Current Affairs of 11 September 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (11 सप्टेंबर 2017)

चालू घडामोडी (11 सप्टेंबर 2017)

91वे मराठी साहित्य संमेलन बुलडाण्यात होणार :

  • 91वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे होणार आहे.
  • अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या नागपुरात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
  • संमेलनाच्या यजमानपदाचा मान ‘विवेकानंद आश्रम’ या संस्थेला देत असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी पत्रपरिषदेत जाहीर केले.
  • संमेलनस्थळाच्या पाहणी समितीने 10 सप्टेंबर रोजी अहवाल सादर केला. दिल्लीतील आयोजक संस्थेने ऐनवेळी माघार घेतल्याने बडोदा व हिवरा आश्रम हे दोनच पर्याय महामंडळापुढे उरले होते. परंतु, यातील एकाही स्थळावर एकमत होत नसल्याने अखेर मतदान घेण्यात आले.
  • महामंडळाच्या एकूण 19 सदस्यांपैकी 16 सदस्यांनी या मतदानात भाग घेतला. तीन सदस्य अनुपस्थित होते. यातील सात मते बडोद्याला तर नऊ मते हिवरा आश्रमला मिळाली. अखेर बहुमताच्या आधारे संमेलन हिवरा आश्रमला देण्याचा निर्णय झाला, अशी माहिती डॉ. श्रीपाद जोशी यांनी दिली.
  • तसेच या निर्णयामुळे सात वर्षांनंतर विदर्भाला पुन्हा संमेलनाच्या आयोजनाची संधी मिळाली आहे. याआधी 2012 मध्ये 85वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चंद्रपूरच्या सर्वोदय शिक्षण मंडळाने आयोजित केले होते.

राफाएल नदाल तिसऱ्यांदा अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचा विजेता :

  • पुरुष एकेरीतील अव्वल टेनिसपटू असलेल्या राफाएल नदालची जादू टेनिस कोर्टवर पुन्हा एकदा पाहायला मिळाली.
  • 10 सप्टेंबर रोजी झालेल्या एकतर्फी अंतिम लढतीत नदालने रशियाच्या पीटर अँडरसनवर 6-3, 6-3, 6-4 अशी मात करत अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
  • राफाएल नदालचे हे या स्पर्धेतील तिसरे आणि एकूण 16 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. नदालने याआधी 2010 आणि 2013 मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. तसेच यावर्षी फ्रेंच ओपनच्या विजेतेपदावरही त्याने कब्जा केला होता.

नवीन एमएमआरडीए डीपीमध्ये कोळीवाडे सुरक्षित :

  • मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) विकास आराखड्याबाबत प्राप्त झालेल्या सूचना/हरकतींचा अभ्यास करून, प्रादेशिक योजनेत बदल सुचविण्यासाठी, प्राधिकरणाकडून त्रिसदस्यीय नियोजन समितीची नेमणूक करण्यात आली आहे.
  • समितीने जून आणि जुलै 2017 दरम्यान मुंबईत सुनावणी घेतली आहे. स्थानिकांच्या विनंतीनुसार, सुनावणी तालुका स्तरावरही घेण्यात येत आहे. सुनावणीची कार्यवाही पूर्ण झाल्यावर, उपसमिती एमएमआरडीएला अहवाल सादर करेल. त्यानंतरच अहवालातील शिफारसींची दखल घेत, योग्य त्या सुधारणांसोबत प्रारूप प्रादेशिक योजना मुंबई महानगर नियोजन समितीमार्फत, राज्य शासनाला मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.
  • प्रस्तावित सागरी किनारी मार्ग व मेट्रो रेल गोराई-मानोरी मार्गे वसई-विरार येथील किनार्‍यावरून जाईल. त्यामुळे स्थानिक कोळीवाडे विस्थापित होतील, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
  • प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, हे प्रकल्प गोराई-मनोरी व वसई-विरार क्षेत्रात किनार्‍यालगत नसून, उपनगरीय रेल्वे मार्गानजीक अस्तित्वात असलेल्या डीपी रोडवर प्रस्तावित आहेत. म्हणजेच, प्रकल्पामुळे कोळीवाडे विस्थापित होणार नाहीत.

यूएस टेनिस ओपन स्पर्धेत प्रथमच स्लोआनी स्टीफन्सला विजेतेपद :

  • अमेरिकेच्या स्लोआनी स्टीफन्सने प्रथमच कारकिर्दीत ग्रँडस्लॅम स्पर्धेचे विजेतेपद मिळविण्याची कामगिरी केली आहे. स्लोआनीने यूएस ओपन स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद मिळविले.
  • स्लोआनीने अमेरिकेच्याच मॅडीसन कीजला 6-3, 6-0 असे सहज दोन सेटमध्ये पराभूत करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. जुलैमध्ये दुखापतीतून सावरत स्लोआनीने टेनिस कोर्टवर पुनरागमन केले होते.
  • स्लोआनीला या स्पर्धेसाठी नामांकनही देण्यात आले नव्हते. नामांकन नसतानाही ग्रँडस्लॅम स्पर्धेचे विजेतेपद मिळविणारी स्लोआमी ही पाचवी महिला खेळाडू ठरली आहे.
  • स्लोआनीला या स्पर्धेच्या विजेतेपदामुळे 3.7 मिलियन अमेरिकन डॉलर एवढी रक्कम मिळाली आहे. तिच्या कारकिर्दीतील ही आतापर्यंतची सर्वोच्च रक्कम आहे.

गृहमंत्री राजनाथसिंह चार दिवसांसाठी काश्‍मीर दौऱ्यावर :

  • जम्मू आणि काश्‍मीरच्या चार दिवसांच्या दौऱ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांचे 10 सप्टेंबर रोजी श्रीनगरमध्ये आगमन झाले.
  • सर्व पर्याय खुले ठेवून मी काश्‍मीरमध्ये आलो आहे. मतभेद चर्चेद्वारे सुटू शकतात यावर विश्वास असणाऱ्या सर्वांना आपण भेटणार असून, त्यांची मते जाणून घेणार असल्याचे राजनाथसिंह यांनी स्पष्ट केले.
  • श्रीनगरमध्ये दाखल झाल्यानंतर राजनाथसिंह यांनी जम्मू आणि काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.
  • काश्‍मीरमध्ये मागील महिन्यात उसळलेल्या हिंसाचारात 27 दहशतवादी ठार झाले होते, तर सुरक्षा दलांचे अनेक जवान हुतात्मा झाले होते. काही सर्वसामान्य नागरिकही मृत्युमुखी पडले होते. या पार्श्वभूमीवर राज्यातील स्थिती सामान्य करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर मेहबूबा मुफ्ती आणि राजनाथसिंह यांच्या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्‍मीरसाठी 2015 मध्ये जाहीर केलेल्या 80 हजार कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांचीही माहिती घेतली. या प्रकल्पांच्या कामांचा वेग वाढवावा, कारण त्यामुळे राज्यातील रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असे राजनाथसिंह यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना स्पष्ट केले.

दिनविशेष :

    • भूदान चळवळीचे प्रणेते ‘आचार्य विनोबा भावे’ यांचा जन्म 11 सप्टेंबर 1895 मध्ये झाला.
    • सन 1942 मध्ये 11 सप्टेंबर रोजी सुभाषचंद्र बोसआझाद हिंद सेनेने जन गण मन हे गीत राष्ट्रगीत म्हणून पहिल्यांदा गायले.
    • 11 सप्टेंबर 1961 मध्ये वर्ल्ड वाइल्डलाइफ फंडची स्थापना झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.