Current Affairs of 30 November 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (30 नोव्हेंबर 2017)
धर्मादाय आयुक्त कार्यालयात डिजिटल यंत्रणा :
- धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे कामकाज लोकाभिमुख, पारदर्शी होण्यासाठी व्यवस्था निर्माण करावी, त्यासाठी मानवी हस्तक्षेपरहित संपूर्ण डिजिटल यंत्रणा उभी करण्याचे, तसेच विश्वस्त नोंदणीच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी डिजिटल सिग्नेचर अथवा आधार क्रमांक सलंग्न यंत्रणा उभी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
- सार्वजनिक विश्वस्त कायद्यातील बदल व त्याच्या अंमलबजावणीचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी विधी व न्याय राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, विभागाचे सचिव राजेंद्र भागवत, धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे आदी उपस्थित होते. या वेळी विविध जिल्ह्यांतील धर्मादाय कार्यालयांतील अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
Must Read (नक्की वाचा):
अमेरिका उत्तर कोरियावर अतिरिक्त निर्बंध लादणार :
- उत्तर कोरियाने केलेल्या शक्तीशाली आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीनंतर अमेरिका चांगलीच भडकली असून उत्तर कोरियावर यापुढे अतिरिक्त कडक निर्बंध लादण्यात येतील असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. या मुद्द्यावरुन चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी त्यांनी 29 नोव्हेंबर रोजी संवाद साधला आणि उत्तर कोरियाला समजावण्याची सूचना त्यांनी केली. ट्रम्प यांनी ट्विटद्वारे ही माहित दिली आहे.
- उत्तर कोरियाने 29 नोव्हेंबर रोजी व्हॉसाँग-15 नामक सर्वाधिक शक्तीशाली आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र सादर केले. हायड्रोजन बॉम्बच्या चाचणीनंतर दोन महिन्यांच्या कालावधीनंतर उत्तर कोरियाने पुन्हा एकदा हे पाऊल उचलले आहे.
- अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन आणि संपूर्ण पूर्व अमेरिकेचा किनारी भाग या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात येत असल्याची भीती काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे अमेरिकेनेही चिंता व्यक्त केली आहे.
- तसेच यासंदर्भात ट्रम्प यांनी दक्षिण कोरियाशी देखील यासंदर्भात कोणती शक्य कारवाई करता येईल याबाबत विचारणा केली आहे. यावेळी दक्षिण कोरियाचे उपराष्ट्रपती माईक पेन्स यांनी आम्ही उत्तर कोरियाला अशा प्रकारे संहारक कृत्ये न करण्याबाबत इशारा दिल्याचे सांगितले.
मॅगीवरून नेस्ले इंडियाला 45 लाखांचा दंड :
- नेस्ले इंडियाचे उत्पादन असलेल्या मॅगीची लॅब टेस्ट घेण्यात आली. या टेस्टमध्ये मॅगी पुन्हा एकदा फेल झाल्याने नेस्ले इंडियाला 45 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
- उत्तर प्रदेशातील शहाजहानपूर जिल्हा प्रशासनाने नेस्ले इंडिया आणि वितरकांना हा दंड ठोठावला आहे. कंपनीसह तीन वितरकांना 15 तर दोन विक्रेत्यांना 11 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
- महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासनाने यापूर्वी 2015 साली मॅगीची 20 विविध प्रकारची चाचणी घेतली होती. यापैकी पाच चाचण्यांमध्ये मॅगीमध्ये शिशाचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक आढळले होते.
- तसेच याशिवाय भारतीय अन्न सुरक्षा आणि दर्जा मानक प्राधिकरणानेही नेस्ले कंपनीच्या नऊ प्रकारच्या मॅगी नूडल्सवर बंदी घातली होती. मात्र, नंतर मॅगीचे सर्व नमुने प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या सर्व चाचणीमध्ये मॅगी नूडल्स यशस्वी ठरल्याने मुंबई उच्च न्यायालयाने ऑगस्ट महिन्यात सशर्त बंदी उठवली होती.
- दरम्यान, पुन्हा केलेल्या मॅगीच्या चाचणीतही शिशाचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक असून, सेवनासाठी अपायकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा नेस्लेच्या मॅगीला 45 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
संरक्षणमंत्र्यांकडून स्वदेशी लढाऊ विमानाचे कौतुक :
- सिंगापूरचे संरक्षणमंत्री एन.ई. हेन यांनी भारताच्या स्वदेशी बनावटीच्या ‘तेजस’ या विमानाचे मोठे कौतुक केले. हे विमान उत्कृष्ट आणि प्रभावशाली असल्याचे त्यांनी म्हटले. हेन यांनी 28 नोव्हेंबर रोजी बेंगळूरु येथील कलाईकुंड या हवाई दलाच्या तळावरुन पहिले परदेशी नागरिक म्हणून तेजस विमानातून सुमारे अर्धा तास हवाई सफर केली. यावेळी त्यांनी भारताच्या या बहुद्देशीय हलक्या विमानाचे तोंडभरून कौतुक केले.
- हेन म्हणाले, “हे खूपच शानदार आणि प्रभावशाली विमान आहे. यावेळी त्यांनी एव्हीएम मार्शल ए.पी. सिंह आणि तेजस उडवणाऱ्या पायलटची प्रशंसा केली. विमानात बसल्यानंतर एका लढाऊ विमानात बसल्यानंतर आम्ही आरामात कारमधून प्रवास करीत असल्याचे भासल्याचे त्यांनी म्हटले.”
- दरम्यान, सिंगापूरच्या संरक्षणमंत्र्यांनी तेजसच्या खरेदीत रस दाखवला आहे. सिंगापूर तेजस लढाऊ विमाने खरेदी करण्यात उत्सुक आहे का? या प्रश्नावर संरक्षणमंत्री हेन यांनी सांगितले की, मी पायलट नाही, यावर तंत्रज्ञानाची माहिती असणाऱ्या लोकांनाच निर्णय घेता येईल. अधिक चर्चेनंतर सिंगापूरने तेजसच्या खरेदीत रस असल्याचे सांगितल्याचे भारतीय संरक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
अभिलाषा म्हात्रे यांचा मनपाकडून सन्मान :
- आशियाई अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत भारतीय महिला संघाने सुवर्णपदक पटकाविल्याबद्दल भारतीय महिला कबड्डी संघाच्या कर्णधार व महापालिकेच्या क्रीडा अधिकारी अभिलाषा म्हात्रे यांचा महापालिका मुख्यालयात सन्मान करण्यात आला. यावेळी महापौर, आयुक्त यांच्या पालिकेचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
- नुकत्याच गोरगान इराण येथे दि. 23 ते 26 नोव्हेंबरदरम्यान पार पडलेल्या आशियाई अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी अंतिम विजेतेपद संपादन करून देशाचा बहुमान वाढविला आहे. त्यातही महिलांच्या कबड्डी संघाच्या कर्णधार अभिलाषा म्हात्रे या महापालिकेच्या क्रीडा अधिकारी असल्याने हे यश नवी मुंबईकरांसाठी आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे भारतीय संघ मायदेशी परतल्यावर महापालिका मुख्यालयात महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते महापौर दालनात सत्कार करण्यात आला.
दिनविशेष :
- 30 नोव्हेंबर 1917 रोजी कलकत्ता येथे ‘आचार्य जगदीश चंद्र बोस’ इन्स्टिट्युटची स्थापना झाली.
- ख्यातनाम साहित्यिक ‘पु.ल. देशपांडे’ यांना 30 नोव्हेंबर 1996 मध्ये महाराष्ट्र सरकारचा पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा