Current Affairs of 19 February 2018 For MPSC Exams
चालू घडामोडी (19 फेब्रुवारी 2018)
देशात महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचे राज्य :
- मॅग्नेटिक महाराष्ट्र 2018 च्या अंतर्गत महाराष्ट्र कौशल्य विकास सोसायटीच्या माध्यमातून मॅरेथॉन पद्धतीने विविध 15 कंपन्या व संस्थांशी सामंजस्य करार करण्यात आले. यानुसार तब्बल एक लाखाहून अधिक रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा आहे.
- तसेच या माध्यमातून केलेले सर्व 15 सामंजस्य करार फक्त कागदावरच राहणार नसून, त्यासाठी आपण सर्व एकत्रितरीत्या जबाबदार सामाजिक घटक म्हणून काम करूया. त्यांची उत्तम प्रकारे अंमलबजावणी करून प्रगतशील देश घडवू, असे प्रतिपादन राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी या कार्यक्रमात केले.
- देशात महाराष्ट्र हे पहिल्याच क्रमांकाचे राज्य आहे. तीन लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था निर्माण करण्याची या राज्याची क्षमता असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ या गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
Must Read (नक्की वाचा):
मराठी साहित्य संमेलनात पुस्तक विक्री बंद :
- गुजरातमधील बडोदा येथे यंदाचे 91वे अखिल भारतीय साहित्य संमेलन सुरु असून संमेलनाचा शेवटच्या दिवशी संमेलनाची सांगता व्हायला अवघे काही तासच शिल्लक असताना येथील पुस्तक स्टॉलधारकांनी पुस्तक विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला असून आयोजकांविरोधात धरणे आंदोलन सुरु केले आहे.
- महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या नगरीत अर्थात बडोद्यात यंदाचे साहित्य संमेलन होत असल्याने त्याची सुरुवातीपासूनच उत्सुकता होती. मात्र, प्रत्यक्ष संमेलन सुरु झाल्यानंतर यातील आयोजकांचा ढिसाळ कारभार समोर आला आहे.
- दरवर्षी संमेलनात पुस्तक विक्रीचे विक्रम होत असतात. मात्र, यंदाच्या साहित्य संमेलनात बडोद्यात मराठी जनांची संख्या लाखांच्या घरात असताना संमेलनाला बऱ्यापैकी गर्दी असतानाही लोकांनी पुस्तकांच्या स्टॉलकडे दुर्लक्ष केले आहे.
हज यात्रेसाठी पाकिस्तान पाठवणार तृतीयपंथी स्वयंसेवक :
- इतिहासात प्रथमच पाकिस्तानकडून ट्रान्सजेंडर समुदायातील व्यक्तींना हज यात्रेत स्वयंसेवक म्हणून पाठवण्यात येणार आहे.
- बॉय स्काऊट्सच्या चमूतील एक भाग असणाऱ्या ट्रान्सजेंडरना 2018 च्या हज यात्रेसाठी स्वयंसेवक म्हणून नेमण्यात आले असून, लवकरच त्यांना सौदी अरेबियामध्ये पाठवण्यात येणार असल्याची माहिती सध्या माध्यमांमध्ये चर्चेत आहे. आयपीसी सिंध बॉय स्काऊट्सचे कमिशनर आतिफ अमिन हुसेन यांनी याविषयीची माहिती दिली.
- ‘युवा ट्रान्सजेंडर्सना सौदी अरेबियीमध्ये खुद्दामुल हुज्जाज (वार्षिक हज यात्रेमधील स्वयंसेवक) म्हणून कार्य करण्यासाठी पाठवण्यात येण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहेत’, असे ते म्हणाले. या उपक्रमासाठी ‘ब्ल्यू वेनिस’ या ट्रान्सजेंडर समुदायासाठी काम करणाऱ्या संस्थेने आयपीसीच्या संयुक्त विद्यमाने पुढाकार घेतला आहे.
आदिवासी संशोधकांना थायलंड सरकारकडून डॉक्टरेट :
- थाईलंडची राजधानी बँकॉक येथे 12 फेब्रुवारीला पार पडलेल्या कला-संस्कृती आदान -प्रदान,सामाजिक न्याय, महिला सक्षमीकरण व युवक कल्याण आंतरराष्ट्रीय अभ्यास परिषदेमध्ये जागतिक प्रतिभाशक्ती एकत्रीकरणाच्या विचारप्रणाचे iiou च्या विश्व संमेलनात जव्हार येथील नामवंत कवी, लेखक व आदिवासी समाज संशोधक मधुकर कावजी भोये व रवी लक्ष्मण बुधर यांना इमेज इंटरनॅशनल ऑनलाइन युनिव्हर्सिटी (युएसए) कडुन मानद (डि.लिट.) डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली आहे.
- बँकॉक येथील पर्यटन विभागाच्या अंतरराष्ट्रीय विश्लेषक डॉ. श्रीम.नीना यांच्या हस्ते हि पदवी प्रदान करण्यात आली.
- नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्हयातील जव्हार सारख्या अति ग्रामीण भागातून आदिवासी समाजातील संशोधन प्रबंधासाठी (आदिवासीचें सण व उत्सव) श्री. मधुकर कावजी भोये यांना व आदिवासींचे नृत्य प्रकारासाठी श्री. रवी लक्ष्मण बुधर याना सन्मानाची ‘मानद‘ (डि. लिट.) डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.
दुसऱ्या सौरमालेतील 100 ग्रहांचा शोध :
- आपल्या सौरमालेव्यतिरिक्त अवकाशात असलेल्या सौरमालांमधील ग्रहांचा शोध घेणासाठी अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेने पाठवलेल्या (नासा) केप्लर अवकाशयानाला आणखी मोठे यश मिळाले आहे.
- के 2 मोहिमेअंतर्गत गेलेल्या या यानाने दुसऱ्या सौरमालेतील नव्या 100 ग्रहांचा शोध लावला आहे. याबरोबरच के 2 मोहिमेत शोधण्यात आलेल्या ग्रहांची संख्या 300 वर पोहोचली आहे.
- डेन्मार्कमधील टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ डेन्मार्कमध्ये डॉक्टरेटचे शिक्षण घेणारे संशोधक अँड्र्यू मायो यांनी याबाबत माहिती दिली.
- तसेच ते म्हणाले, ‘आम्ही 275 ग्रहांचा अभ्यास सुरू केला होता त्यापैकी 149 खरे ग्रह असल्याचे आमच्या लक्षात आले. त्यापैकी 95 ग्रहांचा आम्ही नव्याने शोध लावल्याचे सिद्ध झाले आहे. पहिल्यांदा 2014 मध्ये के 2 ने पहिल्यांदा डाटा पाठवला होता तेव्हापासून याबाबतचे संशोधन सुरू आहे.’ खगोलशास्रांसंबंधीच्या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संधोधनाच्या लिखाणात मायो यांची प्रमुख भूमिका आहे.
दिनविशेष :
- 19 फेब्रुवारी 1630 रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांचा जन्म झाला.
- थॉमस एडिसन यांनी सन 1878 मध्ये फोनोग्राफचे पेटंट घेतले.
- मराठी नवकथेचे जनक ‘अरविंद गोखले’ यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1919 रोजी झाला.
- 19 फेब्रुवारी 2003 रोजी तंबाखू उत्पादनांच्या जाहिरातींवर संपूर्णपणे बंदी घालण्याच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा