Current Affairs of 15 December 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (15 डिसेंबर 2017)
भारत सर्व प्रांतांच्या संरक्षणासाठी सक्षम :
- भारतीय संरक्षण दल हे केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण प्रांतांचे संरक्षण करण्यासाठी समर्थ आहे. समुद्रमार्गे सुरू असलेला दहशतवाद, तस्करी, बेकायदेशीर मासेमारी, चाचेगिरी या आव्हानांशी लढा देण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.
- पंतप्रधान मोदींच्या हस्ते गेल्या 15 वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली भारतीय बनावटीची ‘कलवरी’ या पाणबुडीचे 14 डिसेंबर रोजी राष्ट्रार्पण झाले. मुंबईत पार पडलेल्या या सोहळय़ात पंतप्रधान मोदी यांनी भारतीय संरक्षण दलाच्या कामाचे कौतुक केले.
- संपूर्ण विश्व हे एक कुटुंब असून या कुटुंबाचे संरक्षण करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत भारताने पुढाकार घेतला आहे. परराष्ट्रावर आलेल्या संकटाच्या वेळी सर्वप्रथम भारत धावून गेला आहे. यामुळे पाणबुडी विकासाचा हा कार्यक्रम म्हणजे केवळ भारताचे संरक्षण हा मुद्दा लक्षात घेऊन केला नसून या संपूर्ण प्रांतांतील समुद्राचे संरक्षण करण्यासाठी आपण सक्षम आहोत, असे मोदी म्हणाले.
- तसेच यासाठी ‘सागर’ (SAGAR) हे धोरण आपण अधिक सक्षमपणे राबवीत आहोत. सागरचे पूर्ण स्वरूप ‘सिक्युरिटी अॅण्ड ग्रोथ फॉर ऑल इन द रीजन’ असे आहे.
Must Read (नक्की वाचा):
अमरनाथ गुफेत कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाहीत :
- अमरनाथ गुफेत मंत्रोच्चारांचे पठण करण्यास अथवा भजन करण्यासह कोणत्या प्रकारचे निर्बंध घालण्यात आलेले नाहीत, असे राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) स्पष्ट केले. त्याचप्रमाणे हा संपूर्ण परिसर ‘शांतता क्षेत्र’ म्हणून जाहीर करण्याचा लवादाचा कोणताही हेतू नाही अथवा तसे घोषितही करण्यात आलेले नाही, असेही लवादाने स्पष्ट केले आहे.
- तथापि, कोणत्याही व्यक्तीने अथवा भक्ताने अमरनाथ गुफेत शिवलिंगासमोर उभे असताना शांतता पाळावी एवढेच निर्बंध लावादाने घातले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हे निर्बंध अन्य कोणत्याही भागासाठी लागू नाहीत, असे लवादाचे अध्यक्ष न्या. स्वतंत्रकुमार यांनी म्हटले आहे.
- तसेच गुफेकडे जाणाऱ्या अखेरच्या पायऱ्यांवर यात्रेकरूने कोणतेही साहित्य नेण्यास तेथील मंडळाने मज्जाव केला असून त्याचे पालन करावे, असेही लवादाने म्हटले आहे. अखेरच्या पायऱ्यांपूर्वी कोणतेही निर्बंध नसल्याचे लवादाने म्हटले आहे.
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी नरिंदर बात्रा :
- आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे (एफआयएच) प्रमुख नरिंदर बात्रा यांची भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या (आयओए) अध्यक्षपदावर चार वर्षांच्या कार्यकाळासाठी निवड झाली आहे, तर राजीव मेहता यांची सरचिटणीस पदावर बिनविरोध निवड झाली आहे.
- आशियाई टेनिस महासंघाचे अध्यक्ष अनिल खन्ना यांनी मागील आठवडय़ात अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यामुळे 60 वर्षीय बात्रा यांचा मार्ग मोकळा झाला होता. आयओएच्या निवडणुकीतून मी माघार घेत असून, अध्यक्षपदासाठी बात्रा यांच्या उमेदवारीला पाठिंबा देत आहे, अशा आशयाचे पत्र खन्ना यांनी आयओए निवडणूक आयोगाला लिहिले होते.
- मात्र हे पत्र खन्ना यांनी 3 डिसेंबरची माघार घेण्याची मुदत उलटल्यानंतर पाठवले होते. त्यामुळे औपचारिकता म्हणून झालेल्या निवडणुकीत बात्रा यांना 142 मते पडली, तर खन्ना यांना 13 मते मिळाली. सरचिटणीस पदासाठी मेहता हे एकमेव उमेदवार असल्यामुळे सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी ते पद सांभाळणार आहेत.
ॲथलेटिक्स सायली वाघमारेने इतिहास रचला :
- ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मातीच्या मैदानावर सराव करणाऱ्या सायली वाघमारेने आचार्य नागार्जुना विद्यापीठाच्या यजमानपदाखाली गुटूंर येथे आयोजित 78 व्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ ॲथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या आठशे मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकून इतिहास घडविला. तिने विपरीत परिस्थितीत ही कामगिरी करताना उडणपरी पी.टी. उषाची शिष्य अबिता मेरी मॅन्युअलवर मात केली.
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सायलीने 14 डिसेंबर रोजी झालेल्या अतिशय चुरशीच्या अंतिम फेरीत दोन मिनिटे 09.90 सेकंद इतकी वेळ नोंदवित पहिल्यांदाच सुवर्णपदकावर नाव कोरले.
- तसेच सायलीने यापूर्वी मॅंगलोर (2015–16) व कोईम्बतूर (2016–17) मध्ये झालेल्या आंतरविद्यापीठ ॲथलेटिक्स स्पर्धेत रौप्यपदके जिंकली होती. चौथ्या प्रयत्नात सुवर्ण जिंकणाऱ्या सायलीने मॅंगलोर येथील स्पर्धेत नोंदविलेल्या (2:11:01 सेकंद) या वेळेत सुधारणा करताना करिअरमधील सर्वोत्तम वेळेची नोंद केली.
ब्रॅड हॉज ‘किंग्ज इलेव्हन पंजाब’च्या प्रशिक्षकपदी :
- ‘इंडियन प्रीमिअर लीग’च्या (आयपीएल) आगामी मोसमासाठी ‘किंग्ज इलेव्हन पंजाब’ संघाच्या प्रशिक्षकपदी ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज ब्रॅड हॉज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या दोन मोसमांमध्ये ब्रॅड हॉज ‘गुजरात लायन्स’चे प्रशिक्षक होते. हा संघ आता आगामी ‘आयपीएल’मध्ये नसेल.
- हॉज यांच्या मार्गदर्शनाखाली ‘गुजरात लायन्स’ने 2016 मध्ये गुणतक्त्यात पहिले स्थान पटकाविले होते; पण यंदा या संघाला चारच विजय मिळविता आले. यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये ‘गुजरात लायन्स’ गुणतक्त्यात शेवटून दुसऱ्या स्थानी होते.
- 42 वर्षीय हॉज यांना प्रशिक्षणात साह्य करण्यासाठी दिल्लीचा माजी फलंदाज मिथून मन्हास आणि जे. अरुणकुमार यांचीही निवड झाली आहे. ‘किंग्ज इलेव्हन पंजाब’चे संचालक म्हणून भारताचे माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग काम पाहत आहेत. संजय बांगर यांची भारताचे फलंदाजीचे प्रशिक्षक म्हणून निवड झाल्याने त्यांनी पंजाबच्या संघाचे प्रशिक्षकपद गेल्या वर्षी सोडले. त्यामुळे गेल्या वर्षी सेहवाग यांनीच धुरा सांभाळली होती.
दिनविशेष :
- सन 1903 मध्ये 15 डिसेंबर रोजी ‘स्वामी स्वरुपानंद’ यांचा जन्म झाला.
- 15 डिसेंबर 1950 हा दिवस स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री ‘सरदार वल्लभभाई पटेल’ यांचा स्मृतीदिन आहे.
- 15 डिसेंबर 1971 रोजी बांगलादेश स्वतंत्र झाला.
- चित्रपट दिगदर्शक ‘सत्यजित रे’ यांना सन 1991 मध्ये 15 डिसेंबर रोजी ऑस्कर पारितोषिक जाहीर झाले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
Must Read (नक्की वाचा):
आजच्या चालू घडामोडींचा व्हिडिओ
<iframe width=”350″ height=”250″ src=”https://www.youtube.com/embed/QaTIhStXDTE?autoplay=1″ frameborder=”0″ gesture=”media” allow=”encrypted-media” allowfullscreen></iframe>
{/source}