Current Affairs of 7 December 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (7 डिसेंबर 2015)

चालू घडामोडी (7 डिसेंबर 2015)

भारताला जागतिक हॉकीतील पहिले पदक जिंकण्यात यश :

 • भारतीय हॉकी संघाने इतिहास घडविला. भारताने मॉस्को ऑलिंपिकनंतर जागतिक हॉकीतील पहिले पदक जिंकण्यात यश मिळविले.
 • भारताने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या नेदरलॅंडस्‌ला हरवून वर्ल्ड हॉकी लीगमध्ये ब्रॉंझपदक जिंकण्याचा पराक्रम केला.
 • रायपूरच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवरील या लढतीत भारत मध्यांतरास, अर्थात दुसऱ्या सत्रानंतर 0-2 पिछाडीवर होता; पण त्यानंतर भारताने जबरदस्त प्रतिकार करीत 3-2, 5-3 आघाडी घेतली.
 • केवळ पाच सेकंद बाकी असताना नेदरलॅंडस्‌ने 5-5 बरोबरी साधली. मग गोलरक्षक पीआर श्रीजेशने अप्रतिम कामगिरी करताना भारतास पेनल्टी शूटआउटमध्ये 3-2 असे विजयी केले.

भारत-पाकिस्तान दरम्यान एनएसए पातळीवरील बोलणी :

 • भारत-पाकिस्तान दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या (एनएसए) पातळीवरील बोलणी थायलंडची राजधानी बॅंकॉक येथे झाली. दोन्ही देशांचे परराष्ट्र सचिवदेखील या बैठकीत सहभागी होते.
 • बैठकीबाबत जारी केलेल्या संयुक्त प्रसिद्धिपत्रकानुसार उभय प्रतिनिधींनी विविध मुद्‌द्‌यांवर चर्चा करीत दोन्ही देशांमधील संबंध आणखी दृढ करण्यावर पॅरिस येथे दोन्ही देशांच्या पंतप्रधानांदरम्यान झालेल्या अनौपचारिक चर्चेची फलनिष्पत्ती म्हणूनच या बैठकीकडे पाहिले जात आहे.
 • यासंदर्भातील संयुक्त प्रसिद्धिपत्रकात भेट व चर्चा सौहार्दपूर्ण आणि सहकार्याच्या वातावरणात पार पडल्याचे नमूद करण्यात आले आहे. शांततापूर्ण, स्थिर व समृद्ध दक्षिण आशियाची कल्पना बाळगणाऱ्या उभय देशांच्या नेत्यांच्या मार्गदर्शनातूनच ही बैठक झाली आणि हा सकारात्मक संपर्क यापुढेही चालू ठेवण्याचे मान्य करण्यात आल्याचे पत्रकात म्हटले आहे.
 • पॅरिस येथे 30 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची हवामान बदलविषयक शिखर परिषदेच्या निमित्ताने भेट झाली होती आणि त्यानंतर त्याच मालिकेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचीही भेट झाली आहे.
 • चर्चेतील मुद्दे : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान शांतता व सुरक्षा, दहशतवाद, जम्मू आणि काश्‍मीर आणि नियंत्रण रेषेवर शांतता-पालनासह इतरही अनेक मुद्‌द्‌यांवर चर्चा झाली.

एकाच योजनेतून सर्व प्रकारचे विमा संरक्षण पुरविले जाणार :

 • देशातील शेती व शेतकऱ्यांशी संबंधित विविध घटकांसाठी एकाच योजनेतून सर्व प्रकारचे विमा संरक्षण पुरविणारी केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना तयार झाली आहे.
 • मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी ही योजना सादर करण्यात आली असून, आगामी मंत्रिमंडळ बैठकीत तिच्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
 • येत्या खरिपात महाराष्ट्रातील दोन, तर देशातील 45 जिल्ह्यांमध्ये ही योजना पथदर्शी स्वरूपात आणि त्यानंतर सरसकटपणे राबविण्याचे नियोजन आहे.
 • देशातील सर्व कृषिमंत्री, कृषी सचिव, शेतकरी नेत्यांच्या बैठका घेऊन सर्वसमावेशक योजना तयार केली आहे.
 • सध्याच्या विमा योजनेत फक्त दुष्काळापासून संरक्षण आहे. आग, पूर, अतिवृष्टी आदी विविध प्रकारच्या आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानीचा त्यात समावेश नाही.
 • नवीन योजनेत सर्व प्रकारच्या आपत्तींमुळे होणाऱ्या पिके, शेतकरी, शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्य, त्याची सर्व प्रकारची मालमत्ता, यंत्रे, अवजारे, गोडाऊन, जमीन या सर्वांना संरक्षण देण्यात येणार आहे.
 • शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या विमा योजनांची गरज भासणार नाही. सर्व प्रकारचे विमा संरक्षण या एकाच योजनेतून देण्यात येईल. देशभर त्यासाठीचा विमा हप्ता सर्वसमान असेल.
 • लहान राज्यांसाठी एका कंपनीवर, तर मोठ्या राज्यांसाठी विभागून दोन किंवा तीन कंपन्यांवर विम्याची जबाबदारी सोपविण्यात येईल. संबंधित कंपनीवर सलग किमान तीन वर्षांसाठी योजनेची जबाबदारी राहील.
 • या काळात योजनेची जबाबदारी त्यांना टाळता येणार नाही किंवा अर्ध्यातच सोडता येणार नाही.
 • विमा सरसकट सर्व शेतकऱ्यांसाठी बंधकारक असेल. त्याचा विमा हप्ताही अतिशय कमी ठेवण्यात आला आहे. नुकसानभरपाईसाठी आपत्तिग्रस्त भागात प्रत्यक्ष पाहणी करून व पीककापणी प्रयोगांनुसार भरपाई मिळेल.
 • तसेच पारंपरिक पद्धत आणि हवामानाधारित विमा या दोन्हींचाही यात समावेश आहे. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर पुढील महिन्यात या योजनेची अधिकृत घोषणा करण्यात येईल.

“वाय-फाय लव्हस्टोरी” या पुस्तकाचे प्रकाशन :

 • “स्टार विन्स पब्लिकेशन्स”तर्फे युवा लेखक चरणराज लोखंडे यांनी लिहिलेल्या “वाय-फाय लव्हस्टोरी” या पुस्तकाचे प्रकाशन कोलते यांच्या हस्ते झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौऱ्यात करार होण्याची शक्‍यता :

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी रशिया दौऱ्यात संरक्षण आणि सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले काही करार होण्याची शक्‍यता आहे.
 • यामध्ये सत्तर हजार कोटी रुपयांची एस-400 ही क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा खरेदी करण्याच्या कराराचाही समावेश आहे.
 • पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात मॉस्कोमध्ये वार्षिक बैठक होणार आहे.
 • सध्या सुरू असलेले संसदेचे अधिवेशन संपताच 24 अथवा 25 डिसेंबरला मोदी रशियाला रवाना होण्याची शक्‍यता आहे.
 • क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणेव्यतिरिक्त हवाई दलासाठी एमआय -17 व्ही 5 जातीची 48 हेलिकॉप्टर्स आणि नौदलासाठी कामोव्ह जातीची 50 बहुउद्देशीय हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याचा प्रस्ताव प्राधान्यावर आहे.
 • तसेच रशियाकडून आणखी एक अण्वस्त्रक्षम पाणबुडी घेण्याबाबतची चर्चा मात्र तूर्त थांबविण्यात आली आहे. काशलोत के-322 ही पाणबुडी देण्याचा प्रस्ताव रशियाने भारताला दिला आहे.
 • भारताला ही अत्याधुनिक पाणबुडी 2018 पर्यंत दहा वर्षांसाठी वापरायला देण्यास रशिया तयार आहे. गेल्या काही महिन्यांपासून याबाबत चर्चाही सुरू आहे. मात्र, अद्यापही काही निष्पन्न झालेले नाही.
 • भारतीय नौदलाकडे रशियाकडून दहा वर्षांच्या भाडेतत्त्वावर घेतलेली एक पाणबुडी आहे.

‘बुक माय स्पोर्ट्स’ ही नवी वेबसाईट बनविण्यात आली :

 • भारतात प्रथमच खास क्रीडा क्षेत्रासाठी ‘बुक माय स्पोर्ट्स’ ही नवी वेबसाईट बनविण्यात आली असून, भारताचा फिरकीपटू हरभजनसिंगच्या हस्ते या वेबसाईटचे अनावरण करण्यात आले आहे.
 • भारतातील क्रीडा क्षेत्रात घडत असलेल्या घडामोडींबद्दल सामान्य नागरिक अनभिज्ञ असतात. नागरिकांचे क्रीडा क्षेत्राशी नाते जोडण्याच्या उद्देशाने ‘बुक माय स्पोर्ट्स’ ही वेबसाईट सुरु करण्यात आली आहे.
 • क्रीडा क्षेत्रातील संधी, विविध स्पर्धा, माहिती असे सर्वकाही या वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे.
 • तसेच या वेबसाईटवर फुटबॉल, जलतरण, व्हॉलीबॉल, क्रिकेट, टेनिस, बास्केटबॉल या प्रमुख खेळांना महत्त्व देण्यात आले आहे. याबरोबरच ‘बुक माय स्पोर्ट्स’वर खेळांसंबंधी सर्वप्रकारची माहिती उपलब्ध असणार आहे.

जागतिक मृदा दिनी शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका वाटप :

 • जागतिक मृदा दिनी शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका वाटप करण्यात येत आहे.
 • यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर असून, 12 लाख शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका वाटप करण्यात येणार आहे. त्या पाठोपाठ आंध्रप्रदेशातील 8 लाख तसेच तामिळनाडूतील 7 लाख शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिकेचे वाटप केले जाणार आहे.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी उद्योगाला गती देण्यासाठी शाश्वत शेतीचा मार्ग स्वीकारला असून, यासाठीच केंद्र व राज्य शासनाच्या सहयोगाने राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत मृदा आरोग्य पत्रिका ही योजना सन 2015-16 पासून राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
 • या योजनेंतर्गत देशातील विविध राज्यातील शेतीचे माती परीक्षण करण्यात आले आहे.
 • महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि दापोली कोकण कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दापोली तालुक्यातील साखरोली येथे जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून मृदा आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले.

‘सम-विषम’ योजनेचे स्वागत :

 • दिल्लीत हवा प्रदूषणाला आळा घालण्यासाठी रोज निम्म्याच मोटारी रस्त्यावर येऊ दिल्या जातील अशी घोषणा दिल्ली सरकारने केल्यानंतर आज तो कार्यक्रम राबवण्याची रूपरेषा जाहीर करण्यात आली.
 • त्यानुसार आता विषम क्रमांक असलेल्या गाडय़ा सोमवार, बुधवार व शुक्रवारी धावतील तर समक्रमांक असलेल्या गाडय़ा मंगळवार, गुरुवार व शनिवारी धावतील.
 • या गाडय़ा कुणाच्याही असल्या तरी हा नियम पाळावा लागणार आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातही (एनसीआर) तो लागू राहील.
 • त्यामुळे केंद्रीय मंत्री व नोकरशहा यांनी नियमांचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर शिस्तीचा बडगा दिल्ली पोलिसांना उगारावा लागणार आहे.
 • तसेच सरकार या योजनेत पोलीस नियंत्रण कक्षाच्या व्हॅन, अग्निशामक बंब व रुग्णवाहिका यांना समाविष्ट करणार नाही. दिल्लीतील हवा प्रदूषण गंभीर पातळीला पोहोचले आहे, त्यामुळे राष्ट्रीय राजधानी परिसरातही मंत्री व नोकरशहांना हा नियम पाळावा लागणार आहे.
 • 4 डिसेंबरला आम आदमी पक्षाच्या सरकारने खासगी वाहनांना सम व विषम क्रमांकाच्या निकषावर रस्त्यावर धावण्यास परवानगी देण्याचा नियम 1 जानेवारीपासून लागू करण्याचे ठरवले आहे.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.