Current Affairs of 23 November 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (23 नोव्हेंबर 2015)

महानगरांसाठी धोक्‍याची घंटा :

  • मुंबई आणि पॅरिसमधील दहशतवादी हल्ल्यांत काही प्रमाणात साम्य असले तरी वेगळेपणा व फरकही होता.
  • एक-दोघे जण अल्जीरिया या पूर्वीच्या फ्रेंच वसाहत असलेल्या देशाचे असल्याची माहितीही मिळाली आहे.
  • महानगरी सुरक्षा व्यवस्थेचा स्वतंत्रपणे विचार करण्यास जी सुरवात झाली; तसेच त्यासाठी तज्ज्ञांशी सल्लामसलत, मार्गदर्शन आणि तत्सम सुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याबाबतही संबंधित राज्यांना अधिक आर्थिक मदत करण्याचे जे काम आधीपासूनच सुरू झाले आहे, त्याला गती देण्याची वेळ आली आहे.
  • सहा शहरांसाठी महानगरी पोलिस व सुरक्षा योजना लागू करण्यात आली आहे. अहमदाबाद, मुंबई, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, बंगळूर या शहरांचा त्यात समावेश आहे.
  • सीसीटीव्ही (क्‍लोज सर्किट टीव्ही), गोपनीय माहिती संकलन आणि विश्‍लेषण केंद्र, सुरक्षा यंत्रणांबरोबरची संपर्क यंत्रणा (उदा. पोलिस – 100 क्रमांक), हवाई टेहळणी यंत्रणा (हेलिकॉप्टर्स, मानवरहित वाहने – यूएव्ही), महामार्ग किंवा हमरस्त्यांवरील गस्त तसेच महानगरांतर्गत गस्त व देखरेख, टेहळणी व पाळत यंत्रणा, सामाजिक पोलिस व्यवस्था किंवा कम्युनिटी पोलिसिंग म्हणजेच जागरूक नागरिकांचे साह्य घेऊन समाजविरोधी व संभाव्य दहशतवाद्यांवर नजर ठेवणे, पाळत ठेवणे, पोलिस दलांना आधुनिक प्रशिक्षण, महिला पोलिस, पोलिस दलांच्या दृष्टिकोनात सुधारणा व बदल करण्याचे प्रशिक्षण असे महानगरीय सुरक्षा व्यवस्थेचे मूलभूत घटक मानले जातात.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पुढच्याच वर्षी मदत :

  • राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना खरीप अनुदानाच्या मदतीसंदर्भात डिसेंबरअखेर केंद्र शासन घोषणा करेल.
  • जानेवारीत ही मदत शेतकऱ्यांना मिळेल, अशी माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी रविवारी (ता. 22) पत्रकार परिषदेत दिली.
  • केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाने 20 व 21 रोजी मराठवाड्यासह राज्याचा दौरा केला. राज्य शासनाने केंद्राला 4 हजार 2 कोटींचा प्रस्ताव सादर केला, यानंतर तीनच दिवसांत पथक पाठविण्याचा निर्णय केंद्राने घेतला.
  • आतापर्यंतच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले. केंद्रीय पथकाकडून झालेली या वर्षातील ही पहिलीच पाहणी आहे.
  • फळपिकांचे नुकसान होणार आहे किंवा झालेले आहे, त्यांचे दोन भाग केले आहेत. त्यातील एक म्हणजे फळपिके पुनर्जीवन. त्यासाठी एक योजना तयारी केली असून केंद्राकडे निधी मागितला आहे.
  • दुसरा भाग म्हणजे पूर्ण नुकसान झालेल्यांना जूनपासून नव्याने लागवड करण्यासाठी ‘मनरेगा’च्या माध्यमातून शंभर टक्‍के अनुदान शासन देईल.

कवी जयंता महापात्रा “पद्मश्री’ परत करणार :

  • आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कवी आणि साहित्यिक जयंता महापात्रा यांनी आज देशातील वाढत्या नैतिक विषमतेविरुद्ध नाराजी व्यक्त करीत ‘पद्मश्री‘ पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला.
  • विरोध दर्शविण्यासाठी मी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पत्र पाठवून पद्मश्री पुरस्कार परत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असे महापात्रा यांनी दूरध्वनीवरून वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

मतदारांच्या बोटावर आता मार्करचे निशाण :

  • मतदान केल्यानंतर मतदाराच्या पहिल्या बोटावर खूण करण्यासाठी केला जाणारी शाई आणि ब्रशचा वापर आता लवकरच इतिहासजमा होणार असून, त्याजागी मार्करचा वापर केला जाऊ शकतो.
  • सध्या निवडणूक आयोगाकडून म्हैसूर पेंट्‌स या कंपनीने तयार केलेल्या मार्कर पेनाची चाचणी घेतली जात आहे.
  • साधारणपणे 1962 पासून बोटावरून सहजासहजी पुसल्या जाणाऱ्या अशा शाईचा वापर केला जात आहे.
  • शाईच्या बाटल्यांपेक्षा मार्करसोबत बाळगणे आणि ते साठवून ठेवणे अधिक सोपे असल्याने निवडणूक आयोग त्यांच्या वापराबाबत आग्रही आहे.
  • याआधी अफगाणिस्तानामध्ये झालेल्या निवडणुकीत म्हैसूर पेंटने तयार केलेल्या मार्कर पेनचा वापर करण्यात आला होता.

जोकोविचने पटकावले एटीपी वर्ल्ड टूर टायटल्सचे जेतेपद :

  • एटीपी वर्ल्ड टूर टायटल्सच्या अंतिम सामन्यात रॉजर फेडररला नमवून नोवाक जोकोविचने स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे.
  • या स्पर्धेचा माजी विजेता असलेल्या स्वित्झर्लँडच्या फेडररचा सर्बियाच्या जोकोविचने 6-3,6-4 असा पराभव करत पुरूष एकेरीचे जेतेपद सलग चौथ्यांदा पटकावत यावर्षाची विजयी सांगता केली.
  • सलग चार वर्ष घरी विजेतेपदाची ट्रॉफी घेऊन जाणारा जोकोविच हा 46 वर्षातूल पहिलाच खेळाडू ठरला आहे.
  • 28 वर्षीय जोकोविचने यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या फायनलमध्ये अँडी मरेचा तर विम्बल्डन व यू.एस ओपनमध्ये रॉजर फेडररचा पराभव करत तीन ग्रँड स्लॅम स्पर्धेची विजेतेपदे पटकावली.
  • फ्रेंच ओपनमध्ये स्टॅन वावरिंकाने त्याचा पराभव केल्याने त्याचे चौथे ग्रॅंडस्लॅमपद हुकले.  

प्रशांत दामले यांना दीनानाथ पुरस्कार जाहीर :

  • प्रदीर्घ नाट्यसेवेसाठी दिला जाणारा ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ यंदा प्रशांत दामले यांना जाहीर झाला आहे.
  • हृदयनाथ मंगेशकर यांनी या पुरस्काराची घोषणा केली.
  • ‘कार्टी काळजात घुसली’चा 100 वा प्रयोग दीनानाथ नाट्यगृहात झाला. त्या वेळी घोषणा करण्यात आली.
  • प्रशांत दामले हे उत्तम कलाकार आहेत आणि त्यांनी मराठी रंगभूमीची गेली तीन दशके अविरत सेवा केली आहे.
  • हा पुरस्कार देताना प्रशांत यांचे वय कमी असल्याचा मुद्दा उपस्थित झाला, पण कमी वयातही त्यांनी केलेली कामगिरी मोठी आहे. त्यामुळे पुरस्कारासाठी त्यांचीच निवड योग्य असल्याचे हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितले.

मजबूत लढाऊ ड्रोन विमानाची चीनकडून निर्मिती :

  • चीनने अत्यंत मजबूत असे लढाऊ ड्रोन विमान तयार केले असून ते टेहळणीही करू शकणार आहे.
  • हे ड्रोन विमान निर्यात बाजारपेठेचे आकर्षण ठरले आहे. याच वर्षी चीनने या ड्रोन विमानाचे उड्डाण यशस्वी केले असून ते तीन हजार किलोचे वजन सहज वाहून नेऊ शकते.
  • चीनच्या लष्कराने सीएच 5 हे लढाऊ व टेहळणी ड्रोन सादर केले असून ते चायना अ‍ॅकॅडमी ऑफ एरोस्पेस अँड एरोडायनॅमिक्स या संस्थेने तयार केले आहे.
  • त्याचे उत्पादन मात्र चायना एरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी कार्पोरेशन या ग्वांगडाँग राज्यातील शेनझेन येथे असलेल्या कंपनीने केले आहे.
  • इतर लष्करी ड्रोनशी तुलना करता चीनचे सीएच 5 हे लष्करी ड्रोन विमान 3000 किलो वजन व 900 किलो साधनसामग्री वाहून नेऊ शकते. इतर ड्रोन विमाने केवळ 1500 किलो वजन वाहून नेऊ शकतात.
  • त्याची वजन वाहून नेण्याची क्षमता जास्त असल्याने जास्त टेहळणी सामग्री त्यावर ठेवता येते व ते ड्रोन विमान 80 कि.मी.च्या त्रिज्येत कुठेही फिरू शकते, असे या अ‍ॅकॅडमीचे अभियंता लॅन वेन्बो यांनी सांगितले.
  • प्रगत रडार त्यावर ठेवता येते व ते रडार जाड भिंतीमागे लपलेल्या अतिरेक्यांनाही शोधू शकते.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.