Current Affairs of 5 January 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (5 जानेवारी 2017)

चालू घडामोडी (5 जानेवारी 2017)

महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला :

 • भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने 4 जानेवारी रोजी अचानक मर्यादित षटकांच्या संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे भारतीय क्रिकेटमधील ‘कॅप्टन कूल’ युगाचा अस्त झाला आहे.
 • कर्णधारपद सोडले असले तरी धोनी भारताच्या एकदिवसीय आणि ट्वेंटी-20 संघातून खेळणार आहे.
 • धोनीच्या या निर्णयाची माहिती बीसीसीआयने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली असून, आता कसोटी कर्णधार विराटकडे भारताच्या एकदिवसीय आणि ट्वेंटी-20 संघांचे नेतृत्वही सोपवण्यात येण्याची शक्यता आहे.
 • 2007 साली भारताच्या एकदिवसीय आणि ट्वेंटी-20 संघांच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली होती. तेव्हापासून धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने विजेतेपदांवर कब्जा केला होता.
 • 2007 मध्ये भारताला ट्वेंटी-20 विश्वचषक जिंकून देणाऱ्या धोनीच्या नेतृत्वाखालीच भारताने 2011 साली घरच्या मैदानावर झालेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.
 • कपिल देवनंतर भारताला विश्वचषक जिंकून देणारा तो दुसरा कर्णधार ठरला होता.
 • तसेच पुढे 2013 साली इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही त्याने भारताला विजेतेपद मिळवून दिले होते. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानापर्यंत झेप घेतली होती.
 • 2015 ची क्रिकेट विश्वचषक स्पर्धा आणि 2016 साली मायदेशात झालेल्या ट्वेंटी-20 विश्वचषकातही त्याच्या नेतृत्वाखाली भारताने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.

एम.के. स्टॅलिन द्रमुकचे नवे कार्यकारी अध्यक्ष :

 • तमिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांची द्रविड मुण्णेत्र कळघम (DMK) पक्षाच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
 • पक्षाचे खजिनदार पद आणि तमिळनाडू विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारीही स्टॅलिन यांच्याकडे आहे.
 • स्टॅलिन यांचे वडील व तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री 92 वर्षीय एम. करुणानिधी यांची प्रकृती बिघडली असल्याने स्टॅलिन यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
 • पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीला पक्ष कार्यकारिणीचे सुमारे 3000 सदस्य उपस्थित होते.
 • भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा अपवाद वगळता भारतातील एखाद्या राज्यातील विधिमंडळ निवडणुका जिंकून स्वबळावर आपली सत्ता स्थापन करण्याची विक्रमी कामगिरी करणारा DMK हा पहिला राजकीय पक्ष आहे.

डिजिटल व्यवहारांसाठी निशुल्क हेल्पलाइन सुरू :

 • केंद्र सरकारच्या दूरसंचार माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांनी एकत्रितपणे सर्व डिजिटल व्यवहारांसाठी 1444 ही निशुल्क हेल्पलाइन सुरू केली आहे.
 • तसेच या हेल्पलाइनवर नव्याने सुरू करण्यात आलेल्या भारत इंटरफेस फॉर मनी (भीम) वॉलेटसह अन्य डिजिटल व्यवहारांच्या प्रश्‍नांवर उत्तरे मिळणार आहेत. ही हेल्पलाइन देशाच्या उत्तर, तसेच पूर्व भागातही इंग्रजी आणि हिंदीमध्ये आहे.
 • लवकरच सर्व भारतीय भाषांमध्ये ती सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती दूरसंचारचे सचिव जे.एस. दीपक यांनी दिली.
 • दूरसंचार मंत्रालय, माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि नॅसकॉम यांनी एकत्रितपणे ही हेल्पलाइन सुरू केली आहे.
 • सर्व दूरसंचार कंपन्या या हेल्पलाइनमध्ये सहभागी असल्याने सर्वच कंपन्यांच्या ग्राहकांना ही हेल्पलाइन उपलब्ध असेल.

 जे.एस. खेहर सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश :

 • न्यायाधीश जे. एस. खेहर यांनी 4 जानेवारी रोजी भारताचे 44 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांना शपथ दिली.
 • खेहर यांच्या सरन्यायाधीश बनविण्याच्या अधिसूचनेला आव्हान देताना दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती. त्यानंतर राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात खेहर यांना शपथ देण्यात आली.
 • न्यायाधीश टी. एस. ठाकूर सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाल्यानंतर खेहर यांनी 44 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. हे शीख समुदायातील पहिले सरन्यायाधीश आहेत.
 • तसेच खेहर हे पूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम करत होते. सात महिन्यांचा कार्यकाळ त्यांच्याकडे असणार आहे.

दिनविशेष :

 • 5 जानेवारी 1913 हा मराठी साहित्यिक श्रीपाद नारायण पेंडसे यांचा जन्मदिन.
 • मराठी साहित्यिक विजय तेंडुलकर यांचा जन्म 5 जानेवारी 1928 रोजी झाला.  
 • 5 जानेवारी 1949 रोजी राष्ट्रीय सरंक्षण प्रबोधिनी (एन.डी.ए) पुणे येथे सुरु झाली.
 • विक्रीकर कायद्याची सुरुवात 5 जानेवारी 1957 रोजी करण्यात आली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.