Current Affairs of 9 December 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (9 डिसेंबर 2017)
कुंभमेळा सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित :
- कुंभमेळा हा भारतातील एक श्रद्धेचा विषय असून शेकडो वर्षांच्या परंपरेचा तो अविभाज्य भाग आहे. या पार्श्वभूमीवर युनेस्कोकडून कुंभमेळ्याला मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आले. त्यामुळे कुंभमेळ्याचा आता युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारश्यांच्या यादीत समावेश झाला आहे.
- युनेस्कोच्या यादीत बोस्वाना, कोलंबिया, व्हेनेझुएला, मंगोलिया, मोरक्को, तुर्की आणि संयुक्त अरब अमिराती येथील सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे.
- तसेच यासंबंधी परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी एका सरकारी समितीची बैठक 4 ते 9 डिसेंबर या काळात होणार आहे.
- ‘योग’ आणि ‘नवरोज’ यांच्यानंतर गेल्या दोन वर्षात अशा प्रकारची मान्यता मिळालेला ‘कुंभमेळा’ तिसरा वारसा आहे.
Must Read (नक्की वाचा):
मुस्लीम जगतातून डोनाल्ड ट्रम्प यांचा निषेध :
- जेरुसलेमला इस्रायलची राजधानी करण्यात यावे या अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेचे अरब आणि मुस्लीम जगतात संतप्त पडसाद उमटले आहेत. तसेच या प्रश्नावरून इस्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये झालेल्या निदर्शनांमध्ये एक जण ठार झाला असून 200 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
- इस्रायलमधील जेरुसलेम या शहराच्या ताब्यावरून इस्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये वाद आहे. मुस्लीम, ख्रिश्चन आणि ज्यू अशा तिन्ही धर्मीयांसाठी हे शहर पवित्र असल्याने तिन्ही धर्माच्या अनुयायांना त्यावर नियंत्रण हवे आहे. त्यातून आजवर मोठा संघर्ष झडलेला आहे. या पाश्र्वभूमीवर ट्रम्प यांच्या घोषणेमुळे आगीत तेल ओतल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.
- अमेरिकेच्या काही मित्रदेशांसह अरब आणि जगभरच्या मुस्लीम देशांतून आणि समुदायांकडून ट्रम्प यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे.
- जॉर्डन, इजिप्त, इराक, तुर्कस्तान, टय़ुनिशिया, इराण, मलेशिया, बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इंडोनेशिया या देशांसह जम्मू-काश्मीरमध्येही मुस्लिमांनी या वक्तव्याच्या निषेध केला.
दिव्यांगांच्या जागतिक स्पर्धेत कांचनमालाला सुवर्णपदक :
- नागपूरची दिव्यांग जलतरणपटू कांचनमाला पांडे-देशमुखने मेक्सिको येथे सुरू असलेल्या दिव्यांगांच्या जागतिक जलतरण स्पर्धेत महिलांच्या 200 मीटर वैयक्तिक मेडले प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. स्पर्धेत भारतासाठी तिने मिळविलेले हे पहिलेच सुवर्णपदक होय.
- एस-11 कॅटेगरीत सहभागी झालेल्या कांचनमालाने अन्य प्रकारांत मात्र निराशा केली. 100 मीटर फ्रीस्टाइलमध्ये तिला चौथ्या, तर 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक आणि 100 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. कांचनमालाने जुलैमध्ये बर्लिन येथे पार पडलेल्या स्पर्धेत पदक जिंकून जागतिक स्पर्धेसाठी पात्रता मिळविली होती.
- अमरावतीची रहिवासी असलेल्या कांचनमालाने आतापर्यंत आठवेळा विश्व, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन :
- राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठान, पुणे या संस्थांतर्फे 24 व 25 डिसेंबरला येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात 19 वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन आयोजित करण्यात आल्याची माहिती परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश रोकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
- स्वागताध्यक्ष महेंद्र भारती, संघटक शहाजी पाटील, मुख्य संयोजक प्राचार्य डॉ. एच. टी. दिंडे, समन्वयक एकनाथ पाटील, सुनील यादव उपस्थित होते.
- श्री. रोकडे म्हणाले, 24 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांपासून संमेलनस्थळापर्यंत राष्ट्रीय एकात्मता संदेश यात्रा निघेल. साहित्यिक, कलावंत, कार्यकर्ते, महाविद्यालयीन शिक्षक, विद्यार्थी त्यात सहभागी होतील. दहा वाजता ज्येष्ठ साहित्यिक कवी उद्धव कानडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक आणि घटनातज्ज्ञ अॅड. भास्करराव आव्हाड यांच्या हस्ते होईल.
- तसेच ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मनोहर जाधव यांना प्रा. रा.ग. जाधव साहित्य साधना पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. बंधुता परिसस्पर्श अध्यक्षीय भाषण पुस्तिकेचे, हाजी अफजलभाई शेख यांनी संपादित केलेल्या सत्यार्थी या स्मरणिकेचे आणि शिवाजीराव शिर्के यांच्या पवनेचा प्रवाह या विशेषांकाचे प्रकाशन होईल.
देशातील ऐतिहासिक स्थळांची माहिती स्क्रीनवर :
- मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील वारसा जपण्यासाठी गुगल सरसावले आहे. मध्य रेल्वे आणि गुगल यांच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक स्थळांच्या ‘डिजिटल स्क्रीन’चे अनावरण करण्यात आले. या वेळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के. शर्मा, रेल्वे बोर्डाचे आर.के. शर्मा आणि गुगलचे कला व संस्कृती विभागाचे बेन गोम्स आणि रेल्वे वारसा विभागाचे सुब्रतोनाथ हे उपस्थित होते.
- तसेच या उपक्रमांतर्गत पुढील दोन महिने सीएसएमटीवरील देशभरातील ऐतिहासिक स्थळांची माहिती, वैशिष्ट्ये व्हिडीओच्या स्वरूपात दाखवण्यात येणार आहे.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे स्क्रीन बसवण्यात आल्या आहेत. या स्क्रीनवर देशभरातील ऐतिहासिक स्थळांची माहिती, तेथे पोहोचण्याचे मार्ग, स्थळांची वैशिष्ट्ये व्हिडीओच्या स्वरूपात दाखवण्यात येणार आहेत.
- मध्य रेल्वेचे सीएसएमटी सर्वात वर्दळीचे टर्मिनस आहे. मध्य, हार्बरसह मेल-एक्स्प्रेसने प्रवास करणार्या प्रवाशांना धावपळीच्या आयुष्यात देशातील प्राचीन संस्कृतीचे दर्शन काही मिनिटांत घडवण्यासाठी गुगलने मध्य रेल्वेसोबत करार केला आहे.
- देशातील सर्वाधिक वर्दळीच्या आणि ऐतिहासिक सीएसएमटी स्थानकावर या स्क्रीनमुळे काही मिनिटांत प्रवाशांना ऐतिहासिक स्थळांची माहिती मिळणार आहे. सीएसएमटीवरून रोज लाखो प्रवासी प्रवासाला सुरुवात करतात.
दिनविशेष :
- सन 1946 मध्ये 9 डिसेंबर रोजी दिल्लीमध्ये घटना परिषदेची पहिली बैठक झाली.
- बार्बाडोसचा 9 डिसेंबर 1966 रोजी संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश झाला.
- 9 डिसेंबर 1971 मध्ये संयुक्त अरब अमिरातींचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश झाला.