Current Affairs of 3 December 2015 For MPSC Exams
चालू घडामोडी (3 डिसेंबर 2015)
सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी टी.एस.ठाकूर यांची निवड :
- न्यायाधीश एच.एल.दत्तू निवृत्त झाल्याने रिक्त झालेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी टी.एस.ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे.
- ठाकूर यांची नियुक्ती एक वर्षासाठी करण्यात आली असून ते 4 जानेवारी 2014 रोजी निवृत्त होणार आहेत. लवकरच ते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून राष्ट्रपती भवनामध्ये पदाची शपथ घेणार आहेत.
- जम्मू आणि काश्मीरच्या उच्च न्यायालयात ठाकूर यांनी आपल्या कारकिर्दीला प्रारंभ केला होता. जम्मू-काश्मीरच्या उच्च न्यायालयात 1990 साली त्यांची अतिरिक्त न्यायाधीश म्हणून निवड झाली होती.
- त्यांनी कर्नाटक आणि दिल्ली येथील उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम पाहिले होते. 2008 पासून ते दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहत होते. तर 2009 साली त्यांची निवड सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी झाली होती.
- आयपीएल गैरव्यवहार, तसेच स्पॉट फिक्सिंगप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या खंडपीठाचे ते नेतृत्त्व करत होते.
Must Read (नक्की वाचा):
सिंहस्थ कुंभमेळ्याचा समावेश “युनेस्को”च्या जागतिक वारसा यादीत :
- अलाहाबाद, उज्जैन, हरिद्वार व त्र्यंबकेश्वर-नाशिक या चार ठिकाणी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा समावेश “युनेस्को”च्या जागतिक वारसा यादीत करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे केंद्र सरकारने तत्त्वतः मान्य केले आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यास लवकरच सुरवात होईल.
- “युनेस्को”कडे प्रस्ताव पाठविल्यानंतर त्याचा निर्णय होण्यासाठी किमान सहा महिने लागतात. सांस्कृतिक मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार भारताचा प्रस्ताव अजून तयार करण्यासही सुरवात झालेली नाही. हा प्रस्ताव तयार करून “युनेस्को”कडे जूनच्या आधी पाठवावा लागतो.
- भारताकडून जून 2016 पर्यंत प्रस्ताव पाठविला गेला आहे.
ग्रंथ बाजारपेठेत भारताचा सहावा क्रमांक :
- भारतात निरक्षरतेचे प्रमाण सर्वाधिक आहे किंवा हल्ली सोशल मीडियामुळे पुस्तक वाचनाचे प्रमाण कमी झाले आहे, अशा तक्रारी कायम होत असतात. मात्र, हा सूर चुकीचा असल्याचे “नेल्सन इंडिया मार्केट”ने केलेल्या पाहणीत दिसून आले. भारतातील पुस्तक बाजाराची उलाढाल 261 अब्ज रुपये आहे, ती 2020 पर्यंत 739 अब्ज रुपयांपर्यंत पोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
- जागतिक पातळीवरील ग्रंथ बाजारपेठेत भारताचा सहावा क्रमांक आहे. आश्चर्याची बाब म्हणजे इंग्रजी पुस्तकांबाबत भारत दुसऱ्या स्थानावर आहे.
- “असोसिएशन ऑफ पब्लिशर्स इन इंडिया” आणि “द फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स” या दोन संघटनांनी “नेल्सन इंडिया बुक मार्केट रिपोर्ट 2015 : अंडरस्टॅंडिंग द इंडिया बुक मार्केट” हा अहवाल सादर केला आहे.
बीएसएनएल मोबाईलच्या वापरावर शुल्क आकारले जाणार नाही :
- गेल्या काही दिवसांपासून चेन्नईसह तमिळनाडूमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यात भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) सेवांवर पुढील आठ दिवस कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याची माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी दिली आहे.
- आजपासून पुढे आठवडाभर बीएसएनएल मोबाईलच्या वापरावर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. शुल्काची तपासणी करणारी स्वयंचलित यंत्रणा पुढील आदेशापर्यंत थांबविण्यात आली आहे.
आरबीआय लवकरच मार्गदर्शन तत्त्वे सादर करणार :
- बॅंकेचे आधारदर ठरविण्यासाठी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (आरबीआय) लवकरच मार्गदर्शन तत्त्वे सादर करणार असून त्यामुळे गृह आणि वाहन कर्जदरात कपात करण्यात होण्याची शक्यता आहे. परिणामी कर्जाचे हप्ते (ईएमआय) कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
- यापूर्वी व्याजदरात केलेल्या कपातीचा लाभ बॅंकांनी ग्राहकांना दिला नसल्याची दखल घेत आरबीआयने आधारदर ठरवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
- ही मार्गदर्शक तत्त्वे लागू करताना कर्जांसाठी असलेला आधारदर हा निधी व्यवस्थापनासाठी येणारा खर्च गृहित धरून निश्चित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
पाकिस्तानपुढे रशियाचा वाहिनीद्वारे नैसर्गिक वायुचा पुरवठा करण्याचा प्रस्ताव :
- उर्जेचा मोठा तुटवडा जाणवत असलेल्या पाकिस्तानपुढे रशियाने वाहिनीद्वारे नैसर्गिक वायुचा पुरवठा करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
- बदलत्या जागतिक राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर रशियास युरोपिअन युनियनची बाजारपेठ गमाविण्याच्या असलेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
- या भीतीच्या पार्श्वभूमीवर जगातील नैसर्गिक वायुचा दुसरा सर्वांत मोठा उत्पादक देश असलेला रशिया सध्या इतर पर्यायी बाजारपेठांच्या शोधामध्ये आहे. रशियाने यासंदर्भात याआधीच चीनशी अब्जावधी डॉलर्स किंमतीचा करार केला आहे.
- वर्षाला 2 अब्ज क्युबिक फुटांपेक्षाही जास्त नैसर्गिक वायुच्या तुटवड्याचा सामना करत असलेला पाकिस्तान ही रशियासाठी फार मोठी बाजारपेठ ठरण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
- याच भागामध्ये भारतास नैसर्गिक वायुचा पुरवठा करण्यासाठी वायुवाहिनी (तापी) बांधण्याचा प्रस्ताव असून ही वाहिनीदेखील तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान व पाकिस्तानमार्गे भारतात प्रवेश करणार आहे.
- तसेच रशियाने येत्या दोन वर्षांत पाकिस्तानला द्रवरुपातील नैसर्गिक वायुचाही (एलएनजी) पुरवठा करण्याची तयारी दर्शविली आहे. कराची येथून लाहोर येथे एलएनजी पुरवठा करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये याआधीच करार झाला असून या प्रकल्पासाठी रशिया 2 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा डिसेंबर 2017 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
‘टीम ऑफ द इयर’मध्ये कसोटी संघात केवळ रविचंद्रन आश्विनला स्थान :
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या ‘टीम ऑफ द इयर’मध्ये कसोटी संघात भारताच्या केवळ रविचंद्रन आश्विनला स्थान मिळाले आहे.
- एकदिवसीय संघामध्येही महंमद शमी हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. वर्षभरातील कामगिरीच्या आधारे कसोटी आणि एकदिवसीय संघ निवडला जातो. या संघाची बुधवारी घोषणा झाली.
- कसोटी संघामध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि पाकिस्तानच्या प्रत्येकी तीन खेळाडूंचा समावेश आहे. न्यूझीलंडच्या दोन खेळाडूंना या संघात स्थान मिळाले. या कसोटी संघाचा कर्णधार म्हणून इंग्लंडच्या ऍलिस्टर कुकची निवड झाली.
- तसेच एकदिवसीय संघामध्ये निवड झालेला महंमद शमी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेनंतर भारतीय संघातून बाहेरच आहे.
- अनिल कुंबळे, इयान बिशप, मार्क बाऊचर, बेलिंडा क्लार्क आणि गुंडाप्पा विश्वनाथ यांच्या समितीने या संघाची निवड केली. या संघासाठी 18 सप्टेंबर 2014 ते 13 सप्टेंबर 2015 या कालावधीतील कामगिरी लक्षात घेतली गेली.
- आयसीसीचा कसोटी संघ : डेव्हिड वॉर्नर, ऍलिस्टर कुक (कर्णधार), केन विल्यम्सन, युनूस खान, स्टीव्हन स्मिथ, ज्यो रूट, सर्फराझ अहमद (यष्टिरक्षक), स्टुअर्ट ब्रॉड, ट्रेंट बोल्ट, यासीर शहा, जोश हेझलवूड, आर. आश्विन
- आयसीसीचा एकदिवसीय संघ : तिलकरत्ने दिल्शान, हाशिम आमला, कुमार संगाकारा (यष्टिरक्षक), एबी डिव्हिलर्स (कर्णधार), स्टीव्हन स्मिथ, रॉस टेलर, ट्रेंट बोल्ट, महंमद शमी, मिचेल स्टार्क, मुस्तफिझूर रहमान, इम्रान ताहीर, ज्यो रूट.
ऑक्सफॅमचा अहवाल :
- जगातील तापमानवाढीस जगातील 10 टक्के श्रीमंतच जबाबदार आहेत कारण ते जीवाश्म इंधने जाळून वातावरणात कार्बन डायॉक्साईडचे उत्सर्जन करीत आहेत व ते प्रमाण कार्बन डायॉक्साईडच्या एकूण प्रमाणाच्या निम्मे आहे, असे ऑक्सफॅम या ब्रिटिश संस्थेने अहवालात म्हटले आहे.
- ऑक्सफॅमच्या अहवालात श्रीमंत देशांनाच तापमानवाढीस जबाबदार ठरवले आहे. पॅरिस येथील जागतिक हवामान परिषदेत पृथ्वीचे तापमान कुणामुळे वाढले याबाबत तू-तू मैं-मैं सुरू असताना हा अहवाल जाहीर करण्यात आला आहे.
- संयुक्त राष्ट्रांच्या पॅरिस येथील परिषदेत 195 देश सहभागी आहेत. हरितगृह वायूंच्या उत्सर्जनाची जबाबदारी कशी वाटून घेणार, हवामान बदलांना बळी पडत असलेल्यांना देशांची मदत कशी करणार, असे अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत. ऑक्सफॅमच्या हवामान धोरणाचे प्रमुख टिम गोर यांनी सांगितले की, श्रीमंत लोक किंवा देशांनाच कार्बन उत्सर्जनास जबाबदार धरले पाहिजे मग ते कुठेही राहात असोत.
मार्क झकरबर्ग यांनी आपले 99 टक्के शेअर मानवतेच्या कार्यासाठी केले दान :
- फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झकरबर्ग यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. सगळे जग आपली कन्या मॅक्झिमा व इतर मुलांच्या भल्यासाठी झकरबर्ग व त्यांच्या पत्नीने कंपनीच्या त्यांच्याकडे असलेल्या समभागांपैकी 99 टक्के भाग (शेअर) मानवतेच्या कार्यासाठी दान देण्याचे ठरविले आहे. या समभागांची किंमत 45 अब्ज अमेरिकी डॉलर्स आहे.
- लहान मुलांसाठी हे जग आनंददायी बनावे यासाठी फेसबुकचे 99 टक्के भाग आम्ही मानवतेसाठीच्या कार्याला देत आहोत, या समभागांची किंमत 45 अब्ज डॉलर्स आहे. रोखे व विनिमय आयोगाच्या माहितीनुसार येत्या तीन वर्षांत दरवर्षी 1 अब्ज डॉलर्सचे भाग विकले किंवा देणगी म्हणून दिले जातील.
- पत्नी चॅन झकरबर्ग यांच्या पुढील पिढीतील मानवी क्षमता व समानता वाढीसाठी मुलांवर निधी खर्च करण्याच्या योजनेस मार्क यांनी पाठिंबा दिला असून त्यासाठी ते निधी देणार आहेत. संस्थेकडील समभागांवर मार्क यांचे मतदानाचे हक्क कायम राहणार आहेत.
शीतलचा आर्टीका व अंटार्टिका या दोन्ही ध्रुवांवर पॅराजम्पिंग करण्याचा पराक्रम :
- शीतल महाजन या महाराष्ट्रीय महिला खेळाडूने पॅराजम्पिंगमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर दिमाखदार कामगिरी केली आहे. पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आलेल्या शीतलने आर्टीका व अंटार्टिका या दोन्ही ध्रुवांवर पॅराजम्पिंग करण्याचा पराक्रम केला आहे.
- पॅराजम्पिंगचा हा असा थरार करणारी ती पहिलीच भारतीय महिला आहे.
- शीतलच्या नावावर पाच विश्वविक्रम, 14 राष्ट्रीय विक्रमांची नोंद असून तिने आजवर 664 हून अधिक जम्प्स केले आहेत.
- शीतल महाजनला उत्तर ध्रुवावर तब्बल 24 हजार फूटांवरून पॅराजम्पिंग करताना सामोर आलेली आव्हानं, संपूर्ण तयारी आणि अनुभवांची चित्रफीत सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाली आहे.
‘स्मार्ट सिटी’चा साडेतीन हजार कोटी रुपयांचा आराखडा मंजूर :
- वाहतूक, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, घनकचरा व्यवस्थापन, ई-गव्हर्नन्स, पाण्याचा पुनर्वापर आदींसाठी तंत्रज्ञानाचा अंगीकार करून शहराचे रूप पालटण्यासाठी महापालिकेने तयार केलेला ‘स्मार्ट सिटी’चा सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांचा आराखडा स्थायी समितीने मंजूर केला.
- वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी विविध उपाययोजना करतानाच पाणीपुरवठा, मलनिस्सारण आदी सुविधांवरही भर देण्यात आला आहे. तसेच बाणेर, बालेवाडी आणि औंध क्षेत्र विकासासाठी सुमारे 1300 कोटी रुपयांच्या उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.
- केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात पहिल्या टप्प्यात पुण्याची निवड झाली आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या 20 शहरांत पुण्याची निवड व्हावी, यासाठी आराखडा तयार झाला आहे.
- अश्विनी कदम यांच्या अध्यक्षतेखालील स्थायी समितीने हा आराखडा मंजूर केला. आता सर्वसाधारण सभेची मंजुरी घेऊन राज्य सरकारमार्फत येत्या 15 डिसेंबरपर्यंत केंद्र सरकारला हा आराखडा सादर करण्यात येणार आहे.
- स्मार्ट सिटीचा आराखडा :
- पॅन सिटी उपाययोजना
- वाहतूक आणि गतिशीलता
- स्मार्ट सार्वजनिक वाहतूक (आयटीएमएस व्यवस्था, बसथांब्यांची सुधारणा, वायफाय सुविधा, वाहनांची देखभाल आदी) : 140 ते 160 कोटी रुपये
- वाहतूक नियंत्रण (केंद्रीय नियंत्रण कक्ष, ट्रॅफिक लाइट आदी) : 90 ते 145 कोटी
- स्मार्ट वाहनतळ (मल्टिलेव्हल पार्किंग) : 35 ते 40 कोटी
- देखभाल-दुरुस्ती व सातत्यपूर्ण उपक्रम : 275 ते 290 कोटी
- पाणीपुरवठा व मलनिस्सारण :
- शहराच्या सर्व भागांत 24 तास पाणीपुरवठा करणे : 355 ते 375 कोटी
- सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून ऊर्जानिर्मिती : 5 ते 10 कोटी
- देखभाल-दुरुस्ती : 60 ते 65 कोटी
- क्षेत्रनिहाय विकास योजना :
- नदीसुधारणा : 120 ते 140 कोटी
- स्मार्ट ग्रीड व सौरऊर्जा : 260 ते 280 कोटी
- स्मार्ट मीटरिंग (पिण्याच्या पाण्यासाठी) : 20 ते 25 कोटी
- पाण्याचा पुनर्वापर व पर्जन्य जलसंचय : 80 ते 90 कोटी
- घनकचरा व्यवस्थापन : 10 ते 15 कोटी
- ई-गव्हर्नन्स (आयटी कनेक्टिव्हिटी) : 20 ते 25 कोटी
- रस्त्यांचे सुसूत्रीकरण (पदपथांची संख्या वाढविणे, सायकल ट्रॅक तयार करणे आदी) : 190 ते 210 कोटी
- झोपडपट्टी क्षेत्रातील सामाजिक व आर्थिक विकास : 5 ते 10 कोटी
- वाहनतळ, बीआरटी, ई-रिक्षा, इलेक्ट्रिक बस आदींसाठी : 510 ते 550 कोटी
- एकूण देखभाल :
- दुरुस्ती व सातत्यपूर्ण उपक्रम : 1050 ते 1100 कोटी
- एकूण आराखडा 3225 ते 3480 कोटी
- केंद्र सरकारकडून पाच वर्षे मिळणारा एकूण निधी : 500 कोटी
- राज्य सरकारकडून पाच वर्षांसाठी मिळणारा निधी : 250 कोटी
- महापालिकेचा पाच वर्षांचा हिस्सा : 250 कोटी
दिनविशेष :
- भारत : वकील दिन
- 1818 : इलिनॉय अमेरिकेचे 21वे राज्य झाले.
- 1884 : डॉ. राजेंद्र प्रसाद, स्वतंत्र भारताचे प्रथम राष्ट्रपती यांचा जन्मदिन