Current Affairs of 11 December 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (11 डिसेंबर 2015)

चालू घडामोडी (11 डिसेंबर 2015)

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प संवेदनशील म्हणून घोषित :

 • नाशिक आयुक्तालयाच्या अंतर्गत अमरावती, नाशिक, ठाणे, नागपूर असे चार अप्पर आयुक्त आणि एकूण 24 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी असे कार्यक्षेत्र विभागले आहे. त्यापैकी धारणी, नाशिक, कळवण, तळोदा, जव्हार, डहाणू, किनवट, पांढरकवडा, गडचिरोली, अहेरी व भामरागड हे 11 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अत्यंत संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले.
 • आदिवासी विद्यार्थी स्पर्धेत टिकावे म्हणून त्यांना इंग्रजी माध्यमाच्या खाजगी निवासी आश्रमशाळांमध्ये पाठविले जाते. त्यासाठी शासन प्रत्येक विद्यार्थ्यामागे 50 ते 60 हजार रुपये खर्च करते.
 • सन 2015-16 या शैक्षणिक वर्षासाठी प्रत्येक प्रकल्पामधून किमान हजार आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या खासगी आश्रमशाळेत पाठविण्याचा निर्णय झाला होता. 25 हजार विद्यार्थ्यांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवण्यात आले होते.
 • तसेच हे उद्दिष्टही केवळ पन्नास टक्‍क्‍यांपर्यंतच पूर्ण झाले. कोट्यवधी रुपये खर्चून हा प्रयोग करण्याऐवजी शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न झाला नाही.

गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख रेहमतुल्ला नबील यांचा राजीनामा :

 • तालिबानसारख्या दहशतवादी संघटनांशी चर्चा करण्यासाठी पाकिस्तानशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी उचललेल्या पावलांमुळे नाराज असलेले गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख रेहमतुल्ला नबील यांनी राजीनामा दिला. तालिबानशी शांततेच्या चर्चा केल्या जाऊ नयेत, असे नबील यांचे ठाम मत आहे.
 • याच आठवड्यामध्ये तालिबानी दहशतवाद्यांनी कंदाहार विमानतळावर केलेल्या भीषण हल्ल्यात किमान 50 जणांचा मृत्यू झाला. हा हल्ला आणि त्यानंतरची चकमक तब्बल 27 तास सुरू होती. अध्यक्ष अश्रफ घनी यांनी काही दिवसांपूर्वी एका बैठकीनिमित्त पाकिस्तानला भेट दिली होती. दोन्ही देशांतील शांततेची दीर्घकाळ प्रलंबित असलेली चर्चा सुरू करणे, हादेखील त्यांच्या भेटीचा एक उद्देश होता.
 • पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये शांततेच्या चर्चेची पहिली फेरी जुलैमध्ये झाली होती. अफगाणिस्तानमधील सध्याच्या अशांततेला पाकिस्तान जबाबदार असल्याची स्थानिक प्रशासनातील काही घटकांची भावना आहे.
 • पाकिस्तान आणि तालिबानशी चर्चेचा विरोध करत नबील यांनी दिलेला राजीनामा हा याच अस्वस्थतेतून आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

“इसिस”ने तयार केले मॅंडारिन भाषेमध्ये गाणे :

 • जिहादमध्ये सहभाग घेण्यासाठी चिनी युवकांना प्रेरित करण्यासाठी “इसिस”ने मॅंडारिन भाषेमध्ये एक गाणे तयार केले असून हे गाणे पाकिस्तानमध्ये तयार केले गेले आहे.
 • दोन आठवड्यांपूर्वीच “इसिस‘ने चीनच्या नागरिकाची हत्या केली होती. आता त्या देशातील मुस्लिमांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी त्यांनी त्यांच्याच भाषेत हे गाणे तयार केले आहे.
 • “इसिस”ने जागतिक स्तरावर सुरू केलेल्या जिहादमध्ये चीनमधील मुस्लिमांनी सहभाग घ्यावा, असा आग्रह या गाण्यामध्ये केला आहे.
 • तसेच “इसिस”ने तयार केलेल्या “सैतानाचे राज्य” असलेल्या साठ देशांच्या यादीत चीन आहे.

अभिनेता सलमान खान याची निर्दोष सुटका :

 • दारूच्या नशेत सुसाट गाडी चालवून पदपथावर झोपलेल्या मजुरांना चिरडल्याच्या आरोपातून अखेर 13 वर्षांनंतर अभिनेता सलमान खान याची मुंबई उच्च न्यायालयाने पुरेशा पुराव्यांअभावी सर्व आरोपांमधून निर्दोष सुटका केली.
 • सलमानविरोधातील आरोप निर्विवादपणे सिद्ध करण्यात अभियोग पक्ष सपशेल अपयशी ठरला, अशी टीका न्यायालयाने केली आहे.  
 • सात महिन्यांपूर्वी सलमानला सत्र न्यायालयाने याच आरोपांखाली पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती.या शिक्षेविरोधात त्याने केलेल्या अपील याचिकेवर न्या. ए. आर. जोशी यांनी निकालपत्र दिले.

फेसबुकवर पंतप्रधान ‘नरेंद्र मोदी’ हा विषय सर्वाधिक लोकप्रिय :

 • लवकर ‘बाय बाय’ करण्यात येणाऱ्या 2015 या वर्षांत फेसबुकवर लोकप्रिय ठरलेले विषय जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये भारतात पंतप्रधान ‘नरेंद्र मोदी’ Narendra Modiहा विषय सर्वाधिक लोकप्रिय ठरल्याचे समोर आले आहे.
 • जानेवारी ते डिसेंबर 2015 मध्ये फेसबुकवर पोस्ट, कमेंट, लाईक आणि अन्य माध्यमातून चर्चेत राहिलेल्या विषयांचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये भारतात ‘नरेंद्र मोदी’ हा विषय सर्वाधिक लोकप्रिय असल्याचे आढळून आले आहे.
 • जगातील ‘टॉप 10’ राजकीय नेत्यांमध्ये बराक ओबामा यांनी सर्वोच्च स्थान तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववे स्थान पटकावले आहे.
 • मोदींनंतर भारतामध्ये ई-कॉमर्स बूम, ए.पी.जे.अब्दुल कलाम, बाहुबली, नेपाळचा भूकंप आदी विषय सर्वाधिक चर्चेत राहिले आहेत.

गंगानदीच्या काठासह गोमुखापासून हरिद्वारपर्यंत प्लस्टिक बंदी :

 • गंगानदीच्या काठासह गोमुखापासून हरिद्वारपर्यंत संपूर्ण प्लस्टिक बंदीचे निर्देश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत. 1 फेब्रुवारी 2016 पासून या निर्देशाची अंमलबजावणी सुरु होणार आहे.
 • गंगा नदीला प्रदूषित करणारे परिसरातील उद्योगही बंद करण्याचे आदेश लवादाने दिले आहेत. तसेच गंगा नदीची उपनदी असलेल्या रामगंगा नदीतील पाण्याचे नमुने लवादाने तपासणीसाठी मागविले आहेत.
 • तसेच नोव्हेंबरमध्ये लवादाने उत्तराखंडमधील गंगा नदीच्या परिसरात 200 मीटर अंतरावर बांधकामावर बंदी आणली आहे.

पीएफवरील व्याजदराबाबत जानेवारीमध्ये निर्णय घेतला जाणार :

 • कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (ईपीएफओ) वतीने चालू आर्थिक वर्ष 2015-16 साठीच्या पीएफवरील व्याजदराबाबत जानेवारीमध्ये निर्णय घेतला जाणार आहे, असे केंद्रीय कामगार राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी सांगितले.
 • ईपीएफओसाठी जानेवारीमध्ये बैठक होणार आहे. त्यात 2015-16 वर्षासाठीचे व्याजदर निश्चित करण्यात येणार आहे.
 • तसेच ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची (सीबीटी) पुढील बैठक जानेवारीमध्ये होणार आहे.
 • गेल्या दोन वर्षांपासून पीएफवर 8.75 टक्के व्याजदर मिळते आहे. चालू आर्थिक वर्षात यामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सीबीटीची नुकतीच बैठक झाली. या बैठकीतच हा निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

अ‍ॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीला विधिमंडळात मान्यता :

 • अ‍ॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीला विधिमंडळात एकमताने मान्यता मिळाली. त्यामुळे आता अ‍ॅक्युपंक्चर तज्ज्ञांना या चिकित्सा पद्धतीचा व्यावसायिक (प्रॅक्टिस) वापर करता येणार आहे.
 • अ‍ॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीचे विधेयक वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभा आणि विधान परिषदेत मांडले. ते दोन्ही सभागृहांत एकमताने मंजूर केले.
 • अ‍ॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धती ही महाराष्ट्रातील एक लोकप्रिय चिकित्सा पद्धत आहे. या चिकित्सा पद्धतीला तिच्या विकासासाठी योग्य ती संधी निर्माण करणे आवश्यक आहे. तसेच या चिकित्सा पद्धतीचे अध्यापन व व्यवसाय यांचे विनियमन करणे आवश्यक आहे. यादृष्टीने महाराष्ट्रात ही पद्धती लागू करण्यात आल्याची प्रक्रिया सुरू करत आहोत, असे विनोद तावडे यांनी सांगितले.
 • अ‍ॅक्युपंक्चर ही शरीरावरील विशिष्ट बिंदूवर त्वचेमध्ये बारीक बारीक सुया टोचून त्याद्वारे वेदनामुक्त करणारी किंवा आजारपण बरी करणारी एक चिकित्सा पद्धत आहे. ही एक महत्त्वाची प्राकृतिक स्वरूपाची चिनी पारंपरिक चिकित्सा पद्धती आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार अ‍ॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीच्या वापरास सुमारे 2500 हून अधिक वर्षांपूर्वी सुरुवात झाली असावी. या चिकित्सा पद्धतीची संकल्पना ही अतिप्राचीन काळी विकसित झाली असावी.

    

मॅगी नूडलच्या आणखी 16 नमुन्यांचे परीक्षण करण्याचे आदेश :

 • राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने मॅगी नूडलच्या आणखी 16 नमुन्यांचे परीक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.

  Maggi

 • अनुचित व्यापारावरून नेस्ले इंडियाविरुद्ध सरकारने दाखल केलेल्या दाव्यासंदर्भात आयोगाने हा आदेश दिला आहे.
 • कायदेशीर निर्णय होत नाही, तोवर उत्पादनाच्या सुरक्षेबाबत संशय कायम राहील, असेही आयोगाने म्हटले आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.