Current Affairs of 11 October 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (11 ऑक्टोबर 2016)

चालू घडामोडी (11 ऑक्टोबर 2016)

नेमबाज जीतू राय ठरला पिस्तूल चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता :

  • भारताचा अनुभवी पिस्तूल नेमबाज जीतू राय हा आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या (आयएसएसएफ) चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता ठरला आहे.
  • जीतूने अंतिम लढतीत सर्बियाचा दामिर मिकेच याला 29-6, 28-3 अशा गुणफरकाने मागे टाकून स्पर्धा जिंकली.
  • तसेचा त्याला ट्रॉफीसह पाच हजार युरोचा रोख पुरस्कार मिळाला.
  • रायफल चॅम्पियन्स ट्रॉफी मात्र रशियाचा सर्जेई कामेनस्की याने जिंकली.
  • विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या सर्व नेमबाजांसाठी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केले जाते.
  • दहा मीटर एअर रायफल आणि 10 मीटर एअर पिस्तूल या प्रकारात स्पर्धेचे आयोजन केले जाते.
  • चार शॉटमध्ये सर्वांत कमी गुण नोंदविणारे नेमबाज एलिमिनेशनमध्ये बाहेर पडतात, हे विशेष.

हार्ट, होमस्ट्रॉम यांना अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार जाहीर :

  • ‘कॉट्रॅक्‍ट थिअरी’बद्दल क्रांतिकारी संशोधन करणारे ब्रिटिश अर्थतज्ज्ञ ऑलिव्हर हार्ट आणि फिनलॅंडचे अर्थतज्ज्ञ बेंट होमस्ट्रॉम यांना या वर्षीचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला.
  • त्यांच्या संशोधनामुळे विमा पॉलिसी, अतिवरिष्ठ पदांवरील व्यक्तींचे वेतन इतकेच नव्हे, तर तुरुंग व्यवस्थापन सुकर झाले आहे.
  • विवादित हितसंबंध सोडविण्यासाठी या करार सिद्धांताचा उपयोग होऊ शकतो. प्रत्यक्ष जीवनातील करार, त्यांचा संस्थांवर होणारा परिणाम यांची कल्पना या दोघांच्या संशोधनामुळे येते, असे नोबेल पुरस्कार समितीने म्हटले आहे.
  • तसेच दिवाळखोरीशी संबंधित घटनात्मक आणि राजकीय धोरणांचा पाया यांच्या संशोधनामुळे घातला गेला, असे नोबेल समितीने म्हटले आहे.
  • कराराचे स्वरूप, त्याची व्याप्ती विशद करून त्याचा आकृतिबंध समोर मांडण्याचे काम ‘कॉट्रॅक्‍ट थिअरी’ करते.
  • कराराच्या विविध पद्धती व आकृतिबंध का असतात हे उलगडून सांगणे हा या थिअरीचा उद्देश आहे.
  • कामाच्या स्वरूपानुसार वेतन, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे खासगीकरण अशा अनेक गोष्टींसाठी या सिद्धांताचा उपयोग होतो, असे नोबेल समितीने म्हटले आहे.

47वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव :

  • गोवा येथे 20 ते 28 नोव्हेंबरदरम्यान 47वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया) संपन्न होत आहे.
  • तसेच या चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनातर्फे 10 मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.
  • आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गेल्या वर्षीपासून मराठी चित्रपट पाठविण्याची संकल्पना सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी मांडली आणि ती प्रत्यक्षात उतरविली.
  • गेल्या वर्षी 20 ते 30 नोव्हेंबर 2015 या कालावधीत पणजी येथे पार पडलेल्या 46व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी 9 मराठी चित्रपटांची राज्य शासनातर्फे निवड करण्यात आली होती.
  • आंतरराष्ट्रीय पातळीवर मार्केटिंग करण्यासाठी महाराष्ट्रातून मराठी चित्रपट पाठविणारे महाराष्ट्र पहिलेच राज्य ठरले.
  • तसेच या महोत्सवात अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय निर्माते, दिग्दर्शक, समीक्षकांनी तसेच चित्रपट रसिकांनी हे चित्रपट पाहिले. त्यामुळे मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचण्यास मदत झाली.

डॉ. नयनज्योत लाहिरी यांना जॉन एफ रिचर्ड्स पुरस्कार जाहीर :

  • इतिहासाच्या नामवंत प्राध्यापक आणि पुरातत्त्व क्षेत्रातील विद्वान डॉ. नयनज्योत लाहिरी यांच्या ‘अशोका इन एन्शन्ट इंडिया’ या बहुचर्चित पुस्तकाला 2016 चा जॉन एफ रिचर्ड्स पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • अमेरिकन हिस्टरी असोसिएशनतर्फे (एएचए) दरवर्षी दक्षिण आशियाई इतिहासावरील पुस्तकाला हा पुरस्कार दिला जातो.
  • प्रा. लाहिरी यांचा जन्म 3 मार्च 1960 रोजी दिल्लीत झाला. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी आणि डॉक्टरेट मिळवली.
  • तसेच सध्या प्रा. लाहिरी ह्या हरयाणातील अशोका विद्यापीठात कार्यरत आहेत.
  • प्राचीन भारताचा इतिहास, भारतीय पुरातत्त्वशास्त्र आणि जागतिक वारसा स्थळांचा त्यांचा विशेष व्यासंग असून या क्षेत्रातील त्यांच्या मतांची जागतिक स्तरावर दखल घेतली जाते.
  • या विषयावरील अनेक शोधनिबंध त्यांनी लिहिले असून जगभरातील प्रतिष्ठित नियतकालिकांत ते प्रसिद्ध झाले आहेत.
  • आसाममधील प्राचीन स्थळांविषयी त्यांनी केलेले संशोधन मूलगामी स्वरूपाचे मानले जाते.
  • सम्राट अशोकावरील पुरस्कारप्राप्त पुस्तकासाठीही त्यांनी भरपूर परिश्रम घेतले, प्रवास केला आणि अनेक ऐतिहासिक दस्तावेजांचा बारकाईने अभ्यास केला.
  • पुरातत्त्व क्षेत्रातील त्यांचे अजोड काम लक्षात घेऊन इन्फोसिस फाउंडेशनने 2013 मध्ये त्यांना 55 लाखांचा पुरस्कार देऊन गौरवले होते.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.