Current Affairs of 10 January 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (10 जानेवारी 2018)

चालू घडामोडी (10 जानेवारी 2018)

अमेरिकेकडून एच-1 बी व्हिसा धोरणात बदल नाही :

 • एच-1 बी व्हिसाच्या आधारे अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना बळजबरीने देश सोडण्यास भाग पाडणारा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही, असे ट्रम्प प्रशासनाने स्पष्ट केले. त्यामुळे व्हिसा धोरणातील संभाव्य बदलामुळे भवितव्य टांगणीला लागलेल्या येथील भारतीय तंत्रज्ञांना दिलासा मिळाला आहे.
 • एच-1बी व्हिसा धोरणाचे नियम अधिक कडक करण्याचा ट्रम्प प्रशासनाचा विचार असून, यामुळे सुमारे साडेसात लाख भारतीयांना देश सोडावा लागू शकतो, असा अहवाल काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाल्याने भारतीयांमध्ये खळबळ उडाली होती. या अहवालानुसार, एच-1 बी व्हिसाधारकांची व्हिसाची मुदत वाढविण्यास नकार दिला जाणार होता.
 • अमेरिकेत या व्हिसाधारकांमध्ये पन्नास टक्‍क्‍यांहून अधिक भारतीयच असल्याने याचा सर्वाधिक फटका त्यांनाच बसला असता. या पार्श्‍वभूमीवर यूएस सिटीझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस (यूएससीआयएस) या विभागाने, व्हिसा धोरण बदलाचा विचार नसल्याचे स्पष्ट केल्याने येथील भारतीय आनंदी झाले आहेत.
 • सध्याच्या नियमानुसार, व्हिसाधारकांना सहा वर्षांची मुदतवाढ मिळू शकते. ‘व्हिसा नियम बदलले असते, तरी व्हिसाधारक दुसऱ्या एका नियमानुसार एक वर्षाची मुदतवाढ मागू शकले असते,’ असेही ‘यूएससीआयएस’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोल्हापूरचे नवे अपर पोलिस अधीक्षक ‘तिरुपती काकडे’ :

 • महिनाभर रिक्त असलेल्या कोल्हापूरच्या अपर पोलिस अधीक्षकपदी तिरुपती काकडे यांची नियुक्ती झाली; तर गडहिंग्लज अपर पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांना गुन्हे अन्वेषण विभागात अधीक्षकपदी बढती मिळाली. गृहविभागाकडून बदलीचे आदेश मिळाले आहेत.
 • अपर पोलिस अधीक्षकपदावर काम करणाऱ्या सुहेल शर्मा यांना सांगलीच्या पोलिस अधीक्षकपदी बढती मिळाली. महिनाभरापासून हे पद रिक्त होते.
 • सीआयडी सध्या वारणानगरातील पोलिसांनी मारलेला कोट्यवधींच्या डल्ल्याचा तपास करत आहेत. त्याचा तपास आता बारी करतील. त्याचबरोबर नाशिक येथील प्राचार्य डी.टी.एस.चे श्रीनिवास घाडगे यांची डॉ. बारी यांच्या जागी गडहिंग्लज अपर पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती केली.

आता ईबीसीची मर्यादा आठ लाख रुपये :

 • इतर मागासवर्गाला शैक्षणिक व आर्थिक योजनांच्या लाभासाठी असलेली उन्नत व प्रगत गटातील (क्रिमीलेयर) आठ लाख रुपयांची मर्यादा आता मराठा समाजालाही लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
 • मंत्रिमंडळ उपसमितीची मंत्रालयात बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.
 • उन्नत व प्रगत आरक्षणासह इतर आर्थिक व सामाजिक मागण्यांवर मराठा समाजाने क्रांती मोर्चे काढूनही फारसा फायदा झाला नसल्याने आता पुन्हा 19 फेब्रुवारीला शिवजयंतीनिमित्त आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यापूर्वीच मंत्रिमंडळ उपसमितीने ‘क्रिमीलेयर’ची ‘ओबीसी’साठीची आठ लाखांची सवलत ‘ईबीसी’लाही लागू केली आहे. त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणातील सवलती मिळवण्याकरिता मोठा फायदा होणार आहे.
 • तसेच या महत्त्वाच्या निर्णयासह प्लेसमेंट नसलेल्या व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना 50 टक्के शुल्क सवलत लागू केली जाणार आहे.

कडोली मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी ज्ञानेश्‍वर मुळे :

 • कडोली मराठी साहित्य संघाच्यावतीने 14 जानेवारी रोजी आयोजित 33 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्‍वर मुळे यांची निवड करण्यात आली आहे. हे संमेलन पाच सत्रात रंगणार असून त्यामध्ये कथा, कविता, प्रबोधनाचा कार्यक्रम असणार आहे.
 • सुरवातीला ग्रंथदिंडी निघणार असून त्यानंतर उद्योजक सुधीर दरेकर संमेलनाचे उद्‌घाटन करणार आहेत. त्यानंतर साहित्य संघाचे अध्यक्ष बाबुराव गौंडाडकर, स्वागताध्यक्ष संभाजी होनगेकर यांचे प्रास्ताविक होईल. त्यानंतर अध्यक्षीय भाषण होणार आहे.
 • दुसऱ्या सत्रात पुण्यातील सौरभ करडे हे स्वराज्याचे शिलेदार या विषयावर व्याख्यान देणार आहेत. तिसऱ्या सत्रात या मातीतील आम्ही कवी ही काव्यमैफल रंगणार आहे.
 • चौथ्या सत्रात कोल्हापूरचे दीपक गायकवाड यांचे कथाकथन होणार आहे. तर पाचव्या सत्रात काव्यसंमेलन रंगणार आहे.

‘ओल्ड मंक’चे ब्रिगेडिअर कपिल मोहन कालवश :

 • ‘ओल्ड मंक’ला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवणारे पद्मश्री ब्रिगेडिअर (निवृत्त) कपिल मोहन यांचे वयाच्या 88 व्या वर्षी 6 जानेवारी रोजी निधन झाले.
 • उद्योग व्यवसायातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना वर्ष 2010 मध्ये पद्मश्री किताबाने सन्मानित करण्यात आले होते.
 • कपिल मोहन हे 1965 च्या आधीपासून ट्रेड लिंक्स प्रा. लि.चे प्रमुख होते. त्यांनी डायर मीकिन ब्रेव्हरेजची धुरा सांभाळल्यानंतर कंपनीचा विविध क्षेत्रात विस्तार केला होता.
 • कपिल मोहन यांनी या कंपनीची धुरा सांभाळल्यानंतर ओल्ड मंक रम भारतातच नव्हे तर जगात लोकप्रिय झाली झाली होती.

चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीताची सक्ती नाही :

 • चित्रपटगृहांत चित्रपट सुरू होण्याआधी राष्ट्रगीत वाजवण्याची सक्ती नसल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आपल्या आधीच्या निर्णयात बदल करत सर्वोच्च न्यायालयाने हा नवा आदेश 9 जानेवारी रोजी दिला.
 • चित्रपटगृहांत व सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रगीत वाजवण्याविषयीचा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्राद्वारे केली होती. सर्वोच्च न्यायालयाने 30 नोव्हेंबर 2016 मध्ये चित्रपटगृहात राष्ट्रगीत सक्तीचे असल्याचा आदेश दिल्यानंतर देशभरात मोठे वादळ उठले होते.
 • या मुद्दय़ावर सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट करून काही दिवस उलटल्यानंतर या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे व नियम ठरवण्यासाठी सरकारने आंतरमंत्री पातळीवरील समिती स्थापन केली आहे. या प्रकरणी सरन्यायाधीश न्या. दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील पीठापुढे सुनावणीत हा निर्णय घेण्यात आला.

दिनविशेष :

 • सन 1870 मध्ये 10 जानेवारी रोजी जॉन डी. रॉकफेलर यांनी स्टँडर्ड ऑईल कंपनीची स्थापना केली.
 • मुंबई मधील चर्चगेट रेल्वे स्थानक 10 जानेवारी 1870 मध्ये सुरू झाले.
 • स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ 10 जानेवारी 1926 रोजी मुंबई येथे ‘श्रद्धानंद साप्ताहिक’ सुरू केले.
 • 10 जानेवारी 1966 रोजी भारत व पाकिस्तान यांच्यात ताश्कंद करार झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.