Current Affairs of 12 December 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (12 डिसेंबर 2015)

चालू घडामोडी (12 डिसेंबर 2015)

जपानचे पंतप्रधान शिंझो तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर :

 • जपानचे पंतप्रधान शिंझो ऍबे यांचे तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर दिल्लीत आगमन झाले.
 • भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पासंबंधित सहकार्य करार ऍबे यांच्या दौऱ्यात मार्गी लागण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत असून, दोन्ही देशांदरम्यानच्या नागरी अणू करारावरही या वेळी चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
 • तीन दिवसांच्या दौऱ्यात ऍबे हे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेणार असून, जपान-भारत परिसंवादालाही ते हजेरी लावणार आहेत.
 • तसेच जपानचे पंतप्रधान ऍबे आणि भारताचे पंतप्रधान मोदी यांच्यात शनिवारी चर्चा होणार असून, या वेळी दोन्ही नेते संयुक्त निवेदन प्रसिद्ध करणार आहेत. या वेळी भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला सहकार्य करण्याबाबतच्या करारावर ऍबे स्वाक्षरी करण्याची शक्‍यता आहे.

महत्वाचे मुद्दे :

 1. बुटेल ट्रेन प्रकल्पासंबंधी सहकार्य करार मार्गी लागण्याची शक्‍यता
 2. जपान आणि भारताच्या दरम्यानच्या नागरी अणू करारावर चर्चा
 3. संरक्षण दलांतील सहकार्य करार आणि लष्करी साहित्याची खरेदी
 4. व्यापाराला प्रोत्साहन देण्याबाबत चर्चा
 5. स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी जपानचे सहकार्य

“टॉप 100 सेलिब्रेटीं”च्या यादीत शाहरुख खानने पटकाविले अव्वल स्थान:

 • “फोर्ब्ज”ने तयार केलेल्या भारतातील यंदाच्या “टॉप 100 सेलिब्रेटीं”च्या यादीत शाहरुख खानने अव्वल स्थान पटकाविले आहे. अभिनेता सलमान खान दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर अमिताभ बच्चन तिसऱ्या स्थानी आहेत.
 • एखाद्या सेलिब्रेटीची “ब्रॅंड व्हॅल्यू” आणि त्याचे वर्षभरातील उत्पन्न असे या यादीचे निकष आहेत. बहुतांश सेलिब्रेटींच्या मानांकनामध्ये त्यांच्या उत्पन्नाचा मोठा वाटा असला, तरीही काही जणांच्या मानांकनामध्ये उत्पन्नापेक्षा लोकप्रियता हा अधिक महत्त्वाचा निकष मानण्यात आला आहे.
 • तसेच क्रिकेटपटू रोहित शर्मा, वीरेंद्र सेहवाग, हरभजनसिंग, ईशांत शर्मा, गौतम गंभीर, गायक यो यो हनीसिंग, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, सनी लिऑन इत्यादींच्या मानांकनामध्ये लोकप्रियता हा अधिक महत्त्वाचा निकष आहे.
 • याशिवाय ए. आर. रेहमान (14 वा क्रमांक), अजिंक्‍य रहाणे (25 वा क्रमांक), कपिल शर्मा (27 वा क्रमांक), साईना नेहवाल (39 वा क्रमांक), चेतन भगत (66 वा क्रमांक), रजनीकांत (69 वा क्रमांक), अजय-अतुल (82 वा क्रमांक) हे अन्य सेलिब्रेटीही या यादीत आहेत.

महिला सक्षमीकरणात भारत 135 व्या क्रमांकावर :

 • संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानव विकास निर्देशांकानुसार महिला सक्षमीकरणात भारत 135 व्या क्रमांकावर आहे, अशी केंद्रीय माहिती महिला व बाल कल्याण विभागाच्या मंत्री मेनका गांधी यांनी दिली.
 • संयुक्त राष्ट्र संघाच्या विकास कार्यक्रमांतर्गत मानव विकास अहवाल 2014 प्रसिद्ध केला आहे. त्यात हे नमूद करण्यात आले आहे.
 • तसेच एकूण 147 देशांमधील महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नांचा आढावा यात घेतला आहे. अशा प्रयत्नांत भारत 135 व्या क्रमांकावर आहे, असे मेनका गांधी यांनी लोकसभेत उत्तर देताना सांगितले.
 • सांख्यिकी मंत्रालयाने तयार केलेल्या “वूमेन अँड मेन इन इंडिया- 2015” या अहवालात देशांतील महिलांचे स्थितीवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

आता दुकाने, मॉल, चित्रपट गृहे वर्षातील 24 तास उघडे असणार :

 • उत्पन्न वाढावे आणि जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी दुकाने, मॉल, चित्रपट गृहे आणि उपहारगृहे वर्षातील 365 दिवस 24 तास उघडे ठेवण्यासाठी केंद्र सरकार नवा कायदा करण्याच्या तयारीत आहे.
 • नव्या कायद्यांतर्गत आठवड्यातून एक दिवस दुकान बंद ठेवणे आणि रात्रीच्या वेळी दुकान बंद ठेवण्याच्या अटी रद्द करण्याबाबत सरकार विचार करत आहे.
 • राज्य सरकारांसाठी दुकाने व आस्थापना नोंदणी कायद्यात बदल करण्यासाठी केंद्र सरकार कायद्याचा नमुना तयार करत आहे.
 • त्यामध्ये व्यावसायिकांनी कोणत्याही वेळी दुकान उघडणे आणि ग्राहकांना सेवा देण्याची तरतूद करण्यात येणार आहे. केंद्र सरकारचा हा कायदा ज्या राज्यांना पसंत पडेल त्या राज्यातील दुकाने भविष्यात 24 तास उघडी असतील.
 • अशाप्रकारे नियम शिथील झाल्याने ऑफलाईन आणि ऑनलाईनपद्धती एकाच स्तरावर येतील, असा विश्‍वास केंद्र सरकारकडून व्यक्त करण्यात येत आहे.
 • हा कायदा सर्व राज्यांनी लागू करावा मात्र त्यासाठी कोणत्याही राज्यावर बंधन करण्यात येणार नाही. दरम्यान रात्रीच्या वेळी व्यवहार सुरु राहिल्याने निर्माण होणाऱ्या सुरक्षिततेच्या प्रश्‍नाचाही विचार करण्यात येत आहे.

‘शाहीन- 3’ या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी :

 • पाकिस्तानने मध्यम पल्ल्याच्या ‘शाहीन- 3’ या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे आहे. 2,750 कि.मी.चा पल्ला असल्यामुळे अनेक भारतीय शहरे त्याच्या टप्प्यात आली आहेत.
 • या यंत्रप्रणालीचे विविध डिझाईन आणि तांत्रिक मापदंडांची शहानिशा करण्यासाठी ही चाचणी घेण्यात आली, असे पाकिस्तानी लष्कराच्या इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सनने म्हटले आहे.
 • हे क्षेपणास्त्र पारंपरिक शस्त्रांसह अण्वस्त्रांचाही मारा करू शकते. क्षेपणास्त्राने अरबी समुद्रातील लक्ष्यावर अचूक मारा केला.

चीनमधील संस्थांचे संशोधन :

 • माउंट एव्हरेस्ट हा उंच पर्वत गेल्या पन्नास वर्षांत जास्त तापला असून तेथील हिमनद्या वितळून आकुंचन पावत आहेत, असे चीनच्या संशोधनात म्हटले आहे.
 • गेल्या चाळीस वर्षांत हिमनद्यांचे 28 टक्के आकुंचन झाले आहे. 8844 मीटर उंचीच्या माउंट एव्हरेस्ट पर्वताला तिबेटमध्ये ‘माउंट कोमोलंगमा’ असे म्हटले जाते.
 • तेथील हिमनद्या आकुंचन पावत असून वितळल्याने त्यांचे पाणी खाली नद्यांमध्ये जात आहे, असे चायनीज अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस, हनान युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, माउंट कोमोलांगमा स्नो लिओपार्ड कन्झर्वेशन सेंटर (हिमबिबटया संवर्धन केंद्र) यांनी हे संशोधन केले आहे.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World