Current Affairs of 23 October 2015 For MPSC Exams
चालू घडामोडी (23 ऑक्टोबर 2015)
अण्वस्त्रांच्या बाबतीत जगातील पाचव्या क्रमांकाचा देश बनण्याकडे पाकिस्तानची वाटचाल :
- अण्वस्त्रांच्या संख्येच्या बाबतीत जगातील पाचव्या क्रमांकाचा देश बनण्याकडे पाकिस्तानची वाटचाल सुरू असल्याचा इशारा अमेरिकेमधील तज्ज्ञांनी दिला आहे.
- पुढील दहा वर्षांमध्ये पाकिस्तानकडे 250 हून अधिक अण्वस्त्रे असतील, असे या तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
- पाकिस्तानकडे सध्या 110 ते 130 अण्वस्त्रे आहेत.
- 2011 मध्ये हीच संख्या 90 ते 110 इतकी होती, असे बुलेटिन ऑफ ऍटोमिक सायन्टिस्ट या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या “पाकिस्तानी न्यूक्लिअर फोर्स 2015” या अहवालात म्हटले आहे.
- पाकिस्तानमध्ये काही प्रक्षेपक यंत्रणा विकसित होण्याच्या मार्गावर आहेत, त्यामुळे चार प्लुटोनियम उत्पादन अणुभट्ट्या आणि एक युरेनियम अणुभट्टीच्या साह्याने पुढील दहा वर्षांमध्ये अण्वस्त्रांची संख्या बरीच वाढू शकते, असे या अहवालात म्हटले आहे.
- अण्वस्त्रवाढीचा हा वेग दुप्पट असू शकतो, असा अंदाजही या अहवालात व्यक्त केला आहे.
- भारताच्या आक्रमक धोरणांची भीती वाटून कमी क्षमतेच्या व्यूहात्मक क्षेपणास्त्रांची निर्मिती केल्याचे पाकिस्तानने नुकतेच मान्य केल्याच्या पार्श्वभूमीवर हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.
- पाकिस्तानकडे सध्या शाहीन 1 ए, शाहीन-3 सह सहा प्रकारची अण्वस्त्रक्षम क्षेपणास्त्रे आहेत.
- तसेच, हत्फ-7 आणि हत्फ-8 ही क्षेपणास्त्रे विकसित होण्याच्या मार्गावर आहेत.
Must Read (नक्की वाचा):
अमेरिका पाकला लढाऊ विमाने देणार :
- अमेरिका पाकिस्तानला आठ नवी एफ-16 लढाऊ विमाने विकण्याची शक्यता असल्याची माहिती अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
- पाकिस्तानात दहशतवादी संघटनांचे अद्यापही बरेच अस्तित्व असताना केवळ त्यांच्याशी संबंध सुधारण्याच्या हेतूने अमेरिका हा निर्णय घेण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
- पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून ते अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेणार आहेत.
भारतामधील पहिलीवाहिली “बुलेट ट्रेन” विकसित करण्यासाठी जपानचा प्रस्ताव :
- भारतामधील पहिलीवाहिली “बुलेट ट्रेन” विकसित करण्यासाठी जपानने 1 टक्क्यापेक्षा कमी व्याजदर असलेले अर्थसहाय्य करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
- देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई ते अहमदाबाद या 505 किमी अंतरासाठी ही बुलेट ट्रेन विकसित करण्याची योजना असून, त्यासाठी सुमारे 15 अब्ज डॉलर्स इतका खर्च अपेक्षित आहे.
- याआधी, गेल्या महिन्यामध्ये दिल्ली ते मुंबई या 1200 किमी अंतरामध्ये जलदगती ट्रेन विकसित करण्यासंदर्भातील प्रस्तावाची पडताळणी करण्यासंदर्भातील कंत्राट मिळविण्यात चीनला यश आले होते.
- या कामासाठी अद्यापी अर्थसहाय्याचा प्रस्ताव देण्यात आलेला नाही. तसेच अतिजलद रेल्वे बांधणीसंदर्भातील तंत्रज्ञानाचे काही प्रस्ताव सरकारसमोर मांडण्यात आले आहेत.
- कंपन्यांकडून बुलेट ट्रेनसाठी आवश्यक असलेले साहित्य विकत घेतल्यास मुंबई अहमदाबाद प्रकल्पासाठी 80% अर्थसहाय्य देण्याचा प्रस्ताव जपानने केंद्र सरकारपुढे मांडला आहे.
जीएसटी व्यावसायिकांना प्रत्येक महिन्याला कर भरावा लागण्याची शक्यता :
- प्रास्तावित वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यास (जीएसटी) व्यावसायिकांना प्रत्येक महिन्याला कर भरावा लागण्याची शक्यता आहे.
- एप्रिलपासून जीएसटीची अंमलबजावणी करण्याचा सरकारचा मानस असून, यासाठी हिवाळी अधिवेशनात जीएसटी विधेयक मंजूर करण्याचा प्रमुख अजेंडा केंद्राचा असणार आहे.
- केंद्राच्या संयुक्त समितीकडून जीएसटीचा कृती आराखडा तयार करण्याचे काम वेगात सुरू आहे.
- या समितीने जीएसटीमध्ये वेगवेगळ्या व्यवहारांसाठी आठ विविध प्रकारचे फॉर्म उपलब्ध करण्याची शिफारस केली आहे.
- केंद्राचा जीएसटी, राज्य सरकारचा जीएसटी आणि अंतर्गत जीएसटी या तीन प्रमुख करांचा भरणा प्रत्येक महिन्याला करण्याची शिफारसही यामध्ये करण्यात आली आहे.
- प्रत्येक महिन्याच्या एका निश्चित तारखेला कर भरणा केला जाईल.
- दरमहा रिटर्न फाइल करणाऱ्यांना 20 तारीख निश्चित करण्याचे प्रस्तावित आहे.
- ज्या करदात्यांकडून दर महिन्याला करभरणा केला जाणार नाही, अशा करदात्यांची माहिती पुढील कारवाईसाठी तत्काळ जीएसटी समितीकडे पाठवली जाणार आहे.
‘मिस दिवा युनिव्हर्स’ स्पर्धेच्या अंतिम फेरीत नवेली देशमुख :
- ‘मिस इंडिया’ ऑर्गनायझेशनतर्फे घेण्यात आलेल्या ‘मिस दिवा युनिव्हर्स’ स्पर्धेच्या अंतिम फेरीत औरंगाबादच्या नवेली देशमुखने बाजी मारली आहे.
- देशभरातील 16 सौंदर्यवतींमधून नवेलीने तिसरा क्रमांक मिळवित रत्नजडित मुकुट पटकावला.
- तिला ‘मिस टॅलेंटेड’ हे वेगळे 25 हजारांचे पारितोषिक मिळाले.
- तिसरा क्रमांक आला म्हणून पाच लाखांचे रोख आणि रत्नजडित मुकुट मिळाला.
अमरावती या आंध्र प्रदेशच्या नव्या राजधानीचे भूमिपूजन :
- विविध देशांमधील प्रतिनिधी तसेच अनेक मान्यवर निमंत्रितांच्या उपस्थितीत झालेल्या सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल अमरावती या आंध्र प्रदेशच्या नव्या राजधानीचे भूमिपूजन करण्यात आले.
- गुंटूर जिल्ह्यामधील उद्दांदरायुनिपलेम गावाजवळ ही नवी राजधानी वसविण्यात येणार आहे.
मुलींच्या मृत्यूचे प्रमाण मुलांपेक्षा अधिक :
- भारतात पाच वर्षांखालील मुलींच्या मृत्यूचे प्रमाण मुलांपेक्षा अधिक असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात म्हटले आहे.
- द वर्ल्ड्स विमेन 2015 या अहवालात म्हटल्यानुसार पूर्व आशिया, दक्षिण आशिया, ओशिनिया व पश्चिम आशियात पुरुषांची संख्या महिलांपेक्षा जास्त झाली आहे.
- या तीनही प्रदेशांत पुरुषांची संख्या जास्त असून पुरुषांचे अतिरिक्त प्रमाण पूर्व आशियात 50.5 दशलक्ष आहे, त्याचे कारण चीनमध्ये असलेला असमतोल हे आहे.
- दक्षिण आशियात 49.5 दशलक्ष पुरुष जास्त आहेत, कारण भारतात स्त्रियांची संख्या कमी आहे.
- पश्चिम आशियात 12.1 दशलक्ष अधिक पुरुष आहेत, कारण संयुक्त अरब अमिरात व सौदी अरेबियात स्त्रियांची संख्या कमी आहे.
भारताकडूनवीज आयात करण्याची योजना पाकिस्तानने रद्द :
- भारताकडून 4 हजार मेगावॉट वीज आयात करण्याची योजना पाकिस्तानने रद्द केली आहे.
- भारतात पाकिस्तानविरोधी भावना वाढल्या असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रसारमाध्यमांच्या बातम्यांमध्ये म्हटले आहे.
- ‘डॉन’ या वृत्तपत्राने जल व ऊर्जा मंत्रालयातील अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार भारताच्या पाकिस्तानविरोधी भूमिकेमुळे ही योजना रद्द करण्यात आली आहे.
- जल व ऊर्जा मंत्री ख्वाजा असीफ यांनी सांगितले की, पाकिस्तान व भारताच्या अधिकाऱ्यांनी एप्रिल 2012 मध्ये वीज पुरवण्याच्या योजनेवर चर्चा केली होती.
- त्यानंतर अदानी समूहाच्या अधिकाऱ्यांनी एप्रिल 2014 मध्ये पाकिस्तानला वीज आयातीबाबत भेटही दिली होती.
- अदानी एंटरप्राईजेस लि. या कंपनीने 500 ते 800 मेगावॉट वीज दोन-तीन वर्षांत पाकिस्तानला देण्याचे मान्य केले होते
- पण नंतर 3500-4000 मेगावॉट वीज देण्याचीही तयारी दर्शवण्यात आली, पण त्यात नंतर काहीच प्रगती झाली नाही.
व्हिएतनामने तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी फेसबुकवर एक पेज उघडले :
- कम्युनिस्ट व्हिएतनामने तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी फेसबुकचा आधार घेतला आहे.
- सरकारने या महिन्याच्या प्रारंभी फेसबुकवर एक पेज उघडले असून या पेजवरून सरकार व पंतप्रधानांबाबत लोकांना वेळोवेळी माहिती देण्यात येणार आहे.
- अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे हा या पेजचा उद्देश आहे.
- गुरुवारी दुपारपर्यंत 37 हजारांहून अधिक लाईक्स या पेजला मिळाल्या होत्या.
- गेल्या आठवड्यापेक्षा 13 पट अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.
सायना नेहवालच्या क्रमवारीत घसरण :
- जपान ओपन आणि डेन्मार्क ओपनमधून प्रारंभीच आव्हान संपुष्टात आल्याचे नुकसान भारतीय बॅडमिंटन तारका सायना नेहवाल हिला सोसावे लागले.
- त्यामुळे तिची क्रमवारीत घसरण होऊन ती दुसऱ्या स्थानी पोहोचली आहे.
- ऑल इंग्लंड आणि वर्ल्ड चॅम्पियन स्पेनची कॅरोलिन मारीन ही आता अव्वल स्थानी आली आहे.
- जागतिक बॅडमिंटन महासंघाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या क्रमवारीत सायना दुसऱ्या स्थानी घसरली आहे.
- तिचे 81782 गुण झाले असून, ती मारिनपेक्षा 1630 गुणांनी मागे आहे.
- जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत मारिनकडून पराभूत झाल्यानंतर सायना जपान आणि डेन्मार्क ओपनमध्ये दुसऱ्याच फेरीत पराभूत झाली होती.
- त्याचवेळी जागतिक स्पर्धेत दोन वेळेस कास्यपदक जिंकणारी पी. व्ही. सिंधू 13 व्या स्थानी कायम आहे.
- पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांत आणि एच. एस. प्रणय यांचीदेखील क्रमवारीत घसरण झाली आहे.
- श्रीकांत एका स्थानाने घसरून सहाव्या क्रमांकावर आहे,तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील चॅम्पियन पारुपल्ली कश्यप 10 व्या स्थानापासून आठव्या क्रमांकावर पोहोचला.
- प्रणयची एका क्रमांकाने घसरण झाली असून, तो 17 व्या क्रमांकावर आहे, तर अजय जयरामन 25 व्या स्थानी पोहोचला आहे.