Current Affairs of 7 July 2018 For MPSC Exams
चालू घडामोडी (7 जुलै 2018)
भारतीय अवकाश संशोधन संस्थेची चाचणी यशस्वी :
- चांद्रयान, मंगळस्वारी, एकाच प्रक्षेपणात अनेक उपग्रह अवकाशात पाठविण्याचा विक्रम करणाऱ्या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) 6 जुलै रोजी आणखी एक पाऊल पुढे टाकले. मानवी अवकाश मोहिमेतील आणीबाणीच्या क्षणी अवकाशवीरांना जमिनीवर सुखरूप आणण्यासाठीच्या तंत्राची इस्रोने यशस्वी चाचणी केली.
- मानवी अंतराळ मोहिमेच्या तयारीचा एक भाग असलेल्या क्रू एस्केप सिस्टीमची म्हणजेच अवकाशवीरांना आणीबाणीच्या क्षणी जमिनीवर सुखरूप आणण्याची चाचणी इस्रोने यशस्वी केली.
- मानवी अवकाश मोहिमेमध्ये प्रक्षेपणानंतर काही बिघाड निर्माण झाल्यासही मुक्तता यंत्रणा कार्यान्वित होते आणि अवकाशयानाचा एक भाग अंतराळवीरांसह प्रक्षेपकापासून दूर जातो. त्यानंतर हे क्रू मोडय़ुल म्हणजे अवकाशयानाचा मुख्य भाग अंतराळवीरांसह जमिनीवर आणण्यात येतो. उपग्रह प्रक्षेपण तळावरून घेण्यात आलेली ही पहिलीच आकस्मिक आपदा चाचणी असल्याचे इस्रोने म्हटले आहे.
- श्रीहरिकोट्टा येथील सतीश धवन केंद्रावरून 6 जुलै रोजी सकाळी प्रक्षेपक आकाशात झेपावले. प्रक्षेपक यान जमिनीपासून 2.7 कि.मी. ऊंचीवर असताना एस्केप सिस्टीम आणि क्रू मोडय़ुल प्रक्षेपक यानापासून वेगळे करण्यात आले.
- चाचणीच्या वेळी अंतराळवीराऐवजी त्याचा पुतळा वापरण्यात आला होता. यानाचे दोन भाग होताच अंतराळवीराचा पुतळा असलेले कॅप्सूल पॅराशूटच्या साहाय्याने बंगालच्या उपसागरात विशिष्ट ठिकाणी उतरविण्यात आले.
Must Read (नक्की वाचा):
आता उत्तर प्रदेशातही प्लास्टिक बंदी :
- महाराष्ट्रात प्लास्टिकबंदीचा निर्णय घेण्यात आला. प्रदूषण रोखण्यासाठी प्लास्टिक बंदी घालण्यात आली. या पाठोपाठ आता उत्तर प्रदेशातही प्लास्टिकबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.
- 15 जुलैपासून उत्तर प्रदेशातही प्लास्टिक बंदी लागू होणार आहे. काही वेळापूर्वीच या संदर्भातले वृत्त आले आहे. महाराष्ट्रात या निर्णयाचा मनसेने विरोध केला आहे.
- उत्तर प्रदेशात प्लास्टिकबंदीचे स्वागत होते की विरोध हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्रात प्लास्टिक पिशवी वापरणाऱ्याला 5 हजारांपासून 25 हजारांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे.
- तसेच अशी काही नियमावली उत्तरप्रदेश सरकारने म्हणजेच योगी आदित्यनाथ सरकारने तयार केली आहे का? हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र आता उत्तरप्रदेशात 15 जुलैपासून प्लास्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.
माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना तुरुंगवास :
- पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची तर त्यांच्या मुलीला अर्थात मरियमला मुलीला 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठवण्यात आली आहे. तर मुलाला एका वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
- आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. लंडन मधील बेहिशेबी मालमत्तेचे हे प्रकरण आहे. या प्रकरणात कोर्टाने नवाज शरीफ यांना 80 लाख पाऊंडचा दंड आणि त्यांच्या मुलीला अर्थात मरियमला 2 लाख पाऊंडचा दंड ठोठावला आहे. भ्रष्टाचार प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
- न्यायालयाने या संदर्भातला निर्णय एक आठवडा उशीराने द्यावा यासंदर्भातली याचिका नवाज शरीफ यांनी कोर्टात दाखल केली होती. मात्र ही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. एवनफिल्ड हाऊस मध्ये 4 घरांच्या खरेदी संदर्भातला हा घोटाळा आहे.
- पाकिस्तानच्या अकाऊंटिबिलिटी कोर्टाने नवाज शरीफ आणि त्यांच्या मुलीला भ्रष्टाचार प्रकरणात ही शिक्षा सुनावली आहे. लंडनमध्ये नवाज शरीफ यांनी बेकायदेशीररित्या मालमत्ता खरेदी केली. याच प्रकरणात आता त्यांना शिक्षा भोगावी लागणार आहे.
अस्सल कोल्हापुरी मध आता परदेशात जाणार :
- ना काकवीची भेसळ, ना कुठल्या कृत्रिम पदार्थाची मिलावट. गगनबावडा, शाहूवाडी या डोंगरी भागातील मधमाशांच्या पोळ्यातील अवीट गोडीचा मध वनखात्याच्या वनामृत ब्रॅंडखाली आता परदेशांत विकला जाणार आहे.
- वन खात्याच्या प्रयत्नाने या मधाला देशासह परदेशांतही बाजारपेठा उपलब्ध होतील. यासोबतच ‘वनामृत‘ या ब्रॅंडखाली या डोंगराळ तालुक्यांतील विविध 24 पदार्थ विकले जाणार आहेत.
- प्रचंड पाऊस, बहुतांश गावे जंगलांमध्ये विसावलेली. भात, नाचणी आणि तुरळक ऊस वगळता अन्य पिके नाहीत. अशा डोंगराळ तालुक्यांमध्ये वन खात्याने एक पथदर्शी प्रकल्प राबवला. येथील करवंदे, फणस, भोकर या फळांपासून विविध रुचकर पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण महिला बचतगटांना दिले. त्यांच्याकडून हे पदार्थ बनवून घेतले. अत्यंत आकर्षक पद्धतीने त्यांचे पॅकिंग केले. या सर्व पदार्थांचा वनामृत हा ब्रॅंड बनविला. या ब्रॅंडच्या अंतर्गत या सर्व पदार्थांची विक्री देशात व परदेशांतही केली जाणार आहे.
- तसेच या उत्पादनांमध्ये मधाचाही समावेश असून, हा मध पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने संकलित केला आहे. येथील शेतकऱ्यांनी शेतामध्ये पेट्या ठेवलेल्या होत्या. त्यामध्ये मधमाशांनी पोळे केले. या पेटीतील नैसर्गिक मध संकलित करून तो पॅकबंद केला गेला. या वर्षी सुमारे 4 टन मधाचे संकलन झाले आहे.
दिनविशेष :
- 7 जुलै हा दिवस ‘जागतिक चॉकलेट दिन‘ आहे.
- कावसजीदावर यांनी दि बॉम्बे स्पिनिंग ॲन्ड विव्हिंग मिल पहिली कापड गिरणी मुंबईमध्ये सन 1854 मध्ये सुरू केली.
- सन 1910 मध्ये पुणे येथे भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना झाली.
- भारतीय क्रिकेटपटू माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचा जन्म 7 जुलै 1981 मध्ये झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा