13 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
13 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (13 ऑक्टोबर 2018)
युवा ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरला रौप्यपदक:
- भारताची गुणवान युवा नेमबाज मनू भाकरने 12 ऑक्टोबर रोजी युवा (18 वर्षांखालील) ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत रौप्यपदकावर नाव कोरले. ज्युडोपटू तबाबी देवीनंतर या स्पर्धेत रौप्यपदक जिंकणारी ती दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
- मनू मिश्र आंतरराष्ट्रीय दुहेरीत तझाकिस्तानच्या बेहझान फेझुल्लाएवसह 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात रौप्यपदक मिळवले. त्यांना वॅनेसा सीगर व किरिल किरोव्ह या जोडीकडून 10-3 असे पराभूत व्हावे लागले.
- याबरोबरच भारताच्या नेमबाजीतील सर्व स्पर्धा संपल्या असून त्यांनी स्पर्धेत एकूण दोन सुवर्ण व तीन रौप्यपदकांची कमाई केली. भारताने स्पर्धेत आतापर्यंत आठ पदके जिंकली असून त्यातील पाच भारताला नेमबाजीतून मिळालेली आहेत.
Must Read (नक्की वाचा):
भारतामध्ये इंटरनेट बंद होणार नाही:
- पुढील 24 तास इंटरनेट सेवा देणारे जगभरातील मुख्य सर्व्हर्स बंद राहणार असल्याने या काळात इंटरनेट सेवा बंद राहण्याची शक्यता व्यक्त होत असली तरी भारताला याचा फटका बसणार नाही, असे सरकारचे म्हणणे आहे.
- मुख्य सर्व्हर्सच्या देखभालीचे व प्रसंगी त्यात दुरुस्तीचे तसेच ते अपडेट करण्याचे काम इंटरनेट कॉपोर्रेशन ऑफ असाइन्ड नेम्स अॅण्ड नंबर्स (आयसीएएनएन) या कंपनीमार्फत केले जाणार आहे. जगभर इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या या सर्व्हर्समध्ये काही अत्यावश्यक तांत्रिक बदल करण्यात येणार असल्याचे रशिया टुडेने म्हटले आहे.
- कीमध्ये म्हणजेच जगभरातील वेबसाइट्सचे डोमेन नेम्स (विविध वेबसाइट्सची नावे) साठवून ठेवलेली असतात. त्या क्रिटोग्राफिक कीमध्ये या काळात काही बदल करण्यात येतील.
- जगभरात सायबर हल्ल्यांचे प्रमाण वाढत असल्याने हे बदल करण्यात येणार आहेत, असे आयसीएएनएन या कंपनीने नमूद केले आहे. परंतु, यामुळे भारतात इंटरनेट बंद होणार नाही. यासाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्याचे देशाच्या राष्ट्रीय सायबर सुरक्षा विभागाचे समन्वयक गुलशन राय यांनी सांगितले.
न्या. नरेश पाटील होणार राज्याचे मुख्य न्यायाधीश:
- मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्या. नरेश हरिश्चंद्र पाटील यांचीच नियमित मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केली. उच्च न्यायालयावर बाहेरच्या राज्यातून मुख्य न्यायाधीश नेमण्याची प्रथा असताना न्या. पाटील यांचा अपवाद करण्यात आला.
- मूळ लातुरचे असलेले न्या. पाटील मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून ऑक्टोबर 2001 पासून ते उच्च न्यायालयात न्यायाधीश आहेत.
- न्या. मंजुळा चेल्लुर गेल्या वर्षी 4 डिसेंबर रोजी निवृत्त झाल्यापासून मुख्य न्यायाधीशांचे पद रिक्त आहे. काही महिने न्या. विजया ताहिलरामाणी प्रभारी मुख्य न्यायाधीश होत्या. परंतु त्यांची मुख्य न्यायाधीश म्हणून मद्रासला बदली झाल्यापासून न्या. पाटील प्रभारी मुख्य न्यायाधीश आहेत.
- न्या. पाटील ज्या उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून मूळात नेमले गेले त्याच मूंबई उच्च न्यायालयावर मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणुकीसाठी कॉलेजियमने त्यांची शिफारस केली. यासाठी कॉलेजियमने मेमोरेंडम ऑफ प्रोसिजरमधील तरतुदीचा आधार घेतला.
- संबंधित न्यायाधीशास निवृत्त व्हायला एक वर्षाहून कमी काळ असेल तर त्यांना त्याच उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश नेमले जाऊ शकते, अशी ही तरतूद आहे. न्या. पाटील एप्रिल 2019 मध्ये निवृत्त व्हायचे आहेत.
- मुंबई उच्च न्यायालयास आपल्याच येथील न्यायाधीशांमधून मुख्य न्यायाधीश लाभण्याची सन 1994 नंतरची ही दुसरी वेळ आहे. त्यावेळी न्या. सुजाता मनोहर यांना मुख्य न्यायाधीश म्हणून नेमले होते. त्यानंतर न्या. मनोहर केरळला मुख्य न्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयावर न्यायाधीश म्हणून गेल्या होत्या.
समुद्री गोगलगायीचे 70 वर्षांनी दर्शन:
- अंत्यत आकर्षक आणि चकाकणाऱ्या ‘बॉम्बेयाना‘ या समुद्री गोगलगायीचे दर्शन सुमारे 70 वर्षांनी सागरी जीवांच्या निरीक्षकांना घडले आहे. ‘मरिन लाइफ ऑफ मुंबई‘ या मोहिमेच्या माध्यमातून हाजी अलीच्या खडकाळ समुद्रकिनाऱ्यावर आयोजित केलेल्या ‘बीच वॉक’च्या दरम्यान ही गोगलगाय आढळली.
- या गोगलगायीचा शोध 1946 साली मुंबईत लागला होता. मोठय़ा कालावधीच्या खंडानंतर गेल्या दोन वर्षांपासून मुंबईच्या सागरी परिसंस्थेच्या अभ्यासाची चळवळ पुन्हा जोर धरू लागल्याने अशा आकर्षक सूक्ष्मजीवांचा दुर्मीळ ठेवा गवसत आहे.
- मुंबई सभोवती पसरलेल्या सागरी परिसंस्थेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘मरिन लाइफ ऑफ मुंबई’ या मोहिमेची फेब्रुवारी 2017 मध्ये सुरुवात झाली. त्याद्वारे मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर सागरी जीवांच्या निरीक्षणाचे काम चालते. या मोहिमेच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांत मुंबईच्या सागरी परिसंस्थेतील अनेक सूक्ष्मजीवांबरोबरच समुद्री गोगलगायींच्या प्रजातींचा नव्याने उलगडा झाला.
- आजवर मुंबईतील किनाऱ्यांवरून समुद्री गोगलगायींच्या प्रजातींमधील सुमारे 18 प्रजाती प्रकाशझोतात आल्या आहेत. त्यांचा आकार सुमारे 4 मि.मी. ते काही इंचापर्यंत असू शकतो. मृदू शरीर, विविध आकर्षक रंग आणि शोभिवंत दिसण्यामुळे त्यांना ओळखता येते. खडकाळ किनाऱ्यावरील उथळ पाण्यात या प्रजाती आढळतात.
भारताच्या पदकतालिकेत पाच सुवर्णाची भर:
- पॅराआशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सुवर्णपदकांची लयलूट 12 ऑक्टोबर रोजीही कायम राखताना तब्बल पाच सुवर्णपदके जिंकली. बुद्धिबळमध्ये के. जेनिथा अँटो आणि किशन गांगोली, भालाफेकीत नीरज यादव, क्लब थ्रो प्रकारात अमित कुमार आणि बॅडमिंटनमध्ये पारुल परमारने सुवर्णपदकावर नाव कोरले.
- जेनिथाने जलद पी 1 बुद्धिबळ प्रकारातील अंतिम फेरीत इंडोनेशियाच्या मानुरंग रोझलिंडावर 1-0 अशी सरशी साधली. किशनने पुरुष एकेरीतील जलद व्ही 1-बी 2/3 प्रकारात माजिद बघेरीवर मात करून विजेतेपद मिळवले. बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीच्या अंतिम लढतीत पारुलने थायलंडच्या वँडी कामतमला 21-9, 21-5 असे हरवले.
- पुरुषांच्या भालाफेकीत नीरजने एफ 55 प्रकारात सर्वाधिक 29.24 मीटर अंतरासह सुवर्णाला गवसणी घातली. पुरुषांच्या क्लब थ्रो प्रकारात भारताच्या अमित कुमार 29.47 मीटर अंतरासह सुवर्णपदक मिळवले.
दिनविशेष:
- 13 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिन आहे.
- स्वातंत्र्यसेनानी होमरुल चळवळीतील कार्यकर्ते ‘भुलाभाई देसाई‘ यांचा जन्म 13 ऑक्टोबर 1877 मध्ये झाला.
- सन 1773 मध्ये चार्ल्स मेसियर यांनी व्हर्लपूल गॅलेक्सीचा शोध लावला.
- सन 1929 या वर्षी पुण्यातील पर्वती देवस्थान दलितांना खुले झाले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा