताच्या राज्यपालांनी स्वागत केले.
 • अन्सारी हे तुर्कमेनिस्तानच्या अध्यक्षांची भेट घेणार असून, या वेळी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होणार आहे.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुलैमध्ये तुर्कमेनिस्तानला भेट दिली होती.

विकास गौडा पुढील वर्षीच्या रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र :

 • भारताचा थाळीफेकपटू विकास गौडा पुढील वर्षीच्या रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे.
 • ऑलिम्पिकमधील अ‍ॅथलेटिक्स प्रकारात खेळाडूंची संख्या वाढविण्यासाठी पात्रता निकष शिथिल केल्यामुळे गौडाला पात्रता गाठता आली.
 • रिओ ऑलिम्पिकसाठी एप्रिलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या पात्रता निकषांतर्गत पुरुषांच्या थाळीफेकसाठी 66 मीटर हे निकष ठरविण्यात आले होते.
 • अलीकडे आयएएएफने हे अंतर कमी करून 65 मीटरपर्यंत आणले. तर गौडाने मे महिन्यात जमैका आमंत्रित अ‍ॅथलेटिक्समध्ये 65 मीटर थाळीफेक केली होती.

सौदी अरेबिया देशात प्रथमच महिलांनी केले मतदान :

 • महिलांशी प्रचंड भेदाभेद करणाऱ्या सौदी अरेबिया या देशात प्रथमच महिलांनी मतदान केले. त्याचबरोबर पालिका निवडणुकीत उमेदवार म्हणूनही महिला भविष्य अजमावत आहेत तर त्यांना निवडणुकीत उभे राहण्यास परवानगी देण्यात आली आहे.
 • महिलांबाबत हा देश अत्यंत कर्मठ असून, निवडणुकीत मतदान करू देण्याची आणि उमेदवार म्हणून उभे राहण्याची परवानगी म्हणजे महिलांवरील सामाजिक निर्बंध शिथिल करण्याच्या दृष्टीने टाकण्यात आलेले हे पहिले पाऊल समजले जात आहे.
 • सौदी अरेबियात फक्त पालिकांसाठी निवडणूक घेतली जाते. केवळ पालिकांमध्येच निर्वाचित सदस्य असतात. या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत पहिल्यांदाच महिलांना उभे राहण्याची आणि त्यांना मतदान करण्याची परवानगी देण्यात आली होती.
 • या देशात राजेशाही असून, महिलांना सक्तीने बुरखा परिधान करावा लागतो. त्याचबरोबर त्यांना वाहन चालविण्यास बंदी आहे. निवडणुकीतही फक्त पुरुषांनाच मतदान करण्याची परवानगी होती.

दिनविशेष :

 • माल्टा प्रजासत्ताक दिन
 • 1974 : माल्टा गणतंत्र झाले.
 • 1981 : पोलंडमध्ये जनरल वॉयसियेक यारूझेल्स्कीने लश्करी कायदा (मार्शल लॉ) लागू केला.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.