Current Affairs of 20 February 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (20 फेब्रुवारी 2018)

चालू घडामोडी (20 फेब्रुवारी 2018)

आर.बी. पंडित ‘आयएनए’चे नवे कमांडंट :

  • मूळचे पुण्याचे असलेले व्हाइस ऍडमिरल आर.बी. पंडित यांनी केरळ राज्यातील एडिमला येथील ‘इंडियन नेव्हल ऍकॅडमी’चे मावळते कमांडंट एस.व्ही. भोकरे यांच्याकडून कमांडंट पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांना अतिविशिष्ट सेवा मेडल, युद्ध सेवा मेडल आणि नेव्ही मेडल या पदकांनी भूषविण्यात आले आहे.
  • लेफ्टनंट जनरल (निवृत्त) बी.टी. पंडित यांचे ते पुत्र आहेत. व्हाइस ऍडमिरल पंडित हे खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी छात्र आहेत.
  • तसेच, ‘डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज वेलिंग्टन, द कॉलेज ऑफ नेव्हल वॉरफेयर मुंबई आणि द रॉयल कॉलेज ऑफ डिफेन्स स्टडीज लंडन’चे देखील माजी छात्र आहेत. पाणबुडी विरोधी युद्धतंत्रामध्ये ते पारंगत आहेत. त्यांनी ‘आयएनएस निर्घात, आयएनएस विंध्यगिरी, आयएनएस जलश्‍व’ आणि 22व्या ‘मिसाईल व्हेसेल स्क्वाड्रन’ मुंबईचे नेतृत्व केले आहे.
  • पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त कार्यालयात नौदल सल्लागार, तसेच ‘इंटिलिजेंट हेडक्वार्टर’ येथे नौदलाच्या दक्षिण विभागाचे चीफ ऑफ स्टाफ म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांना एडिमला येथील ‘आयएनए‘च्या कमांडंट पदावर पदोन्नती देण्यात आली.
  • व्हाइस ऍडमिरल एस.व्ही. भोकरे यांनी 20 मे 2016 मध्ये कमांडंट पदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यांनी आपल्या 15 महिन्यांच्या कार्यकाळात ‘आयएनए‘मध्ये पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षण सुविधांमध्ये उल्लेखनीय कामगिरी पार पाडली. पारंपरिक ‘पुलिंग आउट’व्दारे त्यांना निरोप देण्यात आला.

मॅग्नेटिकच्या दुसऱ्या दिवशी 43 सामंजस्य करार :

  • ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स 2018’ या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी, 19 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विविध 43 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. या करारांमुळे राज्यात 12 लाख कोटींची गुंतवणूक होणार आहे. त्यातून सुमारे 30 लाख रोजगार निर्माण होतील, अशी अपेक्षा आहे.
  • तसेच हे सामंजस्य करार करणाऱ्यांमध्ये देश-विदेशांतील नामांकित उद्योगसमूहांचा समावेश आहे. या करारांवर स्वाक्षऱ्या करताना उद्योगमंत्री सुभाष देसाई व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या करारांनुसार क्रेडाई, नारेड्‌को, एमसीएचआयसारख्या संस्था एमएमआर क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर परवडणारी घरे बांधणार आहेत.
  • या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी पोदार हौसिंग, रहेजा डेव्हलपर, येस बॅंक, रेमंड्‌स, टाटा पॉवर, अदाणी ग्रीन एनर्जी, वलसाड जिल्हा को-ऑपरेटिव्ह मिल्क, स्पॅनडेक्‍स, खालिजी कमर्शिअल बॅंक, एचडीएफसी बॅंक, कोटक बॅंक आदींशीही करार झाले.

रतन टाटा यांना ‘महाउद्योगरत्न’ पुरस्कार :

  • टाटा समूहाचे मानद अध्यक्ष आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्त्व असलेल्या रतन टाटा यांना औद्योगिक क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘महाउद्योगरत्न’ या राज्याच्या सर्वोच्च उद्योग पुरस्काराने गौरवण्यात आले; तर रेमंड समूहाचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांना या वेळी ‘महाउद्योगश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
  • मुंबईत सुरू असलेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र गुंतवणूक परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा झाला.
  • वस्त्रोद्योगातून राज्याच्या विकासाला हातभार लावणाऱ्या रेमंड समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया यांना महाउद्योगश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रेमंड समूह 1925 मध्ये ठाण्यात सुरू झाला. आज राज्यभर त्याचा विस्तार आहे. त्यासाठी सरकारने केलेल्या सहकार्याबद्दल सिंघानिया यांनी आभार मानले.

टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे प्रतापराव पवार यांना डी.लिट. पदवी :

  • टिळक महाराष्ट्र अभिमत विद्यापीठाने प्रतापराव पवार यांना ‘डी.लिट.’ ही मानद पदवी जाहीर केली आहे.
  • विद्यापीठाच्या 24 मार्च रोजी होणाऱ्या एकोणिसाव्या पदवीप्रदान समारंभात पवार यांना या पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे.
  • विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विद्यापीठ व्यवस्थापकीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
  • उद्योग, प्रसारमाध्यमे आणि सामाजिक क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पवार यांना या पदवीने सन्मानित करण्यात येईल. तसेच पवार यांना ‘पद्मश्री’ने सन्मानित करण्यात आले आहे.
  • टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे 1993 पासून विविध क्षेत्रांतील दिग्गजांना ‘डी. लिट.’ ही मानद पदवी देण्यात येते.

हायपरलूपसाठी राज्य सरकारचा ‘इरादा’ करार :

  • पुणे ते मुंबई या मार्गावरील हायपरलूपच्या पूर्व व्यवहार्यता अहवालाच्या (प्री-फिझिबिलिटी रिपोर्ट) यशस्वितेनंतर राज्य सरकारने हा प्रकल्प यशस्वी करण्याच्या दृष्टीने ‘व्हर्जिन हायपरलूप वन’ कंपनीसोबत इरादा करार केला आहे. त्यामुळे लवकरच पुणे-मुंबई हा प्रवास अवघ्या तीस मिनिटांमध्ये पूर्ण करता येणार आहे.
  • सध्या पुणे-मुंबई या मार्गावरून तीन लाख प्रवासी रोज प्रवास करतात. हा मार्ग हायपरलूपसाठी जगातील सर्वांत चांगला असल्याचे पूर्व-व्यवहार्यता अहवालात नमूद करण्यात आले आहे.
  • तसेच या दोन्ही शहरांमधील संभाव्य विकास लक्षात घेऊन हा हायपरलूप मार्ग यशस्वी ठरेल, असा विश्‍वासही कंपनीने व्यक्त केला. त्यामुळे राज्य सरकारने या प्रकल्पात आणखी एक पाऊल पुढे टाकत ‘व्हर्जिन हायपरलूप वन’ या कंपनीबरोबर इरादा करार केला.

हैदराबादचे नवाब फझल बहादूर यांचे निधन :

  • हैदराबादचे सातवेशेवटचे निजाम मीर उस्मान अली खान याचा पुत्र नवाब फझल जाह बहादूर (वय 72) यांचे अल्प आजारामुळे निधन झाले, अशी माहिती या राजघराण्यातील सदस्याने 19 फेब्रुवारी रोजी दिली.
  • नवाब फझल जाह यांना गेल्या 15 फेब्रुवारी रोजी  खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, असे नवाब नजफ अली खान यांनी सांगितले. नजफ अली हे सातव्या निजामाचे नातू आणि निजाम कुटुंब कल्याण संघटनेचे अध्यक्ष आहेत.

दिनविशेष :

  • 20 फेब्रुवारी 1905 हा दिवस भारतातील सर्कस उद्योगाचे जनक ‘विष्णुपंत छत्रे’ यांचा स्मृतीदिन आहे.
  • शेवटचा ऑर्डर ऑफ व्हिक्टरी सन्मान ‘लिओनिद ब्रेझनेव्ह’ यांना सन 1978 मध्ये देण्यात आला.
  • 20 फेब्रुवारी 1987 रोजी मिझोराम भारताचे 23वे राज्य बनले.
  • 20 फेब्रुवारी 2014 रोजी तेलंगण हे भारताचे 29वे राज्य बनले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.