27 September 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

27 September 2018 Current Affairs In Marathi

27 September 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (27 सप्टेंबर 2018)

देशात 21 कोटी जणांची पॅन-आधार क्रमांक जोडणी:

 • सर्वोच्च न्यायालयाच्या आधारबाबतच्या निकालानुसार परमनंट अकाऊंट नंबर म्हणजे पॅन क्रमांक व आधार क्रमांक एकमेकांना जोडणे अनिवार्य करण्यात आले असून आतापर्यंत 21.08 कोटी लोकांनी हे दोन क्रमांक एकमेकांशी जोडले आहेत.
 • अधिकृत आकडेवारीनुसार प्राप्तिकर खात्याने जारी केलेले 210816776 इतके पॅन कार्ड हे आधार क्रमांकाशी जोडले गेले आहेत. एकूण पॅनकार्ड किंवा क्रमांकांची संख्या ही 41.02 कोटी असून त्यातील 21.08 कोटी कार्ड आधार क्रमांकाशी जोडले गेले आहेत. Pan-Adhaar Link
 • केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने पॅन क्रमांक व आधार क्रमांक एकमेकांशी जोडण्याची तारीख पुढील वर्षी 31 मार्चपर्यंत वाढवली आहे. याबाबतचा आदेश 30 जूनला जारी करण्यात आला होता.
 • नवीन माहितीनुसार 41.02 कोटी पॅन कार्डमधील 40.01 कोटी कार्ड हे व्यक्तींच्या नावावर आहेत. बाकीच्या कंपन्या व करदाते यांच्या नावावर आहेत. त्यामुळे फक्त पन्नास टक्के पॅन क्रमांक किंवा कार्ड हे आधार क्रमांक किंवा कार्डशी जोडले गेले आहेत. आधार क्रमांक व पॅन क्रमांक जोडण्याची मुदत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पाच वेळा वाढवून देण्यात आली होती.
 • आधारबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत आधार व पॅन क्रमांक जोडण्यास मुदतवाढ देण्यात यावी, असे न्यायालयाने म्हटले होते. सरकारने प्राप्तिकर विवरणपत्रात आधार क्रमांक देणे सक्तीचे केले होते.
 • प्राप्तिकर कायदा कलम 139 एए (2) अन्वये 1 जुलै 2017 अखेर ज्या व्यक्तींकडे पॅनकार्ड असेल व ती व्यक्ती आधारसाठी पात्र असेल तर त्यांनी आधार क्रमांक प्राप्तिकर खात्यास देणे बंधनकारक आहे.
 • तसेच आधार क्रमांक किंवा कार्ड हे युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाने जारी केले आहे, तर पॅनकार्ड किंवा परमनंट अकाऊंट नंबर हा दहा अंकी क्रमांक प्राप्तिकर खात्याने जारी केला आहे.

सर्वोच्च न्यायालयातील कामकाज आता ‘लाइव्ह’:

 • सर्वोच्च न्यायालयातील कामकाजाचे थेट प्रसारण आता सर्वांना पाहता येणार आहे. सर्वोच्च न्यायालयानेच त्यासाठी परवानगी दिली. ‘थेट प्रसारणामुळे न्यायालयाच्या कामकाजात पारदर्शकता येईल. लोकहिताच्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहे,’ असे न्यायालयाने या वेळी नमूद केले.
 • सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. अजय खानविलकर आणि धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने हा ऐतिहासिक निर्णय दिला. ‘न्यायालयीन कामकाजाच्या थेट प्रेक्षपणाची सुरवात सर्वोच्च न्यायालयापासूनच होणार असून, त्यासाठी काही नियमांचे पालन करावे लागणार आहे. या थेट प्रेक्षपणासाठी न्यायिक यंत्रणा जबाबदार असणार आहे,’ असे न्यायालयाने स्पष्ट केले.
 • न्यायालयातील महत्त्वाच्या खटल्यांची सुनावणी आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून उत्तर मागितले होते. त्यावर सरन्यायाधीशांकडून होत असलेल्या संवैधानिक खटल्याच्या सुनावणीचे चाचणी तत्त्वावर प्रसारण करता येऊ शकते, असे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले होते. न्यायालयीन प्रक्रियेच्या थेट प्रक्षेपणासाठी पथदर्शी प्रकल्प सुरू केला जाऊ शकतो, असे केंद्राने सांगितले होते.
 • संवैधानिक आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रकरणांच्या सुनावणीचे थेट प्रसारण केले जावे. हा नागरिकांचा अधिकार आहे. पाश्‍चात्त्य देशांत तशी पद्धत आहे, असे ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनी याबाबत दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते.

इंटरनेटच्या जगात गुगलला 20 वर्षे पूर्ण:

 • 27 सप्टेंबर म्हणजे आपल्या लाडक्या ‘गुगल’चा वाढदिवस. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असणारा आपल्या सर्वांचा मित्र म्हणजे गुगल. गुगलला 27 सप्टेंबर रोजी 20 वर्षे पूर्ण झाले असून गुगल आपला वाढदिवस साजरा करत आहे.
 • या निमित्ताने गूगलने एक खास डूडल तयार केले आहे आणि या माध्यमातून त्याने स्वतःला शुभेच्छादेखील दिल्या आहेत. पण प्रत्येक प्रश्नाला उत्तर असलेल्या गुगलची स्वतःची ओळख ही एका चुकीच्या स्पेलिंगमुळे झाली आहे, हे फार कमी लोकांना माहिती असेल. Google
 • 1998 साली गूगलने आपला पहिला वाढदिवस साजरा केला होता. पण तारखेवरुन एक वाद कायम होता. अखेर त्यानंतर 17व्या वाढदिवसापासून 27 सप्टेंबरलाच गूगल अधिकृतपणे आपला वाढदिवस साजरा करु लागला.
 • 4 सप्टेंबर 1998 रोजी गूगल पहिल्यांदा जगासमोर आले. लॅरी पेज आणि सर्जी ब्रेन यांच्या हस्ते गूगलची स्थापना झाली आणि आज तर इंटरनेट सर्च इंजिनचे जायंट म्हणून गूगलकडे पाहिले जाते. पण गूगलची ओळख एका स्पेलिंग मिस्टेकमुळे आहे.
 • खरं पाहता आताच्या ‘Google‘चे नाव हे ‘Googol’ ठेवायचे होते. पण स्पेलिंगच्या चुकीमुळे ते ‘Google’ असे झाले आणि त्यानंतर याच नावाने ते पुढे प्रसिद्ध झाले. अत्यंत कमी कालावधीत ‘Google’ प्रसिद्ध झाल्यामुळे नंतर हे असेच ठेवण्यात आले आणि आज इंटरनेट सर्च इंजिनच्या दुनियेत ‘जायंट’ म्हणून गूगलकडे पाहिले जाते.
 • तसेच याआधीही पेज आणि ब्रेन यांनी गूगलचे नाव ‘बॅकरब‘ असे ठेवले होते. मात्र, त्यानंतर हे नाव बदलून गूगल असे नाव करण्यात आले. 1997 साली कंपनीने डोमेन रजिस्टर केले आणि अधिकृतपणे ‘गूगल’ असे नाव ठेवण्यात आले.

राफेल करार हा दोन सरकारमधला करार:

 • बहुचर्चित राफेल करार हा सरकार ते सरकार म्हणजेच त्यावेळेसच्या दोन सरकारमध्येच झाला आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यात 36 लढाऊ विमान खरेदीवरून जेव्हा करार झाला, तेव्हा आपण सत्तेत नव्हतो, असे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी म्हटले आहे.
 • संयुक्त राष्ट्रसंघाच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी राफेल खरेदीचा मुद्दा उपस्थित केला. या करारावरून सध्या मोदी सरकारवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मॅक्रॉन म्हणाले, की, मी एक बाब स्पष्ट करू इच्छितो, ती म्हणजे हा राफेल करार म्हणजे सरकार ते सरकार यांच्यात झालेली चर्चा आहे. मला यावर अधिक बोलायचे नाही. कारण मी त्या वेळी पदावर नव्हतो; परंतु करार कोणताही असो; त्याबाबतचे फ्रान्सचे नियम स्पष्ट आहेत, हे ठाऊक आहे. राफेल करार आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण हा करार केवळ औद्योगिक संबंध प्रस्थापित करत नाही, तर सामरिक आघाडीचा एक भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकारकडून आयात शुल्कात वाढ:

 • केंद्र सरकारने सुमारे 19 वस्तूंवरील आयात शुल्कात 26 सप्टेंबर रोजी वाढ केली. ही नवी शुल्कवाढ 26 सप्टेंबर मध्यरात्रीपासून लागू झाली आहे, अर्थमंत्रालयाने एका निवेदनाद्वारे याची माहिती दिली. यामुळे विविध घरगुती दैनंदिन वापराऱ्या वस्तू महागणार आहेत.
 • अर्थमंत्रालयाच्या माहितीनुसार, जेट इंधन, वातानुकुलीत यंत्रणा (एसी), शीतपेट्या (रेफ्रिजरेटर्स), वॉशिंग मशिन, स्पीकर्स, कारचे टायर्स, ज्वेलरी, किचनमधील वस्तू आणि टेबलवेअर काही प्लॅस्टिकच्या वस्तू, सुटकेस आदी वस्तूंचा यात समावेश आहे. गेल्या आर्थिक वर्षात या वस्तूंचे आयात शुल्क 86000 हजार कोटी इतके होते.
 • तूट भरुन काढण्यासाठी केंद्र सरकारकडून आयात केल्या जाणाऱ्या 19 वस्तूंवरील जकात शुल्क वाढवण्यात आले आहे. हे आयात शुल्क दुप्पट करण्यात आले आहे.
 • एसी, फ्रीज आणि वॉशिंग मशिनवरील (10 किलोपेक्षा कमी) आयात शुल्क 20 टक्के इतके करण्यात आले आहे. त्यामुळे या वस्तूंच्या किंमती वाढणार आहेत. ही आयात शुल्कवाढ 26 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत.

दिनविशेष:

 • 27 सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन आहे. RSS Faunder
 • सन 1825 मध्ये द स्टॉक्टन अँड डार्लिंग्टन रेल्वेने जगातील सर्वप्रथम प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू केली.
 • 27 सप्टेंबर 1925 रोजी डॉ. केशव हेडगेवार व्दारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरएसएसची स्थापना करण्यात आली.
 • भारतीय धर्मगुरू माता अमृतानंदमयी यांचा जन्म 27 सप्टेंबर 1953 मध्ये झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.