Current Affairs of 1 July 2015 For MPSC Exams
चालू घडामोडी (1 जुलै 2015 )
कै. धीरुभाई अंबानी यांचा धडा पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्याचा निर्णय :
- रिलायन्स ग्रुपचे संस्थापक कै. धीरुभाई अंबानी यांचा धडा पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला आहे.
- तरुणाईने उद्योजक होण्याचे स्वप्न पाहावे, ही या निर्णयामागे भावना असल्याचे तसेच धीरुभाईंसारख्या उद्योजकाने यशस्वी होण्यासाठी केलेल्या संघर्षाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी त्यांचा धडा पुस्तकात समावेश करण्यात आला आहे.
Must Read (नक्की वाचा):
“मॅगी” नूडल्सला परदेशात निर्यात करण्याची परवानगी :
- आरोग्याला अपायकारक असल्याने भारतात बंदी घालण्यात आलेल्या “मॅगी” नूडल्सची परदेशात निर्यात करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिली.
- तरी देशातील “मॅगी“बंदी मात्र कायम आहे.
- निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक शिसे असल्याच्या कारणावरून महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांनी “मॅगी”च्या 10 उत्पादनांवर बंदी घातली आहे.
- तसेच जुलैच्या अखेरपर्यंत “मॅगी‘ नूडल्सची सुमारे 17 हजार कोटी पाकिटे नष्ट करणार आहोत. त्यापैकी 11 हजार कोटी पाकिटे बाजारातून परत घेतलेली आहेत, असे “नेस्ले”ने सांगितले.
- तसेच एफएसएसएआय, राज्य सरकारसह सर्व प्रतिवादींनी “मॅगी”वरील बंदी न हटवण्याची मागणी प्रतिज्ञापत्राद्वारे केली आहे.
30 जून हा दिवस नेहमीपेक्षा एक सेकंदाने मोठा होता :
- या वर्षीचा 30 जून हा दिवस नेहमीपेक्षा एक सेकंदाने मोठा होता.
- या दिवशी वेळेमध्ये एका अतिरिक्त सेकंदाची भर घातली जाणार असल्याचे अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था “नासा”ने सांगितले आहे.
- पृथ्वीच्या परिभ्रमणाचा वेग कमी होत असल्याने वेळेचा समतोल राखण्यासाठी वेळेमध्ये एका सेकंदाची वाढ करणे हा उपाय होता, असे “नासा”मधील तज्ज्ञ डॅनियल मॅकमिलन यांनी सांगितले.
- एका दिवसामध्ये 86,400 सेकंद असतात. प्रमाण वेळेनुसार, लोक आपल्या दैनंदिन जीवनात याचा समन्वित जागतिक वेळेच्या रूपात वापर करतात. ‘कोऑर्डिनेटेड युनिव्हर्सल टाईम’ची (यूटीसी) आण्विक कालगणनेशी जुळणी करण्यासाठी असा जास्तीचा एक सेकंद घ्यावा लागतो.
- 1972 ला प्रथम अशी एका सेकंदाची भर घालण्यात आली तर 1999 पासून साधारणेपणे दरवर्षी अशी भर घातली जात आहे.
पी. व्ही. नरसिंहराव समाधी दिल्लीत बांधण्याचा निर्णय :
- माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मृत्यूनंतर तब्बल दहा वर्षांनी त्यांची समाधी दिल्लीत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- राष्ट्रीय स्मृतीजवळील इतर माजी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या स्मारकांजवळच त्यांची समाधी बांधण्यात येणार असल्याचे शहर विकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
व्हॉटस् अॅप, स्काईप परवाना शुल्क आकारावे असा प्रस्ताव तयार :
- इंटरनेटच्या माध्यमातून व्हॉईस आणि टेक्स्ट मेसेजिंगची सेवा देणाऱ्या व्हॉटस् अॅप, स्काईप या सेवांची गणना देखील दूरसंचार सेवेप्रमाणे करत त्यांचा समावेश इंडियन टेलिग्राफ अॅक्टमध्ये करावा आणि त्यांच्याकडून परवाना शुल्क आकारावे असा प्रस्ताव दूरसंचार विभागाच्या अंतर्गत समितीने तयार केला आहे.
- दूरसंचार कंपन्यांतर्फे व्हॉईस अर्थात नियमित व्हॉईस कॉलिंग आणि टेक्स्ट सेवा पुरविली जाते.
- तसेच या सेवा देण्याकरिता आवश्यक त्या तांत्रिक गरजांची पूर्तता करण्यासाठी या कंपन्यांना परवाना शुल्क भरावे लागते.
- याचधर्तीवर इंटरनेटच्या आधारे व्हॉईस आणि टेक्स्टची सेवा देणाऱ्या अॅप्सना वेगळा न्याय कशासाठी, या तर्काच्या आधारे हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
सर्वाधिक कमाई केलेल्या सेलिब्रेटींची यादी फोर्ब्जने केली प्रसिद्ध :
- फोर्ब्ज मासिकाने 2015 मध्ये सर्वाधिक कमाई केलेल्या जगातील ‘टॉप 100’ सेलिब्रेटींची यादी (सेलिब्रिटी 100 : द वर्ल्ड टॉप पेड एन्टरटेनर्स 2015) नुकतीच प्रसिद्ध केली आहे.
- या यादीत अमिताभ, सलमान, अक्षयसह भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी याचाही समावेश आहे.
- या वर्षाच्या यादीत अमेरिकेचा बॉक्सर फ्लॉइड मेवेदर हा अव्वलस्थानी आहे. मेवेदरची कमाई 19 अब्ज रुपये आहे.
- अमिताभ आणि सलमानची कमाई 2 अब्ज 13 कोटी रुपये आहे. सलमान, अमिताभ हे संयुक्तपणे 71 व्या स्थानी आहेत.
- तसेच अक्षय कुमारही कमाईत या दोघांच्या जवळपास आहे. त्याची कमाई 2 अब्ज 7 कोटी आहे. या यादीत तो 76 व्या स्थानी आहे. तर धोनीची कमाई 1 अब्ज 97 कोटी रुपये असून तो 82 व्या क्रमांकावर आहे.
- तसेच यात शाहरुख खान स्थान पटकावू शकलेला नाही.
- फोर्ब्स यादीत गायिका टेलर स्विफ्ट (8), टेनिसपटू रोजर फेडरर (16), गायिका बियांसे (29), किम करदाशियाँ (33), गोल्फपटू टाइगर वुड्स (37), अभिनेता टॉम क्रूज (52), अभिनेता जॉनी डेप (87) आणि लियोनाडरे डिकैप्रियो (89) यांचा समावेश आहे.
‘इसिस’ संबंधित कंपन्यांशी व्यवहारावर भारताची बंदी :
- पश्चिम आशियामध्ये दहशतीचा धुमाकूळ घालणाऱ्या ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेच्या ताब्यातील तेलसाठ्यांच्या व्यापारावर भारताने 30 जून रोजी बंदी घातली.
- तेलसंपन्न इराक, सीरियामधील बहुतांश भूभागावर ताबा मिळविलेल्या ‘इसिस’साठी तेलसाठे हे निधी उभा करण्याचे महत्त्वाचे साधन आहे. त्यांच्या नाड्या आवळण्यासाठी या संघटनेशी तेलासंदर्भातील व्यवहार करू नये, असा ठराव ‘संयुक्त राष्ट्रसंघा’ने (यूएन) केला होता.
- कट्टर दहशतवादी संघटना असलेल्या ‘इसिस’चा उदय सीरिया आणि इराकमध्ये झाला. कट्टरवाद आणि निर्घृण हत्या करत त्यांनी जगभरातील दहशतवाद्यांना आकर्षित केले आहे.
- ‘इसिस’कडे भरतीसाठी असलेल्या तरुणांच्या ओढ्यामुळे पाश्चिमात्य देश चिंताक्रांत झाले आहेत.
- आता ही कट्टरवादी संघटना युरोपमध्येही हातपाय पसरू पाहत असल्याची चिन्हे गेल्या काही दिवसांमध्ये दिसली आहेत. ‘इसिस’ची आर्थिक कोंडी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने मदत करावी, असे आवाहन इराकचे पंतप्रधान हैदर अल-अबादी यांनी केले आहे.
- या पार्श्वभूमीवर वाणिज्य मंत्रालयाने एक परिपत्रक काढून या व्यापारावर बंदी घालत असल्याचे जाहीर केले.
जयललितांचा ऐतिसाहिक विजय :
- तमिळनाडूतील आर.के. नगर पोटनिवडणुकीत तमिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि ‘अण्णा द्रमुक’ सर्वेसर्वा जे. जयललिता यांनी ऐतिहासिक विजय मिळविला आहे. जयललिता यांना 1 लाख 60 हजार 342 मते मिळाली आहेत.
- विक्रमी फरकाने त्यांचा विजय झाला असून सर्व प्रतिस्पर्धी उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. या विजयामुळे तमिळनाडूमधील विधानसभेमध्ये पुन्हा प्रवेश करण्याचा जयललिता यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
- या मतदारसंघातून मुख्य लढत ही जयललिता आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते सी. महेंद्रन यांच्यात झाली. सी. महेंद्रन यांना अवघी दहा हजार मतेच पडली. जयललिता यांनी महेंद्रन यांचा 1 लाख 50 हजार 722 मतांनी पराभव केला.
- या पोटनिवडणुकीसाठी 70 टक्के मतदान झाले होते. निवडणुकीवर मुख्य विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. त्यामुळे जयललिता यांचा विजय निश्चित मानला जात होता.
भारत, थायलंडमध्ये करार :
- भारत आणि थायलंडने दुहेरी कर आकारणी टाळणे करारासह (डीटीएए) अनेक महत्त्वपूर्ण करारांवर 30 जूनला स्वाक्षऱ्या केल्या, तसेच प्रत्यार्पण करारावर शिक्कामोर्तब करणाऱ्या दस्तऐवजांची देवाण-घेवाण केली.
- भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि थायलंडचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री तानासाक पातिमप्रगोर्म यांनी या करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.
- प्रत्यार्पण करारावर 2013 मध्ये स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. हा करार फरार गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणासाठी कायदेशीर चौकट उपलब्ध करून देतो. दस्तऐवजांच्या देवाण-घेवाणीमुळे प्रत्यार्पण प्रक्रियेला वेग मिळणार आहे.
विसूभाऊ बापटांची गिनीज बूकमध्ये नोंद :
- सलग पंधरा तास काव्यवाचन करत विसूभाऊ बापट यांनी काव्य वाचनातला नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यासाठी 12 जून रोजी त्यांची गिनीज बूकमध्ये नोंद झाली आहे.
दिनविशेष :
- 1 जुलै – कृषिदिन
- 1 जुलै – जागतिक वास्तुकला दिन
- 1909 – क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यांनी इंडिया ऑफिसचे राजकीय ए.डी.सी.सर विल्यम कर्झन वायली यांची हत्या केली.
- 1918 – गायनाचार्य पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी गोपाळ गायन समाजाची स्थापना केली.