Current Affairs of 5 October 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (5 ऑक्टोबर 2017)

चालू घडामोडी (5 ऑक्टोबर 2017)

एसबीआयचे नवे अध्यक्ष रजनीश कुमार :

 • देशातील सर्वात मोठ्या बँकेला नवा अध्यक्ष मिळाला आहे. केंद्र सरकारने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदासाठी रजनीश कुमार यांच्या नावाला मंजुरी दिली.
 • अपॉईंटमेंट कमिटी ऑफ द कॅबिनेटकडून (एसीसी) तीन वर्षांसाठी रजनीश कुमार यांना या पदावर नियुक्त केले जाणार आहे. 7 ऑक्टोबर रोजी ते आपला पदभार स्वीकारतील.
 • रजनीश कुमार हे सध्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत आहेत. सन 1980 मध्ये ते स्टेट बँकेत प्रोबेशनरी अधिकारी म्हणून रुजू झाले होते. त्यानंतर त्यांनी बँकेत विविध पदांवर काम केले.
 • सन 2015 मध्ये नॅशनल बँकींग ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक बनण्यापूर्वी ते व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून स्टेट बँकेची मर्चंट शाखा आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्सचे काम सांभाळत होते.
 • सध्या अरुंधती भट्टाचार्य या स्टेट बँकेच्या अध्यक्षा आहेत. त्यांचा कार्यकाळ 6 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. त्यांना सरकारकडून या पदावर राहण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. भट्टाचार्य यांनी ऑक्टोबर 2013 मध्ये या पदाची जबाबदारी सांभाळली होती. गेल्याच वर्षी सरकारने त्यांना तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर एक वर्षाची मुदतवाढ दिली होती.
 • स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिल्या आहेत. सन 1977 मध्ये त्या स्टेट बँकेत रुजू झाल्या होत्या.

मदरशांमध्येही राष्ट्रगीत बंधनकरक :

 • मदरशांमध्ये राष्ट्रगीत म्हटले जावे हा निर्णय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला होता. त्यांच्या या निर्णयावर आता अलाहाबाद हायकोर्टानेही शिक्कामोर्तब केले.

 • योगी आदित्यनाथ यांनी ऑगस्ट महिन्यात हा आदेश लागू केला. मात्र या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मदरशांतर्फे दाखल करण्यात आली होती. हीच याचिका अलाहाबाद हायकोर्टाने फेटाळली.
 • राष्ट्रगीतासंदर्भात मदरशांना कोणतीही सूट मिळणार नाही, असेही अलाहाबाद हायकोर्टाने स्पष्ट केले.
 • राष्ट्रगीत आणि तिरंग्याचा सन्मान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. राष्ट्रगीत हे कोणत्याही जात, धर्म, भाषा आणि भेद यांच्या कक्षेत येत नाही, असेही अलाहाबाद कोर्टाने म्हटले आहे.

 • 15 ऑगस्टला मदरशांमध्ये झेंडावंदन केले जावे आणि राष्ट्रगीत म्हटले जावे, असा आदेश उत्तर प्रदेश सरकारने जारी केला होता. त्यानंतर मदरसे आणि उत्तर प्रदेश सरकार यांच्यात मतभेद निर्माण झाले.
 • मदरशांनी योगी सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका अलाहाबाद कोर्टात दाखल केली होती. हीच याचिका फेटाळण्यात आली आहे.
 • तसेच उत्तरप्रदेश सरकार आमच्या देशभक्तीवर संशय घेत असल्याचा आरोपही काही मुस्लिम संघटनांनी ऑगस्ट महिन्यात केला होता.

तीन शास्त्रज्ञांना रसायनशास्त्राचे नोबेल जाहीर :

 • जॅक्स डबोके, ओकाईम फ्रँक, मायकल हेंडरसन या तिघांनाही यंदा रसायनशास्त्राचे नोबेल जाहीर करण्यात आले आहे.
 • पदार्थांच्या जैव रेणूंची रचना पाहण्यासाठी क्रायो-इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी विकसित करण्यासाठी या तिघांनी जे योगदान दिले त्याचमुळे हे नोबेल त्यांना दिले जात असल्याचे नोबेल समितीने म्हटले आहे.
 • जगातील सर्वोच्च सन्मान म्हणून नोबेल या पुरस्काराची ओळख आहे. 3 ऑक्टोबर रोजी पदार्थ विज्ञान क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाले, त्यानंतर 4 ऑक्टोबर रोजी रसायन शास्त्रातील पुरस्कार जाहीर करण्यात आले.
 • ‘हिंदुस्थान टाइम्स’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. डबोके, फ्रँक आणि हेंडरसन या तिघांनी पदार्थाच्या जैव रेणूंची रचना पाहण्यासाठी क्रायो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी विकसित करण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले. या तिघांच्या या महत्त्वाच्या संशोधनामुळे जैवरेणू गोठवून त्यांचा अभ्यास करणे हे संशोधकांना सोपे जाणार आहे.

रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण जाहीर :

 • रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षातील चौथे व्दिमासिक पतधोरण 4 ऑक्टोबर रोजी जाहीर केले असून रेपो दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाही.
 • ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये महागाईच्या दरात वाढ झाल्यामुळे रिझर्व्ह बँकेने व्याजदर स्थिर ठेवले आहेत.
 • गेल्या व्दिमासिक पतधोरणात रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने रेपो दरात पाव टक्क्यांनी कपात केली होती. मात्र यंदाच्या पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दर कायम ठेवले जाण्याची चर्चा आधीपासूनच होती.
 • 3 ऑक्टोबरपासून पतधोरण समितीच्या बैठकीला सुरुवात झाली होती. 4 ऑक्टोबर रोजी ही बैठक संपल्यानंतर रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर केले. अपेक्षेनुसार पतधोरण समितीने रेपो दर कायम ठेवले आहे.
 • तसेच यानुसार रेपो दर 6 टक्क्यांवर तर रिव्हर्स रेपो रेट 5.75 टक्क्यांवर कायम आहे. विकासदर 6.7 टक्के इतका राहिल, असे अनुमान रिझर्व्ह बॅंकेने वर्तविले. यापूर्वी हाच अंदा 7.3 टक्के इतका वर्तविण्यात आला होता.

भारत-जिबुतीमध्ये सल्लामसलती संदर्भाविषयी करार :

 • भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थित भारत आणि जिबुती या दोन देशांमध्ये परराष्ट्र कार्यालयांच्या पातळीवरील सल्लामसलतीसंदर्भातील करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या वेळी जिबुतीचे अध्यक्ष ओमर गुलेह ही उपस्थित होते.
 • जिबुती आणि इथिओपिया या दोन देशांच्या चार दिवसांच्या दौऱ्यासाठी कोविंद यांचे येथे आगमन झाले. राष्ट्रपती झाल्यानंतरचा गोविंद यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे.
 • कोविंद यांचे अध्यक्षीय निवासस्थानी गुल्लेह यांनी समारंभपूर्वक स्वागत केले. त्यानंतर कोविंद आणि गुलेह यांच्यात शिष्टमंडळ पातळीवरील चर्चा झाली.
 • तसेच त्यानंतर दोन्ही देशांमध्ये परराष्ट्र कार्यालयांच्या पातळीवरील सल्लामसलतीसंदर्भातील करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या वेळी ‘ऑपरेशन राहत’च्या काळात जिबुतीने केलेल्या सहकार्याबद्दल कोविंद यांनी गुलेह यांचे आभार मानले.
 • 2015मध्ये युद्धग्रस्त येमेनमधून भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी जिबुतीकडून मदत देण्यात मिळाली होती. जिबुतीने आंतरराष्ट्रीय सौरऊर्जा गटात (आयएसए) सहभागी होण्याची विनंती कोविंद यांनी केली.
 • जिबुतीला भेट देणारे कोविंद हे पहिलेच भारतीय नेते आहेत. सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या जिबुतीमध्ये चीनने आपला पहिला देशाबाहेरील लष्करी तळ उभारला आहे. त्या पार्श्वभूमीवर कोविंद यांच्या जिबुती दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

दिनविशेष :

 • स्टीव्ह जॉब्स – (24 फेब्रुवारी 1955 सान फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया, अमेरिका येथे जन्म झाला. तर 5 ऑक्टोबर 2011 पालो आल्टो, कॅलिफोर्निया, अमेरिका येथे निधन झाले.) हे एक अमेरिकन व्यवसायिक होते आणि ॲपल ह्या अमेरिकन कंपनीचा सहसंस्थापक व मुख्याधिकारी होते.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.