Current Affairs of 31 December 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (31 डिसेंबर 2015)
राज्यातील 18 अतिरिक्त “सीईओं’ना पदोन्नती :
- राज्यातील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पदोन्नती (निवडश्रेणी) देण्याचा गेल्या वीस वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न राज्याच्या ग्रामविकास व जलसंधारणमंत्री पंकजा मुंडे यांनी अखेरीस मार्गी लावला. नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांनी राज्यातील 18 अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवडश्रेणीत घेऊन पदोन्नती दिली आहे.
- महाराष्ट्र विकास सेवेतील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संवर्गात पदोन्नतीच्या संधी कमी प्रमाणात असल्यामुळे या संवर्गात निर्माण झालेली कठीणता दूर करण्यासाठी दिवंगत माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनीही पाठिंबा दिला होता. पंकजा मुंडे यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संवर्गातील काही पदे निवड श्रेणीत रूपांतरित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
Must Read (नक्की वाचा):
अरबी समुद्रात नौदलाने घेतली यशस्वी चाचणी :
- जहाजाच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करण्याची क्षमता असलेल्या बराक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी आज “आयएनएस कोलकता‘ या विनाशिकेवरून घेण्यात आली. बराक क्षेपणास्त्रामुळे आता भारतीय नौदलाच्या संहारक शक्तीमध्ये वाढ झाल्याचे मानले जाते.
- नौदलाच्या जहाजाच्या पृष्ठभागावरून हवेतील लक्ष्याचा वेध घेणाऱ्या बराक क्षेपणास्त्राची मारक क्षमता सुमारे 70 किलोमीटर एवढी आहे. नौदलाकडे असलेल्या क्षेपणास्त्रांच्या ताफ्यात लवकरच “बराक‘चा समावेश केला जाणार आहे. नौदलाच्या “आयएनएस कोलकता‘ या विनाशिकेवरून काल आणि आज दोन बराक क्षेपणास्त्रे हवेतील अतिवेगवान लक्ष्याच्या दिशेने डागण्यात आली. दोन्ही क्षेपणास्त्रांनी अचूक लक्ष्यभेद केल्याची माहिती नौदलाने जारी केलेल्या निवेदनात देण्यात आली आहे.
- अरबी समुद्रात सध्या नौदलाचा सराव सुरू आहे. या सरावादरम्यान “बराक‘ची चाचणी घेण्यात आली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि भारतीय नौदलाने इस्राईलच्या मदतीने ही चाचणी घेतली. बराकच्या यशस्वी चाचणीनंतर अवकाशातील मोठ्या अंतरावरील लक्ष्याचा भेद घेण्याची भारतीय नौदलाची क्षमता वाढली असल्याचे सांगण्यात आले. इस्राईल एरोस्पेस इंडस्ट्रीज आणि हैदराबाद येथील “डीआरडीओ‘च्या प्रयोगशाळेने संयुक्तपणे “बराक‘ची निर्मिती केली आहे.
जीवनगाणे शिकवणारे कवी मंगेश पाडगावकर यांचे निधन :
- ‘येणार असेल, मरण तर येऊ द्यावं; जमलंच तर लाडानं जवळ घ्यावं,‘ असे सांगताना लहानग्यांपासून आबालवृद्धांपर्यंत सर्वांनाच जगण्यावर शतदा प्रेम करायला शिकवणारे प्रेमकवी आणि महाराष्ट्र भूषण मंगेश पाडगावकर (वय 86) यांचे बुधवारी शीव येथील घरी दीर्घ आजाराने निधन झाले. नववर्षाचा सूर्य उगवायला अवघा एक दिवस बाकी असताना या साहित्यसूर्याच्या सकाळीच झालेल्या अस्तामुळे साहित्यविश्वावर शोककळा पसरली.
- शीव येथील “साईप्रसाद‘ इमारतीतील घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अत्यवस्थ होती. “अखेरचा श्वास मी माझ्या घरात घेणार‘ या त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या खोलीतच “आयसीयू‘ कक्ष तयार करण्यात आला होता. मंगळवारी रात्रीपासून त्यांची प्रकृती झपाट्याने खालावली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
- “लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती‘, असे म्हणत त्यांच्या स्मृती रसिकांच्या मनात कायमच्या ठेवून कवितेच्या विश्वातली ही प्रेमकहाणी अधुरी सोडून मंगेश पाडगावकर गेले. काही वर्षांपासून त्यांना नागीण झाली होती. या आजाराने त्यांचा पिच्छा सोडला नव्हता. असह्य वेदना होत असतानाही “या नागिणीच्या मिठी‘बाबत ते मिश्कीलपणे बोलत असत.
- साहित्यविश्वाचा श्वास असलेल्या या महान कवीच्या निधनाची वार्ता समजताच शीव येथील त्यांच्या निवासस्थानी चाहत्यांनी गर्दी केली होती. कवितेच्या या तेजस्वी ताऱ्याला अखेरचा सलाम करण्यासाठी राहत्या घरी त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी यशोदा, मुलगा अजित, अभय व मुलगी अंजली कुलकर्णी व तनुश्री, तनय, रूपक ही नातवंडे असा परिवार आहे.
वहिदा रेहमान यांना विशेष पुरस्कार :
- सहाव्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेत्री वहिदा रेहमान यांना विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आला. चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात म्हणजेच 22 जानेवारीला सायंकाळी चार वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरच्या मुख्य सभागृहात शरद पवार यांच्या हस्ते त्यांना तो प्रदान करण्यात येणार आहे. हा चित्रपट महोत्सव 22 ते 28 जानेवारीदरम्यान चव्हाण सेंटरमध्ये होणार आहे, अशी माहिती महोत्सवाचे संचालक जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
- जब्बार पटेल म्हणाले की, वहिदा रेहमान यांचे स्वतंत्र अस्तित्व आहे. त्यांनी मोठमोठ्या दिग्दर्शकांसोबत काम केले असून त्या अष्टपैलू अभिनेत्री आहेत. चित्रपटसृष्टीतील भरीव योगदानाबद्दल यंदाचा विशेष पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना देण्यात येणार आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पुणे फिल्म फाऊंडेशन आणि महाराष्ट्र सरकार यांच्या वतीने हा चित्रपट महोत्सव होणार आहे.
- चव्हाण सेंटरच्या इमारतीत मुख्य सभागृह, रंगस्वर व सांस्कृतिक सभागृह या तिन्ही सभागृहात दररोज पाच चित्रपटांचे प्रदर्शन केले जाईल. डीसीपी, ब्ल्यूरे, डीव्हीडी, डीजीबीटाचा वापर त्यासाठी केला जाईल. पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळालेला चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यानंतर मुख्य सभागृहात दाखवला जाणार आहे.
- महोत्सवांतर्गत एकूण 75 चित्रपट प्रदर्शित केले जातील. त्यात ग्लोबल सिनेमा विभागात 40, रिट्रॉस्पेक्टिव्ह विभागात 5, कंट्री फोकस विभागात 7, इंडियन सिनेमा विभागात 5, मराठी सिनेमा विभागात 5, स्टुडंट कॉम्पिटिशन विभागात 10 चित्रपटांचा समावेश असेल. महोत्सवाच्या काळात दररोज सकाळी साडेदहा वाजता चित्रपटांचे प्रदर्शन सुरू होईल.
ओडिशाचे ‘ऑपरेशन स्माइल-2’ :
- हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी तसेच त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी ओडिशा सरकारने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन स्माइल‘ या मोहिमेला पहिल्या टप्प्यात चांगले यश आल्याने या मोहिमेचा दुसरा टप्पा नव्या वर्षात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- गुन्हे शाखेच्या कटक येथील मुख्यालयामध्ये झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीस विविध जिल्ह्यांमधील शंभर पोलिस अधिकारी उपस्थित होते. या मोहिमेसाठी दहा पोलिसांची पथके स्थापन करण्यात आली आहेत.
अणु कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी :
- ऑस्ट्रेलियासोबतच्या नागरी अणु सहकार्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. यामुळे भारतातील अणुभट्ट्यांसाठी ऑस्ट्रेलियाकडून युरेनिअम पुरवठ्याचा मार्ग सुकर झाला आहे. गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियाचे तत्कालिन पंतप्रधान टोनी अबॉट यांच्यासोबत हा करार करण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाचे सध्याचे पंतप्रधान माल्कर टर्नबुल यांनी 15 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या करारासाठीचे सर्व सोपस्कार पूर्ण झाले असून, त्याची अंमलबजावणी केली जाऊ शकते, असे स्पष्ट केले होते.
- सध्या ऑस्ट्रेलियाकडे युरेनिअमचा मोठा साठा आहे. युरेनिअमच्या साठ्याच्या दृष्टीने जगात ऑस्ट्रेलियाचा तिसरा क्रमांक लागतो, असे जागतिक अणु संघटनेने आणि आस्ट्रेलियातील सरकारने म्हटले आहे.
- ऑस्ट्रेलिया अणुऊर्जेचा वापर करीत नसल्यामुळे त्यांच्याकडील युरेनिअमची जास्तीत जास्त निर्यातच केली जाते. अणुऊर्जेचा विस्तार करण्याची योजना आखल्यामुळे भारतासाठी युरेनिअमचा पुरवठा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या दृष्टीने या कराराला अत्यंत महत्त्व आहे.
मुंबईच्या आयुक्तपदी दत्ता पडसलगीकर :
- अहमद जावेद यांच्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तपदाची धुरा दत्ता पडसलगीकर यांच्याकडे सोपविली जाण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. ‘आयबी’मध्ये कार्यरत असलेल्या पडसलगीकर यांना पुन्हा ‘होम केडर’ म्हणजेच महाराष्ट्रासाठी रिलिव्ह करावे, असे पत्र राज्य सरकारकडून केंद्रीय गृहविभागाला पाठविण्यात आले आहे. पडसलगीकर यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून मुंबईत परतण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे त्यांची निवड निश्चित असल्याचे गृहविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
- आयुक्तपदासाठी त्यांच्या स्पर्धेत असलेल्या संजय बर्वे यांचे नाव मागे पडले आहे. विद्यमान आयुक्त अहमद जावेद यांची सौदी अरेबियाच्या राजदूतपदी नियुक्ती जाहीर झाली. तथापि, 31 जानेवारीपर्यंत ते सेवेत असतील. राज्य सरकारने गेल्या आठ सप्टेंबरला आकस्मिकपणे राकेश मारिया यांची पदोन्नती करून, आयुक्तपदाची धुरा अहमद जावेद यांच्याकडे सोपवली. जावेद यांना जेमतेम पावणेपाच महिन्यांचा कालावधी मिळणार, हे निश्चित होते.
- 20 दिवसांपूर्वी त्यांची सौदी अरेबियाच्या राजदूतपदीनियुक्ती केल्याचे केंद्रीय गृहविभागाने जाहीर केले, तसेच जावेद यांच्यासाठी ‘अपग्रेड’ केलेले आयुक्तपद पुन्हा ‘डाउन ग्रेड’ करून अप्पर महासंचालक दर्जाचे करण्याचा निर्णय झालाआहे. त्यानुसार, आयबीत कार्यरत असलेले दत्ता पडसलगीकर व संजय बर्वे यांची नावे चर्चेत होती.त्यात पडसलगीकर यांना पसंती देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्यानुसार, गृहविभागाने केंद्रीय गृहविभागाला पत्र पाठवून त्यांना ‘होम केडर’साठी रिलीव्ह करावे,
ऑस्ट्रेलियाचा मालिका विजय :
- ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडीजचा दुसऱ्या कसोटी सामन्यात 177 धावांनी पराभव केला आणि फ्रँक वॉरेल चषकावर नाव कोरले. ऑस्ट्रेलिायने होबार्टमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव 212 धावांनी विजय मिळवला होता. दुसऱ्या कसोटी सामन्यात मंगळवारी चौथ्या दिवशी वेस्ट इंडीजचा दुसरा डाव 282 धावांत गुंडाळत विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याआधी ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव 3 बाद 179 धावसंख्येवर घोषित करीत विंडीजपुढे 460 धावांचे आव्हान ठेवले.
- लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजने चहापानापर्यंत 4 बाद 146 धावांची मजल मारली होती. कर्णधार जेसन होल्डर व माजी कर्णधार दिनेश रामदिन यांनी सहाव्या विकेटसाठी 100 धावांची भागीदारी केली, पण अखेरच्या चार विकेट झटपट माघारी परतल्यामुळे निर्धारित वेळेच्या 1.3 षटकांपूर्वीच विंडीजला पराभवाला सामोरे जावे लागले. होल्डरने 86 चेंडूंना सामोरे जाताना 68 धावा फटकावल्या, तर रामदिनने 90 चेंडूंमध्ये 59 धावांची खेळी केली. रामदिनची ही गेल्या दोन वर्षांतील सर्वोत्तम खेळी ठरली.
- ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला फिरकीपटू नॅथन लियोन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याने सात बळी घेतले. अष्टपैलू मिशेल मार्शने दुसऱ्या डावात 61 धावांच्या मोबदल्यात 4 बळी घेतले. पहिल्या डावात 59 धावा फटकावणारा कार्लोस ब्रेथवेट दुसऱ्या डावात 2 धावा काढून बाद झाला. त्याला लियोनने माघारी परतवले. कर्णधार होल्डरला मार्शने तंबूचा मार्ग दाखवला. केमार रोच (11) याला पेटिन्सनने, तर जेरोम टेलरला (00) मार्शने बाद केले.