Current Affairs of 3 October 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (3 ऑक्टोबर 2017)
ओबीसी वर्गीकरणासाठी नव्या आयोगाची स्थापना :
- केंद्रीय यादीत समाविष्ट असलेल्या अन्य मागासवर्गांमध्ये (ओबीसी) मोडणार्या सर्व जातींना आरक्षणाचे फायदे समन्यायी पद्धतीने देता यावेत या उद्देशाने या जातींचे पोटवर्गीकरण करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एका घटनात्मक आयोगाची स्थापना केली.
- हा आयोग राज्यघटनेच्या अनुच्छेद 340 अन्वये नेमण्यात आला असून काही दिवसांपूर्वीच निवृत्त झालेल्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश न्या.जी. रोहिणी या त्याच्या अध्यक्ष असतील.
- तसेच डॉ. ए.के. बजाज यांची आयोगाचे सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. भारतीय वंशशास्त्रीय सर्वेक्षण संचालक व जनगणना महानिबंधक हे पदसिद्ध सदस्य असतील. केंद्रीय सामाजिक न्याय खात्याचे सहसचिव आयोगाचे पदसिद्ध सचिव म्हणून काम पाहतील.
- अध्यक्षांनी कार्यभार स्वीकारल्यापासून तीन महिन्यात आयोगाने अहवाल देणे अपेक्षित आहे.
- केंद्रीय यादीत समाविष्ट असलेल्या अन्य मागासवर्गांच्या आरक्षणाचे लाभ त्यातील विविध जातींना व पोटजातींना कसे अन्याय्य पद्धतीने मिळतात याचा अभ्यास करणे, ओबीसीं’मध्ये मोडणार्या पोटजातींचे वर्गीकरण करणे आणि आरक्षणाचे लाभ त्या सर्व जातींना समन्यायी पद्धतीने देण्यासाठी कोणते निकष व पद्धत वापरावी याची शिफारस करणे अशी कार्यकक्षा आयोगास ठरवून देण्यात आली आहे.
Must Read (नक्की वाचा):
तीन अमेरिकन शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक :
- वैद्यकशास्त्रातील यंदाचा प्रतिष्ठेचा नोबेल पुरस्कार 2017, जेफरी सी. हॉल, मायकल रोसबाश आणि मायकल डब्लू. यंग या तीन अमेरिकन शास्त्रज्ञांना जाहीर झाला आहे.
- ‘molecular mechanisms controlling the circadian rhythm’ या महत्वपूर्ण संशोधनासाठी या तिघांना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
- जेफरी हॉल, मायकल रोसबाश आणि मायकल यंग यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल 108 व्या नोबेल पुरस्काराची येथील कारोलिन्स्का इन्सिट्यूटमधील नोबेल समितीच्या व्यासपीठावरून घोषणा करण्यात आली.
- तसेच या पुरस्कारांतर्गत या शास्त्रज्ञांचे नाव असलेले नोबेलचे मानचिन्ह तसेच 8 लाख 25 हजार पौंडांची रक्कम या तीन शास्त्रज्ञांमध्ये विभागून देण्यात येणार आहे.
- ‘सजीवांमधील दैनंदिन प्रक्रियांचे अंतर्गत चक्र’ यामध्ये या तिघांनी महत्वपूर्ण संशोधन केले आहे. या घड्याळरुपी चक्रामुळे सजीवांमधील झोपेचे प्रकार, खाण्यापिण्याच्या पद्धती, हार्मोन्सची निर्मिती आणि रक्तदाब यांचे नियमन होते, हे त्यांनी प्रयोगाद्वारे सिद्ध केले आहे.
- सजीवांमधील हे अंतर्गत घड्याळ आणि बाह्य वातावरण यांच्यामध्ये बदल झाल्यास त्याचा सजीवांवर परिणाम होतो. यासाठी उदाहरणादाखल त्यांनी एखादे जेट विमान जोराचा आवाज करीत आपल्या डोक्यावरुन गेल्यानंतर होणाऱ्या अवस्थेचा दाखला दिला आहे. या तिन्ही शास्त्रज्ञांच्या टीमने सजीवांमधील या अंतर्गत घडाळ्यातील विविध प्रकारचे जनुकं आणि प्रथिनांचा शोध लावला आहे.
बंदुकीचे परवाने सर्वाधिक असणारा राज्य उत्तर प्रदेश :
- बंदुकीचे परवाने मिळविण्याच्या बाबतीत उत्तर प्रदेश राज्याचा देशात सर्वात वरचा क्रमांक आहे. एकूण 12.77 लाख जणांकडे बंदूक बाळगण्याचा परवाना आहे. त्यापाठोपाठ दहशतवादग्रस्त जम्मू-काश्मीरचा क्रमांक असून तेथे 3.69 लाख जणांकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना आहे. महाराष्ट्रात 84 हजार 50 जणांकडे परवाने आहेत.
- केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात 31 डिसेंबर 2016 पर्यंत एकूण 33 लाख 69 हजार 444 जणांकडे बंदुकीचे परवाने आहेत. त्यांपैकी उत्तर प्रदेशात 12 लाख 77 हजार 914 जणांकडे बंदूक बाळगण्याचा परवाना आहे. यांपैकी बहुसंख्य परवाने हे वैयक्तिक सुरक्षेच्या कारणास्तव घेण्यात आलेले आहेत.
- तसेच उत्तर प्रदेशची लोकसंख्या (2011 जनगणनेनुसार) 19 कोटी 98 लाख 12 हजार 341 इतकी आहे.
- गेल्या तीन दशकांपासून दहशतवादग्रस्त असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये तीन लाख 69 हजार 191 जणांकडे बंदुकीचे परवाने आहेत. या राज्याची लोकसंख्या (2011 जनगणनेनुसार) एक कोटी, 25 लाख 41 हजार 302 इतकी आहे, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.
राजघाटावर महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण :
- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 148 व्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी महात्मा गांधी यांच्या 1.8 मीटर उंचीच्या ब्रॉंझच्या पुतळ्याचे अनावरण केले.
- प्रसिद्ध मूर्तिकार राम सुतार यांनी हा पुतळा तयार केला असून, तो राजघाट येथे बसविण्यात आला आहे. या पुतळ्याची किमत ही आठ लाख 73 हजार इतकी असल्याचे प्रसिद्धीस असलेल्या पत्रकात म्हटले आहे.
- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे समाधिस्थळ असलेल्या राजघाट येथे पहिल्यांदाच नवीन सुविधा उपलब्ध झाल्या असून, त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक येथे येत आहेत.
- ग्रेनाइटच्या दोन फूट उंचीवर हा पुतळा बसविला आहे. राजघाटावरील या पुतळ्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात सुधारणांची कामे हाती घेण्यात आलेली आहेत.
- राजघाटावर दररोज दहा हजार पर्यटक भेट देत असून, त्यात अनेक परदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. पार्किंगच्या जागेतील इंटरप्रिटेशन केंद्राचे उद्घाटनही नायडू यांनी या वेळी केले.
- 59 लाखांचे एलईडी स्क्रीनचा वापर करून गांधीजींच्या जीवनावर आणि त्यांच्या कार्याबद्दल माहिती नागरिकांना देण्यात येत आहे. त्याशिवाय पर्यटकांना गांधीजींवरील चित्रपट आणि त्यांची भाषणेही ऐकता येणार आहेत, असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
भारताने आयात केले अमेरिकी कच्चे तेल :
- अमेरिकेकडून आयात केलेले पहिलेवहिले कच्चे तेल भारतामध्ये ओडिशातील पारादीप बंदरावर दाखल झाले.
- ‘इंडियन ऑइल कार्पोरेशन’ने (आयओसी) 16 लाख बॅरल तेलाची मागणी नोंदवली होती.
- अमेरिकेच्या एमटी न्यू प्रॉस्परिटी या अत्यंत मोठ्या कच्च्या तेलवाहू नौकेतून हे तेल पारादीप बंदरामध्ये दाखल झाले. या नौकेची क्षमता वीस लाख बॅरल तेल वाहून नेण्याची आहे.
- 19 ऑगस्ट रोजी ही नौका भारताकडे येण्यास निघाली होती. ‘आयओसी’ने आपल्या निवेदनात म्हटले आहे, ‘पारादीप, हल्दिया (पश्चिम बंगाल), बरौनी (बिहार), बोंगाइगाव (आसाम) या ठिकाणी असलेल्या रिफायनरींमध्ये या तेलावर प्रक्रिया करण्यात येईल.
- अमेरिकेकडून कच्च्या तेलाची आयात करणारी आयओसी ही भारतातील पहिली कंपनी ठरली आहे. एकूण 39 लाख बॅरलची मागणी ‘आयओसी’ने नोंदवली आहे.’ पारादीप बंदरावर छोटेखानी कार्यक्रमाचे यानिमित्त आयोजन करण्यात आले होते. अमेरिकेच्या वकिलातीतील, ‘आयओसी’चे, मंत्रालयातील अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
- भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांनीही त्यांचा कोची आणि वायझॅग येथील रिफायनरींसाठी 29.5 लाख आणि 10 लाख बॅरलची मागणी अमेरिकी कच्च्या तेलासाठी नोंदवली आहे. त्यामुळे भारतातील सरकारी कंपन्यांकडून एकूण 78.5 लाख बॅरल तेलाची मागणी नोंदवण्यात आली आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा