Current Affairs of 1 March 2018 For MPSC Exams
चालू घडामोडी (1 मार्च 2018)
मालदीवचा बहुराष्ट्रीय नौदल सरावास नकार :
- पुढील महिन्यात भारताने आयोजित केलेल्या बहुराष्ट्रीय नौदल सराव कार्यक्रमाला येण्याचे आमंत्रण मालदीवने नाकारले असून, मालदीवमधील आणीबाणीच्या परिस्थितीत त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याचे स्पष्टीकरण दिले.
- या सरावापासून दूर राहण्याचे कारण देताना मालदीवच्या नौदल अधिकाऱ्यांनी सावधपणे त्यांचे म्हणणे मांडले की, ‘या नौदल सरावात मालदीवच्या नौदलाचे अधिकारी हे केवळ प्रक्षेक म्हणून असतील, त्यामुळे त्यांची अनुपस्थिती ही फार लक्षणीय नसेल.’
- भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल सुनील लांबा यांनी 6 मार्चपासून सुरू होणाऱ्या या आठ दिवसांच्या नौदल सराव कार्यक्रमाची घोषणा केल्यानंतर मालदीवच्या दिल्लीतील दूतावासातून या कार्यक्रमाला अनुपस्थित राहण्याची माहिती मिळाली.
- यापूर्वी नौदल सराव कार्यक्रम 1995 साली पहिल्यांदा पाच नौदलांबरोबर, क्षेत्रीय सहकार्य वाढविण्याच्या उद्देशाने केला होता. यात ऑस्ट्रेलिया, मलेशिया, मॉरीशस, म्यानमार, न्यूझिलंड आणि ओमान या देशांच्या नौदलाचा सहभाग होता.
Must Read (नक्की वाचा):
विद्यापीठांच्या मानांकनात आयआयटीची घसरण :
- 2018 सालासाठीचे ‘द क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी’ रँकिंग जाहीर करण्यात आले असून, त्यात प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्थेची (आयआयटी) गेल्या वर्षीच्या तुलनेत अनेक विषयांमध्ये घसरण झाल्याचे दिसून येत आहे.
- इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंडियन स्कूल ऑफ माइन्स) आणि आयआयटी खरगपूर या ‘अभियांत्रिकी- खनिज व खाणकाम’ या विषयात पहिल्या 50 क्रमांकातील स्थान राखण्यात यशस्वी झाल्या असल्या, तरी त्यांची क्रमवारी घसरली आहे.
- आयआयटी (आयएसएम) 29व्या, तर आयआयटी खरगपूर 40व्या क्रमांकावर आहे. गेल्या चार वर्षांशी तुलना करता, विषयनिहाय श्रेणीच्या पहिल्या पन्नास (‘टॉप 50’) यादीत स्थान मिळवण्यात केवळ तीन भारतीय संस्था यशस्वी ठरल्या आहेत. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी असलेल्या 109व्या स्थानाच्या तुलनेत यंदा केवळ 20 भारतीय संस्था ‘सर्वोच्च 100’च्या यादीत आहेत.
- तसेच ताज्या श्रेणीकरणानुसार, ‘इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी’ या विषयाने सर्वोत्तम कामगिरी केली असून, टॉप 100 मधील तीन विद्यापीठांसह 10 विद्यापीठांनी या यादीत स्थान मिळवले आहे.
हिंगोलीच्या पुष्यमित्रला उत्कृष्ट वैज्ञानिक पुरस्कार :
- संगमनेर (जि. नगर) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेमध्ये देशभरातील पन्नास ख्यातनाम प्राध्यापकांसमोर येथील आदर्श महाविद्यालयाचा विद्यार्थी पुष्यमित्र जोशी याने बायोमेडिकल वेस्टेजची विल्हेवाट लावण्यासाठी तयार केलेले इन्सीनरेटरचे पायलट मॉडेल कौतुकाचा विषय ठरले. त्याने सादर केलेला शोधनिबंध व पोस्टर सादरीकरणालाही जोरदार दाद मिळाली. या परिषदेत त्याने प्रथम क्रमांक मिळविला.
- पुष्यमित्र राजेश जोशी हा आदर्श महाविद्यालयात बी.एस्सी.च्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. अकरा टक्के मृत्यू हे बायोमेडिकल वेस्टेजची योग्य विल्हेवाट न लागल्याने होतात, असे युनायटेड नेशनच्या अहवालामध्ये नमूद आहे. ते पुष्यमित्रच्या वाचनात आले. त्यावर त्याने विचार सुरू केला. या समस्येवर उपाय म्हणून त्यासाठी लागणारे इन्सीनरेटर तयार करण्याचे त्याने ठरविले. पुढे त्याने ते करून दाखवले.
सत्यपाल सिंह यांनी डार्विननंतर न्यूटनला केले टार्गेट :
- आयझॅक न्यूटन यांच्यापूर्वी कितीतरी आधी वेदांमधील मंत्रांमध्ये गतीचे नियम सांगितले आहेत, असा दावा देशाचे शिक्षण राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांनी केला आहे. या वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा टीकेचे धनी होण्याची शक्यता आहे.
- कारण यापूर्वी त्यांनी डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांताला आव्हान देत मानवाची उत्पत्ती ही माकडांपासून झाली नसल्याचा दावा करीत त्यासाठी वेदांचा संदर्भ दिला होता. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा असाच कित्ता गिरवाला असून यंदा न्यूटनच्या गतीविषयक नियमांना आव्हान दिले आहे.
- 15 आणि 16 जानेवारी रोजी केंद्रीय शिक्षण सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला अनेक केंद्रीय मंत्री आणि राज्यांचे शिक्षण मंत्री उपस्थित होते. न्यूटनने गतीच्या नियमांचा शोध लावण्यापूर्वीच मंत्रांमध्येच गतीविषयक नियमांचा उल्लेख होता. त्यामुळे पारंपारिक ज्ञानाची आपल्य़ा शिक्षणपद्धतीत समावेश आवश्यक आहे, अशी चर्चा बैठकीत झाली होती.
- जानेवारी महिन्यांतच सिंह यांनी चार्ल्स डार्विनच्या उत्क्रांतीवादाचा सिद्धांत हा चुकीचा असून शाळा आणि महाविद्यालयातील अभ्यासक्रमातून तो हटवण्यात यायला हवा असे त्यांनी म्हटले होते. पृथ्वीवर मानवाचा जन्म मानव म्हणूनच झाल्याचा दावा त्यांनी केला होता. यासाठी वेदांमध्ये मानव माकडांपासून तयार झाल्याचे म्हटलेले नाही, असा दाखला त्यांनी दिला होता.
आयपीएलमध्ये ‘डीआरएस’ला बीसीसीआयची मान्यता :
- आयपीएलचा अकरावा हंगाम अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपलेला असताना बीसीसीआयने, नवीन हंगामासाठी DRS SYSTEM ला आपला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे पाकिस्तान सुपरलिग स्पर्धेनंतर इंडियन प्रिमीअर लिग ही DRS (Decicion Review System) चा वापर करणारी दुसरी स्पर्धा ठरली आहे.
- DRS चा वापर करण्यासाठी बीसीसीआय उत्सुक होतेच. बीसीसीआय तंत्रज्ञानाच्या दृष्टीकोनातून सर्वोत्तम कामगिरी करतेय, मग आयपीएलमध्ये DRS चा वापर का करु नये असे मत सर्व अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
- बीसीसीआय प्रत्येक आंतरराष्ट्रीय सामन्यात DRS या यंत्रणेचा वापर करते, म्हणून यंदाच्या आयपीएल सामन्यांमध्येही DRS च्या वापराला बीसीसीआयने परवानगी दिली आहे.
दिनविशेष :
- ‘यलो स्टोन नॅशनल पार्क’ या जगातील पहिल्या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1 मार्च 1872 मध्ये झाली.
- टाटा आयर्न अँड स्टील कंपनीची स्थापना 1 मार्च 1907 रोजी झाली.
- महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभणारे आधुनिक महामानव डॉ. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांचा अलिबाग, रायगड येथे सन 1922 मध्ये 1 मार्च रोजी जन्म झाला.
- 1 मार्च 1948 रोजी गुवाहाटी उच्च न्यायालयाची स्थापना झाली.