Current Affairs of 8 November 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (8 नोव्हेंबर 2017)
स्वदेशी बनावटीच्या निर्भय क्षेपणास्त्राची चाचणी :
- स्वदेशी बनावटीच्या निर्भय या क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी भारताने यशस्वी रीत्या घेतली असून हे क्षेपणास्त्र तीनशे किलो अस्त्रे वाहून नेऊ शकते. ओदिशातील चंडीपूर किनाऱ्यावर ही चाचणी करण्यात आली.
- 2014 पासून घेतलेल्या चार चाचण्यांत केवळ एक चाचणी यशस्वी झाली आहे. त्यामुळे आताची चाचणी यशस्वी झाली ही आनंदाची बाब असल्याचे वैज्ञानिकांनी सांगितले.
- चंडीपूर येथील एकात्मिक चाचणी क्षेत्रातील संकुल क्रमांक 3 मधून हे क्षेपणास्त्र आकाशात झेपावले. सकाळी 11.20 वाजता ही चाचणी करण्यात आली, असे संरक्षण संशोधन व विकास संस्थेने म्हटले आहे.
- आधीचे सोपस्कार पार पडल्यानंतर हे उड्डाण यशस्वी झाले. आता या उड्डाणाची तांत्रिक माहिती गोळा करण्याचे काम सुरू असून या क्षेपणास्त्राचे रॉकेट बूस्टर अॅडव्हान्सड सिस्टीम लॅबोरेटरी यांनी तयार केले आहे.
- तसेच या क्षेपणास्त्राचा पल्ला 1000 किलोमीटर आहे. हे क्षेपणास्त्र टबरेफॅन व टबरेजेट इंजिनसह चालते. त्यातील दिशादर्शक प्रणाली स्वदेशी असून ती आरसीआयने तयार केली आहे. या क्षेपणास्त्राने अपेक्षित वेग व उंची गाठली होती व त्याचा मार्गही योग्य होता, असे सांगण्यात आले. रडार व विमानांच्या मदतीने त्याचे निरीक्षण करण्यात आले.
Must Read (नक्की वाचा):
हैदराबाद आयआयटीमध्ये अॅपलकडून प्लेसमेंट :
- सर्जनशील आणि नावीन्यपूर्ण उत्पादनांसाठी जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या अॅपल कंपनीत नोकरी करण्याची संधी भारतीय विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
- अॅपलकडून लवकरच हैदराबाद आयआयटीमध्ये कॅम्पस प्लेसमेंटची प्रक्रिया पार पडेल. त्यासाठी या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या जातील.
- भारतातील महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये परदेशी कंपन्यांनी कॅम्पस इंटरव्ह्यू घेणे, ही नवीन बाब नाही. मात्र, अॅपल कॅम्पस प्लेसमेंटसाठी पहिल्यांदाच भारतात येत आहे. त्यामुळे अॅपलला कर्मचाऱ्यांकडून नक्की कशाप्रकारच्या अपेक्षा आहेत, याबाबत विद्यार्थ्यांना फारशी कल्पना नाही. तरीही अॅपलसारखी कंपनी कॅम्पस प्लेसमेंटसाठी भारतात येणे, ही आनंदाची बाब असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
- तसेच याबाबत आयआयटी हैदराबादचे प्लेसमेंट प्रमुख देवीप्रसाद म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे. विद्यार्थ्यांना आपल्या क्षमता सिद्ध करण्याची ही चांगली संधी असेल. त्याचा त्यांनी चांगल्या पद्धतीने लाभ घ्यायला हवा. याशिवाय गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि फिलिप्स यांसारख्या नामांकित कंपन्यांनीही कॅम्पस प्लेसमेंटसाठी नोंदणी केली आहे. आयआयटीच्या बंगळुरु आणि हैदराबाद येथील कॅम्पसमधील विद्यार्थ्यांना ही संधी मिळणार आहे.
दिल्लीमधील वायूप्रदूषण धोक्याच्या पातळीवर :
- उत्तर भारतामध्ये 7 नोव्हेंबर रोजी पहाट गडद धुक्यामध्ये उजाडली असून पंजाब, हरयाणा, उत्तर राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांना धुक्याने वेढा घातला. दिल्लीमध्ये धुरक्याचे प्रमाण इतके होते की त्यामुळे सर्व प्राथमिक शाळांना सुट्टी जाहीर करावी लागली.
- ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पर्यावरणीय आणीबाणी जाहीर करण्याची विनंती केली आहे. या संस्थेने सद्यस्थितीत घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे. सुदृढ व्यक्तीला श्वास घेण्यासाठी वाईट असे वातावरण असल्याचे संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले.
- दरवर्षीप्रमाणे यंदाही थंडी सुरू होताच राजधानी दिल्लीत काळे धुके दाटण्यास सुरुवात झाली असून हा वाढत्या प्रदूषणाचा परिणाम आहे. त्यामुळे दिल्ली, उत्तर प्रदेश व हरयाणा या राज्यांनी हवेचा दर्जा सुधारण्यासाठी वेळीच उपाययोजना का केल्या नाहीत अशा शब्दात राष्ट्रीय हरित लवादानेही या राज्यांच्या सरकारांना फटकारले आहे. मात्र दिल्लीमधील धुरक्याने धोक्याचीही पातळी ओलांडल्यामुळे सरकारला शाळांना सुट्टी करावी लागली. दिवसा नागरिक आणि शालेय विद्यार्थी मास्क घालून शहरांत फिरत आहे.
न्यूझीलंड विरुद्ध भारताचा मालिका विजय :
- वन-डे मालिकेपाठोपाठ भारताने न्यूझीलंडला टी-20 मालिकेतही पराभवाचा धक्का दिला आहे. पावसाने व्यत्यय आणलेल्या तिसऱ्या सामन्यात भारताने न्यूझीलंडसमोर 8 षटकांत 68 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र हे आव्हान पूर्ण करणे न्यूझीलंड संघाला जमले नाही.
- अखेर भारताने अखेरच्या सामन्यात 6 धावांनी विजय मिळवत मालिका 2-1 च्या फरकाने खिशात घातली. दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांचा फॉर्म पाहता, हे आव्हान ते सहज पार करतील असा अंदाज सर्वांनी बांधला होता. मात्र भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करत न्यूझीलंडच्या फलंदाजांना एकामागोमाग एक धक्के दिले. दुसऱ्या सामन्यात शतक झळकावणारा कॉलिन मुनरोही या सामन्यात फारशी चमक दाखवू शकला नाही. त्यामुळे अखेरच्या दोन षटकांत न्यूझीलंडसमोर खडतर आव्हान निर्माण झाले.
- शेवटच्या षटकांत न्यूझीलंडचे फलंदाज हाणामारी करुन सामना आपल्याकडे खेचून आणतील असे वाटत असतानाच, महत्वाच्या फलंदाजांना माघारी धाडण्यात भारताचे गोलंदाज यशस्वी झाले.
- तसेच अखेरच्या षटकात 19 धावा शिल्लक असताना न्यूझीलंडच्या तळातल्या फलंदाजांनी विजयासाठी प्रयत्न केले, मात्र भारतीय गोलंदाजांसमोर त्यांना हार मानावीच लागली.
डिजिटल व्यवहारांत चाळीस टक्के वाढ :
- इंटरनेट बॅंकिंग, ऑनलाइन ट्रान्झॅक्शन, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे व्यवहार आणि मोबाईल ॲप्सद्वारे मनी ट्रान्स्फरच्या व्यवहारांना नोटाबंदीनंतर चालना मिळाली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत चाळीस ते पंचेचाळीस टक्क्यांनी डिजिटल व्यवहारांत वाढ झाली आहे. त्यामुळे कॅशलेस इकॉनॉमी नागरिकांच्याही हळूहळू अंगवळणी पडू लागली आहे. मात्र भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडून अर्थपुरवठा होत असला तरीही आउटसोर्सिंग एजन्सींच्या दिरंगाईमुळे अनेकदा एटीएममधून ग्राहकांना वेळेवर पैसे मिळत नाहीत. त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतोय.
- केंद्र सरकारने आठ नोव्हेंबर 2016 रोजी पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या. परिणामी, बॅंकांच्या बचत खात्यात दुपटीने वाढ झाली. बॅंकांच्या ठेवीही वाढल्या. कर्ज प्रकरणांवरही त्याचा परिणाम झाला. पण कॅशलेस इकॉनॉमीच्या दृष्टीने केंद्राने पावले टाकल्याने नागरिकांनाही पर्याय राहिला नाही. अगदी वीज मीटरचे बिल, टेलिफोन बिल, ट्रॅव्हल कंपन्यांचे, विमानाचे, रेल्वेचे तिकीट, सिलिंडरची रक्कमदेखील ऑनलाइन व्यवहारांद्वारे स्वीकारण्यास सुरवात झाली. किरकोळ विक्रेत्यांनीही ‘पेटीएम’ची सुविधा सुरू केली. त्याचे सकारात्मक पडसाद उमटू लागले असून, नागरिकही आता मोबाईल बॅंकिंगला प्राधान्य देऊ लागल्याचे निरीक्षण बॅंकिंग तज्ज्ञांनी नोंदविले आहे.
दिनविशेष :
- लोकप्रिय मराठी लेखक “पु.ल. देशपांडे” (पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे) (8 नोव्हेंबर 1919 (जन्मदिन) 12 जून 2000 (स्मृतीदिन) तसेच नाटककार, नट, कथा व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जायचे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा