Current Affairs of 6 February 2018 For MPSC Exams
चालू घडामोडी (6 फेब्रुवारी 2018)
भारताला लढाऊ विमाने विकण्यास ‘बोइंग’ उत्सुक :
- भारतीय नौदलाला ‘एफ/ए-18 हॉर्नेट’ ही अत्याधुनिक लढाऊ विमाने विकण्यास अमेरिकेची बोइंग ही कंपनी उत्सुक आहे. मात्र त्यासाठी अद्याप बरीच तांत्रिक छाननी होणे बाकी आहे, असे बोइंगच्या संरक्षण, अंतराळ आणि सुरक्षा विभागाचे उपाध्यक्ष जीन कनिंगहॅम यांनी म्हटले आहे.
- भारत आणि अन्य देशांना ‘केसी-46’ ही हवाई इंधन भरणारी विमाने पुरवण्याची शक्यताही बोइंग पडताळून पाहत असल्याचे कनिंगहॅम यांनी सांगितले.
- नौदलाला विमानवाहू युद्धनौकांसाठी 57 लढाऊ विमानांची गरज असून त्यासाठी गतवर्षी प्रस्ताव मागवण्यात आले होते. याशिवाय हवाई दलाला 100 विमानांची गरज आहे.
- अमेरिकेची बोइंग आणि स्वीडनची ‘साब एबी’ या कंपन्या त्यासाठी उत्सुक आहेत. मात्र ही दोन्ही कंत्राटे एकत्र करावीत, असे या दोन्ही कंपन्यांचे म्हणणे आहे. तसे केल्यास हे लढाऊ विमानांचे जगातील सर्वात मोठे कंत्राट ठरणार आहे.
- भारत हा जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्रे आयात करणारा देश आहे. येत्या काही वर्षांत लढाऊ विमाने, तोफा, बंदुका, सैनिकांसाठीची शिरस्त्राणे आदी संरक्षण सामग्री खरेदीवर 250 अब्ज डॉलर खर्च करण्याची तयारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवली आहे.
Must Read (नक्की वाचा):
मालदीवमध्ये 15 दिवसांची आणीबाणी घोषित :
- मालदीवचे अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी देशात 15 दिवसांची आणीबाणी घोषित केली असल्याचे त्यांच्या सहकारी मंत्री अझिमा शुकूर यांनी सरकारी दूरचित्रवाहिनीवर जाहीर केले. यामुळे या देशातील राजकीय संकट आणखी गडद झाले आहे.
- या निर्णयामुळे सुरक्षा दलांना संशयितांना अटक करण्याचे आणि स्थानबद्ध ठेवण्याचे अमर्याद अधिकार मिळाले आहेत.
- सर्वोच्च न्यायालय आणि सरकार यांच्यातील तणावाचे संबंध पराकोटीला पोहचले असताना ही घडामोड घडली आहे. जगभरातून दबाव वाढत असतानाही राजकीय कैद्यांची सुटका करण्याच्या न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास अध्यक्षांनी नकार दिला आहे.
देश सोडून जाणाऱ्या अतिश्रीमंतांच्या संख्येत वाढ :
- देश सोडून जाणाऱ्या अतिश्रीमंतांच्या संख्येत वाढ झाली आहे. चीन पाठोपाठ आता भारतातून मोठ्या प्रमाणावर अतिश्रीमंत परदेशांत स्थायिक होत असल्याची बाब ‘न्यू वर्ल्ड वेल्थ’ च्या अहवालातून समोर आली आहे.
- ‘न्यू वर्ल्ड वेल्थ’ च्या सर्वेक्षणानुसार 2017 या वर्षांत 7 हजार अतिश्रींमत व्यक्ती भारत सोडून परदेशात स्थायिक झाले. हे प्रमाण गेल्यावर्षींच्या तुलनेत वाढलं असून ही देशासाठी ही अत्यंत चिंतेची बाब ठरू शकते असा अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
- भारत सोडून गेलेले हे अतिश्रीमंत अमेरिका, ग्रेट ब्रिटन, सौदी अरेबिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांसारख्या देशांत स्थलांतर करत असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.
- तसेच चीनमधून सर्वाधिक श्रीमंत 2017 मध्ये परदेशात स्थलांतरित झाले. ही संख्या सर्वाधिक म्हणजे दहा हजार होती. चिनी अतिश्रीमंतांनी स्थलांतरासाठी अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांना पसंती दिली.
- ‘बिझनेस स्टँडर्ड’च्या माहितीनुसार भारतात सध्याच्या घडीला 33 लाख 400 अतिश्रीमंत व्यक्ती आहेत तर 20 हजार 730 हून अधिक लोकांची संपत्ती ही अब्जावधींच्या घरात आहे.
- भारतातून 2016 मध्ये सहा हजार अतिश्रीमंत व्यक्ती परदेशात स्थायिक झाले, ही संख्या 2015 मध्ये चार हजार होती. भारतातून जरी अतिश्रीमंत व्यक्ती स्थायिक होत असले तरी देशासाठी ही चिंतेची बाब नसल्याचं अहवालातून स्पष्ट करण्यात आलं आहे.
सुधा करमरकर यांचे निधन :
- मराठी रंगभूमीवर ‘लिटल थिएटर’ची रुजवात करणा-या ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्य निर्मात्या सुधा करमरकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
- बालनाट्य चळवळीच्या प्रणेत्या म्हणून सुधातार्इंचे रंगभूमीवरील योगदान न विसरता येण्याजोगे आहे. त्यांच्या निधनामुळे बालनाट्य चळवळ पोरकी झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
- ‘लिटल थिएटर’च्या माध्यमातून ‘अलिबाबा आणि चाळीस चोर’, ‘अल्लाउद्दिन आणि जादूचा दिवा’, ‘कळलाव्या कांद्याची कहाणी’, ‘चिनी बदाम’, ‘गणपती बाप्पा मोरया’ ही सुधातार्इंनी सादर केलेली बालनाट्ये लोकप्रिय ठरली होती.
- व्यावसायिक रंगभूमीवरही त्यांनी भूमिका साकारल्या. ‘पुत्रकामेष्टी’, ‘बेईमान’, ‘तुझं आहे तुजपाशी’, ‘वीज म्हणाली धरतीला’, ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकांतील त्यांच्या भूमिका रसिकांच्या पसंतीस उतरल्या होत्या.
छायाचित्र काढताच अवघ्या दहा सेकंदांत कोणत्याही गुन्हेगाराचे सर्व रेकॉर्ड अॅपद्वारे :
- चंदिगड-पंजाबच्या कोणत्याही भागात गुन्हा करून फरार झालेल्या गुन्हेगारांना आता पोलिसांपासून लपणे अथवा बचाव करणे सोपे नाही. त्याचे एक छायाचित्र काढताच अवघ्या दहा सेकंदांत कोणत्याही गुन्हेगाराचे सर्व रेकॉर्ड अॅपद्वारे पोलिसांच्या मोबाइलवर येते. एफबीआयच्या धर्तीवर पंजाब पोलिसांचे अॅप येत आहे. या अॅपमध्ये राज्यातील 82 हजार गुन्हेगारांची माहिती दिली आहे. अशा प्रकारची योजना आखणारे पंजाब देशातील पहिले राज्य ठरले आहे.
- हे अॅप प्रत्येक पोलिसांच्या मोबाइलमध्ये असेल. पंजाब आर्टिफिशयल इंटेलिजन्स सिस्टिम नावाच्या अॅपची चाचणी सुरू आहे.
- तसेच हे अॅप आयजी, डीआयजी रेंज, सर्व एसएसपी, एसएचओज आणि आयओ यांच्याकडे देण्यात आले आहे.
- या अॅपमध्ये दहशतवादी, माजी दहशतवादी, गँगस्टर्स, कुख्यात गुन्हेगार, साखळीचोर, भुरटे चोर आदींसह सर्व लहान-मोठ्या चोरट्यांची माहिती यात असेल. गुन्हेगाराचे नाव, त्याचा पत्ता, छायाचित्र व गुन्ह्याची सर्व माहिती असेल.
- तसेच एका व्यक्तीच्या छायाचित्रांचे 150 फीचर्स दिसतील. म्हणजे ते छायाचित्र फ्रंट फोटो, बॅक फोटो, साइडचे फोटो याशिवाय संभाव्य मेकअप केलेले, अशा 150 पद्धतीने पाहता येईल. वेशांतर करूनही आरोपीला फार काळ लपता येणार नाही.
उत्तम कामगिरी करणाऱ्या 30 तरुणांची यादी फोर्ब्ज इंडियाने जाहीर केली :
- विविध क्षेत्रांत उत्तम कामगिरी करणाऱ्या 30 वर्षांपेक्षा लहान 30 तरुणांची यादी फोर्ब्ज इंडियाने जाहीर केली आहे.
- यादीत सर्वाधिक म्हणजे 4 तरुण क्रीडा क्षेत्राशी संबंधित तर तीन नावे मनोरंजन क्षेत्रातील आहेत. यादीत अभिनेत्री भूमी पेडणेकर, अभिनेता विकी कौशल, क्रिकेटर जसप्रीत बुमराह, महिला क्रिकेटर हरमनप्रीत कौर आणि शूटर हिना सिद्धू यांची नावे समाविष्ट आहेत.
- फोर्ब्जकडून 2011 पासून 30 वर्षांखालील तरुणांची यादी जाहीर केली जाते. 2014 पासून फोर्ब्ज इंडियाची यादी घोषित करण्यात येते.
- यादीत 30 पैकी 12 स्थानांवर एकापेक्षा अधिक लोकांची नावे आहेत. यात बुमराह, हरमनप्रीत, हिना सिद्धू आणि सवित पुनिया हे चौघे खेळाशी संबंधित आहेत. तिघे जण मनोरंजन क्षेत्रात आहेत. यात विकी कौशल, भूमी आणि मिथिला पालकर. गायक झुबिनचे नावही आहे. 9 स्थानांवर 10 महिलांची नावे आहेत. तर तंत्रज्ञान, सोशल मीडिया-कम्युनिकेशन, उद्योग जगत, हेल्थ केअर, फूड-हॉस्पिटॅलिटी, फायनान्स, फॅशन, ई-कॉमर्स व डिझायनिंग क्षेत्रातील प्रत्येकी 2 आहेत.
दिनविशेष :
- 1918 : 30 वर्षे वयावरील ब्रिटिश महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. 1928 मध्ये हे वय 21 करण्यात आले.
- 1931 : भारतीय स्वातंत्र्यसेनानी, स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य, कायदेपंडित मोतीलाल गंगाधर नेहरू यांचे निधन.