Current Affairs of 19 March 2018 For MPSC Exams
चालू घडामोडी (19 मार्च 2018)
तिरंगी टी-20 मालिकेत भारताचा विजय :
- अखेऱच्या षटकांमध्ये अशक्य असणारा विजय दिनेश कार्तिकने केलेल्या फटकेबाजीमुळे भारताला शक्य झाला अन् भारताने बांगलादेशचा चार गडी राखून पराभव करीत तिरंगी टी-20 मालिकेत विजय मिळविला.
- श्रीलंकेतील निदहास तिरंगी टी-20 क्रिकेट स्पर्धेत भारताने विजेतेपदच जिंकायला हवे, या अपेक्षापूर्तीचे दडपण भारतीय संघासमोर बांगलादेशविरुद्धच्या निर्णायक लढतीवेळी होते. अखेर भारतीय खेळाडूंनी हे आव्हान पेलत विजय मिळविला. दिनेश कार्तिकने 8 चेंडूत 29 धावा करत भारताचा विजय साकार केला. भारताने या स्पर्धेसाठी प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली होती.
- बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 166 धावा केल्या. साबीर रेहमानने 50 चेंडूत 77 धावा केल्याने बांगलादेशला ही धावसंख्या उभारता आली.
- 166 धावांचा पाठलाग करतांना भारतीय संघाला अडचणी आल्यात पण अखेरच्या चेंडूवर पाच धावांची गरज असताना दिनेशने षटकार खेचत भारताला विजय मिळवून दिला.
Must Read (नक्की वाचा):
शिवाजी विद्यापीठाचा संशोधन क्षेत्रात अग्रस्थान :
- शिवाजी विद्यापीठाने संशोधनाच्या क्षेत्रातील आपली आगेकूच कायम राखताना देशातील अकृषी राज्य विद्यापीठांत राष्ट्रीय पातळीवर अग्रस्थान प्राप्त केले आहे. आघाडीच्या टॉप-10 संशोधन संस्थांच्या सर्वसाधारण यादीत विद्यापीठ देशात आठवे आहे.
- विशेष म्हणजे विद्यापीठाने मटेरियल सायन्स, भौतिकशास्त्र, खगोल आणि अभियांत्रिकी या तीन विषयांमध्ये राष्ट्रीय स्तरावर अकृषी राज्य विद्यापीठांत प्रथम स्थान प्राप्त केले आहे. विद्यापीठाच्या 54व्या दीक्षान्त समारंभाच्या पार्श्वभूमीवर, संशोधनाच्या क्षेत्रातील हे यश विद्यापीठाच्या नावलौकिकात भर टाकत आहे.
- ‘करंट सायन्स’च्या 25 फेब्रुवारी 2018 च्या अंकात रिसर्च आऊटपुट ऑफ इंडियन इन्स्टिट्युशन्स ड्युरिंग 2011-16 क्वालिटी ॲन्ड क्वांटिटी परस्पेक्टिव्ह हा विशेष लेख प्रकाशित झाला आहे. यामध्ये जागतिक संशोधनाचा दर्जा निश्चित करणाऱ्या साय-व्हॅल निर्देशांकाच्या आकडेवारीचा आधार घेण्यात आला.
व्लादिमीर पुतिन यांची पुन्हा रशियाचे अध्यक्षपदी निवड :
- रशियामध्ये 18 मार्च रोजी अध्यक्ष निवडीसाठी मतदान पार पडले. यांत रशियाचे विद्यमान अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला आहे.
- पुतिन यांच्याशिवाय अन्य सात उमेदवार या निवडणुकीत सहभागी होते. परंतु गेली दोन दशके रशियातील राजकारण व जनमानसावर प्रभाव टाकणाऱ्या पुतिन यांनी तब्बल 73.9 टक्के मतांच्या फरकाने आपल्या विरोधकांवर एकतर्फी विजय मिळवला.
- तसेच त्यामुळे आता आणखी सहा वर्षांचा कार्यकाल त्यांना मिळणार आहे. पुतिन यांची कार्यशैली पाहता त्यांना हुकुमशाह असे म्हटले जाते. आणि म्हणूनच मतदानादरम्यान मतदारांमध्ये काहीसा निरुत्साह दिसून आला होता, असे दावे रशियातील राजकीय तज्ज्ञांनी केले होते. परंतु पुतिन यांनी पुन्हा एकदा निर्विवाद विजय मिळवून आपली लोकप्रियता सिद्ध केली आहे.
भोयेगाव जिल्हा परिषद शाळाला ‘ओझस’ नामांकन :
- जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शिक्षणाच्या दर्जाबद्दल वरचेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. त्यास अपवाद ठरलीय भोयेगाव (ता. चांदवड) येथील जिल्हा परिषदेची शाळा. शिक्षक अन् ग्रामस्थांनी शाळेला ‘ओझस’ मानांकन यादीत पोचवलेय. राज्यातील दहा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळांमध्ये समावेश होण्यासाठीची ही संधी निर्माण झाली आहे. याच शाळेने ‘आयएसओ’ मानांकनही मिळवले आहे. शिक्षण पद्धतीमध्ये नावीन्यपूर्ण बदल करत शाळेत दर शनिवारी ‘नो बॅग डे’ उपक्रम राबवला जातो.
- दर्जेदार शिक्षण, डिजिटल क्लास-रूम, सुसज्ज इमारत, 24 तास मोफत ‘वायफाय-ब्रॉडबॅंड’ सुविधा, ‘बॉटनिकल गार्डन’ अशा उपक्रमांद्वारे भोयेगावच्या शाळेने राज्यभर ओळख निर्माण केली आहे.
- 267 पटसंख्येच्या या शाळेची शैक्षणिक गुणवत्ता सुमार होती, पण शाळेतील शिक्षकांनी शाळा व्यवस्थापन समिती अन् ग्रामस्थांच्या मदतीने शाळेचा भौतिक सुविधांच्या जोडीला गुणवत्तेचा दर्जा उंचवण्याचा संकल्प केला.
- परिणामी, डिसेंबर 2014 मध्ये या शाळेने 200 पैकी 199 गुण संपादन करत ‘अ’ श्रेणीचा बहुमान संपादला. सर्वच क्षेत्रांत शाळेने बदलांची प्रक्रिया कायम ठेवली. खासगी कंपन्यांचा ‘सीएसआर’ निधी मिळविण्यात ही शाळा जिल्ह्यात अव्वल ठरली. जिल्ह्यात सर्वप्रथम या शाळेने ‘आयएसओ’ मानांकन मिळवले.
माधव नेत्रालय सिटी सेंटरचे लोकार्पण :
- राज्यात आजच्या तारखेत साडेसतरा लाख मोतीबिंदू रुग्ण आहेत. या रुग्णांसह नव्याने भर पडणाऱ्या सर्व रुग्णांवर मोतिबिंदू शस्त्रक्रिया करून जुलै 2019 पर्यंत राज्य आजाराने मुक्त केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
- माधव नेत्रालय सिटी सेंटरचे 18 मार्च रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते लोकार्पण झाले.
- मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शासनासोबतच खासगी क्षेत्रातील 175 रुग्णालयात रोज किमान 10 तास मोतीबिंदू शस्त्रक्रिया होत आहेत. आतापर्यंत 50 हजार शस्त्रक्रिया झाल्या आहेत. सन 2050 पर्यंत देशात 11 कोटी लोक नेत्ररोगाने ग्रस्त होतील. महाराष्ट्र शासनाने यासाठी सक्रिय पुढाकार घेतला आहे. त्यामुळे माधव नेत्रालयाचीही शासनाला मदत होईल. नागपूर शहर हे मेडिकल हब म्हणून पुढे येत आहे. माधव नेत्रालयामुळे यात मोलाची भर पडली आहे.
- तसेच केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. जगतप्रसाद नड्डा म्हणाले, केंद्रीय अर्थसंकल्पात ‘आयुष्यमान भारत’ या योजनेच्या माध्यमातून 10 कोटी कुटुंबाला पाच लाखाचा आरोग्य विमा देण्यात येणार आहे.
दिनविशेष :
- सन 1674 मध्ये 19 मार्च रोजी शिवाजी महाराजांच्या सर्वात धाकट्या पत्नी काशीबाई यांचे निधन झाले.
- चित्रपट संगीतकार शंकर विष्णू तथा दादा चांदेकर यांचा जन्म 19 मार्च 1897 मध्ये झाला.
- मूलद्रव्याच्या समस्थानिकांच्या (Isotopes) शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक ‘जीन फ्रेडरिक जोलिओट’ यांचा जन्म 19 मार्च 1900 रोजी झाला.
- सन 1932 मध्ये 19 मार्च रोजी सिडनी हार्बर ब्रिज सुरू झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा