9 December 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
9 December 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (9 डिसेंबर 2019)
भारत विकणार सुपरसॉनिक ‘ब्रह्मोस’ मिसाइल :
- ब्रह्मोस हे आजच्या घडीला भारताकडे असलेले सर्वात घातक क्षेपणास्त्र आहे. मागच्या काही काळापासून भारत हे क्षेपणास्त्र अन्य देशांना विकण्याचा प्रयत्न करत आहे.
- तर लवकरच फिलीपाईन्स ब्रह्मोस क्षेपणास्त्र विकत घेणारा पहिला देश बनू शकतो. सध्या भारत आणि फिलीपाईन्समध्ये ब्रह्मोसची विक्री किंमत निश्चित करण्यावरुन चर्चा सुरु आहे. 2020 पर्यँत हा करार प्रत्यक्षात आणण्याचा दोन्ही देशांचा प्रयत्न आहे.
- ब्रह्मोस हे भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे. भारताची मागच्या काही वर्षांपासून थायलंड, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम या देशांबरोबर ब्रह्मोस विक्रीबद्दल चर्चा सुरु आहे.
- तसेच ब्रह्मोस हे सुपरसॉनिक क्रूझ मिसाइल असून ते जमीन आणि पाण्यातून हल्ला करण्यासाठी सक्षम आहे.
- तर वेगवेगळया चाचण्यांनंतर फिलीपाईन्सच्या लष्कराने ब्रह्मोस विकत घेण्याचे सुनिश्चित केले आहे. आता फक्त किंमतीवरुन चर्चा सुरु आहे. या संरक्षण व्यवहारासाठी भारताने फिलीपाईन्सला 10 कोटी डॉलर्सचे कर्ज देण्याची तयारी दाखवली आहे. पण फिलीपाईन्स स्वत:च्या पैशाने हे क्षेपणास्त्र विकत घेण्याचा विचार करत आहे.
- त्यासाठी पुढच्यावर्षीच्या अर्थसंकल्पात ब्रह्मोसच्या खरेदीसाठी तरतूद करण्याचा फिलीपाईन्सचा विचार आहे. भारतीय लष्कर आणि नौदलाने ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा वापर सुरु केला आहे.
- ब्रह्मोस हे नाव भारतातील ब्रह्मपुत्रा आणि रशियातील मॉस्क्वा या दोन नद्यांच्या नावांतील सुरुवातीची अक्षरे एकत्र करून बनवले आहे. ब्रह्मोसचा पल्ला 290 किमी असून त्यावर 300 किलो वजनाची पारंपरिक स्फोटके किंवा अण्वस्त्रे बसवता येतात.
- ब्रह्मोस सध्या जगातील सर्वात वेगवान आणि अचूक क्रूझ क्षेपणास्त्र मानले जाते. त्याचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा 2.8 ते 3 पट आहे. म्हणजे ब्रह्मोस एका सेकंदात 1 किमी अंतर पार करते. तसेच त्याची नेम चुकण्याची क्षमता (सक्र्युलर एरर प्रॉबेबिलिटी – सीईपी) 1 मीटरपेक्षा कमी असल्याचा दावा केला जातो. म्हणजेच त्याची अचूकता 99.99 टक्के आहे.
- क्रूझ क्षेपणास्त्र असल्याने ब्रह्मोस जमिनीपासून कमी उंचीवरून प्रवास करून शत्रूच्या रडारला चकवा देऊ शकते.
तसेच मार्ग बदलून क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणांपासून बचाव करून घेऊ शकते. ब्रह्मोस जमीन, पाणी तसेच हवेतून डागता येते. भारताच्या तिन्ही सेनादलांत आणि रशियाच्या सैन्यात ब्रह्मोस तैनात केले जात आहे.
Must Read (नक्की वाचा):
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत :
- पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांतून आलेल्या बिगरमुस्लीम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद असलेले नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज, लोकसभेत मांडणार आहेत.
- तर सहा दशकांपासून लागू असलेल्या नागरिकत्व कायद्यात दुरुस्ती करण्यासाठीचे हे विधेयक अमित शहा लोकसभेत मांडतील आणि ते संमत करण्याच्या दृष्टीने त्यावर चर्चा करण्यात येईल, असे लोकसभेच्या सोमवारच्या कामकाजपत्रिकेत म्हटले आहे.
- तसेच धार्मिक छळाला कंटाळून पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांतून 31 डिसेंबर 2014 पर्यंत भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी व ख्रिस्ती समुदायाच्या लोकांना बेकायदा स्थलांतरित मानले जाणार नाही आणि त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल, अशी तरतूद नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक 2019 मध्ये आहे.
- तसेच ही दुरुस्ती घटनेच्या सहाव्या अनुसूचित समाविष्ट केलेल्या आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांतील आदिवासी भागांना, तसेच बंगाल ईस्टर्न फ्रंटियर रेग्युलेशन, 1873 मध्ये अधिसूचित केलेल्या भागांना लागू असणार नाही.
- धर्माच्या आधारावर विचार न करता सर्व बेकायदा स्थलांतरितांना हद्दपार करण्यासाठी 24 मार्च 1971 ही आधार तारीख निश्चित करणारी आसाम करारातील तरतूद यामुळे निष्प्रभ ठरेल, असे सांगून ईशान्य भारतातील अनेक संस्था आणि संघटनांनी या विधेयकाला मोठा विरोध केला आहे.
शिक्षणतज्ज्ञ सुरेश आमोणकर यांचे निधन :
- कोकणी लेखक, पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ व गोवा कोकणी अकादमीचे अध्यक्ष पद्मश्री सुरेश आमोणकर यांचे अल्प आजाराने रविवारी पणजी येथे निधन झाले. ते 84 वर्षांचे होते.
- शिक्षण व साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारने 2009 साली आमोणकर यांना पद्मश्री किताबाने सन्मानित केले होते.
- तर शिक्षणतज्ज्ञ, अनुवादक व भाषा चळवळीतील अग्रणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमोणकर यांनी आयुष्याच्या उत्तरार्धात चार वेळा कर्करोगाशी यशस्वी लढा दिला होता.
- तसेच ‘धम्मपद’ या बौद्धांच्या धर्मग्रंथाचा कोकणीत अनुवाद करण्यासाठी ते पाली भाषा शिकले होते.
- ज्ञानश्वरी, भगवद्गीता, ‘गॉस्पेल ऑफ जॉन’ या महत्त्वाच्या धार्मिक पुस्तकांचे त्यांनी कोकणीत प्रवाही अनुवाद केले. अलीकडेच त्यांनी शेक्सपियरच्या ‘ज्युलियस सीझर’ या नाटकाचा कोकणीत अनुवाद केला होता. शेक्सपियरच्या विविध नाटकांमधील प्रसिद्ध संवाद व म्हणी यांचे संकलन असलेल्या कोकणीतील अनुवादित पुस्तकाचेही त्यांनी प्रकाशन केले होते.
भारताची पदकांची वर्चस्वमालिका कायम :
- जलतरणपटू आणि कुस्तीपटूंच्या दमदार कामगिरीच्या बळावर भारताने दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या (सॅफ) रविवारी सातव्या दिवशीही पदकांची वर्चस्वमालिका कायम राखली.
- तर जलतरणपटूंनी 7 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्यपदकांची कमाई केली, तर कुस्तीपटूंनी 4 सुवर्णपदकांवर नाव कोरले.
- रविवारी भारताने 38 पदकांची भर घातली. यात 22 सुवर्ण, 10 रौप्य आणि 6 कांस्यपदकांचा समावेश आहे.
- तसेच गुणतालिकेत अग्रेसर असलेल्या भारताच्या खात्यावर 132 सुवर्ण, 79 रौप्य आणि 41 कांस्य अशी एकूण 252 पदके जमा आहेत. यजमान नेपाळ 165 पदकांसह (45 सुवर्ण, 44 रौप्य, 76 कांस्य) दुसऱ्या स्थानावर आहे.
कॅप्टन कोहलीने ट्वेंटी-20त नोंदवला विश्वविक्रम :
- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. वेस्ट इंडिजनं संघात एक बदल करताना दिनेश रामदिनच्या जागी निकोलस पूरणला पाचारण केले. पण, विराटनं संघात बदल नसल्याचं जाहीर केले. या सामन्यात विराटनं 19 धावा करताच विश्वविक्रमाला गवसणी घातली. त्यानं हिटमॅन रोहित शर्माचा विक्रम मोडला.
- तर फलंदाजीला आलेल्या रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी संयमी सुरुवात केली. पण, चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर खॅरी पिएरे यानं लोकेश राहुलला माघारी पाठवलं. राहुल 11 धावा करून शिमरोन हेटमायरच्या हाती झेल देऊन माघारी परतला. त्यानंतर कर्णधार विराटनं एक चतुर खेळी केली.
- स्वतः फलंदाजीला न येता विराटनं डावखुऱ्या शिवम दुबेला फलंदाजीला पाठवले. पण, दोन्ही खेळाडूंना मोठे फटके मारताना अडचण जाणवत होती. टीम इंडियानं पहिल्या पॉवर प्लेमध्ये 1 बाद 42 धावा केल्या.
- तसेच विराट 19 धावांवर माघारी परतला, पण तो ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्यानं 74 सामन्यांत 2563 धावा केल्या आहेत. तर रोहित 103 सामन्यांत 2562 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
दिनविशेष :
- 9 डिसेंबर – आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन
- 9 डिसेंबर 1892 मध्ये इंग्लिश फुटबॉल क्लब न्यूकॅसल युनायटेडची स्थापना झाली
- डेव्हीस कप टेनिस स्पर्धेची 9 डिसेंबर 1900 मध्ये सुरवात.
- 9 डिसेंबर 1946 मध्ये दिल्लीमध्ये घटना परिषदेची पहिली बैठक.
- ब्रिटन पासुन स्वतंत्र होऊन टांझानिया देशाचा जन्म 9 डिसेंबर 1961 मध्ये झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा