Current Affairs of 12 March 2018 For MPSC Exams
चालू घडामोडी (12 मार्च 2018)
सांगली परिसरात होणार ‘चिऊताईं’ची गणना :
- अंगणातील चिमण्यांचा किलबिलाट जणू आता बंदच झाला आहे. क्वचित कोठेतरी चिऊताईचे दर्शन घडते. चिऊताईंचा किलबिलाट पुन्हा ऐकू यावा म्हणून प्राणीमित्रांकडून प्रयत्न केले जातात. त्यात नागरिकांनीही सहभागी होणे गरजेचे आहे. त्यासाठीच ‘बर्डसॉंग‘ आणि खोपा बर्ड हाऊस संस्थेतर्फे चिमण्यांची गणना करण्याच्या मोहीमेला 11 मार्चपासून प्रारंभ झाला.
- घराच्या अंगणात कधी-कधी घरात येऊन घरटे शोधणाऱ्या चिमण्या शोधूनही सापडत नाहीत, असे चित्र आहे. अंगणात तांदूळ टाकून बघूनही चिमण्या येत नाहीत. अनेकांनी लहानपणी चिमण्या बघितल्या तरी, परंतु आता चिमण्यांचे दर्शन दुर्मिळ झाल्यामुळे लहान मुलांना चित्रातच चिमणी दाखवावी लागते.
- सिमेंटच्या जंगलात चिमण्यांच्या घरट्यांना जागाच राहिली नाही. दिवसेंदिवस चिमण्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. निसर्गचक्रातील चिमण्यांचे महत्त्व मोठे आहे. चिमण्यांचे अस्तित्व जिवंत ठेवावे, त्यांची संख्या वाढण्यासाठी उपाययोजना कराव्यात म्हणून अनेक निसर्गप्रेमी धडपड करत आहेत. त्यातीलच या संस्था प्रतिवर्षीप्रमाणे चिमण्यांची गणना करतात. चिमण्यांची संख्या किती, संख्या कमी होण्याची कारणे काय? हे समजून घेऊन त्यावर उपाय योजना करण्यासाठी गणनेचा उपयोग होतो.
Must Read (नक्की वाचा):
राज्यात लोकसभेच्या तसेच विधानसभेची पोटनिवडणूक होणार :
- कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे.
- पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांचे झालेले निधन आणि नाना पटोले यांनी दिलेला लोकसभा सदस्यत्वाचा राजीनाम्यामुळे दोन ठिकाणी लवकरच पोटनिवडणूक अपेक्षित आहे.
- डॉ. पतंगराव कदम यांनी 9 मार्च रोजी लीलावती रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सदस्याच्या निधनामुळे किंवा राजीनाम्यामुळे लोकसभा अथवा विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाल्यास तेथे सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणूक घ्यावी लागते. त्यामुळे दोन लोकसभा आणि एक विधानसभा मतदारसंघात येत्या मेपर्यंत किंवा जूनपर्यंत पोटनिवडणूक अपेक्षित आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर टीका करीत लोकसभेत भंडारा-गोंदियाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नाना पटोले यांनी गेल्या वर्षी खासदारकीसह भाजपचा राजीनामा दिला. त्यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
प्रवीण निकम यांना वसुंधरा पुरस्कार जाहीर :
- बारामती येथील एन्व्हॉर्यमेटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा वसुंधरा पुरस्कार यंदा मासिक पाळी या विषयामध्ये महिलांसोबतच पुरुषांचेही प्रबोधन करणारे रोशनी या सेवाभावी संस्थेचे प्रमुख प्रवीण निकम यांना प्रदान केला जाणार आहे. स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी ही माहिती दिली.
- पर्यावरण व सामाजिक क्षेत्रात राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणा-या व्यक्तीस दरवर्षी वसुंधरा पुरस्कार प्रदान केला जातो. प्रवीण निकम यांनी मासिक पाळीबाबत समाजाच्या सर्व स्तरात जागृतीचे महत्वाचे काम केले आहे. लैंगिक शिक्षण व मासिक पाळी या बाबत ते मोकळेपणाने विचार मांडतात आणि त्यांच्या या कामाची दखल सर्वच पातळ्यांवर घेतली गेली आहे.
- तसेच या विषयातील चळवळ वाढविण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अत्यंत कमी वयात या विषयात वेगळे ठसा उमटविणारे काम त्यांनी केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
- सन 2016 मध्ये प्रवीण निकम यांना राष्ट्रीय युवा सन्मान तसेच युनायटेड नेशन्सचे जागतिक युवा अँबेसिडर म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.
शी जिनपिंग राहणार चीनच्या आजीवन अध्यक्ष :
- चीनने 11 मार्च रोजी ऐतिहासिक निर्णय घेतला. दोनदा अध्यक्षपद भूषविलेले शी जिनपिंग यांचा आजीवन अध्यक्षपदी राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
- चीनच्या संसदेने राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष पदासाठीचा दोन कार्यकाळांची विशिष्ट मर्यादा हटवली आहे. त्यामुळे सध्याचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा आजीवन राष्ट्राध्यक्षपदी राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
- चीनच्या संसदेत राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष या दोन पदांसाठी बंधनकारक असलेली मर्यादा दोन तृतीयांश बहुमताने संपवली आहे. सत्ताधारी ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’ (सीपीसी) द्वारे प्रस्तावित सुधारणेस मंजुरी मिळणार हे निश्चितच मानले जात होते.
- चीन संसदेच्या वार्षिक सत्राच्या आधीच ‘सीपीसी‘ पक्षाने राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्षपदासाठी दोन कार्यकाळांची असलेली सीमा हटवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. दरम्यान, शी जिनपिंग यांचा सध्या दुसरा कार्यकाळ सुरू असून, हा कार्यकाळ 2023 मध्ये संपणार आहे. या झालेल्या बदलानंतर शी जिनपिंग यांचा आजीवन राष्ट्राध्यक्षपदी राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यसभेसाठी कुमार केतकरांना काँग्रेसकडून उमेदवारी :
- भाजपपाठोपाठ काँग्रेसनेही राज्यसभेसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. महाराष्ट्रातून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना काँग्रेसने संधी दिली आहे.
- याशिवाय नारनभाई रथवा आणि डॉ. अमी याज्ञिक (गुजरात), धीरजप्रसाद साहू (झारखंड), डॉ. हनुमंथैया, डॉ. सय्यद नासीर हुसेन, जी.सी. चंद्रशेखर (कर्नाटक), राजमणी पटेल (मध्य प्रदेश), पोरीका बलराम नाईक (तेलंगण) आणि अभिषेक मनू सिंघवी (पश्चिम बंगाल) यांची नावे काँग्रेसने जाहीर केली आहे.
- तसेच या नावांना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंजुरी दिली आहे. महाराष्ट्रातून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत चर्चा सुरु होती. अखेर यावर शिक्कामोर्तब झाले असून, कुमार केतकर काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत.
भारतीय महिला संघासमोर आता ऑस्ट्रेलियाचे आव्हान :
- दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात मालिका जिंकणारा भारतीय महिला संघ बलाढय़ ऑस्ट्रेलियाविरुद्ध आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी उत्सुक झाला आहे. या दोन संघांमधील तीन सामन्यांच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेला 12 मार्च पासून बडोदा येथे प्रारंभ होत आहे.
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अजिंक्यपद स्पर्धेचाच भाग म्हणून ही मालिका होत आहे. भारताने या स्पर्धेतील पहिल्या टप्प्यात आफ्रिकेला हरवले आहे.
- ऑस्ट्रेलियाची मुख्य मदार कर्णधार मेग लॅनिंग, अष्टपैलू खेळाडू एलिसी पेरी, एलिसी व्हेलानी, निकोली बोल्टन, अश्लिघ गार्डनर व यष्टिरक्षक अॅलिसा हिली यांच्यावर आहे.
- भारताची भिस्त प्रामुख्याने कर्णधार मिताली राज, उपकर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, वेदा कृष्णमूर्ती, पूनम राऊत, पूनम यादव, मोना मेश्राम यांच्यावर आहे.
- तसेच द्रुतगती गोलंदाज झुलन गोस्वामी ही दुखापतीमुळे खेळू शकणार नसल्यामुळे भारताच्या गोलंदाजीची जबाबदारी शिखा पांडे व पूजा वस्त्रकार यांच्यावर आहे.
दिनविशेष :
- भारताचे 5वे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि महाराष्ट्राचे पहिले मुखमंत्री ‘यशवंतराव चव्हाण’ यांचा जन्म सन 1913 मध्ये 12 मार्च रोजी झाला.
- महात्मा गांधी यांनी मिठाच्या सत्याग्रहासाठी 200 मैलाच्या दांडीयात्रेला 12 मार्च 1930 रोजी सुरवात केली.
- प्रसिध्द पार्श्वगायिका ‘श्रेया घोशाल’ यांचा जन्म 12 मार्च 1984 रोजी झाला.
- 12 मार्च 1999 रोजी सरकारी नोटांवर यापुढे महात्मा गांधींचेच चित्र असेल असा सरकारतर्फे निर्णय घेण्यात आला.
- चेक प्रजासत्ताक, हंगेरी व पोलंड नाटो (NATO) मध्ये 12 मार्च 1999 मध्ये सामील झाले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा