Current Affairs of 7 December 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (7 डिसेंबर 2017)
पंडित कशाळकर यांना तानसेन पुरस्कार जाहीर :
- संगीत क्षेत्रातील अत्यंत मानाचा समजला जाणारा तानसेन पुरस्कार पंडित उल्हास कशाळकर यांना जाहीर झाला आहे. दोन लाख रुपये, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
- कशाळकर हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक असून ते ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर या घराण्यांच्या गायनपद्धतींवर हुकुमत असणारे गवई आहेत. त्यांनी संगीताचे सुरुवातीचे शिक्षण ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा वारसा लाभलेले आपले वडील नागेश दत्तात्रेय कशाळकर यांच्याकडे घेतले.
- नागपूर विद्यापीठातून त्यांनी संगीताच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात सुवर्णपदक मिळवले. नंतर त्यांनी राजाभाऊ कोगजे आणि पी. एन. खर्डेनवीस यांच्याकडे संगीताभ्यास केला.
- जयपूर गायकीतील निष्णात गवई निवृत्तीबुवा सरनाईक, दत्तात्रेय विष्णू पलुसकर तथा बापुराव पलुसकर, मास्तर कृष्णराव, कुमार गंधर्व या मंडळींचा उल्हास कशाळकरांच्या गायकीवर प्रभाव आहे.
- तसेच त्यांनी आकाशवाणीच्या ठाणे येथील केंद्रात 1983 ते 1990 दरम्यान काम केले. यापूर्वी त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Must Read (नक्की वाचा):
ताजमहाल जागतिक वारसा स्थळांमध्ये दुसर्या स्थानी :
- भारताची ओळख असलेला संगमरवरी मकबरा ‘ताजमहाल’ हे युनेस्कोचे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्कृष्ट जागतिक वारसा स्थळ (वर्ल्ड हेरिटेज साइट) असल्याचे एका ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टलने म्हटले आहे.
- मोगल सम्राट शाहजहान याने त्याची पत्नी मुमताज महल हिच्या स्मरणार्थ बांधलेला आणि दरवर्षी 80 लाखांहून अधिक पर्यटक भेट देत असलेला ताजमहाल याचे स्थान कंबोडियाच्या अंकोर वॅट मंदिरानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
- देशी आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांची मते आणि त्यांनी दिलेली क्रमवारी यांच्या आधारे ‘ट्रिप अॅडव्हायझर’ने जगभरातून युनेस्कोच्या सवरेत्कृष्ट सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा स्थळांची यादी प्रसिद्ध केली आहे.
- तसेच या यादीतील सर्वात लोकप्रिय वारसा स्थळांमध्ये चीनच्या उत्तरेकडील क्वी राजघराण्याच्या झु डा याने ख्रिस्तपूर्व 1368 साली बांधलेल्या चीनच्या महाकाय भिंतीचा समावेश आहे. दक्षिण अमेरिकेच्या पेरू देशातील माचु पिचुने यादीत चौथा क्रमांक मिळवला आहे. याशिवाय ब्राझीलमधील इगुआझु राष्ट्रीय उद्यान, इटलीतील ‘सासी ऑप मटेरा’, पोलंडमधील ऐतिहासिक क्रकॉओ, इस्रायलमधील जेरुसलेम हे पुरातन शहर आणि तुर्कस्तानमधील इस्तंबुलची ऐतिहासिक ठिकाणे यांचाही यादीत समावेश आहे.
‘मी टू’ मोहिमेला पर्सन ऑफ द इयर पुरस्कार :
- लैंगिक अत्याचाराविरोधात सुरु करण्यात आलेल्या ‘मी टू’ (#MeToo) या ऑनलाईन मोहिमेला टाइम मासिकाचा ‘पर्सन ऑफ द इयर’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
- ‘मी टू’ या ऑनलाईन हॅशटॅग अभियानातून लैंगिक अत्याचाराचा सामना कराव्या लागलेल्या अनेकांनी जाहीरपणे त्यांच्या भावना व्यक्त केल्या. या अभियानाला जगभरातून मोठा प्रतिसाद लाभला होता.
- हॉलिवूडमधील निर्माते, दिग्दर्शक हार्वे वाईनस्टिन यांचे लैंगिक अत्याचार प्रकरण उजेडात आल्यावर ‘मी टू’ या ऑनलाईन मोहिमेला सुरुवात झाली होती.
- लैंगिक अत्याचाराबद्दल लोकांनी मनात कोणताही न्यूनगंड न बाळगता त्याबद्दल बेधडक व्यक्त व्हावे, यासाठी ‘मी टू’ अभियानाची सुरुवात करण्यात आली. लैंगिक अत्याचाराविरोधातील आवाज बुलंद करणे हा या मोहिमेचा मुख्य हेतू होता. याच मोहिमेला टाइम मासिकाने ‘पर्सन ऑफ द इयर’ पुरस्कार जाहीर केला आहे. अमेरिकेत 6 डिसेंबर रोजी सकाळी याबद्दलची घोषणा करण्यात आली.
दिल्लीत आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र सुरू :
- गेल्या पंचवीस वर्षांपासून रेंगाळलेले आणि राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजधानीतील पहिलेवहिले स्मारक म्हणून ओळखले जात असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र 7 डिसेंबर पासून दिमाखात सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आग्रही पुढाकाराने केवळ 32 महिन्यांमध्ये ‘ल्युटेन्स दिल्ली’मध्ये ही देखणी वास्तू साकारली आहे.
- 20 एप्रिल 2015 रोजी मोदींनी या वास्तूचे भूमिपूजन केले होते. त्याचवेळी ते म्हणाले होते, की ‘या महामानवाचे हे स्मारक पंचवीस वर्षांहून अधिक काळ रेंगाळले. आता आपण पंचवीस महिन्यांमध्ये ते साकारण्याचा प्रय केला पाहिजे.’ मोदींनी म्हटल्याप्रमाणे 25 महिन्यांमध्ये ते पूर्ण होऊ शकले नाही; पण 32 महिन्यांमध्ये का होईना, पंचवीस वर्षांपासून रखडलेली ही वास्तू देखण्या स्वरूपात उभी राहिली.
- ’15, जनपथ’ असा तिचा पत्ता असून प्रसिद्ध ‘ल मेरिडियन’ या पंचतारांकित हॉटेलला खेटून ही वास्तू आहे. 7 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता उदघाटन सोहळा आहे.
- तसेच या केंद्राला ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चा दर्जा देण्याची शक्यता असून दलित, आदिवासी, अन्य मागासवर्गीय, महिला आणि अल्पसंख्याक आदींच्या सामाजिक व आर्थिक विकासाचे हे केंद्र बनविण्याचा सरकारचा विचार आहे. सामाजिक विषयांसाठी हे केंद्र सरकारसाठी ‘थिंक टँक’ असू शकते.
जेरुसलेमला इस्रायलच्या राजधानीचा दर्जा :
- जेरुसलेमला इस्रायलच्या राजधानीचा दर्जा देण्यास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मान्यता दिली आहे. अमेरिकी दूतावास तेथे हलवण्याची प्रक्रियाही सुरू केली जाणार आहे. या घडामोडींमुळे आधीच स्फोटक असलेल्या मध्यपूर्वेत हिंसक उलथापालथ होईल, असा इशारा अनेक अरब नेत्यांनी दिला आहे.
- 2016 साली प्रचारात याबाबत दिलेले आश्वासन ट्रम्प आता पूर्ण करत आहेत. या वादग्रस्त निर्णयामुळे मध्यपूर्वेत तसेच जगात इतरत्र व्यापक निदर्शने होण्याची भीती अरब नेत्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, व्हाइट हाऊसमध्ये ही घोषणा करण्याच्या निर्णयावर ट्रम्प कायम राहतील, असे त्यांच्या प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले होते. ते या बाबीकडे ‘ऐतिहासिक वस्तुस्थितीला मान्यता’ या दृष्टिकोनातून पाहतात, असे एका अधिकाऱ्याने पत्रकारांना सांगितले.
दिनविशेष :
- सन 1856 मध्ये 7 डिसेंबर रोजी पहिला उच्चवर्णीय विधवा विवाह कोलकात्यात झाला.
- स्वामीनारायण पंथातील अध्यात्मिक गुरू प्रमुख ‘स्वामी महाराज’ यांचा जन्म 7 डिसेंबर 1921 मध्ये झाला.
- कन्नड साहित्यिक यू.आर. अनंतमूर्ती यांना 7 डिसेंबर 1994 रोजी ज्ञानपीठ पारितोषिक जाहीर.
- 7 डिसेंबर 1998 मध्ये 72व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी ‘वसंत बापट’ यांची निवड करण्यात आली होती.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा