Current Affairs of 23 March 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (23 मार्च 2018)

चालू घडामोडी (23 मार्च 2018)

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला देणार बहिणाबाई चौधरींचे नाव :

 • उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरींचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी करण्यात येत होती.
 • जळगाव येथे 15 ऑगस्ट 1990 रोजी उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती. यात जळगावसह धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचा समावेश करण्यात आला होता. या विद्यापीठाची स्थापना केल्यानंतर काही वर्षांनी याला खानदेशकन्या बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली होती.
 • तसेच यासाठी अनेक आंदोलनेदेखील झाली. अलीकडेच पाडळसे येथे झालेल्या लेवा पाटीदार समाजाच्या महाअधिवेशनात या आशयाचा ठरावदेखील संमत करण्यात आला होता. या पार्श्‍वभूमीवर, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरींचे नाव देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केली.
 • अधिवेशनात अर्थसंकल्पाच्या विभागवार चर्चेत खानदेशातील काही आमदारांनी यासंदर्भात मागणी केली होती. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याची घोषणा केली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (22 मार्च 2018)

पहिल्या जैविक औषधाला यूएसएफडीएची मान्यता :

 • सन फार्मा या भारतातल्या सर्वात मोठ्या औषध निर्मात्या कंपनीच्या एका औषधाला अमेरिकी अन्न आणि औषध प्रशासनाकडून (यूएसएफडीए) मान्यता मिळाली आहे. या संबंधीची घोषणा नुकतीच करण्यात आली.
 • यूएसएफडीएने सनफार्माचे जैविक औषध ‘ल्युमिया’ला मान्यता दिली आहे. मध्यम ते गंभीर स्वरुपाच्या ‘प्लेग सोरायसिस’ या आजारावर उपचार करताना ल्युमिया या औषधाचा वापर केला जाणार आहे. हे औषध इंजेक्शनच्या स्वरूपात वापरले जाणार आहे.
 • सन फार्माने सप्टेंबर 2014 मध्ये मर्क या अमेरिकी कंपनीकडून औषधाचा परवाना 505 कोटी रुपयांना विकत घेतला होता. त्यावेळेस या औषधाच्या चाचण्या तिसऱ्या टप्प्यात (फेस थ्री ट्रायल्स) होत्या. या करारानंतर मर्कने सन फार्माच्या आर्थिक पाठबळावर संशोधन सूरूच ठेवले.
 • यूएसएफडीएच्या मान्यतेनंतर आता कायदेशीर प्रक्रिया, मान्यतेनंतरचे संशोधन, औषध निर्मिती आणि विक्री या जबाबदाऱ्या सन फार्माच्या असणार आहेत. सन फार्मा आणि मर्क या दोन कंपन्यांमधल्या करारानुसार या औषधापासून मिळणाऱ्या उत्पन्नातला काही हिस्सा मर्क या कंपनीला देखील मिळणार आहे.

मालदीवमधील आणीबाणी अखेर उठवली :

 • मालदीवचे अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी देशात 45 दिवसांपासून लागू असलेली आणीबाणी 22 मार्च रोजी उठवली. देशातील स्थिती आता पूर्वपदावर आल्याने आणीबाणी उठवत असल्याचे यामीन यांच्या कार्यालयाने दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
 • सुरक्षा दलाचा सल्ला आणि देशातील स्थिती सामान्य करण्याच्या प्रयत्नाचाच भाग म्हणून अध्यक्षांनी आणीबाणी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या राजकीय कैद्यांची सुटका करण्याचा निकाल दिल्यानंतर मालदीवमध्ये राजकीय संकट निर्माण झाले. मात्र, आदेश पाळण्यास नकार देत अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी सुरवातीला 5 ते 15 फेब्रुवारीदरम्यान पंधरा दिवसांची आणीबाणी लागू केली होती.

राज्यात होणार तेराशे आधार नोंदणी केंद्रे :

 • राज्यात मार्चअखेरीस 1293 आधार नोंदणी केंद्रांची सुरवात करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आधार नोंदणीसोबतच या ठिकाणी आधार कार्डमध्ये माहिती अपडेट करणेही शक्‍य होईल. आतापर्यंत पोस्टाच्या 447 कार्यालयांत आधार नोंदणी सेवेची सुरवात झाली आहे. उर्वरित ठिकाणी मार्चअखेरीस आधार नोंदणी सुरू होईल. कोकण, मराठवाडा, विदर्भातील विविध जिल्ह्यांत ही आधार नोंदणी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.
 • आतापर्यंत पोस्टाच्या कार्यालयांत एक लाख 63 हजार 335 नागरिकांनी आधार अपडेशन आणि आधार नोंदणीच्या सुविधेचा लाभ घेतला आहे. मुंबई 194 ठिकाणी, नवी मुंबईत 118 ठिकाणी; तर पुणे ग्रामीण, पुणे शहर आणि सातारा अशा तिन्ही ठिकाणी मिळून पोस्टाच्या 87 केंद्रांद्वारे या सेवेची सुरवात केली आहे.

‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्राकरून लक्ष्याचा अचूक वेध :

 • भारताने 22 मार्च रोजी ब्राह्मोस या स्वनातीत क्रूझ क्षेपणास्त्राची राजस्थानमधील पोखरण येथे यशस्वी चाचणी घेतली. या क्षेपणास्त्राने लक्ष्याचा अचूक वेध घेतला, अशी माहिती संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.
 • तीन महिन्यांपूर्वी सुखोई एमकेआय या लढाऊ विमानातून ब्राह्मोस क्षेपणास्त्राची पहिली चाचणी घेण्यात आली होती. भारत आणि रशियाचा संयुक्त प्रकल्प असलेल्या ‘ब्राह्मोस’चा पल्ला चारशे किलोमीटर आहे.
 • तसेच या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाल्याबद्दल संरक्षण मंत्रालयाने ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’चे अभिनंदन केले आहे.

राजा रविवर्मांच्या ‘तिलोत्तमे’चा लिलाव :

 • प्रख्यात चित्रकार राजा रविवर्मा यांनी काढलेले तिलोत्तमा या पौराणिक कथेतील अप्सरेचे चित्र येथील लिलावात 5.17 कोटी रुपयांना विकले गेले आहे.
 • येथे मॉडर्न अँड कॉंटेम्पररी साउथ एशियन आर्ट या प्रदर्शनात हा लिलाव करण्यात आला. या चित्राला 3.90 कोटी रुपये अपेक्षित असताना त्याहून अधिक किंमत मिळाली. राजा रविवर्मा यांची फार निवडक चित्रे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध झाली असून, त्यातील तिलोत्तमेचे हे चित्र आहे.
 • रविवर्मा यांची चित्रे अत्यंत जिवंत वाटतात आणि त्यात भारतीयत्व स्पष्टपणे दिसते, अशी प्रशंसा सॉथबे या लिलाव करणाऱ्या कंपनीने केली आहे. राष्ट्रीय खजिना म्हणून भारत सरकारने जाहीर केलेल्या रविवर्मा यांनी रामायण, महाभारत आणि इतर पौराणिक कथांमधील व्यक्तिमत्त्वे रंगविली आहेत. पौराणिक कथेनुसार, सुंद आणि उपसुंद या दोन दैत्यबंधूंना मारण्यासाठी ब्रह्मदेवाच्या विनंतीनुसार तिलोत्तमा ही अप्सरा स्वर्गातून पृथ्वीवर आली होती. तिला मिळविण्याच्या इर्ष्येने दोन्ही भावांनी एकमेकांशी लढाई केली आणि त्यात त्यांचा अंत झाला.

दिनविशेष :

 • सन 1868 मध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठाची ओकलंड येथे स्थापना झाली.
 • भारतीय क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी फाशी देण्यात आली.
 • सन 1956 मध्ये पाकिस्तान हे जगातील पहिले इस्लामी प्रजासत्ताक बनले.
 • 23 मार्च 1980 मध्ये ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा ‘प्रकाश पदुकोन’ यांनी पहिले भारतीय म्हणून जिंकली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (24 मार्च 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.