11 ऑगस्ट 2021 चालू घडामोडी – Current Affairs

मेसी
मेसी

11 August 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (11 ऑगस्ट 2021)

मागासवर्ग निश्चितीबाबत विधेयक लोकसभेत मंजूर :

 • राज्यांना मागासवर्ग निश्चितीचा अधिकार बहाल करणारे घटनादुरुस्ती विधेयक दोनतृतीयांश मतांनी मंगळवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले.
 • तर या दुरुस्तीमुळे मराठा समाजाला राज्याच्या सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास यादीत समाविष्ट करण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
 • मात्र मराठा आरक्षणासाठी 50 टक्क्यांची मर्यादा शिथिल करण्याच्या तरतुदीचा या विधेयकामध्ये समावेश न केल्याबद्दल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली.
 • मात्र ही मर्यादा शिथिल करण्यासाठी संभाव्य नवा कायदा करण्यावर वा दुरुस्ती विधेयकात तरतुदीचा समावेश करण्यावर मौन बाळगले.
 • मराठा आरक्षणासंदर्भातील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने 102व्या घटनादुरुस्तीचा अर्थ स्पष्ट करताना ओबीसी यादी तयार करण्याचा अधिकार केंद्राला असल्याचे स्पष्ट केले होते. पण त्यात आता दुरुस्ती केली जात असून महाराष्ट्रातील सरकारला मराठा समाजाला न्याय देता येईल.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (10 ऑगस्ट 2021)

उज्ज्वला योजनेचा दुसरा टप्पा सुरू :

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना मोफत एलपीजी जोड देणारी उज्ज्वला 2.0 योजना कार्यान्वित केली आहे.
 • प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा हा दुसरा टप्पा असून त्यात उत्तर प्रदेशातील महोबा येथे मोफत एलपीजी जोड देण्यात आले.
 • तर यावेळी त्यांनी सांगितले की, देशातील साधनांचा लाभ सर्वाना मिळाला पाहिजे ही सरकारची यामागील भूमिका आहे.
 • तसेच या औपचारिक उद्घाटनानंतर त्यांनी 10 महिलांना आभासी पद्धतीने गॅस जोड प्रदान केले.
 • उज्ज्वला 1.0 योजना 2016 मध्ये सुरू झाली होती. त्यात पाच कोटी महिलांना गॅस जोड देण्याचे उद्दिष्ट होते. दारिद्रय़रेषेखालील कुटुंबांना याचा लाभ झाला.

127व्या घटनादुरुस्तीचं विधेयक लोकसभेत पारित :

 • काही दिवसांपासून मोठी चर्चा सुरू असलेलं 127व्या घटनादुरुस्तीचं विधेयक लोकसभेमध्ये मंजूर झालं आहे.
 • लोकसभेत उपस्थित असलेल्या 372 विरुद्ध शून्य अशा मतसंख्येने हे विधेयक पारित करण्यात आलं आहे. आता हे विधेयक राज्यसभेत मांडलं जाणार आहे.
 • तसेच या पार्श्वभूमीवर आता एखादा समाज मागास आहे किंवा नाही, हे ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारांच्या अखत्यारीत असण्याला केंद्रानं मान्यता दिली आहे.
 • राज्यसभेत हे विधेयक पारित झाल्यानंतर ते राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवलं जाईल. राष्ट्रपतींच्या सहीनंतर त्याचं कायद्यात रुपांतर होईल.
 • तर काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्रिमंडळानं यासंदर्भात निर्णय घेतला होता. त्या विधेयकाला आता लोकसभेत मंजुरी मिळाली आहे.

मेसी पॅरिस सेंट-जर्मेनशी करारबद्ध :

 • विश्वातील सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लिओनेल मेसीने मंगळवारी हजारो चाहत्यांच्या साक्षीने पॅरिस सेंट-जर्मेन संघात प्रवेश केला.
 • तर पुढील दोन वर्षांसाठी मेसी फ्रान्समधील या क्लबकडून खेळताना दिसणार आहे.
 • आंतरराष्ट्रीय पातळीवर अर्जेटिनाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मेसीने काही दिवसांपूर्वीच बार्सिलोना क्लबला अलविदा केला.
 • तब्बल 17 वर्षे बार्सिलोनाकडून खेळल्यानंतर मेसी आता 4 कोटी 10 लाख डॉलर रकमेला सेंट-जर्मेनशी करारबद्ध झाला आहे.
 • त्यामुळे फ्रान्सच्या लीग-1 चषक फुटबॉल स्पर्धेत खेळणारा सेंट-जर्मेन संघ अधिक धोकादायक झाला आहे.
 • ब्राझीलचा नेयमार, फ्रान्सचा किलियान एम्बापे, स्पेनचा सर्जिओ रामोस आणि युरो चषक विजेत्या इटलीचा गोलरक्षक डोनारुमा असे खेळाडू सेंट-जर्मेनच्या ताफ्यात असून मेसीच्या समावेशामुळे त्यांना चॅम्पियन्स लीगचे जेतेपद मिळवण्याची यंदा सर्वोत्तम संधी आहे.

अ‍ॅथलेटिक्स फेडरेशनचा मोठा निर्णय :

 • नीरज चोप्राने ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये सुवर्ण जिंकून इतिहास रचला.
 • तर त्यानंतर आता अ‍ॅथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाच्या समितीने देशात दरवर्षी 7 ऑगस्ट रोजी भाला फेक दिवस साजरा केला जाईल असे ठरवले आहे.
 • जेणेकरून जास्तीत जास्त तरुण या खेळात सामील होतील. नीरज चोप्राने या निर्णयावर आनंद व्यक्त केला आणि स्वतःला भाग्यवान म्हटले आहे. नीरज चोप्राने 7 ऑगस्टलाच भारतासाठी सुवर्ण जिंकले होते.
 • भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये अ‍ॅथलेटिक्समध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या नीरज चोप्रासह सर्व खेळाडूंचा सन्मान केला.

दिनविशेष :

 • सन 1943 मध्ये सी.डी. देशमुख हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया चे पहिले भारतीय गव्हर्नर झाले.
 • दादरा व नगर हवेली हा भाग सन 1961 मध्ये भारताचा केन्द्रशासित प्रदेश बनला.
 • सन 1999 बारा वर्षाखालील मुलांच्या राज्यस्तरीय जलद बुद्धीबळ स्पर्धेत नवी दिल्ली येथील सहा वर्षे वयाच्या ‘परिमार्जन नेगी‘ याने विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा जिंकणारा सर्वात छोटा खेळाडू ठरला.
 • डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी यांच्या जनता पक्षाचे 11 ऑगस्ट 2013 मध्ये भारतीय जनता पक्षात विलीनीकरण झाले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (12 ऑगस्ट 2021)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.