Current Affairs of 17 November 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (17 नोव्हेंबर 2017)
पर्यावरण विभागातर्फे राज्यात प्लास्टिक बंदी :
- राज्य सरकारने पर्यावरण रक्षणासाठी 16 नोव्हेंबर रोजी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यात सरसकट प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, यासाठी कायद्यात सुधारणा केली जाणार आहे. याबाबत आगामी अधिवेशनात दुरुस्ती विधेयक मांडण्यात येईल, अशी माहिती पर्यावरण विभागाने दिली.
- 16 नोव्हेंबर रोजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मुंबई महानगर क्षेत्रातील (एमएमआर) महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मुंबई, ठाणे, उल्हासनगर, कल्याण- डोंबिवली, वसई- विरार, मीरा-भाईंदर या महापालिकेचे अधिकारी या बैठकीत उपस्थित होते. प्लास्टिकमुळे निर्माण होणारी पूरस्थिती आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यावर बैठकीत चर्चा झाली. राज्यात सध्या 50 मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी आहे. मात्र आता सरसकट प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी कायद्यात सुधारणा केली जाणार आहे.
- कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या हॉटेल्स आणि विक्रेत्यांवर फौजदारी कारवाईची तरतूदही करण्यात येणार असून, नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना 3 ते 6 महिने शिक्षा आणि परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
- तसेच प्लास्टिक बंदीमुळे शीतपेय आणि पाण्याची बाटलीवर बंदी येणार आहे. अशा परिस्थितीत काचेचा बाटल्या हा पर्याय उपलब्ध असेल. तर प्लास्टिक पिशव्यांवरऐवजी कापडी पिशव्यांचा पर्याय उपलब्ध करुन दिला जाईल. यासाठी महिला बचत गटांची मदत घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Must Read (नक्की वाचा):
नंदूरबार येथे विद्रोही साहित्य संमेलन :
- विद्रोही सांस्कृतिक चळवळीतर्फे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन येत्या 23 व 24 डिसेंबरला नंदूरबार जिल्ह्यातील शहादा येथे होत आहे. पाच हजारहून अधिक कार्यकर्ते संमेलनाला येतील.
- महाराष्ट्र, गुजरातसह गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश येथील विचारवंत, साहित्यिक सहभागी होणार आहेत. ही माहिती विद्रोहीचे उपाध्यक्ष डॉ. बाबूराव गुरव, कार्याध्यक्ष कॉम्रेड धनाजी गुरव, ॲड. के.डी. शिंदे यांनी दिली. या वेळी प्राचार्य विश्वास सायनाकर व प्रा. विजयकुमार जोखे उपस्थित होते.
- ते म्हणाले, ‘शासनाकडून एक रुपयाही मदत न घेता समाजाच्या ताकदीवर चालणारे बहुजनांचे हे संमेलन आहे. 14 व्या संमेलनाच्या अध्यक्षपदी दलित आदिवासी, ग्रामीण साहित्यिक व कष्टकरी आदिवासी समाजाच्या नेत्या नजूबाई गावित यांची निवड केली आहे.”
- तसेच संमेलनाला पद्मश्री गणेश व सुरेखा देवी, कॉम्रेड कुमार शिराळकर यांच्यासह दिग्गज उपस्थित राहतील. आत्मजित सिंग उद्घाटक आहेत. चिन्ना स्वामी यांची प्रमुख उपस्थिती आहे. वाहरू सोनवणे हे विद्रोहीचे अध्यक्ष आहेत.
मुंबई-पुणे हायपरलूप तंत्रज्ञानासाठी करार :
- पुणे प्रवास आता आणखी वेगवान होण्याची शक्यता आहे. राज्य सरकार आणि पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाने 16 नोव्हेंबर रोजी व्हर्जिन हायपरलूप वन या कंपनीशी करार केला. कंपनी हायपरलूपच्या प्रस्तावित मार्गाचा अभ्यास करुन अहवाल सादर करणार आहे.
- अमेरिकास्थित व्हर्जिन हायपूर वन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीने पीएमआरडीएशी करार केला असून या कराराअंतर्गत हायपरलूपसाठी योग्य ठिकाणांची निवड करणे, तसेच आर्थिक आणि तंत्रज्ञानात्मकदृष्ट्या या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासली जाणार आहे.
- हायपरलूपमुळे दळणवळण क्षेत्रात मोठी क्रांती होईल. हायपरलूपमुळे मुंबई-पुणे हे अंतर अवघ्या 14 मिनिटांमध्ये गाठता येईल. सध्या कारने मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी किमान तीन तास लागतात. त्यामुळे हायपरलूप सेवा दोन्ही शहरांसाठी एक वरदान ठरु शकते.
- हायपरलूप तंत्रज्ञान लागू होऊ शकेल का, या तंत्रज्ञानाचे फायदे आणि तसेच आर्थिक-सामाजिक घटकांचा विचार करता राज्यातील अन्य कोणत्या मार्गांवर ही सेवा सुरु करता येईल याचाही कंपनी अभ्यास करणार आहे. सध्या ही कंपनी यूएई, अमेरिका, कॅनडा, फिनलँड या देशांमध्ये सक्रीय आहे. देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये मुंबई आणि पुण्याचा समावेश होतो.
केंद्र सरकारने डाळ निर्यातीवरील सर्व निर्बंध हटवले :
- देशात डाळीचे विक्रमी उत्पादन झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्वप्रकारच्या डाळींच्या निर्यातीवरील निर्बंध हटवले आहेत. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे डाळ उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे. निर्यातीवरील निर्बंध हटवल्याने डाळीला चांगला भाव मिळू शकेल.
- यंदा देशभरात सर्व प्रकारच्या डाळींचे विक्रमी उत्पादन झाले आहे. देशात यापूर्वी दरवर्षी डाळींचे उत्पादन 179 लाख टन होते. यावर्षी हे प्रमाण 220 लाख टनांवर पोहोचले आहे. यापूर्वी डाळींचे उत्पादन आणि मागणी यात तफावत असल्याने निर्यातीवर निर्बंध होते. विक्रमी उत्पादन झाल्याने डाळीला योग्य भाव मिळत नव्हता. चणा डाळीच्या उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 32 टक्क्यांनी वाढ झाली. तर अन्य डाळींच्या उत्पादनात सुमारे 22 टक्क्यांनी वाढ झाली. केंद्र व राज्य सरकारने डाळ विकत घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. डाळींच्या आयात-निर्यात धोरणाबाबत या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत सर्व प्रकारच्या डाळींवरील निर्यातीबाबतचे निर्बंध हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. निर्यात बंदी हटवल्याने आता शेतकऱ्यांना मोठी बाजारपेठ खुली झाली आहे.
दिनविशेष :
- 17 नोव्हेंबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन’ म्हणून साजरा केला जातो.
- सन 1932 मध्ये 17 नोव्हेंबर रोजी कॉंग्रेसने बहिष्कार घातलेल्या तिसर्या गोलमेज परुषदेची सुरुवात झाली.
- 17 नोव्हेंबर 2012 हा दिवस शिवसेनेचे संस्थापक, शिवसेनाप्रमुख, व्यंगचित्रकार, सामना वृत्तपत्राचे संपादक माननीय “बाळासाहेब ठाकरे” यांचा स्मृतीदिन आहे.