Current Affairs of 30 January 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (30 जानेवारी 2017)

चालू घडामोडी (30 जानेवारी 2017)

‘टॉप’ समितीच्या प्रमुखपदी अभिनव बिंद्रा :

 • बीजिंग ऑलिम्पिकचा सुवर्ण विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याची केंद्र सरकारने पुनर्गठित टार्गेट ऑलिम्पिक पोडियम (टॉप) समितीच्या प्रमुखपदी निवड केली. पी.टी. उषा आणि प्रकाश पदुकोण यांचा देखील समितीत समावेश आहे.
 • बिंद्रा हा मागच्या समितीचा देखील प्रमुख होता पण त्याने 2016 च्या रिओ ऑलिम्पिकवर लक्ष केंद्रित करण्यासाठी समितीचा राजीनामा दिला होता.
 • दहा सदस्यांच्या समितीत अन्य दोन खेळाडू नेमबाज अंजली भागवत आणि सिडनी ऑलिम्पिकची कांस्य विजेती कर्णम मल्लेश्वरी यांचा तसेच टेनिस महासंघाचे अध्यक्ष सी.के. खन्ना, बॉक्सिंगमधील प्रशासक के. मुरलीधरन राजा, रेल्वे बोर्डाच्या सचिव रेखा यादव, साईचे कार्यकारी संचालक एस.एस. रॉय, संयुक्त क्रीडा सचिव इंदर धमीजा आदींचा समावेश आहे.
 • तसेच ही समिती खेळाडू निवडीची पद्धत स्वत: निश्चित करेल. गरज भासल्यास तज्ज्ञांना पाचारण करेल. समितीचा कार्यकाळ एक वर्षाचा असेल.
 • 2020 आणि 2024 च्या ऑलिम्पिकसाठी पदक विजेत्यांचा शोध घेणे हा टॉपचा उद्देश आहे. ही योजना आधी 2016 आणि 2020 च्या ऑलिम्पिकला डोळ्यापुढे ठेवून आखण्यात आली होती.

पी.व्ही. सिंधूला सय्यद मोदी ग्रांप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद :

 • रौप्यपदकविजेती पी.व्ही. सिंधू आणि राष्ट्रीय चॅम्पियन समीर वर्मा यांनी नव्या वर्षाची शानदार सुरुवात करताना 29 जानेवारी रोजी 1,20,000 डॉलर बक्षीस रकमेची सय्यद मोदी ग्रांप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत अनुक्रमे महिला व पुरुष गटात विजेतेपद पटकावले.
 • विशेष म्हणजे, भारताने या स्पर्धेत वर्चस्व राखताना पाचपैकी तीन गटांत अजिंक्यपद आपल्या नावावर केले.
 • तसेच गेल्या सत्रात शानदार फॉर्ममध्ये असणाऱ्या अव्वल मानांकित सिंधूने इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मरिस्काचा 21-13, 21-14 असा पराभव केला, तर हाँगकाँग सुपर सिरीजच्या फायनलमध्ये धडक मारणाऱ्या समीरने आपल्याच देशाच्या साई प्रणीतचा 44 मिनिटे रंगलेल्या लढतीत 21-19, 21-16 असा पराभव केला.
 • ब्राझील आणि रशियात ग्रांप्री विजेतेपद जिंकणाऱ्या प्रणव जेरी चोपडा आणि एन. सिक्की रेड्डी या व्दितीय मानांकित जोडीनेदेखील मिश्र दुहेरीतील आपले पहिले ग्रांप्री गोल्डचे विजेतेपद पटकावले.

मनवीर गुर्जर ‘बिग बॉस-10’ चा विजेता :

 • सर्वात लोकप्रिय स्पर्धक ठरलेला मनवीर गुर्जर बिग बॉस 10 चा विजेता ठरला आहे. बिग बॉसच्या अंतिम भागात बानी, लोपा, मनवीर आणि मनू यांपैकी एक या स्पर्धेचा विजेता ठरणार होता.
 • मनू पंजाबीने दहा लाख रुपये घेत फिनाले मधून बाहेर पडला, यामुळे बानी, मनवीर व लोपामुद्रा यांच्यात सरळ लढत झाली. यात बानीला मागे टाकत मनवीरने विजेतेपदावर आपले नाव कोरले.
 • मनवीरला ट्रॉफीसह 40 लाख रुपये मिळाले. मनवीरच्या वडिलांनी बक्षिसामधील रक्कमेतील 20 लाख रुपये सलमानच्या बीइंग ह्युमन या सामाजिक संस्थेला दान म्हणून दिले आहेत.
 • तसेच या शोमधील सर्वात लोकप्रिय स्पर्धक बानी फर्स्ट रनर अप तर लोपा सेकंड रनर अप ठरली.

डॉ. विजय भटकर नालंदा विद्यापीठाच्या नवे कुलगुरू :

 • बिहारमधील नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून प्रसिद्ध संशोधक आणि ‘परम’ सुपरकॉम्प्युटरचे (परम संगणक) निर्माते डॉ. विजय भटकर यांची नियुक्ती झाली. नालंदा विद्यापीठाच्या वेबसाईटवर तशी घोषणा केली आहे.
 • भटकर यांची 25 जानेवारीपासून नियुक्ती झाल्याचे वेबसाईटवर म्हटले आहे. कुलगुरू म्हणून भटकर तीन वर्षे काम पाहतील.
 • सुपरकॉम्प्युटिंगच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱया सी-डॅक विभागाच्या स्थापनेत भटकर यांचा मोलाचा वाटा आहे. त्याशिवाय त्यांनी ईआर अँड डीसी, आआयआयटीएम-के, आय2आयटी, ईटीएच रिचर्स लॅब, एमकेसीएल आणि इंडिया इंटरनॅशनल मल्टियुनिव्हर्सिटी अशा राष्ट्रीय संस्थांच्या स्थापनेतही प्रमुख सहभाग नोंदवला आहे.
 • भटकर यांनी भारत सरकारच्या विज्ञान सल्लागार समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे. सीएसआरच्या गव्हर्निंग कौन्सिलचेही ते सदस्य राहिले आहेत.
 • महाराष्ट्र आणि गोवा सरकारच्या ई गव्हर्नन्स समितीवर त्यांनी काम केले आहे. देशातील आघाडीच्या विज्ञान, अभियांत्रिकी आणि व्यावसायिक संस्थांवर ते काम करीत आहेत.
 • तसेच पद्मभूषण, पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कारांनी त्यांना भारत आणि महाराष्ट्र सरकारने यापूर्वी गौरविले आहे. भटकर यांनी 12 पुस्तके आणि 80 शोधनिबंध लिहिले आहेत. सध्या ते इंडिया इंटरनॅशनल विद्यापीठाचे कुलपती आहेत.

दिनविशेष :

 • 30 जानेवारी हा भारताचा शहीद दिन आहे.
 • भारतीय राजकारणी चिदंबरम् सुब्रमण्यम् यांचा जन्म 30 जानेवारी 1910 रोजी झाला.
 • 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसेने महात्मा गांधींचा पिस्तुलाने खून केला. हा दिवस महात्मा गांधीचा स्मृतीदिन आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.