Current Affairs of 24 November 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (24 नोव्हेंबर 2017)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करणार चित्रपट महोत्सवाचे आयोजन :
- दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ सिनेमावरून गोंधळ सुरू असतानाच एका नव्या विषयावरून देशात पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चित्रपट महोत्सवाचे आयोजन करणार आहे. ‘फर्स्टपोस्ट’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
- संघाचे म्हणणे आहे की, चित्रपट हे समाजाचा आरसा असतात. याद्वारे सामाजिक आणि बौद्धिक बदल घडवून आणला जाऊ शकतो. त्याचबरोबर चित्रपटच सशक्त माध्यम आहे ज्याद्वारे आजच्या तरुण पिढीमध्ये उत्कृष्ट सामाजिक मूल्ये आणि संस्कार रुजवले जाऊ शकतात. त्यामुळेच संघ आता या दृष्टीने हळूहळू पुढे जात आहे.
- तसेच यापूर्वी वेळोवेळी संघाच्यावतीने विविध चित्रपटांवर टिपण्णी करण्यात आली आहे. मात्र, या क्षेत्रात पदार्पणाचा निर्णय पहिल्यांदाच घेण्यात आला आहे.
- गोव्याचे राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या पुस्तकावर आधारित राजमाता विजयाराजे सिंधिया यांच्यावरील चित्रपट बनवण्यात आला होता. ‘एक थी रानी ऐसी भी’ या नावाने हा सिनेमा आला होता. यामध्ये भाजपच्या खासदार हेमा मालिनी आणि दिवंगत अभिनेते विनोद खन्ना मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाला संघ परिवाराचा पाठिंबा होता.
Must Read (नक्की वाचा):
गुढी पाडव्यापासून राज्यात प्लॅस्टिक बंदी :
- निसर्गाचा समतोल राखण्यासाठी येत्या पाच महिन्यांत म्हणजे गुढीपाडव्यापासून राज्यात प्लॅस्टिक बंदी करण्यात येणार आहे. यासाठी जाणकारांची मते जाणून घेतली जात असून लवकरच कडक कायदा तयार केला जाईल, अशी माहिती पालकमंत्री रामदास कदम यांनी येथे दिली.
- औरंगाबाद येथे 23 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्लॅस्टिक बंदी बाबत अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी मंत्री श्री. कदम यांनी अधिकाऱ्यांच्या सूचना ऐकून घेतल्या.
- तसेच त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत कदम म्हणाले, मंत्रालयापासून ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत बाटलीबंद पाणी बंद करण्यात येईल. तसेच पाणी बॉटल तयार करणाऱ्या कंपन्यांना रिकाम्या बाटल्या रिसायकलिंग कारखाना सुरू करावाच लागेल. हा देशहिताचा निर्णय असून कुणाचीही मुजोरी खपवून घेणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरू भूषण गगरानी :
- मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या हकालपट्टीनंतर नव्या कुलगुरूंच्या निवडीसाठी नेमलेल्या शोध समितीत सरकारी प्रतिनिधी म्हणून भूषण गगरानी यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय विद्यापीठाच्या व्यवस्थापकीय परिषदेच्या सदस्यांपैकी एका सदस्याची निवड लवकरच करणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. तसेच मेरिट ट्रॅक कंपनीची गच्छंती करण्याचे संकेतही दिले.
- निकालाची ऐशीतैशी करणार्या मेरिट ट्रॅक कंपनीविरोधात राज्य सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने तयार केलेला अहवाल उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राज्यपालांना पाठवल्याची माहिती तावडे यांनी दिली. यासंदर्भात नवे कंत्राट काढण्याचा विचार असून, त्यासाठी अनेक कंपन्या उत्सुक असल्याचे तावडे यांनी या वेळी सांगितले.
- कंपनीच्या गच्छंतीच्या निर्णयामुळे विद्यापीठ परीक्षांचे ऑनलाइन मूल्यांकन यापुढेही सुरूच राहणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. पुन्हा निकालात गोंधळ होऊ नये, म्हणून अनेक नव्या सूचना विद्यापीठाने मेरिट ट्रॅक कंपनीला दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नव्या कंत्राटाबाबत त्यांनी वाच्यता केल्याने मेरिट ट्रॅक कंपनीची गच्छंती निश्चित मानली जात आहे.
- विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक पदावर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे नियंत्रक डॉ. अर्जुन घाटुळे यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांची नियुक्ती तुर्तास टळली आहे. मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा पूर्ण होईपर्यंत नेटके यांची नियुक्ती करू नये, अशी विनंती मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू बी.ए. चोपडे यांनी राजभवनास केली होती. परिणामी, आणखी काही दिवस घाटुळे यांच्याकडे ही जबाबदारी असेल.
हाफीजच्या सुटकेवरून अमेरिका संतप्त :
- पाकिस्तानला बिगर-नाटो मित्रदेशाचा देण्यात आलेला दर्जा रद्द करावा, अशी विनंती अमेरिकेतील दहशतवाद प्रतिबंधक क्षेत्रातील एका उच्चपदस्थ तज्ज्ञाने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला केली आहे.
- मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि बंदी घालण्यात आलेल्या जमात-ऊद-दावचा म्होरक्या हाफीज सईद याची लाहोर न्यायालयाने नजरकैदेतून सुटका केल्यानंतर ट्रम्प प्रशासनाला वरील विनंती करण्यात आली आहे.
- दहशतवादी कृत्यांमधील सहभागाबाबत हाफीज सईदवर अमेरिकेने 10 दशलक्ष डॉलरचे इनाम जाहीर केले होते, जानेवारी महिन्यापासून सईद नजरकैदेत होता. संयुक्त राष्ट्रसंघ आणि अमेरिकेने सईदला दहशतवाद्यांचा म्होरक्या जाहीर केले होते.
- मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यास नऊ वर्षे लोटली तरीही अद्याप सईदवर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे पाकिस्तानला देण्यात आलेला बिगर-नाटो मित्रदेशाचा दर्जा रद्द करण्याची वेळ आली आहे, असे ब्रूस रिडेल या दहशतवाद प्रतिबंधक क्षेत्रातील उच्चपदस्थ तज्ज्ञाने केली आहे.
दिनविशेष :
- 24 नोव्हेबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून पाळला जातो.
- 24 नोव्हेंबर 1961 हा भारतीय लेखिका ‘अरुंधती रॉय’ यांचा जन्मदिन आहे.
- मराठी भाषेतील प्रसिद्ध लेखक ‘केशव तनाजी मेश्राम’ यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1937 रोजी झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा